कासव-अस्वल शर्यत ही पळण्याची शर्यत आहे. भारतीय लोककथेतील ससा-कासवाची पळण्याची शर्यत इथे आठवणे अगदी स्वाभाविक आहे. दोन्ही कथांत मंदगती कासव कायम आहे. स्पर्धक मात्र बदलला आहे. एका ठिकाणी अस्वलासारखा शक्तिमान प्राणी आहे, तर दुसऱ्या ठिकाणी सशासारखा चपळाईने पळणारा प्राणी आहे. घमेंडी स्वभाव मात्र दोन्ही कथांत आहे आणि उतरलेली घमेंडही दोन्हीकडे आहे. कासवाचे चातुर्य आणि युक्तिबाजपणाही दोन्ही कथांत कायम आहे. दोन वेगवेगळ्या संस्कृतीत कल्पनांचे असलेले, हे साधर्म्य थक्क करणारे निश्चितच आहे.
गोठवून टाकणाऱ्या हिवाळ्याच्या सुरुवातीचा काळ होता. सर्वत्र खूप बर्फ पडला होता. सगळी डबकी, तळी आणि मोठे तलावही गोठून गेले होते. अस्वलांनाही गोठवणारी थंड हवा होती. अशा हवेत उघड्यावर उगाच हिंडू नये तर संपूर्ण गोठवणारा ‘पांढरा हिवाळा’ संपेपर्यंत गुहेत झोप काढणे शहाणपणाचे असते,अशी समज ज्याला अद्याप यायची बाकी आहे, असे अस्वल उगाच गुरगुरत जंगलातून इकडून तिकडे हिंडत होते.
हिंडता हिंडता ते अस्वल एका मोठ्या गोठलेल्या तलावाच्या काठी पोहोचले. गोठलेल्या तलावाच्या बर्फातून तोंड बाहेर काढले आहे, असे एक कासव त्या अस्वलाला दिसले. त्या जुन्या मित्राला कोणत्याही प्रकारचे अभिवादन न करता ते आठ्यताखोर अस्वल मोठ्याने ओरडून म्हणाले, ‘हाय! अहो हळुराव, काय बघताहात? कुठं लक्ष आहे? ‘कासवाला राग आला. अस्वलाकडे मिटमिट बघत ते म्हणाले, “मला हळुराव तू का बरं म्हणतोस?’ हे ऐकल्यावर तर त्या अस्वलाला जास्तच चेव चढला. अस्वल कासवाला म्हणाले, अरे सर्व प्राण्यात सर्वात मंद म्हणजे तू ! मग तुला हळुराव म्हणायचे नाही तर काय? त्यात काय बिघडले? तू आहेसच मुळी सर्वात मंद. म्हणून हळुराव ! अरे, तुझ्याबरोबर जर कधी मी पळायची शर्यत लावली असती, तर तुला मी कधीच मागे टाकून शर्यत जिंकली असती!’
अस्वलाची ही तुच्छतावादी भाषा ऐकून कासव शांतपणे म्हणाले,’मित्रा,ठीक आहे. असे नुसते बोलण्यापेक्षा आपण शर्यतच लावून ठरवू की दोघांत कोण अधिक चपळ आहे.’ अस्वलाने कासवाकडे एकदा बघितले आणि ते म्हणाले, ‘ठीक आहे. पण आपली शर्यत होईल कुठे? ‘
कासव उत्तरले, ‘उद्या सकाळी याच तलावाकाठी आपण पळण्याची स्पर्धा ठेवू. तू तलावाच्या काठाकाठाने पळत राहा आणि मी तलावाच्या पाण्यातून पोहत राहीन.’ अस्वल म्हणाले, ‘अरे पाण्यातून पोहताना तू कसा दिसणार? कारण हा सर्व तलाव बर्फाने भरून जाऊन गोठला आहे.’ कासव उत्तरले, हे बघ,आपण असे करू या, गोठलेल्या तलावातील बर्फाला मी तलावाच्या काठाकाठाने जागोजागी काही विशिष्ट अंतरावर भोकं पाडतो. बर्फाच्या खालच्या पाण्यातून मी पोहतो. मी पोहतो आहे हे तुला कळण्यासाठी प्रत्येक भोकात तोंड खुपसून मी बाहेर काढीत जाईन म्हणजे मी कुठल्या भोकापर्यंतचे अंतर कापीत पोहत पुढेपुढे चाललो आहे, हे तुला समजत राहील. अस्वलाला कासवाचे हे बोलणे पटले. अस्वल म्हणाले, ‘ठीक आहे. मला मान्य आहे. उद्या सकाळी आपली पळण्याची शर्यत होईल.
दुसरा दिवस उगवल्यावर मग दुसरेही पुष्कळ प्राणी ही मजेशीर शर्यत पाहण्यासाठी जमा झाले. त्या मोठ्या तलावाच्या काठावर हे जमलेले प्राणी एका रांगेत उभे राहिले. त्यांना दिसले की शर्यतीच्या तयारीने आलेले अस्वल जमिनीवरच्या बर्फावर मनसोक्त लोळले. उठले. उड्या मारल्या. या प्रकाराने त्याने शर्यतीसाठी स्वतःला तयार केले. मग सूर्य जेव्हा क्षितिजावर हातभर वर आला तेव्हा त्या मोठ्या तलावाच्या झालेल्या बर्फातून कासवाने डोके वर बाहेर काढले. कारण ते बर्फाखाली पाण्यात होते. बर्फाला पाडलेले ते पहिलेच भोक होते. तिथूनच शर्यत सुरू होणार होती. त्या पहिल्या भोकातून डोके बाहेर काढून ते कासव अस्वलाला म्हणाले, ‘अस्वला, चल मी शर्यतीसाठी तयार आहे. मग अस्वलही लगबगीने शर्यत जिथून सुरू होते त्या जागी जाऊन उभे राहिले. शर्यत सुरू करण्याची सूचना मिळताच अस्वलाने सुसाट धावायला सुरुवात केली. बर्फात चौखूर उधळण्याने त्याच्या पंजांनी सर्वत्र बर्फ पडत होता आणि धावण्याने श्वासाचा वेग वाढल्याने त्याच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासांचे थंड हवेचे पांढऱ्या वाफेत रुपांतर झाले होते. या वाफेचा पांढरा ढग त्याच्या डोक्यावर तरंगू लागला होता. इकडे पहिल्या भोकातून तोंड बाहेर काढणारे कासव पुन्हा बर्फाच्या खाली होते. त्याचे कौतुक होत होते. अस्वल मात्र शर्यत पूर्णपणे हरले होते.
अत्यंत मानहानी झाल्याने निराशेने त्या अस्वलाने दुखऱ्या पायांना कसेबसे ओढत घर गाठले. मनाने आणि शरीराने ते इतके भयंकर थकलेले होते, की घरी पोहोचल्यावर त्याला लगेच गाढ झोप लागली. संपूर्ण हिवाळा संपून सुखद उन्हाळ्याची चाहूल लागेपर्यंत ती गाढ निद्रा चालूच होती !
अस्वल आणि सर्व प्रेक्षकप्राणी निघून गेल्यावर त्या हुशार आणि विजयी कासवाने आपल्या मोठ्या पंजाने तलावाच्या बर्फावर खुणेची थापटी मारली. या खुणेच्या थापटीचा अर्थ बर्फाखालील पाण्यात असणाऱ्या कासवांना बरोबर कळला आणि डझनभर कुरुप हिरवी तोंडं बर्फातील त्या सर्व भोकांमधून एकाचवेळी दत्त म्हणून एकदम प्रकट झाली! ही डझनभर कुरुप हिरवी कासवे त्या विजयी कासवाचे चुलत भाऊ होते, म्हणूनच ते सर्वच्या सर्व विजयी कासवाप्रमाणेच दिसत होते!
सर्व भावंडांना पाहून ते कासव उद्गारले, ‘हे माझ्या भावंडांनो, मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. सर्वांना सतत नावे ठेवणाऱ्या त्या उद्दाम आणि बढाईखोर अस्वलाला आपण सर्वांनी आज चांगलाच धडा शिकवला आहे.’ असे म्हणून ते विजयी कासव हसले आणि त्याच्याबरोबर त्याच्यासारखी दिसणारी डझनभर कासवेही अगदी तश्शीच हसली! ते कासव हसून पुढे म्हणाले, ‘अन्य प्राण्यांना आपण आज असेही दाखवून दिले आहे, की कासव हा काही सर्व प्राण्यांतला हळुराव नाही.’