पांढऱ्या अस्वलाची गोष्ट

एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं.



एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं. जहाजाचा कप्तान फिकिरीत पडला. सगळा हिवाळा जर आता इथंच काढावा लागला तर जहाजासकट आपण बर्फातच बुडून जाऊ असं त्याला दिसलं. आता काय करावं? काय करायचं ते ताबडतोब करायला हवं. तो लगेच कामाला लागला. त्या कामात त्याला सर्वात अधिक मदत ओथुनची झाली. सबंध हिवाळाभर त्यानं काम केलं आणि जहाजाला वाचविलं. त्यानंतर वसंत ऋतू आला आणि बर्फ वितळू लागलं.

हळूहळू जहाज मोकळं झालं. जहाजाचा कप्तान खूष होऊन ओथुनला म्हणाला, बोल, तुला काय इनाम देऊ ? ओथुनपाशी उत्तर तयारच होतं. तो म्हणाला, ‘ मला तुमच्याबरोबर जहाजातून घेऊन चला.’ कप्तानानं आनंदानं त्याची मागणी मान्य केली. घर सोडण्यापूर्वी ओथुननं तीन वर्ष पुरेल एवढं खाण्याचं सामान घरात बेगमी करून ठेवलं. तो आईला म्हणाला, ‘मी देशोदेशी फिरून येणार आहे.

“आईनं विचारलं, ‘तू माघारी केव्हा येणार?’
ओथून म्हणाला, ‘तीन वर्षांनी! हा दाणागोटा संपेपर्यंत मी येतोच! आई म्हणाली, ‘गेलास तिकडं सुख मिळालं, तर तिकडंच नाही ना राहणार ? म्हाताऱ्या आईला नाही ना विसरणार?’ ओथुन म्हणाला, ‘नाही अम्मी, तुला मी कसा विसरेन ? मी स्वतःला एकवेळ विसरेन; पण आईला कसा विसरेन ? ‘ आणि मग आईनं जड अंतःकरणानं त्याला निरोप दिला. ओथुन जहाजातून नॉर्वे देशाला आला. तेथून तो ग्रीनलँडला गेला. तिथं त्याला बर्फासारखीच पांढरीशुभ्र गुबगुबीत अस्वलं बघायला मिळाली. ती बघून त्याला फार आनंद झाला. एखादं असं अस्वल आपण पाळावं असं त्याच्यामनात आलं आणि तिथं बारा महिने कष्ट करून त्यानं जे पैसे कमावले होते ते सर्व एक अस्वलाचं पिल्लू खरेदी करण्यात खर्च केले ! त्याला खूप आनंद झाला. आता त्याच्याजवळ होतं काय ? अंगावरचे कपडे अन् एक पांढरं शुभ्र गुबगुबीत अस्वलाचं पिल्लू ! ग्रीनलँडला असताना त्यानं स्वीडनचा राजा स्वीन याची कीर्ती ऐकली की हा राजा धार्मिक वृत्तीचा आहे आणि तो तीर्थयात्रा करणाऱ्यांना पुष्कळ मदत करतो. ओथुनला तीर्थयात्रा करण्याची अन् धर्मगुरू पोप यांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. त्यानं विचार केला, हे अस्वल आपण राजा स्वीनला भेट म्हणून द्यावं आणि त्याच्या कृपेनं रोमची तीर्थयात्रा सुखानं करावी ! तो आपल्या अस्वलाला घेऊन डेन्मार्कला जायला निघाला, वाटेत जहाज नॉर्वेच्या किनाऱ्याला नांगरून पडलं. तेव्हा ओथुन ते पिल्लू घेऊन नॉर्वेच्या भूमीवर उतरला. नॉर्वे देशाचा राजा हेरल्ड नावाचा होता. ओथुन चालत चालत राजधानीच्या शहरातून जात असताना त्याच्यामागं जाणारं ते गुबगुबीत सुंदर अस्वल बघून प्रत्येकाला मजा वाटली. लोकांच्या तोंडी होता होता ही बातमी राजाच्या कानापर्यंत पोचली. पांढरं शुभ्र अस्वल बाळगावं अशी राजाला स्वतःला फार हौस होती. त्यानं ओथुनला बोलावून आणलं. राजा त्याला म्हणाला, ‘ऐकलंय, की तुझ्यापाशी एक फार मोलाचं रत्न आहे!’ ओथुन राजाला सलाम करून म्हणाला, ‘रत्न, आणि ते माझ्यासारख्या गरीब माणसापाशी ? हे अंगावरचे कपडे अन् हे अस्वल याखेरीज दुसरं काही नाही.’ राजा लगेच म्हणाला, ‘अरे तेच ! ते अस्वल हेच रत्न मी म्हणतो. असं रत्नं राजापाशीच शोभेल. तुझ्यासारखा कंगाल माणूस त्याला कसा सांभाळणार? म्हणून ते अस्वल मला विकत दे. तू त्याचे पैसे मागशील तेवढे मी तुला देईन!’ ओथुन म्हणाला, ‘क्षमा करा महाराज, मला ते विकायचं नाही.’ राजा म्हणाला, ‘तू’मागशील त्याच्या दुप्पट पैसे देतो, ते मला दे.’ ओथुन म्हणाला, ‘मला माफ करा. ते होणार नाही.’ राजा म्हणाला, ‘चौपट पैसे देतो.’ तरी ओथुननं नकारच दिला.

राजानं विचारलं, ‘विकायचं नाही तर काय मला ते तू भेट देणार आहेस ?’ तरी ओथुन हात जोडून ‘माफ करा महाराज‘ म्हणाला, राजा म्हणाला, ‘विकायचं नाही, भेट म्हणून द्यायचं नाही. तर या अस्वलाचं तू काय करणार आहेस ? तुझे स्वतःचे खाण्याचे हाल; मग अस्वलाचं पोट तू कसं भरणार?’ ओथुन म्हणाला, ‘ते काही जन्मभर मी पाळणार नाही, ते मला डेन्मार्कचा राजा स्वीन याला नजर करायचं आहे. तोवर मी त्याला काहीही करुन सांभाळीन.’ हे ऐकून राजाला राग आला. कारण डेन्मार्कच्या राजाशी त्याचं फार वर्ष वैर होतं; आणि त्यांच्या सतत लढाया होत होत्या. म्हणून ओथून अस्वल आपल्याला भेट म्हणून न देता आपल्या शत्रूला भेट देणार ही गोष्ट त्याला कशी रुचणार ? पण त्यानं आपला राग लगेच आवरला आणि तो म्हणाला, ‘म्हणजे तुला येथून डेन्मार्कला जायची इच्छा आहे?’ ओथुन’हो’ म्हणाला. राजा म्हणाला, ‘पण तिकडं जाण्याचा रस्ता धोक्याचा आहे. आमच्या सारख्या लढाया सुरू आहेत. वाटेत चोर-लुटारुही फिरत असतात. नागड्या-उघड्या माणसालाही ते जाऊ देत नाहीत. मग हे किंमती अस्वल घेऊन तू कसा जाणार?’ ओथुन म्हणाला, ‘अस्वल राजा स्वीनला भेट म्हणून द्यायचा माझ्या मनाचा निश्चयच आहे. तेव्हा वाटेल ती जोखीम पत्करावी लागली तरी ती पत्करून मला जायलाच हवं! ‘राजा विचारात पडला. थोड्या वेळानं तो म्हणाला, ‘ठीक, तू जा; पण तू डेन्मार्कला सुरक्षितपणे पोहोचावस याची जबाबदारी माझी आहे असं मी समजतो. वाटेत तुला काही झालं किंवा तुझं मोलाचं अस्वल चोरलं गेलं तर तो माझ्या नावाला काळा डाग लागेल की हे तुझं अस्वल मीच काही कपट करून पळविलं! म्हणून मी तुला ही माझी खुणेची अंगठी देतो. जिथं तुला धोका वाटेल, तिथं ही अंगठी दाखविलीस की माझी माणसं तुला त्यातून सोडवून पुढं नेतील.
