राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती

(वेताळाच्या गोष्टी)

त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’



(वेताळाच्या गोष्टी)

त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच
खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ
त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार
करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’
‘अयोध्या नावाची एक नगरी आहे. ही पूर्वी राक्षसकुलाचा संहार करणाऱ्या
श्रीरामाची राजधानी होती. त्या नगरीत वीरकेतू नावाचा राजा होता.
नगराभोवतीच्या तटामुळे नगराचे जसे संरक्षण होते, त्याप्रमाणे त्या
महापराक्रमी राजाने पृथ्वीचे संरक्षण केले होते.
तो राजा अशा प्रकारे पृथ्वीचे राज्य करीत असताना त्या अयोध्यानगरीत
रत्नदत्त नावाचा खूप श्रीमंत व्यापारी राहात होता. दैवतांची खूप आराधना
केल्यानंतर त्याला त्याच्या नंदयती नावाच्या पत्नीपासून रत्नवती नावाची
मुलगी झाली. रूपलावण्य, विनय वगैरे गुण स्वभावतःच असलेली ती कन्या
आपल्या वडिलांच्या घरी वाढू लागली. ती तरुण झाल्यानंतर रत्नदत्ताकडे
तिच्यासाठी मोठे मोठे व्यापारी आणि राजेलोकही याचना करू लागले; पण ती
बद्धिमान तरुणी पुरुषांचा द्वेष करत असे! म्हणून ती इंद्राला देखील आपला पती
बनवायला इच्छित नसे! तिच्या विवाहाची गोष्ट जर काढली तर ती प्राणत्याग
करायला निघे! त्यामुळे तिचा प्रेमळ पिता दुःखी होऊन मुकाट्याने बसला
आणि तिच्याविषयीचा हा प्रवाद अयोध्यानगरीभर पसरला.
दरम्यान, चोरांच्या संपत्तीच्या लुटालुटीमुळे त्रासलेले सर्व नागरिक राजा
वीरकेतूकडे आले आणि त्यांनी निवेदन केले की, ‘हे प्रभू! रोज रात्री आम्हाला
चोर लुटतात व प्रयत्न करूनही ते आम्हाला दिसून येत नाहीत. तेव्हा या
बाबतीत काय करावे ह्याचा निर्णय आपणच घ्यावा!’ नागरिकांनी अशी विनंती केली असता त्या राजाने चोरांना पकडण्यासाठी नगराच्या चारी बाजूंना रात्रीच्या वेळी गुप्त रक्षक पाठविले. पण त्यांना ते चोर सापडेनात. तेव्हा एकदा रात्री राजा स्वतःच हातात शस्त्र घेऊन गुप्तपणे व एकटाच नगरात फिरावयाला निघाला. तेव्हा तटाच्या मागच्या बाजूने जाणारा एक पुरुष त्याला दिसला. तो पुरुष संशयाने सारखा मागे वळून पाहात होता. जाताना पायांचा आवाज मुळीच करत नव्हता; आणि त्याचे डोळे चंचल आणि
भयग्रस्त दिसत होते.

‘माझ्या नगरात एकट्याने चोऱ्या करत असलेला हाच चोर असला पाहिजे.’
असा तर्क करून राजाही त्याच्याजवळ गेला. राजाला पाहून त्या चोराने
विचारले, ‘तू कोण आहेस?’ राजाने त्याला उत्तर दिले. ‘मी चोर आहे!’ हे
ऐकताच तो चोर आनंदाने राजाला म्हणाला, ‘तर मग तू माझा व्यवसायमित्रच
आहेस! माझ्या घरी चल, म्हणजे मी तुझा पाहुणचार करतो.’ ते ऐकून राजा
‘तसेच करू या’ असे म्हणाला आणि त्याच्या बरोबर अरण्यातील त्याच्या
भूमिगत वसतिस्थानाकडे गेला.
भूमीत खोदलेले ते वसतिस्थान म्हणजे राजवाडाच होता. तेथे सर्व
सुखोपभोग हजर होते. रत्नांच्या तेजामुळे ते गृह चमकत होते. ते जणू काय
पाताळ-राज्यच होते! फक्त बळीराजा तेथे नव्हता इतकेच! तेथे प्रवेश करून
त्याने राजाला एका आसनावर बसविले आणि तो चोर आतल्या बाजूला गेला.
इतक्यात एक दासी तेथे आली आणि राजाला म्हणाली, ‘अरे महाभागा! हे
केवळ मृत्यमुख आहे! तू येथे कसा आलास? हा चोर अंतर्गृहातून बाहेर
आल्यावर पापाचरण करून तुझा वध करेल कारण तो विश्वासघातकी आहे.
म्हणून तू लवकर येथून निघून जा.’ दासीचे हे बोलणे ऐकून राजा वीरकेतू तेथून निसटला आणि आपल्या राजधानीला पोहोचला. तेथे पोहोचल्यावर त्याने रातोरात सैन्य जमविले आणि थोड्याच वेळात सैन्यासह जाऊन त्याने त्या चोराच्या भूमिगत निवासस्थानाला वेढा घातला.

आपल्याला घेरलेले पाहून तो चोर युद्धात मरण्याचे ठरवून युद्धासाठी बाहेर
पडला. ढाल आणि तलवार घेऊन लढणाऱ्या त्या वीर चोराने एकट्यानेच
हत्तीच्या सोंडा तोडल्या, घोड्यांचे पाय कापले आणि सैनिकांची डोकी छाटून
टाकली! त्याने पुष्कळशा सैनिकांचा असा नाश केल्यानंतर राजाने स्वतः त्या
चोरावर आक्रमण केले. खड्गविद्येत प्रवीण असलेल्या राजाने युक्तीने त्याच्या
हातातील ढाल-तलवार उडवून टाकली व त्यास निःशस्त्र केले! नंतर स्वतःही
निःशस्त्र होऊन, कुस्ती खेळून त्या चोराला जमिनीवर पाडले आणि जिवंत
धरले. नंतर त्याला बांधून, त्याच्या सर्व धनासह नगरात नेले. सकाळी त्याला
राजाज्ञेवरून सुळावर चढवण्याकरिता डंका वाजवत वध्यभूमीकडे नेत असता
व्यापाऱ्याची मुलगी रत्नवतीने आपल्या प्रासादाच्या गच्चीवरून त्याला पाहिले.
त्या चोराच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या आणि त्याचे शरीर धुळीने
भरले होते. अशा परिस्थितीत त्या चोराला पाहताच आपल्या पित्याकडे
जाऊन ती म्हणाली, ‘बाबा, हा जो पुरुष वध्यभूमीकडे सुळावर चढवण्यासाठी
नेला जात आहे त्यालाच मी माझा पती म्हणून मनाने वरले आहे! म्हणून
राजाकडे जाऊन त्याचे प्राण वाचवा! नाही तर त्याच्या मागोमाग मीही प्राणत्याग
करेन!’ हे ऐकून व्याकुळ झालेला तिचा पिता तिला म्हणाला, ‘मुली तू हे काय
बोलतेस! तू साक्षात राजांनाही पती म्हणून पसंत करत नव्हतीस आणि आता
हा चोर पती म्हणून स्वीकारायला तयार झालीस? आणि तोही चोर कसा की,
आता त्याला लवकरच सुळावर चढविणार आहेत असा! त्याला मी राजापासून
कसा वाचवू शकेन?’ अशा प्रकारे तिची हेटाळणी करून तिला हिताच्या गोष्टी
सांगितल्या असताही तिने आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा मुलीच्या प्रेमामुळे
तो व्यापारी राजाकडे गेला आणि ‘आपली सर्व संपत्ती घ्यावी व त्या बदली त्या
चोराला मरणाच्या शिक्षेतून सोडावे,’ अशी प्रार्थना करू लागला; परंतु राजाने
स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याला पकडले होते व नागरिकांची खूप संपत्ती
त्याने चोरली होती. म्हणून शंभर कोटी सुवर्णमुद्रांच्या मोबदल्यातही राजा त्याला सोडण्यास तयार झाला नाही.
तेव्हा पिता अयशस्वी होऊन परत आल्यानंतर त्या हट्टी कन्येने चोराबरोबर
सहगमन करण्याचे ठरविले. सर्व आप्तांनी तिची समजूत घातली असताही सती
जाण्याच्या इच्छेने तिने स्नान केले व शिबिकेत बसून वध्यभूमीकडे जाण्यास
निघाली. तिचे आईवडील व इतर आप्त बांधव रडत रडत तिच्यामागे निघाले!
अशा प्रकारे ती कन्या वध्यभूमीवर पोचत आहे तोच त्या चोराला वधकांनी
सुळावर चढवले देखील! प्राण जाता जाता त्या चोराने आप्तजनांसह आलेल्या
त्या कन्येला पाहिले. त्या सर्वांनी तिचा हट्ट व घडलेली सर्व हकिगत चोराला
सांगितली. ते ऐकून त्या चोराच्या डोळ्यांतून काही क्षण अश्रू वाहू लागले व
पुढल्याच क्षणी तो एकदम हसला! आणि काही क्षणांतच त्याने सुळावरच प्राण
सोडला. तेव्हा सुळावरून उतरवलेल्या त्या चोराच्या शवाला घेऊन ती पतिव्रता
वैश्यकन्या चितेवर चढली. तेव्हा स्मशानात राहणारा भगवान श्रीशंकर अदृश्य राहूनच आकाशातून तिला म्हणाला, ‘हे पतिव्रते, तू स्वतः मनाने वरलेल्या ह्या पतीबद्दल जी दृढभक्ती दाखवलीस त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. म्हणून माझ्याकडून वर मागून घे.’
हे ऐकून तिने त्याला वंदन केले आणि वर देणाऱ्या त्या देवाकडे वर
मागितला, ‘हे भगवान! मुलगा नसलेल्या माझ्या बाबांना शंभर पुत्र होवोत!
म्हणजे दुसरे अपत्य नसल्यामुळे माझ्या वियोगामुळे ते प्राणत्याग करणार
नाहीत!’ तिने असा वर मागितला असता भगवान भैरव तिला म्हणाला, ‘तुझ्या
पित्याला शंभर पुत्र होतील. पण तू आणखी दुसरा वर माग. कारण
तुझ्यासारख्या दृढनिश्चयी मुलीला एकच वर देणे मला योग्य वाटत नाही!”
हे ऐकून ती म्हणाली, ‘देवा! आपण जर माझ्यावर इतके प्रसन्न झाला
असाल तर हा माझा पती जिवंत होऊ दे आणि नेहमी धार्मिक राहू दे.’
तिचे हे शब्द ऐकताच भगवान श्रीशंकर अदृश्य राहून आकाशातूनच
म्हणाला, ‘तसेच होईल. हा चोर अक्षत शरीराने जिवंत होईल व धार्मिक बनेल!
राजा वीरकेतूही त्याच्यावर प्रसन्न होईल.’ श्रीशंकराच्या या आकाशवाणीनंतर चोर जखमा बऱ्या होऊन जिवंत होऊन उठला. तेव्हा पुत्र होण्याचा वर मिळालेला तो रत्नदत्त व्यापारी आपली मुलगी व जावई यांसह व आनंदित आप्तांसह घरी परत आला व त्याने मोठा आनंदोत्सव साजरा केला. हे सर्व वर्तमान राजाला कळाले व त्यालाही आनंद झाला. त्याने
त्या श्रेष्ठ वीर असलेल्या चोराला आपल्या दरबारात बोलावले आणि त्याला
आपले सेनापतीपद दिले. त्यानेही चोरी करणे सोडून दिले आणि व्यापाऱ्याच्या कन्येबरोबर विवाह केला. त्यानंतर त्याने धर्ममार्गाचे पालन केले व रत्नवतीबरोबर तो सुखाने काल घालवू लागला. अशी कथा सांगून आणि पूर्वी दिलेल्या शापाचे भय दाखवून वेताळ त्या राजाला म्हणाला, ‘हे राजेन्द्रा! आई-बापांच्या बरोबर आलेल्या त्या वैश्य
कन्येला पाहून सुळावर चढविलेला तो चोर प्रथम रडला आणि नंतर हसला.
याचे कारण काय? राजाने उत्तर दिले, ‘काही कारण नसता भावाप्रमाणे
मदतीला धावून आलेल्या त्या व्यापाऱ्याच्या उपकारातून मला मुक्त होता येणार
नाही, असे समजून त्या दुःखामुळे तो चोर प्रथम रडला आणि ‘ही कन्या उत्तम
राजांना सोडून माझ्यासारख्या चोरावर भाळली! हा काय चमत्कार आहे!
खरोखर स्त्रियांचे मन अति विचित्र असते!’ असा विचार मनात येऊन
आश्चर्यचकित होऊन तो हसला!’ राजाचे हे उत्तर ऐकताच तो वेताळ राजाच्या खाद्यांवरून नाहीसा झाला व पुन्हा शिंशपवृक्षावर शवरूपाने लटकू लागला. राजाही त्याच्या मागोमाग शिंशपवृक्षाकडे त्याला आणायला जाऊ लागला.

Author