वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१. चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||
अर्थ :
चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता (काळजी) जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर (मृताला) जाळते. हे संस्कृत सुभाषित फारच प्रसिद्ध आहे.
२. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्, नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||
अर्थ :
(खूप) कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. (विसरल्यामुळे) गेलेली विद्या अभ्यास करून (पुन्हा) मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ (वाया) घालवला तर तो गेला तो गेलाच. (वेळ वाया घालवण टाळावं). वेळेचे महत्व वर्णन केले आहे. गेलेली वेळ किती मौल्यवान असते कारण ती परत येत नाही.
३. श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |
न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||
अर्थ :
उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.
कबीराचा दोहा पण हेच सांगतो. कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षणमे प्रलय होगा, बहुरी करेगा कब?
४. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |
रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय
अर्थ :
हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे (न थांबता, सतत) समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक (दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच) विचार येवो. देवाची भक्ती करतांना खूप तल्लीन व एकरूप होऊन करावी लागते तरच देव तुम्हाला पावतो. म्हणूनच मीरादेवीस श्रीकृष्ण भेटला.
५. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||
अर्थ :
महाभारत हे पाचवा वेद (वेदा इतका पवित्र) आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे. (अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो). उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. (मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.)
हा पण एक प्रसिद्ध श्लोक आहे.
६. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||
अर्थ : (फार) मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर (सगळ्यांशी) भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून (माणसाने) मध्यममार्ग स्वीकारावा हे उत्तम.
७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |
अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||
अर्थ:
सज्जन (नुसत) पाहिल्यावर नारळासारखे (खडबडीत; कडक; कठोर असावेत असे दिसते); पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे (दुर्जन) बाहेरूनच फक्त बोराप्रमाणे आकर्षक असतात. (पण अनुभव चांगला येत नाही.) पण आतून दुष्टच असतात.
८. नभो भूषा पूषा कमलवनभूषा
मधुकरो वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम् |
मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः
सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः ||
अर्थ:
सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या बागेला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्याने वाणी शोभून दिसते. अधिक संपत्ती दान करण्याने सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंतऋतु मध्ये मदनाचा अस्तित्व शोभून दिसते. सभेमध्ये चांगल वक्तृत्व शोभून दिसते. (तर) नम्रता सर्व गुणांना खुलवते.
९. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||
अर्थ:
दुष्ट माणसाला दुसऱ्याच वैगुण्य मोहोरी एवढ असलं तरी डोळ्यावर येत, पण स्वतः मधे मात्र बेलफळाएवढा (मोठा) दोष दिसत असून सुद्धा तो न दिसल्याप्रमाणे वागतो. अशाच अर्थाची मराठीत म्हण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
१०. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च |
पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् ।।
अर्थ:
शत्रू, रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना, रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे. महाराणा प्रताप याने महंमद घोरीला युद्धामद्ध्ये हरवून बारा वेळा जीवदान दिले पण घोरीनेच त्याला शेवटी ठार केले.
११. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम।
उदार चरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम ।।
अर्थ:
हे माझे, हे दुसऱ्याचे असे असा विचार छोट्या मनाचे लोक करतात. विशाल मनाचे लोक हि पृथ्वी आपले कुटुंब आहे असा विचार करतात.
१२. उद्यमं सक्षमं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
षडेते यत वर्तन्ते तत्र देवः सहायकृत। ।
अर्थ:
प्रयास, साहस, धैर्य, बुद्धि , शक्ति तथा पराक्रम देखील साहाय्य करतात. ज्याच्याकडे हे सहा गुण आहेत त्याला देव देखील साहाय्य करतात.
१३. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
मनुस्मृति ८. १५
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
महाभारत ३.११४.१३१
एकाच अर्थ असणारे हि सुभाषिते वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत झाली आहेत.
अर्थ:
(ज्याचा) धर्म नष्ट झाला (तोही) संपून जाईल, जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून मी धर्माचा त्याग करणार नाही किंवा धर्माला नष्ट करणार नाही, कुणीही नष्ट करू नये. तसे केले तर मीच नष्ट होईन, तोच नष्ट होईल.
१४. उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे।
असाधुजनसंपर्के यः पलायेत् स जीवति ॥
चाणक्यनीतिदर्पण अ. ३.१९
अर्थ: जो माणूस नैसर्गिक आपत्ती, परक्याचा हल्ला, भयानक दुष्काळ, दुष्टांची संगति अशापासून दूर पळून जातो तो जीवंत राहतो. अशा वेळी स्वतःचा जीव वाचवणेच सर्वात जास्त महत्वाचे असते. हिंदी मधल्या म्हणी प्रमाणे सिर सलामत तो पगडी पचास।
१५. विद्याभ्यासो विचारश्च समयोरेव शोभते।
विवाहश्च विवादश्च समयोरेव शोभते ॥
सुभाषितरत्नभण्डागार -सुधर्मादिनपत्रिका
अर्थ: समान (पातळीवरील) लोकांनी एकत्र विद्या शिकणे आणि विचारविनिमय करणे बरे दिसते, त्याप्रमाणेच समान लोकांमध्येच विवाह आणि वादविवाद होणे चांगले असते.
१६. गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो
बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल:।
पिको वसन्तस्य गुणं न वायस:
करी च सिंहस्य बलं न मूषक: ॥
अर्थ: गुणी पुरुषच दुसऱ्याचे गुण ओळखू शकतो. गुणहीन पुरुष ते ओळखू शकत नाहीत. बलवान पुरुषच दुसऱ्याचे बळ (शक्ती) ओळखतो. बलहीन पुरुष हे करू शकत नाही. वसन्त ऋतु आला हे कोकिळा ओळखते, कावळा नाही. वाघाची शक्ती हत्तीचं जाणतो, उंदीर नाही.
१७. कन्या वरयते रुपं
माता वित्तं पिता श्रुतम्
बान्धवा: कुलमिच्छन्ति
मिष्टान्नमितरेजना:
अर्थ: विवाहाच्या वेळी कन्येला (वधूला) सुंदर पती पाहिजे असतो. तिच्या आईला सधन जावई पाहिजे असतो. तिच्या वडिलांना विद्वान जावई पाहिजे असतो, तसेच तिच्या नातेवाईकांना चांगले खानदान पाहिजे असते. परंतु बाकी लोक लग्नात केलेल्या फक्त मिष्टान्ना करता येतात.
१८. अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणम्।
चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम्॥
अर्थ: घोड्याचा वेग हि त्याची ओळख आहे, मस्त चाल हे हत्तीचे आभूषण आहे, चातुर्य हा स्त्रीचा अलंकार आहे व सदा उद्द्योगी राहणे हे विद्वान पुरुषाचे लक्षण आहे.
१९. वॄत्तं यत्नेन संरक्ष्येद् वित्तमेति च याति च।
अक्षीणो वित्तत: क्षीणो वॄत्ततस्तु हतो हत:॥
अर्थ:
आपल्या चारित्र्याचे रक्षण सदैव केले पाहिजे. कारण सदाचारी माणसाच्या साठी चरित्र हेच सर्वस्व असते. पैसा( धन) येते व जाते. गेलेला पैसे परत मिळवता येतो, नष्ट झालेले चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. ती व्यक्ती समाजात तोंड दाखवायच्या लायकीची राहत नाही. मेलेल्या माणसा सारखी त्याची स्थिती असते.
२०. दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत्।
यावज्जीवं च तत्कुर्याद् येन प्रेत्य सुखं वसेत्॥
अर्थ: मनुष्याला दिवसभर असे (चांगले) काम केले पाहिजे कि तो रात्रभर सुखाने झोपू शकेल. आणि जिवात जीव असे पर्यंत सत्कृत्य केले पाहिजे कि मेल्या नंतर सुद्धा तो सुद्धा सुखी राहील.
२१. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥
अर्थ: जसे आकाशातून पडलेले पाणी कसेही (ओढा, नदी, इत्यादी ) मार्गे शेवटी समुद्राला जाऊन मिळते, तसे कोठल्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच परमेश्वरास मिळतो.