त्यानं तुला कुठं अडथळा येणार नाही. पण तुला एक माझी सूचना आहे. तू परत येशील तेव्हा मला मुद्दाम भेटायचं आणि राजा स्वीननं तुझी कशी कदर केली ते मला सांगायचं. एवढं करशील? ओथुननं ती सूचना मान्य केली आणि राजानं दिलेली खुणेची अंगठी घेऊन त्याचे मनापासून आभार मानले. खुश्कीच्या म्हणजे जमिनीवरच्या रस्त्यानं जाताना ठिकठिकाणी लढाईचे मोर्चे बांधले होते. त्यातून त्याला जावं लागलं;
पण राजा हेरल्डनं दिलेल्या खुणेच्या अंगठीनं त्याचं काम बिनधोकपणे पार पडलं. ज्याच्यापाशी राजाच्या खुणेची ती अंगठी असेल, तो खुद्द राजाचा दूत समजला जाई; त्यामुळं ठिकठिकाणच्या सैनिकांनी ओथुनला त्याच्या अस्वलासह पुढं पुढं नेऊन सोडलं. असा जात-जात तो नॉर्वेच्या सीमेपर्यंत पोचला आणि तेथून जहाजात बसून डेन्मार्कला गेला. डेन्मार्कला तो पोचला; पण कित्येक दिवस त्याला उपास काढावे लागले. त्याच्या अस्वलालाही पुरतं खायला मिळालं नव्हतं; त्यामुळं दोघंही उपासमारीनं व्याकुळ झाले होते. म्हणून डेन्मार्कच्या किनाऱ्याला पाय लागताच ओथुन अन्नाचा शोध करू लागला. जमिनीवर पाय ठेवताच तिथला कोतवाल प्रथम त्याला भेटला. देशा-परदेशातून कोण येतं, कोण जातं, याचा तपास काढण्याचं त्याचं काम होतं. पांढरं अस्वल बघून त्या कोतवालाचं मन लालचावलं. त्यानं ओथुनला हाक मारली. ओ परदेसी! कुठं चाललास? थांब! ओथुन एकदम थबकला. त्यानं हा कोणी सरकारी कोतवालासारखा अंमलदार असावा हे ओळखलं तो त्याला म्हणाला, ‘आपण कोतवाल कां ? मला अन् माझ्या या अस्वलाला काही खायला मिळण्याची सोय होईल का हो ?’ कोतवाल मिशीवर हात फिरवीत म्हणाला, ‘होईल, होईल का नाही होणार ? पण पहिले हे मला सांग, की हे अस्वल घेऊन तू कुठं चाललायस? ओथुन म्हणाला, ‘मी हे अस्वल राजा स्वीनना भेट देण्यासाठी आणलं आहे. कोतवाल नाकपुड्या फुगवून म्हणाला, ‘राजा स्वीनना ? अस्सं काय ? पण काय रे, तुझ्या आणि तुझ्या अस्वलाच्या पोटभर खाण्याची मी सोय केल्याबद्दल मला काय तू देणार?’ ओथुन म्हणाला, ‘ मी हा असा कंगाल माणूस; आपल्याला काय देऊ शकणार? ‘ कोतवाल म्हणाला, ‘कां नाही ? राजाला भेट देणार ना हे अस्वल ? मग या अस्वलात माझा भाग काय ? ‘ ओथुन म्हणाला, ‘अस्वलात? तुमचा भाग ?’ कोतवाल म्हणाला, ‘हां हां, अर्धा भाग ! राजाकडून तुला परत भेट जी मिळेल, त्यातला अर्धा भाग मला देत असलास तर तुझी सारी व्यवस्था मी करतो. बोल. नाही तर तू आणि तुझं हे अस्वल उपाशी मार!’ ओथुनला स्वतःला तर भुकेनं खाल्लंच होतं; पण त्याहून देखील आपल्या अस्वलाची भुकेनं चाललेली तडफड बघून त्याला कोतवालाचं म्हणणं मान्य करावंच लागलं. कोतवालानं दोघांच्या भरपूर खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आणि त्यांना राजाच्या वाड्याकडं घेऊन जाऊन राजापुढं नेऊन उभं केलं. राजानं ओथुनला विचारलं, ‘तू कोण आहेस? कुठून आलास?’ ओथुननं विनयपूर्वक आपली ओळख करून दिली आणि तो म्हणाला, ‘ महाराज, मी ग्रीनलँडहून हे पांढरंशुभ्र अस्वल आपल्याला भेट म्हणून देण्यासाठी आणलं आहे. हे अस्वल खरेदी करण्यासाठी मी माझ्याजवळचा सगळाचा सगळा पैसा खर्ची घातला आहे. माझं आणि माझ्या या अस्वलाचं पोट भरण्यापुरतंसुद्धा माझ्यापाशी काही उरलेलं नाही. मला भीक मागावी लागत आहे. वाटेत मी नॉर्वे देशात उतरलो. तिथल्या राजा हेरल्डनं माझ्याकडं या सुंदर अस्वलाची मागणी केली, चौपट किंमत देतो म्हणाला; पण मी त्याला ते दिलं नाही. मी तिकडं चाललो आहे. हे एकून राजा हेरॉल्डचं आपल्याशी शत्रुत्व असतानादेखील त्यानं मला शांतपणे जाऊ दिलं. इतकंच नव्हे तर मला वाटेत कुणाचा त्रास होऊ नये, अडथळा होऊ नये म्हणून त्यानं आपली खुणेची अंगठीसुद्धा मला दिली. त्या अंगठीच्या बळावर मी येथपर्यंत सुरक्षित येऊन पोचू शकलो. पण इथली भीक मला महाग पडली, महाराज ! भीक पदरात घेण्यासाठी अस्वलाचा अर्धा हिस्सा मला द्यावा लागला !’ स्वीन राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं विचारलं, ‘अं? काय म्हणालास?’ ‘होय, खरं सांगतो महाराज, एका वेळचं माझं अन् या अस्वलाचं पोट भरण्याकरिता मला अस्वलाचा अर्धा भाग देण्याचं कबूल करावं लागलं. म्हणून मला वाटलं की ताबडतोब आपले दर्शन घेऊन हे अस्वल आपल्याला एकदाचं नजर करून टाकावं. मग माझं पुढं काय व्हायचं असेल ते होवो ! हे ऐकून राजा स्वीन म्हणाला, ‘काय? माझ्या राज्यात अशी गोष्ट घडते?’ ओथुन म्हणाला, ‘या कोतवालसाहेबांनाच विचारा ना ! तेच माझ्या अस्वलाच्या मिळकतीत अर्धे भागीदार आहेत!’ कोतवाल दूर उभा होता. आपल्याकडं बोट दाखवून परदेशी राजाला काही सांगतो आहे हे त्याला दिसलं अन् तो घाबरला. रागानं राजाचे डोळे लाल झाले.

तो म्हणाला, ‘कोतवाला, तुला लोकांचं रक्षण करण्यासाठी नेमलं असताना तू त्यांना लुबाडतोस ? या माणसानं आपला सगळा मिळकतीचा पैसा खर्चून जिवावरच्या जोखमी सोसून इथवर हे अस्वल मला भेट देण्यासाठी आणलं आणि तू त्यात सौदा केलास ? माझ्याशी वैर करणाऱ्या हेरल्ड राजानंदेखील याला डेन्मार्कला येण्याच्या सर्व सोयी करून दिल्या; आणि तू त्याला लुबाडायला निघालास ? दुष्टा, तू माझं नाक खाली करायला लावलंस ! तुला सुळावर चढविण्याची शिक्षा द्यावी असं माझ्या मनात येतं; पण राजानं एवढा राग धरणं बरं नाही असं राजनीती सांगते, म्हणून मी तुला फक्त या देशातून हद्दपार करण्याची शिक्षा करतो ! शिपाई, या कोतवालाच्या अंगावरचे सर्व कपडे काढून घ्या आणि त्याला या देशाच्या हद्दीबाहेर हाकलून द्या!’ मग ओथुनकडं वळून तो म्हणाला, ‘तुझ्या या सुंदर आणि प्रेमळ भेटीचा मी आनंदानं स्वीकार करतो, तुझ्या मनाला वाटेल तितके दिवस तू माझा पाहुणा म्हणून इथं राहा! राजा स्वीननं ओथुनला मोठ्या सन्मानानं ठेवून घेऊन त्याचा पाहुणचार केला. थोड्या दिवसांनी ओथुन राजाला म्हणाला, ‘ महाराज, आता मला परवानगी द्या!’ राजानं विचारलं, ‘का? कंटाळा आला?’‘आपल्या सहवासात आणि सुंदर देशात कुणाला कंटाळा कसा येईल? पण मी इथं आलो तो मनात एक इच्छा धरून.’ ‘काय तुझी इच्छा आहे?’ ‘धर्मक्षेत्र रोमला जाऊन तिथं धर्मगुरू पोप महाराजांचं दर्शन घेण्याचं फार दिवस माझ्या मनात आहे. आपण यात्रेकरुंची सोय करता असं मी ऐकलं होतं; म्हणून मी आपल्याकडं आलो! काही हरकत नाही. ‘तुझ्या या धर्मयात्रेची आम्ही सगळी सोय करून देतो,’ असं म्हणून राजानं ओथुनच्या रोमच्या यात्रेची सर्व तयारी करून दिली. ओथुन तीर्थयात्रेला निघाला. त्यानं रोमला जाऊन धर्मगुरु पोप यांचं दर्शन धेतलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मग तो तिथून परत फिरला. वाटेत तो आजारी पडला. या आजारात त्याच्याजवळ होता नव्हता, तो सारा पैसा खर्च होऊन गेला. इतके त्याचे हाल झाले की कित्येक दिवस त्याला उपाशीपोटी काढावे लागले. तो केवळ हाडांचा सापळा राहिला. अशा अवस्थेतदेखील त्यानं आपला प्रवास चालूच ठेवला आणि तो कसाबसा डेन्मार्कला येऊन पोचला. पण अशा भिकारी अवस्थेत राजाकडं जाऊन त्याला भेटावं कसं? म्हणून तो धर्मशाळेत राहिला. इतक्यात ईस्टरचा सण आला. त्या दिवशी राजा प्रार्थना करण्याकरिता देवळात जाणार, त्यावेळी त्याच्या नजरेला पडण्याची संधी घ्यायची असं त्यानं योजलं. म्हणून त्या दिवशी तो देवळाच्या वाटेवर एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. राजाची स्वारी देवळात आली. प्रार्थना करुन तो देवळाच्या बाहेर पडला. तेव्हाच त्याच्यापुढं व्हावं असं ठरवून ओथुन रस्त्यात पुढं झाला; पण राजाच्या बरोबर लवाजमा मोठा असल्यामुळं त्या गर्दीत तो बाजूला ढकला गेला. पण राजाची सगळीकडं फिरणारी नजर त्याच्यावर पडली आणि त्यानं ‘हा कोण कंगाल, अस्थिपंजर माणूस आहे, त्याला माझ्याकडं आणा’ असा हुकूम केला. सेवकांनी ओथुनला धरून राजा स्वीनपुढं आणलं. राजा त्याला विचारणार होता की तो कोण, कुठला, एवढ्यात त्याला ओथुनची ओळख पटली आणि तो उद्गारला,‘कोण? ओथून? अरे, काय तुझी दशा ही ?‘त्यानं त्याला आदरपूर्वक आपल्याजवळ घेतलं आणि तो राजवाड्यात आला. त्याला राजानं आपल्याजवळ घेतलेलं पाहून दरबारी माणसं हसू लागली. तेव्हा राजा म्हणाला, ‘अरे, तुम्ही त्याला नाही हसत; मला हसता ! याचं शरीर हाडांचा पिंजरा झालाय्, हा कंगाल झाला म्हणून काही तो तुच्छ ठरत नाही. त्याचं शरीर कंगाल असलं तरी आत्मा श्रीमंत आहे. हा कष्टी आहे. कष्ट देणारा नाही; म्हणून देवाची याच्यावर कृपा आहे.’ हसणारे खजील होऊन गप्प बसले. राजा ओथुनला आपल्या बरोबरच घेऊन गेला आणि आपल्याच महालात त्याला त्यानं ठेवून घेतलं. तो त्याच्याकडून वरचेवर त्याच्या तीर्थयात्रेच्या हकिगती आणि अनुभव ऐकत राहिला. इतक्या तरुण वयातसुद्धा खूप अनुभव मिळाल्यामुळं तो अधिक शहाणा झाला होता. राजा म्हणाला, ‘ओथुन, तू आता इथंच रहा. माझ्या दरबाराचं रत्न म्हणून तुला मी मानीन!’ ओथुन म्हणाला, ‘तीन वर्षं पुरी व्हायला आली. मला आता आईसलँडला जाऊन पोचलं पाहिजे! राजा म्हणाला, ‘त्या बर्फाळ मुलुखात तुझं काय पुरून ठेवलंय् ? ओथुन शांतपणे म्हणाला, ‘माझी आई वाट पाहत आहे !’ हे शब्द बोलाताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरारले. राजाच्या मनावर त्या शब्दांचा परिणाम झाला. ओथुन म्हणाला, ‘माझ्या आईला मी तीन वर्षांची मुदत सांगून निघालो होतो. तिची तीन वर्षांचीच बेगमी करून मी बाहेर पडलो होतो. इथं मी मजेत रहायचं अन् तिनं तिथं माझी वाट बघत दुःखात दिवस काढायचे हे मला कसं बरं वाटेल?मग राजानं त्याला घरी जाण्याची परवानगी दिली; आणि त्याच्यासाठी जहाजाची सोयही करुन दिली. थोड्या दिवसांनी राजा स्वीन ओथुनला घेऊन बंदरावर गेला. तिथं बरीच जहाजं उभी होती; पण त्यातसुद्धा एक जहाज अतिशय सुंदर होतं. राजा म्हणाला, ‘कसं वाटतंय् हे जहाज ? पुष्कळ खर्च करून खास तुझ्यासाठी मी हे बनवून घेतलंय् !’ ओथुननं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. तो म्हणाला, ‘इतकं सुंदर जहाज मी कधीच बघितलं नव्हतं!’ राजा म्हणाला, ‘तूच काय, कोणीच बघितलेलं नाही. हे मी तुला माझी भेट म्हणून बक्षीस देतो. तू मला अजोड असं अस्वल भेट दिलंस; तर मी तुला अजोड असं हे जहाज भेट देतो! ओथुन राजाकडं आश्चर्यानं बघतच राहिला. राजा म्हणाला, हे सगळं जहाज खाण्या-पिण्याच्या अन् अंगावर घालण्या पांघरण्याच्या वस्तूंनी भरून ठेवलंय्. पुष्कळ वर्ष तुला त्या वस्तू पुरतील अन् तू मजेत राहू शकशील आणि तुझ्या आईला सुखात ठेवू शकशील. पण आइसलँडच्या समुद्रात बरेच छुपे खडक आहेत अन् तिथं जहाजं फुटण्याचा धोका सतत असतो असं ऐकतो. दुर्दैवानं असं काही झालं आणि तुझं जहाज खडकावर आपटून फुटलं तर तू राजा स्वीनला भेटला होतास अन् त्यानं तुझा सत्कार केला होता हे कुणाला कसं कळणार? थोडा वेळ थांबून त्यानं स्वतःचं उत्तर दिलः ‘ही सोन्याच्या नाण्यांनी भरलेली थैली घे. ती सदोदित तुझ्या कमरेला बांधून ठेव. जहाज बुडलं तरी ही थैली तरी तुझ्यापाशी राहील !’ असं म्हणून त्यानं सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक चामड्याची थैली त्याला दिली. परत त्याच्या मनात आलं, ‘सोन्या-रुप्याची नाणी तर पुष्कळांपाशी असतात, त्यात मी विशेष काय केलं ? थैली कदाचित हरवेल, चोरीलाही जाईल. मग लोकांना कसं कळणार की तू राजा स्वीनचा पाहुणा अन् मित्र होतास?’ विचार करुन त्यानं आपल्या बोटातली अंगठी काढून ओथुनच्या हातावर ठेवली अन् म्हणाला, ‘ही तू तुझ्या बोटात घाल. देव न करो, पण दुर्दैवानं तुझं हे जहाज बुडलं, ही थैली हरवलीच, तरी निदान ही स्वीन राजाची अंगठी तुझ्यापाशी राहील. आणि ती तुला अन् लोकांना माझी आठवण करून देईल!’ थोडा वेळ थांबून पुनः तो त्याला म्हणाला, ‘ही अंगठी तू कोणालाही देऊ नयेस असं तर मी म्हणू शकत नाही;पण द्यायचीच झाली तर जगात जो तुला मोठ्यातला मोठा माणूस वाटेल, त्याला ती तू खुशाल द्यावीस!’ आणि राजा स्वीननं ओथुनला प्रेमानं निरोप दिला.

ओथुनचं ते उत्कृष्ट जहाज नॉर्वेला पोचलं, तेव्हा राजा हेरल्डला दिलेल्या वचनाप्रमाणं ओथुन नॉर्वेच्या बंदरात उतरला आणि राजाला भेटायला गेला. त्याला पाहताच राजा हेरल्डनं त्याला ओळखलं. त्याला आपण काय सांगितलं होतं त्याचीही त्याला आठवण झाली आणि त्यानं मोठ्या उत्सुकतेनं विचारलं, ‘राजा स्वीननं तुझा कसा पाहुणचार केला, सांग बघू!
ओथुन म्हणाला, ‘फार छान !’
‘तुझी अस्वलाची भेट त्यानं कशी स्वीकारली ?”
‘मोठ्या आनंदानं अन् प्रेमानं!’
राजा हेरल्ड म्हणाला, ‘तशी तर मीसुद्धा स्वीकारली असती ! ‘त्यात त्यानं
विशेष काय केलं?
मला रोमच्या यात्रेला जाण्याकरिता पैसे दिले.
‘तसे तर तो नेहमीच पुष्कळांना पैसे देतो. त्यासाठी त्याला भेट द्यावी लागत नाही. पण त्यानं याहून विशेष काही केलं का? सांग !’ ‘त्यानं मला आपल्या दरबारात राहण्याचं निमंत्रण दिलं. म्हणाला, माझ्या दरबाराचं रत्न मानीन.’ मी तुला हेरल्ड म्हणाला, ‘ही झाली फक्त तोंडचीच बात ! त्यानं तुला नुसती वचनंच दिली की आणखी काही दिलं? त्यानं माझ्यासाठी खास एक सर्वोत्कृष्ट जहाज बनवून दिलं. साधनं-सामग्रीसहित!’
‘अंः, ते तर मीही दिलं असतं. त्यानं त्यात विशेष काय केलं?’ त्यानं मला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली ही थैली दिली. म्हणाला, ‘देव न करो, पण जर तुझं जहाज कदाचित् खडकावर आपटून फु टलं तर हे धन तुझ्या उपयोगी पडेल.’ हे एकून राजा हेरल्ड म्हणाला, ‘ही गोष्ट मात्र त्यानं विशेष केली खरी. हे करण्याचं मला सुचलं नसतं. दुसरं आणखी काय केलं?ओथुननं आपल्या बोटात असलेली अंगठी दाखविली आणि म्हणाला,
‘आपल्या बोटातली ही अंगठी काढून त्यानं मला दिली. म्हणाला, देव न करो, पण जर तुझं जहाज बुडालं, सोन्याची थैली हरवली, तरीसुद्धा माझी आठवण म्हणून ही अंगठी तुझ्यापाशी सदोदित राहील. ‘आणखी तो काय म्हणाला ?” ‘तो म्हणाला, ‘ही अंगठी तू कुणालाही देवू नकोस असं काही मी म्हणत नाही; पण द्यायचीच झाली तर जगातल्या सर्वात मोठ्या माणसाची कृपा मिळत असेल तर ती खुशाल दे!’ थोडा वेळ थांबून ओथुन पुढं म्हणाला, ‘आणि देवाच्या दयेनं जगातल्या ज्या सर्वात मोठ्या माणसाची कृपा मला मिळाली असं मला वाटतं, त्या श्रेष्ठ पुरुषाला ही अंगठी मी आता अर्पण करू इच्छितो. ही अंगठी मी आपल्याला अर्पण करतो. आपण तिचा स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे. ‘ असं म्हणून त्यानं आपल्या बोटातून अंगठी काढली आणि ती राजा हेरल्डपुढं केली. राजा म्हणाला, ‘थांब, मी जगातला सर्वात मोठा माणूस तू कसा ठरविलास? हे तुझे खुशामतीचे शब्द नाहीत काय ?” ओथुन निश्चयाच्या स्वरात बोलला, ‘नाहीत महाराज! ‘कसे?’ ओथुन म्हणाला, ‘मी पहिल्या प्रथम अस्वल घेऊन आपल्याकडे आलो होतो. त्यावेळी आपण मनात आणलं असतं तर सत्तेच्या बळावर माझं अस्वल काढून घेऊ शकला असता. अस्वलच नव्हे, तर माझं जीवनसुद्धा आपल्या हातात होतं. पण आपण तसं काही केलं नाही. उलट, आपल्या शत्रूकडं मी गोष्टींच्या गुहेत जायचं म्हणालो तर मी सुरक्षित जावं अशी माझी सोय करून दिलीत. अशी उदारता आणि मानवता दुसऱ्या कुणी राजानं दाखविल्याचं माझ्या माहितीत नाही. म्हणून मी आपल्याला जगातला मोठ्यात मोठा माणूस मानतो; आणि आपली कृपा मला लाभावी याकरिता अन् स्वतःला भाग्यशाली समजून ही अंगठी मी आपल्याला अर्पण करतो. यायोगे राजा स्वीनचीही कीर्ती होईल, माझीही कीर्ती होईल आणि आपली कीर्ती तर आहेच!’ राजा हेरल्डने मग आनंदानं त्या अंगठीचा स्वीकार केला त्याच वेळी त्यानं जाहीर केलं की आजपासून नॉर्वेचं डेन्मार्कशी असलेलं शत्रुत्व कायमचं संपलं आहे. राज्यसभेत त्यानं ही घोषणा केली अन् सभेनं आनंदाचा जयघोष केला. राजानं ओथुनला थोडे दिवस आपल्याकडं ठेवून घेतलं आणि नंतर पुष्कळ बहुमोलाच्या भेटी देऊन त्यानं त्याला निरोप दिला. ओथुन आपलं जहाज घेऊन देवाच्या दयेनं सुखरूप आपल्या देशाला पोचला. तो आपल्या घरी पोचला तेव्हा तिसऱ्या वर्षाचा तो शेवटचा दिवस होता आणि त्याची म्हातारी आई आपल्या मुलाच्या वाटेकडं डोळे लावून बसली होती. ओथुननं आई, ‘आई’ करीत आईच्या गळ्याला मिठी मारली !

Author