एक प्रवास वर्णन....नागपूर जवळील उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव....
पुणे स्थित Insearch Outdoors आयोजित (८-१३ जून २०१६) ह्या वन्यजीव अभयारण्य सफारीला जायचा योग आला आणि धन्य झालो. माझ्या आयुष्यातील हा एक फारच आगळा वेगळा अनुभव म्हणावा लागेल. सर्वप्रथम ह्या सगळ्याचे श्रेय मी Insearch Outdoors संघाला देईन. अप्रतिम व्यवस्थापन, जबरदस्त नियोजन, उत्कृष्ट संघटन, वक्तशीरपणा, तसेच व्यावसाईक परंतु एकसंध कौटुंबिक जिव्हाळा असलेला तरुणाईचा हा संघ मला तर खूपच भावला. खास करून हे श्रेय शौरी सुलाखे आणि मयुरेश कुळकर्णी ह्यांना जाते. वय वर्ष ८ ते ८४ सगळे मिळून २३ जणांचे बांधलेले कडबोळे तर वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल. ह्या पोरांना असलेली जैवविविधतेची, प्राण्यांची, निसर्गाची आणि भौगोलिक माहिती तर तोंडांत बोटेच घालावयाला लावते. ही नुसती एक जंगल सफारी नसून आपल्या तुटपुंज्या ज्ञानात भरच टाकणारी एक कार्यशाळाच होती. माझ्या साठी तर हा आयुष्यातील वयाच्या ५३व्या वर्षी आलेला एक सुखद असा धक्काच होता. मी तर मंत्रमुग्धच झालो होतो.
तसेच उमरेड येथील श्री. निशांत बरडे ह्यांच्या श्री साई शीतल विश्राम मध्ये केलेली निवास व जेवणाची व्यवस्था तर अगदी घरच्या सारखी होती. त्यांचे काळजी घेणारे कुटुंबीय तर कौतुकास पात्र आहेत. त्यांनी केलेला आमचा पाहुणचार (व्यावसाईक असूनही) अगदी घरच्या सारखा होता हे फारच विशेष आहे. असो.. वरील प्रस्तावनेनंतर मूळ मुद्द्या कडे येतो.
मी आणि आमचे कुटुंब २०११ साली आयुष्यातील पहिल्या वहिल्या, केनिया येथील मसाई मारा ह्या जंगलातील सफारीला गेलो होतो, त्यानंतर वाटले की भारतातील जंगलामध्ये ही मजा येणारच नाही. परंतु माझा हा एक भ्रमच होता असे मला उमरेडला जाऊन आल्यानंतर वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर अशा सहलीला जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आणि तो ही इतका अविस्मरणीय आहे की मी तर आता ठरवलेच आहे की सहलीला अथवा सफारीला जायचे असेल तर Insearch Outdoors बरोबरच जायचे.
गरीब रथ ह्या रेल्वेने ८ जूनला संध्याकाळी पुण्यातून प्रवास सुरु झाला. सगळ्यांशी ओळखी होत होत सर्व सामान लावून मस्त पैकी गप्पा मारत मारत घरून नेलेल्या जेवणाचा आनंद घेत ९ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरला कधी पोचलो हेच कळले नाही. तेथून नाष्टा करून उमरेडच्या प्रवासाला बसने सुरवात केली. वातानुकुलीत रेल्वेतून वातानुकुलीत बस मध्ये बसलो. येथपर्यंत ठीक होते. जेंव्हा उमरेडला उतरलो तेंव्हा एकदम नागपूरच्या वातावरणाची झलक मिळाली आणि साधारण विदर्भी उन्हाच्या तडक्याचा अंदाज आला. पोहचल्यावर काही वेळात जेवण करून लगेचच पहिल्या सफारीला जंगलामध्ये निघालो. चार जिप्सी मध्ये आम्ही २३ जण विभागलो गेलो (एका जिप्सी मध्ये सहा) आणि जी काही धमाल आली ती तर सांगणेच कठीण आहे. आहो वाघ राहिला लांबच, वरून सूर्यदेव तळपत होते आणि आम्ही उघड्या जिप्सी मध्ये जीव मुठीत घेऊन बसलो होतो. साथारण निवासस्थान ते जंगल हा १५ किलोमीटरचा प्रवास दुपारच्या २.३० च्या नागपूरच्या तळपत्या उन्हात तो ही उघड्या जिप्सी मध्ये म्हणजे आमची फाटलीच होती असे म्हणायला हरकत नाही. पण जेंव्हा कऱ्हान्डला जंगलाच्या दरवाज्याशी पोचलो तेंव्हा एक वेगळीच उर्जा शरीरात निर्माण झाली. तेथील एकंदरीत वातावरण व जवळ जवळ अजून २५ जिप्सी पाहून तर हुरुपच आला आम्हांला. चला आता वाघ बघायचे आहेत असे म्हणून सोबत आणलेल्या थंड पाण्याच्या अर्धी बाटली संपवली व कानाला पंचा बांधून तयार होऊन बसलो. ३.३०ला जंगलाचा दरवाजा उघडला आणि एक एक करून सर्व २५ जिप्सी आत जायला निघाल्या. पण आपल्याला संयम असतो का.. तर नाही. १५ – २० मिनिटे झाली जिप्सीत बसून पण एकही वाघ दिसला नाही. झाले आमची म्हणजे माझी कटकट सुरु झाली. बायको, मुलगी, मुलीच्या सासू बाई तर माझ्या मुक्ताफलांमुळे वैतागून गेले होते. मी मला माझ्या जावयाने व मुलीने (रेल्वेच्या प्रवासात) भेट म्हणून दिलेला फोटो काढण्याचे यंत्र (कॅमेरा) सरसावून बसलो होतो पण वाघ काही दिसत नव्हता. इतर प्राणी, चितळ, नीलगाय, माकडे, सरडे, खूप सारे पक्षी, गवे, घोरपड दिसत होते पण वाघोबा गायब होते. थोडासा वैतागलोच होतो.. ते बघा ते बघा असे सगळेजण एकमेकांना सांगत होते. मी म्हणालो पक्षी का प्राणी हे जरा मला समजून सांगा, म्हणजे मला फोटो काढण्यासाठी तसे तयार राहायला. आमचा गाईड जिप्सीतून वाघाला शोधत होता. आता इकडे गेला असेल, त्या पाणवठ्यावर असेल, येईलच लवकरच पाण्यावर वगैरे वगैरे.. पण वाघोबा काही दर्शन द्यायला तयार नव्हते. आम्ही साधारण ४०-५० किलोमीटर जंगल पालथे घातले पण पालथ्या घड्यावर पाणीच पडले. हा दिवस आमचा नव्हताच. संध्याकाळी ७ वाजता परत जंगलाच्या मुख्य दाराशी आमची जिप्सी अयशस्वी होऊन आली. सगळे एकमेकांना विचारायला लागले.. सगळ्याचा वाघाने पोपट केलेला होता हे समजल्यावर मी जरा शांत झालो. परत निवासस्थानी उघड्या जिप्सीतून आलो व वऱ्हाडी जेवणावर ताव मारून झोपायच्या तयारीला लागलो. तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने येऊन सांगितले की उद्या पहाटे ३.०० ला सगळ्यांनी तयार राहायचे आहे. आपली उद्याची पहिली सफारी पहाटे ४ वाजता आहे. झाले. माझे तर अवसानच गळाले होते. पण मानसिक तयारी करून झोपायचा प्रयत्न केला व १२.०० वाजता झोपलो.