२२. मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे।
हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते॥
अर्थ: मूर्ख लोकांचे पाच गुणधर्म असतात. ते अहंकारी असतात, त्यांच्या तोंडात कायम वाईट शब्द असतात, ते जिद्दी असतात , दुसऱ्या लोकांचे अजिबात ऐकत नाहीत व नेहमी वाईट चेहरा करून बसतात.
२३. अष्टौ गुणा पुरुषं दीपयंति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥
अर्थ: आठ गुण पुरुषांना शोभतात – बुद्धि, सुन्दर चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, मितभाषिता, यथाशक्ति दान आणी कृतज्ञता.
२४. क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥
अर्थ: क्षमा निर्बल लोकांची शक्ती आहे, क्षमा बलवान लोकांचे आभूषण आहे. ह्या जगास क्षमेनेच वश केले आहे. क्षमेमुळे कोणती गोष्ट्य प्राप्त होत नाही? (सर्व गोष्टी प्राप्त होतात).
२५. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रम नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ।।
अर्थ: (यज्ञा मद्धे) अश्व नाही, हत्तीही नाही, व्याघ्र तर नाहीच नाही पण गरीब बोकडाचा (अजापुत्र) मात्र बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बलांना घातक असतात.
आजकालच्या काळात मोठे मोठे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. पण त्यात बळी कोण जातो?
त्याच्या वरचा हा नवीन श्लोक :
सेक्रेटरी नैव,चेअरमन नैव, मिनिस्टर नैवे च नैवे च ।
कनिष्ठ लिपिकः बली दद्ध्यात, सी आर दुर्बल घातकः ।।
अर्थ: (घोटाळ्यात) सेक्रेटरी नाही, चेअरमन, मिनिस्टर तर नाहीच नाही,
बिचारा कनिष्ठ बाबू चा बळी जातो कारण त्याचा गुप्त अहवाल (सी आर) खराब केला जातो.
-- डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
दिनांक: २३.०४. २०२३
संस्कृत भाषा हि सुभाषित रत्नांची खाण आहे. त्यातून जितकी रत्ने शोधून काढावी तेवढी थोडीच. आपण ह्या लेखमालेत अशी रत्ने शोधून त्यांचे मराठी भाषांतर करणार आहोत. शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकवलेली असतात ती तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत. म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज असते.
There may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही!


दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होऊ शकेल. यासाठी ठशांचं ‘वय’ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं चालू आहेत; परंतु संशोधकांना यात अजून यश आलेलं नाही. मात्र नजीकच्या भविष्यकाळात हे शक्य करणारं संशोधन, अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठातील यंग जीन ली यांनी अलीकडेच केलं आहे. यंग जीन ली यांनी अँड्रयू पॉलसन यांच्या सहकार्यानं केलेलं हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘सेंट्रल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. हे संशोधन म्हणजे यंग जीन ली यांनी तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्वतःच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे.
आताच्या या अभ्यासात या संशोधकांनी एकाच व्यक्तीच्या बोटांचे चौदा ठसे घेतले. त्यानंतर हे ठसे ज्या काचांवर घेतले, त्या काचा प्रयोगशाळेतच, परंतु उघड्यावर ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रयोगाच्या काळातलं, प्रयोगशाळेतलं तापमान, आर्द्रता, हवेतील ओझोनचं प्रमाण, इत्यादी सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवली. त्यानंतर त्यांनी, या चौदा ठशांचं वेगवेगळ्या दिवशी रासायनिक विश्लेषण केलं. सुरुवातीला मोजक्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण असणाऱ्या या पदार्थांना, हवेतल्या ओझोनशी झालेल्या रासायनिक क्रियांमुळे अधिकाधिक गुंतागुंतीचं स्वरूप येऊ लागल्याचं या संशोधकांना आढळलं. या ठशांतील ट्रायअसाइलग्लिसेरॉल या रसायनाचं प्रमाण सात दिवसांत, तर स्क्वॅलिन या रसायनाचं प्रमाण तीन दिवसांत लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर या रासायनिक क्रियांत तयार होणाऱ्या डेकॅनॉइक आम्लासारख्या स्निग्धाम्लांचं, तसंच इतर अनेक रसायनांचं प्रमाण वाढत गेलं होतं. ओझोनशी क्रिया होऊन नष्ट होणाऱ्या रसायनांची, तसंच या क्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनांची, त्यांच्या प्रमाणानुसार तपशीलवार माहिती या विश्लेषणातून मिळाली. यांतील कोणत्या रसायनांच्या प्रमाणात काळानुरूप होणाऱ्या बदलाचा, ठशांचं वय काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज या संशोधकांना येऊ शकला.
