(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मातीमध्ये हात घालतो त्याला कळते (गझल)

    मातीमध्ये हात घालतो त्याला कळते
    मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते

    प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो
    प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते

    जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ?
    जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते

    मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो
    किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते

    दिशा एकही राहत नाही हातामध्ये
    तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते

    ©®_ महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
    9579081342

      November 5, 2020


  • तू लपलास गुणांत

    कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी

    वाटे मजला, तू बसलास लपुनी

    इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती

    बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती

    ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी

    ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी

    फुलातील गंध, तल्लीन करी मना

    होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना

    फळातील रस, देई मधुर स्वाद

    उल्हासी मनाला, देऊनी आनंद

    वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी

    देई देहा सुख, अल्हाद्कारी

    रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण

    तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 7, 2020


  • निसर्गाचे चक्र

    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
    उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।

    एक एक पाकळी
    लहानशी कळी
    जाई उमलून
    फूल त्याचे बनून
    सुगंधी टपोरे फूल
    कांही वेळ राहील
    कोमेजून जाई
    देऊनी रुप बीजाचे
    परत अंकूरण होई
    दुजा एका झाडाचे ।।१।।
    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    एक एक पाऊल
    टाकते मुल
    वाढते हसून
    बनते यौवन
    एटदार तो दहधारी
    कांही काळाची उभारी
    देह होई विलीन
    पेटवूनी दिवे वंशाचे
    होई अवतरण
    नव्या एका मानवाचे ।।२।।
    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 2, 2017


  • मज तोडू नका

    लांबलचक ही दोरी माझ्या आयुष्याची

      July 12, 2026


  • स्वप्न दोष

    भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे ।
    तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।।

    शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन ।
    उघडले जाते मग विचारांचे दालन ।।

    किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही ।
    विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।।

    रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी ।
    कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।।

    वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी ।
    उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।।

    प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा
    स्वप्नाचा दोष काढूनी निरोगी बनविण्याचा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 25, 2016


  • मायेचा स्पर्श

    दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर
    अती उत्साहाने फूंकर घातली
    ...
    आणि फटाक्यांची माळ
    माझ्या हातातच फूटली

    जखम पाहुन सारी हळहळली
    वेदना मला ती असह्य झाली
    छोटी अनु जरी घाबरली
    धीर दिला मला,नाही ती रडली

    अगदी शांतपणे येऊन
    माझ्या उशाशी ती बसली
    मांडीवर डोकं घेऊन

    मायेने हात फिरवु लागली

    मी बळेबळे हसलो
    पण ती नाही फसली
    माझी वेदना तिच्या डोळ्यात
    स्पष्ट मला दिसली

    पप्पा, उगी उगी म्हणत
    मला थोपटू लागली
    संयमाने आसवांना
    पापण्यात दडवू लागली

    कोवळ्या त्या स्पर्शाने
    मनाला शांती मिळाली
    तळमळनाऱ्या वेदनेलाही
    हळूहळू झोप लागली

    शमलेली माझी वेदना
    माझ्या चेहऱ्यावरुन तिला कळली
    बघून माझ्याकडे
    अगदी गोड होती हसली

    सारे म्हणु लागले,
    कशी हिला ऐवढी समज आली ?
    तेंव्हा पहिल्यांदा वाटलं
    छोटी अनु मनानं खूप मोठी झाली.

    - डॉ.सुभाष कटकदौंड

      September 5, 2018


  • देता आणि खाता

    देणाऱ्याने देत जावे
    घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥

    सत्तेवरल्या मंत्र्याकडून
    भले मोठे पोट घ्यावे
    मऊ मऊ खुर्चीसाठी
    डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥

    गरीबशा लोकांकडून
    गरीबीची दु:खे घ्यावी
    पोटातल्या आगीसाठी
    हातचलाखी शिकावी ॥ २ ॥

    भडकलेल्या आगीवरुन
    तडकण्याचा गुण घ्यावा
    भरलेल्याशा 'खिशा'कडून
    आपला तेवढा 'हप्ता' खावा ॥ ३ ॥

    मेलेल्याने मरत रहावे
    खाणाऱ्याने खात जावे
    नरकातल्या जागेविषयी
    'खाऊबा'ने निश्चिंत रहावे ॥ ४ ॥

    (कवी विंदा करंदीकरांची 'देता' कविता, जी आमच्या शालेय अभ्यासक्रमात होती, ती प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)

    -यतीन सामंत
    ऋणानुबंध या कविता संग्रहातून
    (१९७४)

      June 23, 2022


  • मोगरा

    वेलीवरचा मोगरा आजही गंध वाहतो
    तुझ्या रूपाचे अजून गीत गातो..

    तुझ्याच गंधित आठवणी साठवत
    निरोप घेताना दरवळून जातो..

    ओंजळीत घेता दव पाकळ्यांचे
    अत्तर ह्दयीचे शिंपून जातो..

    तू नसतानाही असण्याची साक्ष
    सुगंधीत मोगरा देवून जातो.

      July 15, 2026


  • लज्जा

    साडी चोळी सुंदर नेसूनी,

    आभूषणें ती अंगावरती,

    लज्जा सारी झांकुनी टाकतां,

    तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।।

    आत्म्यासम ती लज्जा भासे,

    सौंदर्य जिवंत त्याच मुळें,

    लोप पावतां लज्जा माग ती,

    जिवंतपणा तो कसा कळे ।।२।।

    लपले असते सौंदर्य सारे,

    एक बिंदूच्या केंद्रस्थानीं

    शोध घेण्या त्याच बिंदूचा

    लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।।

    विकृत ती मनाची वृत्ती

    स्वच्छंदीपणात ती असते

    क्षणिक पणाच्या मागें लागून

    खरा आनंद ती गमावते ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 16, 2017


  • निशब्द उत्तर

    एक दिवस असा येतो,
    की मन रडतं... पण डोळे रडत नाहीत.
    ओठांवर हजारो शब्द असतात,
    पण ते उच्चारण्याची इच्छाच उरत नाही.

    कारण अनुभव शिकवून जातो...
    प्रत्येक गैरसमज दूर करता येत नाही,
    प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
    आणि प्रत्येकाला आपल्या मनाची किंमत कधीच कळत नाही.

    खूप समजावून पाहिलं,
    खूप वेळा स्वतःलाच चुकीचं ठरवलं,
    फक्त नातं टिकावं म्हणून
    स्वतःचं मन हजारदा मोडलं.

    पण एक क्षण असा येतो,
    जेव्हा मन थकून म्हणतं
    "आता पुरे...
    ज्यांना माझं मौनही समजत नाही,
    त्यांना माझे शब्द तरी काय समजणार?"

    मग राग संपतो,
    अपेक्षा विरघळून जातात,
    आणि उरते फक्त एक शांत स्मितरेषा,
    जी खूप काही सहन करूनही
    कुणालाच दोष देत नाही.

    आजही मनात प्रेम आहे,
    आदर आहे, आठवणी आहेत.
    पण मागे वळून हाक मारण्याची
    सवय मात्र कायमची सुटली आहे.

    कारण आता समजलंय...

    जिथे आपल्या भावनांची किंमत राहत नाही,
    तिथे शब्दांचाही अर्थ उरत नाही.
    म्हणून काही नाती सोडून द्यावी लागतात...
    आणि काही माणसं
    फक्त आठवणीतच ठेवावी लागतात.

    •ॲड. कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो.: ९०११८४१२१२

      June 23, 2026