दुसऱ्यादिवशी पहाटे आमची फौज पहाटे ३.३० ला पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने उघड्या जीप्शीतून मार्गस्थ झाली. पहाटेचा गार वारा त्यात उघडी जिप्सी. साला मना मध्ये एक विचार आला की हा वाघ ही मंडळी इकडे निवासस्थानीच का आणत नाहीत उगाच एवढ्या पहाटे उठून त्याला कशाला बघायला जायचे.. बायकोला म्हणालो अग तुझ्यासाठी सुद्धा मी एवढा फिरलो नाही किंव्हा तुझीसुद्धा एवढी प्रतीक्षा केली नाही मी कधी. हा वाघ कोण लागून गेला. असे काहीतरी मुक्त संवाद चालू होते माझे.. अर्थात जीप्सितच.. तेवढ्यात मयुरेशची जिप्सी आम्हांला दिसली आणि त्याने सांगितले की त्यांना वाघ दिसला.. नुसता दिसला नाही तर जवळ जवळ ४५ मिनिटे तो त्यांच्या जिप्सीच्या पुढे चालत होता.. त्याने रस्त्यात शू केली, शी पण केली, झाडावर ओरखडे मारले, स्वतःच्या धुंधीत हा जंगलाचा राजा चालत होता. आमच्या चार जिप्सी पैकी दोन जिप्सींना हा सगळा सोहळा चित्रित करण्याची संधी मिळाली व त्यांचा आनंद गगनात मावेना असा होता. चला आमच्या पैकी निम्म्या लोकांना वाघाने दर्शन दिले ह्या विचाराने आम्ही आमच्या जिप्सीवाल्याला गाडी दामटायला सांगितले व एक झलक तरी मिळते आहे हे पाहायला वळलो. पण त्याने आमचा परत एकदा पोपट केला होता. पण आम्ही थोडे खुश थोडे नाराज असे परतीच्या प्रवासाला लागलो. वर लिहिल्या प्रमाणे ८ वाजता निवासस्थानी परत आलो थोडेसे आवरून जेवणा साठी तयार झालो व तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने दुपारच्या सफारीसाठी ३.०० वाजता निघायचे आहे अशी वर्दी दिली. सगळे पट पट जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी जावून विसावलो.
दुपारी परत तोच उघड्या जिप्सीतून रणरणत्या उन्हात प्रवास.. एक वेगळाच आनंद आणि आता तरी वाघ दर्शन देणार ह्या आशेने तयार होऊन निघालो. ह्या सफारीलाही आपला पोपट होऊ नये अशी आशा करत जंगलाच्या वाटा तुडवीत आमची जिप्सी धुराळा उडवीत वाघाला शोधात फिरत होती. ३.३० ते ६.१५ वाजेपर्यंत साधी झलकही दाखवली नाही पठ्ठ्याने. अगदी दिग्मुड होऊन परत निघालो. काही जिप्सी दुसऱ्या दिशेला शोधात होत्या तर काही अजून इकडे तिकडे आशेवर फिरत होत्या. जंगलाच्या नियमानुसार फक्त शेवटची १५ मिनिटेच राहिली होती आणि तेवढ्यात आमच्या पुढील ५०० मीटर लांब असलेल्या जिप्सीला एका ओढ्यात झोपलेली एक वाघीण दिसली आणि आमच्या जिप्सी वाल्याने लगेच गाडी दामटून त्या ओढ्याशी नेली व आम्हांला त्या वाघिणीचे दर्शन घडवले. एकदाचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जो तो फोटो काढण्यात गुंग होता. ती वाघीण (चांदी/बरखा) शांतपणे ओढ्यात पहुडली होती आणि तुच्छतेने आमच्या कडे हे कोण वेडे आलेत म्हणून पाहत होती. (ह्या जंगलात प्रत्यक वाघाला नाव दिले आहे. तेवढ्यात जवळ जवळ १०-१५ जिप्सी तेथे येऊन धडकल्या आणि प्रेतेकाला त्या वाघिणीचे फोटो काढण्याची एक स्पर्धाच मला जगलात अनुभवायला मिळाली. लोक ओरडत होते, भांडत होते. सगळे नियम धाब्यावर बसवून जेवढे शक्य होईल तेवढे त्या वाघीणीस त्रास होईल असेच वागत होते. पण करणार काय येथे आलेला प्रत्यके प्रवासी हा फक्त वाघ बघायला आला असल्यामुळे कोणाचेच कोणाशी काहीच चालत नव्हते. पण एकदाचा एक तरी वाघ दिसला ह्या आनंदात आम्हीं वेळ संपत आली म्हणून मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने वाटचाल करायला सुरवात केली होती. एकंदरीच मजाच आली होती. काळवंडलेले सगळे चेहरे वाघ दिसल्यामुळे थोडेसे उजळले होते एवढेच. परत निवासस्थानी ८ वाजता पोचलो. दमलेले काहीजण जेवण करून झोपायच्या तयारीला लागले होते आणि काहीजणांनी म्हणजे परुष लोकांनी गप्पांची मैफिल रंगवली होती.
इतक्यात शौरी आणि मयुरेशने सागितले की उद्या पहाटे दोन जिप्सी ३० किलोमीटर लांब असलेल्या गोठणगावं जगलात पहाटे जाणार आहोत व दोन जिप्सी दुपारी जाणार आहते. जे सकाळी गोठणगावंला जाणार नाहीत ते जवळच एका जंगलात पक्षी दर्शनाला जाणार आहेत. आमचा नंबर पहाटेचा होता त्यामुळे गपचूप गप्पांची मैफिल उरकती घेवून जेवण करून झोपयला गेलो.
भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून ३.१५ ला ३० किलोमीटर उघड्या जिप्सीतून प्रवास करून आम्ही गोठणगावं जंगलात पोह्चोलो. हा अनुभव गोठवनाराच होता पण जंगल वेगळे असल्यामुळे व येथे वाघ दिसण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आशावादी होतो. सफारी सुरु झाली. जंगल खूपच छान होते. गाईड मुलगी होती. पण वाघ साहेब आजही आमच्यावर नाराज होते. घूम घूम घुमवले पण साहेबांनी काही आम्हांला दर्शन नाही दिले. काही लोकांना मिळाले पण साले आमचे नशीबच जरा गांडू होते. पण एक मात्र चांगले होते की बाकीचे प्राणी मात्र अगदी जवळून पाहता आले. पक्षी तर फारच छान होते. माकडांनी तर त्यांच्या माकडचेष्टांनी आमची खूपच करमणूक केली होती. कोणीतरी सांगितले की काल मयुरेशला दिसलेला श्रीनिवास नावाचा वाघ आज ह्या जंगला मध्ये आलेला आहे व त्याने काही जिप्सींना दर्शन दिले आहे तसेच T६ नावाची वाघीण सुध्दा दिसली आहे. आम्हांलाच दिसली नव्हती. असो. पण मला एकंदरीत सर्व सफारी मध्ये जी काही मजा आणि अनुभव येत होता तो अफलातून असाच होता. वाघ दिसणे न दिसणे हे नशिबाचा भाग समजून मी संपूर्ण सफारीचा मनमुराद आनंद लुटत होतो. खरोखर मी ह्या सगळ्या वातावरणात रंगून गेलो होतो आणि माझ्यातील कवीला साद घालत होतो...आणि सुचले की अंदाज वाघांचा कधी बांधलाच नाही... वाघ हा असा मला सहज दिसलाच नाही...वाघासाठी केली वणवण.. त्याने केला आमचा पोपट.
तिकडे आमचा दुसरा समूह सकाळी जाऊन दुसऱ्या जंगलात जाऊन खूप पक्षी पाहून आला होता व एकदम खुश होऊन मस्त पैकी निवासस्थानी आराम करत होता कारण त्यांना दुपारच्या सफारीला जायचे होते. परत एकदा ३० किलोमीटरचा उघड्या जीप्सीतील प्रवास करून दुपारी ११ वाजता पोचलो... नाष्टा केला आणि आडवे झालो.
तेवढ्यात मयुरेश आला आणि म्हणाला जिप्सीत एक जागा आहे.. कोणाला दुपारच्या सफारीला यायचे आहे का.. झाले...मी लगेच तयार होऊन बसलो.. व निघण्याच्या तयारीला लागलो कारण मला असाही पक्षी बघण्यात फारसा रस नव्हता.
परत तोच पहाटे सारखा प्रवास दुपारच्या विदर्भातील चांदण्यात, एक वेगळाच अनुभव आणि मनाला उभारी देणारा असा प्रवास का सोडायचा ह्या भावनेने तयार झालो आणि जिप्सीत जावून बसलो. वाघ दिसो अथवा न दैसो मला त्याच्या काही घेणे देणेच नव्हते. कारण जगलात तर वाघ आहेच पण असा अनुभव परत घेता येईल का नाही ह्या विचारांनी मला थोडीशी भुरळच घातली होती. तसा मी वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भांदक येथे २० वर्षांपूर्वी फिरलेलो होतो पण ते कामा निमित्त. दुपारी ३.१५ ला परत मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो, ३.३० ला जंगलात प्रवेश केला.. सचिन नावाच्या गाईडशी गप्पा मारल्या, जो पुण्यात नोकरीला होता. मला जरा वाघ दिसण्याची अथवा तो नक्कीच दाखवेल अशी वेडी आशा मनात निर्माण झाली. पण हे समजलेच नाही की हे जंगल आहे आणि येथे राज्य त्या वाघाचे आहे सचिनचे नाही. तरीही खूप खूप प्रयत्न करूनही ह्या सफारीलाही अगदी ३०-३० मिनिटे एका ठिकाणी थांबून वाट पाहूनही वाघ साहेबांनी दर्शन दिले नाही. पण माझी काहीच तक्रार नव्हती. कारण मला दोन तीन प्रवाश्यांनी सागितले होते की ही त्यांची १६वी सफारी आहे पण अजून त्यांना वाघ दिसला नाही. मी तर खूपच नशीबवान होतो की मला तिसर्याच सफारीला वाघाचे दर्शन झाले होते. असो. ह्या वेळेसही खूप सारे प्राणी आम्हांला दिसले जे सुध्दा ह्या जंगलाचा एक भाग आहेत. पण लोक फक्त आणि फक्त वाघच बघायला येतात आणि स्वत:चा हिरमोड करून घेतात. उशिरा का होईना मला हे समजले आणि मी संपूर्ण सफारीचा आनंद घेऊ शकलो हे मात्र एकदम खरे आहे.
रात्री परत निघालो आणि पावसाने आम्हांला गाठले. जिप्सी उघडी असल्यामुळे थोडेशे भिजायला झाले पण तो ही एक मस्त अनुभव मनातील करपलेल्या कातडीला प्रफुल्लीत करून गेला आणि रात्री गप्पांच्या फडात आपसूकच एक उर्जा देऊन गेला. कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी ओळख होऊन गप्पा व प्रत्येकाचे अनुभव ऐकण्यात गुंग होऊन गेलो. माझ्या काही कहाण्या ऐकवल्या व त्यांच्याही ऐकल्या तसेच काही वयस्कर मंडळींकडून मोलाचे सल्ले व आपुलकीच्या चार गोष्टी ऐकून मन कसे भरून आले होते. कोण कुठली ही माणसे पण दोन रात्रीत अगदी घरचीच वाटायला लागली होती. हेच तर ह्या सहलीचे फलित होते असे मला तरी वाटले.
सहलीचा शेवटचा दिवस, सकाळी ६ वाजता उठून जवळील एका जंगलात पक्षी पाहण्यासाठी बाहेर पडलो.. खूप पक्षी व पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे किडे पाहायला मिळाले. शौरीने आम्हांला एकंदरीतच ह्या विषयातील दिलेली माहित मला तर अचंबित करून गेली. आपण किती अज्ञानी आहोत ह्याची जाणीव झाली. शौरी आणि मयुरेश काय किंव्हा Insearch Outdoors चा संघ काय, तुम्हांला फक्त जंगलात फिरवत नाहीत तर आपल्या सृष्टी सौदर्याची आपल्याला जाण करून देतात हे त्यामधील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. निसर्ग सौदर्य कसे अनुभवायचे व कसे पाहायचे आणि किती आजमवायचे हे आयुष्यात उशिरा का होईना मला शिकवून गेले.
पक्षी पाहून आलो तर नाष्टा तयार होता. परतीच्या प्रवासाची तयारी करायाची होती आणि थोडासा आरामही. दुपारी १.३०ला जेवण करून आम्ही तयार होतो न होतो तोच आम्हांला नागपूरला पोहोचवायला बस तयार होती. परत ४ वाजता नागपुरात प्रवेश आणि प्रसिद्ध हल्दीराम दुकानातील संत्रा बर्फी खरेदी उरकून सगळेजण रेल्वेच्या वातानुकुलीत प्रतीक्षालयात विसावलो व ६.३० मिनिटांनी सुटणाऱ्या गरीब रथ गाडीची वाट पाहत पहुडलो होतो. आमच्यातील काही जाणकार (माझ्यासारखे) जवळील उपहार गृहातून गाडी मधील रात्रीच्या जेवणाच्या व्यवस्थेत गुंतून गेलो.