यंग जी लीन आणि अँड्रयू पॉलसन यांचे हे प्रयोग प्राथमिक स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं यापुढचे प्रयोग केले जाणार आहेत. याशिवाय पुढचे प्रयोग हे अनेक व्यक्तींवर केले जाऊन, त्यांतून सर्वंकष स्वरूपाची माहिती गोळा केली जाईल. या माहितीच्या विश्लेषणासाठी वेगळी संगणकीय पद्धतीही विकसित केली जाईल. त्यामुळे या तंत्रातील अचूकता वाढून, गुन्ह्याच्या तपासातील अचूकताही वाढण्याची खात्री या संशोधकांना वाटते आहे. किंबहुना फक्त हे संशोधकच नव्हे तर, गुन्ह्यांचा शोध घेणारे तज्ज्ञही या तंत्राबद्दल अपेक्षा बाळगून आहेत. अमेरिकेतल्या व्हर्जिनिआ राज्याच्या न्यायवैद्यक विभागातील रसायनशास्त्रतज्ज्ञ कार्ल डेसिल यांनीही, यंग जीन ली आणि अँड्रयू पॉल यांचं हे संशोधन, गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या तंत्राचं प्रमाणीकरण होण्यास काही वेळ लागणार आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात होत असलेली प्रगती पाहता, हा काळ फार मोठा असणार नाही हे नक्की!
(छायाचित्र सौजन्य - byrev/Pixabay and Young Jin Lee, et al)
शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं?
श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे २२ वर्षे वास्तव्य होते.
तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोग्य सेवा, पर्यटन असा विविध अंगांनी विकास करणे हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२ एकरांच्या जागेवर भव्य असा अनुभुती प्रकल्प साकारण्यात येत आहे.
अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामीसमर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली १०८ फुटी भव्य मूर्ती (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार असून त्यासोबत दिव्य दर्शन, बहूउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे.
या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांची असून त्यासाठी त्यांनी अक्कलकोट संस्थानची सुमारे २५० कोटीहून जास्त मुल्याची ४२ एकर जागा सेवा स्वरूपात दिलेली आहे. आता सर्व स्वामीभक्तांचा स्वामीसेवा स्वरुपात या प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा रहात आहे.
सुयोग्य प्रकाश योजना, दिशा दर्शक फलक, भाविकांना मनःशांती प्रदान करणारे भारतीय आध्यात्मिक वृक्ष आणि फुलझाडांदे नक्षत्रवन हे देखील या प्रकल्पाचे आकर्षण ठरणार आहे. तज्ज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागीरांच्या कलाविष्कारातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनात आपला वेगळा ठसा उमटविणारा ठरणार आहे.
या प्रकल्पाव्दारे पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देण्यात येणार असून अक्कलकोटच्या राजघराण्याची झलक देखील यातून मिळणार आहे.
प्रकल्पाची विस्तृत माहिती:
ब्रह्मस्थान (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) ह्या नावाने श्री स्वामी समर्थ महाराज यांची १०८ फुटी पंचधातूमधील मूर्ती उभारण्यात येणार आहे. येथे चौथऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थाचे भव्य शिल्प शांतता आणि समतोलाची अनुभुती देणारे असणार आहे. सदर १०८ फुटी मूर्तीच्या खाली २२ फुटी कमळ आहे. त्या कमळाच्या खाली भाविकांसाठी ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र असणार आहे.
दिव्य दर्शन :- दिव्य दर्शनमधील १८ दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव कामातून पर्यटकांना श्री स्वामी समर्थाच्या जीवन चरित्राचा आस्वाद घेता येणार आहे. येथील प्रत्येक शिल्पामधून भाविक आणि पर्यटकांना एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे.
बहूउद्देशीय रुग्णालय :- अनुभूती प्रकल्पामधील येणाऱ्या उत्पन्नातून बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याद्वारे अक्कलकोटच्या राजघराण्याची समाजप्रती असलेली सेवेची बांधिलकी व्यक्त होत आहे. हे बहूउद्देशीय रुग्णालय अक्कोलकोटवासीयांच्या सेवेसाठी नि शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रशस्त पार्किंग :- प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या पार्किंगसाठी ५०० कार, बसेस आणिक इतर वाहने उभी करण्यासाठी वृक्षेच्या छायेखाली जागा उपलब्ध करून देणार आहे. हे पार्किंग वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापासून साधारण १०० मीटर अंतरावर आहे.
पार्किंग परिसरात अग्निशामक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहे.
फूड कोर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीच्या परिसरात असलेल्या फूड कोर्टमध्ये महाराष्ट्रातील विविध विभाग आणि जिल्ह्यांमधील तसेच भारतातील विविध राज्यांमधील आणि जगातील प्रमुख देशांमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळी उपहारगृहे उभारण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटकांना अक्ललकोट येथे आकर्षित करण्यात येणार आहे. अक्कलकोट आणि परिसरातील जनतेसाठीसुद्धा ही एक खाद्य अनुभूती असणार आहे.
लाईट आणि साऊंड शो :- प्रकाश, ध्वनी आणि जलाचा मनोहारी सांगीतिक आविष्कार असलेल्या या विभागातून पर्यटकांना अतिउच्च आनंदाचा अनुभव मिळणार आहे.
प्रसादम् :- या प्रकल्पाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला प्रसादम् विभागात सात्विक प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
कुंजर बन :- शाही हत्तींच्या मुक्त संचारासाठी हे वनरुपी परिपूर्ण निवासस्थान असेल.
पंचकर्मा रिसॉर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या १०८ फुटी मूर्ती समोर आणि स्वामींच्या सानिध्यात १८ वैशिष्टयपूर्ण बंगल्याचे रिसॉर्ट देखील उभारण्यात येणार आहे. भारतातील तसेच परदेशी पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म यासाठीच्या उच्च दर्जाच्या सुविधा देणारे हे रिसॉर्ट अक्लकोट परिसरातील पर्यटनाला चालना देणार आहे.
स्टुडिओ अपार्टमेंट :- देशभरातून आणि जगभरातून अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार वास्तव्याची सोय करण्यासाठी विविध सोयी सुविधांनी युक्त स्टुडिओ अपार्टमेंट बांधण्यात येणार असून या निवासस्थानात अतिथींना सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
या संपूर्ण प्रकल्पाची माहिती www.swamisamarthanubhuti.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कोझल इथल्या या खड्ड्यांपैकी अनेक खड्डे पाण्यानं भरले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांच्या परिसराला आता पाणथळी स्वरूप प्राप्त झालं आहे. हे पाणथळ परिसर म्हणजे बेडकासारखे विविध प्रकारचे उभयचर, सरीसृप, कीटक, पक्षी-प्राणी, इत्यादींचं वसतिस्थान होऊन, कोझलच्या खोऱ्यात ठिकठिकाणी नवीच वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था विकसित झाली आहे.
सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली.. पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे.

लाल शैवालांच्या अस्तित्वामुळे बर्फाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वीस टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचं आढळलं आहे. प्रकाश अधिक प्रमाणात शोषला जात असल्यामुळे, लाल रंगाचं बर्फ तापमानवाढीस कारणीभूत ठरतं आहे.

झिलँडिया खंडाचा पाण्याखालचा थर आणि ऑस्ट्रेलिया खंडाभोवतीचा पाण्याखालचा थर हे स्पष्टपणे वेगवेगळे झालेले असून, ते एका खोल घळीनं विभागले आहेत. सुमारे साडेतीन किलोमीटर इतकी खोली असणारी ही घळ ‘कॅटो ट्रफ’ या नावानं ओळखली जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti