(मॉरिशसची लोककथा)
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होते माकड आणि एक होते कासव. या कासवाला सात मुले होती. माकड मात्र आळसात वेळ घालवीत असे. कासव खूप कष्ट करीत असे. एकदा कष्टाचे काम केल्यावर त्याला त्याची मजुरी मिळाली, तर त्या मजूरीच्या पैशातून त्याने तांदुळाचे एक पोते खरेदी केले. ते पोते घेऊन कासव घरी येत असता वाटेतच मध्यावर थांबले. त्याने आपल्या पाठीवरचे पोते रस्त्यावर काढून ठेवले. मग ते लाकूडफाटा आणायला गेले. पाठीवर लाकूडफाटा घेऊन ते परत आले, तर त्याच्या तांदुळाच्या पोत्यावर एक माकड बसलेले दिसले. माकड म्हणाले, ‘मित्रा! हे बघ मला एक तांदुळाचे पोते मिळाले.’
ते ऐकून कासवाने लगेच उत्तर दिले, ‘हे तांदुळाचे पोते तुझे नाही, मित्रा, मी ते माझ्या मुलाबाळांसाठी खरेदी केले आहे. मी ते रस्त्यावर ठेवून लाकूडफाटा आणण्यासाठी गेलो होतो. माझे पोते मला परत दे.’ माकड त्याचे म्हणणे ऐकून घेईना. ते म्हणाले, ‘जे उचलून घ्यायला चांगले असते ते जवळ ठेवण्याच्या योग्यतेचे असते. मी पोते परत देणार नाही.’
कासव दुःखीकष्टी झाले. परंतु त्याला काही करता येईना. तरीही त्याने एक शेटची विनंती केली, ‘भल्या मित्रा ! एक किलो तांदूळ मला विकत दे. माझ्या मुलाबाळांसाठी. ती भुकेलेली आहेत. त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाहीये.’माकड म्हणाले, ‘अशक्य ! माझा तांदूळ हा विकण्यासाठी नाही. कुणातरी चिनी माणसाच्या दुकानात जा आणि विकत घे.’ ‘ठीक आहे, मित्रा. आपण पाहून घेऊ.’ असे म्हणून कासव चालू लागले. एकदा ते माकड झाडाच्या फांदीवर बसले होते. त्याची शेपटी खाली जमिनीपर्यंत लोंबत होती. कासव त्या वाटेने जात होते. त्याने त्या माकडाची शेपटी जमिनीवर टेकलेली पाहिली. त्याने ती घट्ट पकडली आणि म्हणाला, ‘इथे मला एक माकडाची शेपूट मिळालीय. जे जे काही उचलून घ्यायला चांगले असते ते जवळ ठेवण्याच्या योग्यतेचे असते. मी आता ते परत करणार नाही.’
माकड म्हणाले, ‘अरे मित्रा ! तू काय थट्टा बिट्टा करतोस की काय? ते माझे शेपूट आहे. ते सोडून दे.’ कासव म्हणाले, ‘रस्त्यावरील तांदुळाचे पोते ज्याने उचलले ते त्याच्या मालकीचे झाले. आता हे रस्त्यावरचे शेपूट ज्याने वर उचलले ते त्याच्या मालकीचे झाले.’ माकड रागाने लालबुंद झाले. त्याने आपले शेपूट वर खेचले. परंतु ते शेपूट कासव काही केल्या सोडून देईना. त्या दोघांमध्ये भयंकर भांडण जुंपले. ती बाब मग न्यायमंडळासमोर नेण्यात आली. न्यायाधीश महाराज आपल्या न्यायासनावर बसलेले होते. ते माकड त्यांना म्हणाले, ‘महाराज, या कासवाला शिक्षा करा आणि त्याला माझे शेपूट सोडून द्यायला सांगा.’ मग ते कासव न्यायाधीशांना म्हणाले, ‘महाराज ! या माकडाला शिक्षा करा आणि त्याला माझे तांदळाचे पोते मला परत द्यायला सांगा.’ न्यायाधीशांनी त्या दोघांची उलट तपासणी केली. त्यांना ती सगळी भानगड नीट कळली. त्यांनी माकडाला विचारले, ‘तांदळाचे पोते कुठे आहे?’ तो प्रश्न ऐकून ते माकड पोट धरधरून हसायला लागले. आपले पोट थोपटीत ते म्हणाले,’माझ्या पोटात, महाराज.
त्यानंतर न्यायाधीशांनी एका पोलिसाला बोलावून आणले. त्याला एक लाकडाचा ठोकळा आणायचा हुकूम त्यांनी केला. तो आणल्यावर त्या न्यायाधीशांनी त्या पोलिसाला त्या माकडाचे शेपूट त्यावर ठेवण्याचा हुकूम केला. नंतर ते शेपूट तोडण्याचा हुकूम केला. हे सर्व झाल्यावर न्यायाधीशांनी आपला न्यायनिवाडा दिला. ते म्हणाले. ‘जे जे काही उचलून घ्यायला चांगले असते ते जवळ ठेवण्याच्या योग्यतेचे असते. या माकडाने रस्त्यावरील तांदुळाचे पोते उचलले. ते पोते त्याच्या मालकीचे झाले. या कासवाने माकडाच्या शेपटाचे टोक रस्त्याने जाताना उचलले. ते शेपटाचे टोक त्याच्या मालकीचे झाले. परंतु माकडाला ते शेपटाचे टोक विकत घ्यायचे असेल आणि आपल्या शेपटाला ते चिकटवून टाकायचे असेल तर मी कासवाला अशी शिक्षा करतो. माकड आणि कासव कान देऊन ऐकत होते. शेवटी न्यायाधीश म्हणाले, ‘कासवाने त्या शेपटीचे टोक तांदुळाच्या एका पोत्याच्या बदलात त्या माकडाला विकावे. न्यायालयाचे काम संपले आहे. तुम्ही आता जाऊ शकता.’