एकंदरीत ही जंगल सफारी खूपच छान आणि अगदी व्यवस्थित पार पडली. खूप सुखावून गेली आणि परत परत अशा सहलींना जाण्यासाठी मनाची तयारी करून गेली. मी तर ठरवले आहे की आता अशा सहलींची एकही संधी सोडायची नाही. अर्थातच Insearch Outdoors बरोबरच.
-- रविंद्र कामठे, पुणे
भ्रमणध्वनी -९८२२४०४३३०
August 20, 2016
यासाठी आपण जेथे राहत असाल त्याठिकाणी इस्कॉनचे केंद्र असल्यास आपणाला याविषयी मौलिक मार्गदर्शन मिहू शकेल. आणि इस्कॉनचे केंद्र नसेल तर आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधा. मी अवश्य आपणाला प्रमाणित सर्वश्रेष्ठ परंपरेशी संलग्न असलेल्या प्रामाणिक कृष्णभक्ताची भेट घालून देईल.
January 5, 2011
कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे…
आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली….
काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती....
तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी माझ्या …"
मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !
आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.
नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.
तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !
ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.
जो काव्यमधु तू मागत आहेस त्याचे कित्येक मधुघट रिते होऊन घरी पडून आहेत ज्याकडे बघायला आता फुरसत राहिली नाही. आता मात्र नव्याने हे मधुघट माझ्याकडे सहजतेने निर्मिले जावेत अशी माझी शारीरिक अवस्था राहिलेली नाही अशी दिनवाणी कबुली या कवितेच्या सुरुवातीस कवींनी दिली आहे.
जेंव्हा माझी गात्रे शिथिल नव्हती, स्मृती सक्षम होत्या अन शरीर साथ देत होते तेंव्हा माझ्या मनातली फुलपाखरे हा काव्यमधु अगदी लीलया निर्मित होती. अगदी कमळाच्या विशाल द्रोणी भरून मी हा शब्दरस तुझ्या स्वाधीन करत होतो. तेंव्हा मला साधनांची कमतरता भासत नव्हती. मनातली उर्मी दाटून आली की ती शब्दबद्ध व्हायची पण आता तशी परिस्थिती उरली नाही. तुला देण्याजोगे माझ्याकडे काही नुरले तरी माझी पूर्वीची ही काव्यसेवा ध्यानात घेऊन तू आता माझ्यावर रागावू नकोस. तू मला माफ कर अन माझ्यावर थोडासा दयाभाव दाखव अशी विनंती कवी आपल्या 'त्या' मित्रास करतात.
माझा हा अखेरचा प्रवास सुरु आहे, हा प्रवास कधी अन कसा संपेल हे मलाही माहिती नाही. मात्र शेवटच्या काळात मला त्या परमात्म्याचे परमेश्वराचे आराधन करायचे आहे. त्याचे स्तवन करायचे आहे, त्याच्या पूजनासाठी माझ्या प्रतिभेचे उरले सुरले चार शब्द मी जपून ठेवले आहेत, या भावनेचे अगदी हळवे वर्णन करताना भा.रा.तांबेंनी जो उपमा अलंकार वापरला आहे तो अगदी अद्भुत अन विलक्षण परिणामकारी असा आहे. ते म्हणतात की दुधाच्या नैवेदयाची एकच वाटी माझ्या गाठी आहे अन देवपुजेस्तव एकच काटेरी फुलझाड (कोरांटी) मी कसेबसे माझ्या अंगणी तग धरून राखिली आहे ! उरले सुरले काव्यस्फुरण फक्त प्रभूचरणी अर्पण करण्यासाठी राखून ठेवल्याने आता तुला देण्यासाठी माझ्याकडे मधुघट राहिले नाहीत याची मला खूप खंत वाटते आहे असे कवी इथे सुचवतात.
आपल्या मित्रास किंवा आपल्या रसिक वाचक- चाहत्यांना आपल्याकडून काय लिहिले जावे याची मर्मभेदी जाणीव तांबेंना आहे. युवा मनाची स्पंदने ज्या प्रेमभावनेत कैद असतात, ती प्रेमभावना युवामनाची भाषा असते अन त्यांचे श्वास हीच त्यांची कुजबुज असते. प्रतिभावंत साहित्यिक या श्वासांना शब्दात परावर्तित करतात अन या कुजबुजीला कवितेचे प्रारूप मिळवून देतात. हे प्रेमकाव्य आपल्या नवनावोन्मेशशाली प्रतिभासामर्थ्याने कवी जिवंत करतात अन वाचक त्या काव्यास आपल्या हृदयात अढळ स्थान देतात. याहीपुढे जाऊन काहींना जगण्याचे ध्येय हवे असते तर काहींना जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असतो त्यासाठी ते अविरतपणे संसारसुखाचे मर्म शोधत असतात. कवी मात्र फुलांचे परागकणदेखील न दुखावता त्यातून अलगद मधुर मधुकण शोषून घ्यावे इतक्या सहजतेने जीवनातील मर्म हलकेच समोर मांडत जातात. त्यातला अर्थ बघून आपण दिग्मूढ होऊन हरखून जातो. कवी म्हणतात की आता अशा भावना, असे विचार शब्दबद्ध करावे इतके भान माझ्याकडे उरले नाही. माझ्या अंगी तितके बळही राहिले नाही.तेंव्हा तू त्याविषयीची आर्जवे मला करू नकोस !
शेवटच्या कडव्यात कवी अगदी आर्ततेने ह्रदयाला पीळ पडतील अशा शब्दात आपली व्यथा मांडतात. 'आता अंतःकाळ जवळ आला आहे, ज्याप्रमाणे पूर्वेस रम्य प्रभातीस उगवलेला सूर्य निरव सांजेला मावळतो हा निसर्गनियम आहे त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकास मृत्यू अटळ असतो. या निसर्ग नियमास आपण कसे अपवाद असू शकू ? आता माझा श्वाससूर्य ढळणार आहे, ही सांजवेळ मला काहीशी कातरवेळ वाटते आहे अन त्यामुळे थोडीशी घबराट देखील माझ्या मनात दाटून आली आहे असे प्रामाणिक कथन ते इथे करतात. अशा या बिकट प्रसंगी काव्यमधुचे स्फुरण होईल तरी कसे असा सवाल कारतानाच ते म्हणतात की आता माझे चित्त कशातच गुरफटले नसून माझे नेत्र केवळ आणि केवळ पैलतीरावरच्या आत्मीय ज्योतीत लीन झाले आहेत. तेंव्हा माझ्या सख्या आता मला तू ह्या काव्यमधुचा आग्रह करू नकोस असे म्हणत म्हणत साश्रूपूर्ण शब्दांची ओंजळ ते आपल्या मित्राच्या ओंजळीत रिती करतात.
कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या जर्जर माणसाने मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे.
-- संगीत.. या WhatsApp ग्रुपवरुन..
May 29, 2017
अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच खल करून अशी कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान मनमोहनसिंग व कोंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले होते असा विरोधकांचा आरोप आहे.
June 5, 2011
देशात विठ्ठल कामत यांनी पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रॅन्चायझी पद्धतीने केली. आज देशातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील ४५० हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे.
November 28, 2021
बागेतील तारका-
July 10, 2013
पालकांनी ही कविता जरुर वाचावी
April 17, 2011
फोर्थ इंजिनियर , थर्ड मेट, कॅप्टन, स्टीवर्ड, मोटरमन , एक ए बी आणि मी पकडून असे एकूण सात जण मनौस शहरात सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आलो होतो. सकाळी जहाजावरुन जाताना छोट्या स्पीड बोट मध्ये पायलट लॅडर ने सगळे एका मागोमाग उतरले.
July 1, 2021
प्रतिमेची पुजा करिता,
May 27, 2011
आता आपणच ठरवा शैव आणि वैष्णवात श्रेष्ठ कोण?
December 3, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti