जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
April 6, 2022
ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बर्मिंगहम मध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्धीस आले.
February 6, 2022
झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.
October 29, 2023
मी गतीचे गीत गाई’ हे बाबा आमटे यांच्या एका गीतासारखे बोल रक्ताच्या थेंबाथेंबात जागवतच शर्ले मलडावनी हिचा अमेरिकेत जन्म झाला असावा! लहानपणी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूयॉर्कमधील शेनेक्टॅडी (Schenectady) येथील रस्त्यांवरील शर्यतीत आपल्या गावातील मुलांबरोबर शर्ले दांडगाईने वागत असे.
December 19, 2023
मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी मिरज येथे झाला. राम कदम यांच्या घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे राम कदम यांच लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच ते क्लॅरोनेट वाजवायला शिकले. पुढे पथकात वाजवू लागले. प्रभात चित्र संस्थेचे छायाचित्रकार ई.महमद मूळचे मिरजेचेच. त्यांनीच राम कदम यांना पुण्याला बोलावून घेतलं. वयाच्या २२ व्या वर्षी राम कदम प्रभातमध्ये दाखल झाले ऑफिसबॉय म्हणून!
पगार महिना ७ रुपयेप्रमाणे सेवा सुरू झाली. शांतारामबापूंची खोली झाडताना राम कदम यांना कमीपणा कधीच वाटला नाही. उलट एवढय़ा प्रतिभासंपन्न व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळतेय याचा आनंद झाला. हळूहळू प्रभातच्या संगीत विभागात त्यांचा प्रवेश झाला आणि मान्यवर संगीतकाराचा त्यांना सहवास लाभला. प्रभात चित्र संस्था आदर्श विचार मूल्यांवर चालणारी होती त्यामुळे इथे जे घडत असे ते पवित्र, सर्वोत्कृष्ट आणि चिरंतन टिकणारे असायचे. राम कदमांच्या आयुष्यातील ही १० वर्षे त्यांच्यातील कलावंताला घडवणारी होती. इथेच त्यांना पु. ल. देशपांडे, देव आनंद, गुरुदत्त यांचा सहवास लाभला, पण स्वातंत्र्यानंतर प्रभातचाही उतरणीचा कालखंड सुरू झाला. राम कदम प्रभातमधून बाहेर पडल्यावर त्यांना कोल्हापूरहून भालजी पेंढारकर यांनी बोलावले.
गांधीहत्येनंतर भालजींचा जयप्रभा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व त्यावेळी ‘मीठ भाकर’ या चित्रपटाची प्रिंटही भस्मसात झाली. भालजी यांनी तो सिनेमा परत बनवला. त्याचं संगीत राम कदम यांचं होतं! (पण पूर्वीच्या शर्थीनुसार संगीतकार म्हणून कशाळकर यांचेच नाव श्रेयनामावलीत राहिलं!) रामभाऊ नाराज झाले, पण लवकरच त्यांना ‘गावगुंड’ हा सिनेमा स्वरबद्ध करायला मिळाला. पण सुरुवातीची १० वर्षे कदमांची परीक्षा पाहणारी ठरली. यश कायमच हुलकावणी देत होतं. नशिबाचे फासे कायमच उलटे पडत होते. सुधीर फडके, वसंत पवार यांच्याकडे सहायकाचं काम चालूच होतं. १९५९ सालच्या अनंत मानेच्या ‘सांगते ऐका’तील ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ ही फक्कड लावणी रामभाऊ कदम यांनी स्वरबद्ध केली होती. पण ही कामगिरी सहाय्यकाच्या रूपातली असल्याने रसिकांना उशिरा लक्षात आली.
‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. मराठी लावणीचे लावण्या खुलवून राम कदम यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. राम कदम यांनी जवळपास १२० मराठी चित्रपटाना संगीत दिले. यात त्यांनी तब्बल ११४ गायकांना संधी दिली. यात लता मंगेशकर, आशा, उषा, मोहम्मद रफी, पं.भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू , मन्ना डे आदी मान्यवरांचा सहभाग आहे.
बाजीराव मस्तानीच्या पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात 'पिंगा ग पोरी पिंगा...' याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे. पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणाले. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६ साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती.
श्री.मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने मा.राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे. मा.राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 28, 2017
भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
February 4, 2017
अशा हृदयातून ऐकणार्या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !
May 23, 2014
विख्यात शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचा जन्म २७ जानेवारी १९३४ सालचा. राम थत्ते यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून “जी.डी.आर्ट”ची पदवी संपादन केली होती. थत्ते यांनी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सातत्याने सहा वर्षे पारितोषिके मिळविली.तसंच, मुंबई राज्यकला प्रदर्शनाचे सहा वेळा परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे पुतळा समितीवर त्यांची निरीक्षक म्हणून निवड झाली होती. विविध संस्था, चित्रकला महाविद्यालयांमध्ये अधिव्याख्याता म्हणून देखील थत्ते कार्यरत होते. कलाविषयावर विपूल प्रमाणावर लेखन करण्याचं काम राम थत्ते यांनी केले असून त्यांच्या "अजंठा"या २००४ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाला वाचकांसह समीक्षकांकडून कौतुकाची दाद मिळाली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात पोटाच्या विकारामुळे राम थत्ते त्रस्त होते. मृत्यूच्या आठ दिवस आधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर २०१४ या दिवशी राम थत्ते यांचे वयाच्या ८०व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी झाला.
महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली. नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली.
त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला ‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे.
त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कधी तो सकारात्मक असतो, कधी नुसताच आशावादी असतो तर कधी निराशावादी असतो. विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, असे म्हणावे लागेल. दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा. यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. टेलिव्हिजन या त्यामानाने नवीन माध्यमात प्रवेश करण्याआधी भट्टी दैनिक ‘ट्रिब्यून’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. कमीत कमी शब्दांत जास्त कोरडे ओढण्याची त्यांची शैली इथपासूनची. ‘फ्लॉप शो’नंतर सुरू केलेली ‘उल्टा पुल्टा’ ही मिनी कॅप्सूल होती. म्हणजे १५ मिनिटांचा विनोदाचा डोस. जो दोन कार्यक्रमांच्या मध्ये दाखवला जायचा. पण, त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विनोदाला कारुण्याची झालर असते, असे म्हणतात.
सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता. ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओ सोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली.
जसपाल भट्टी यांचे २५ ऑक्टोबर २०१२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 5, 2018
नाझिया हसन यांनी वयाच्या १५व्या वर्षीचं ‘आप जैसा कोई’ हे गाणं, १६ व्या वर्षीचा ‘डिस्को दिवाने’, १८ व्या वर्षीचं ‘बुम बुम’, २० व्या वर्षीचं ‘यंग तरंग’, २२ व्या वर्षीचं ‘हॉटलाइन’ आणि शेवटी ‘कॅमेरा कॅमेरा’ आणि ‘टूनाइट’. पाच अल्बम मधून त्यांनी क्रांती निर्माण केली. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६५ रोजी झाला. संपूर्ण दक्षिण आशिया तिच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या डिस्को दिवान्यांत ब्राझीलसारखे लॅटिन देशही सामील झाले. त्यांनी निर्माण केलेल्या पॉप वातावरणानंतर भारत आणि पाकिस्तान कायमचे बदलून गेले. नाझिया हसन यांनी स्वरांचं नवं दालन उघडून दिलं. १९८० सुमारास, ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए, तो बात बन जाए..’ हे गाणं सतत वाजू लागलं होतं. ते गाणं होतं फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील होते आणि गाणारी नाझिया हसन ही पाकिस्तानी मुलगी. संगीत बिड्डू याचं आहे. हेही समजलं की ते गाणं वेगळं वाटण्याचं कारण होते त्याला बिड्डूचं संगीत आणि लंडनमध्ये झालेलं गाण्याचं रेकॉर्डिंग. ते २४ ट्रॅकवर रेकॉर्ड केलेलं पहिलं भारतीय गाणं होतं. नाझिया यांचा आवाज दोनदा रेकॉर्ड करून त्यात एको म्हणजे प्रतिध्वनीचा परिणाम साधला होता. याच वर्षी ‘डिस्को दिवाने’ नावाचा एक म्युझिक अल्बम आला. त्यातील सगळी गाणी नाझिया हसन यांची होती. आणि एक दिवस व्हिडीओ अल्बमवर नाझिया हसन कोण हेही दिसलं. उजव्या हातात मायक्रोफोन आणि डाव्या हातात त्याची वायर धरलेली.. खांद्यावर ओघळेलेले तिचे लांब केस, तिचं गाणं जसं जगावर पसरलं तसे.
नाझिया हसन यांच्या ‘डिस्को दिवाने’ या पहिल्या अल्बमच्या जगभर सहा कोटी प्रती खपल्या. या अल्बमच्या माध्यमातून ती चिरंतन झाली पण तिचा शेवट खूप क्लेशकारक झाला. हे एवढंच नव्हतं. तिच्या असण्याचे काही ऐतिहासिक आणि अर्थातच सांस्कृतिक पैलू होते. तिने केवळ संगीत क्षेत्रात वादळ निर्माण केलं नव्हतं, तर एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली होती. नाझिया हसन आणि त्यांचा भाऊ झोहेब हसन यांनी एकत्रितपणे अनेक गाणी गायली. नाझिया हसन जगभरात इतकी लोकप्रिय होत होत्या की, असे म्हणतात तिला तिच्या देशात गाणं म्हणताना टीव्हीवर बघता येऊ नये, अशी व्यवस्था करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा व्हिडीओ, कमरेपासून वरचाच भाग शूट करून तयार करण्यात आला. कारण इतकंच की, तिचे नाचणारे पाय दिसू नयेत.
‘वायटल साइन्स’, ‘स्ट्रिंग्स’, ‘जुनून’ हे नंतर भारतात लोकिप्रय बनलेले बँड सुरू झाले होते. त्यांच्यासाठी नाझियाच्या संगीताने त्यांच्या संगीताला रुजण्यासाठीची जमीन तयार केलेली होती.
नाझिया यांना कर्करोग झाला होता त्यावर त्वरित उपचार सुरू झाले. त्या त्यातून बरी झाल्या आणि नाझिया यांचे लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र लाखो हृदयांत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या या पॉप क्वीनचा फुप्फुसाचा कर्करोग पुन्हा उफाळून आल्याचं उघडकीस आलं.
नाझिया हसन यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींतून सांगितलं होतं की, गाणं हे तिच्यासाठी कायम छंद होता आणि आहे. त्यांनी स्वत:साठी वेगळं करिअर उभं केलं होतं. नाझिया हसन यांनी लंडनच्या विद्यापीठातून बिझनेस अॅंडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली होती. संयुक्त राष्ट्रांच्या महिला विभागातील आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमात सहभागी होती. त्या वेळी तरुणांची पिढी नष्ट करणाऱ्या अमली पदार्थाच्या विरोधात काम करण्यासाठी तिने संस्था काढली होती. कराचीतील ल्यारी या सर्वाधिक गरीब वस्तीत तिने त्यासाठी मोबाइल क्लिनिक सेवा सुरू केली होती. नाझिया हसन यांचे निधन १३ ऑगस्ट २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट / इब्राहिम अफगाण
नाझिया हसन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=mWzTZE-B1fM
https://www.youtube.com/watch?v=mZqawa_lmSo
April 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti