(ब्रह्मदेशातली लोककथा )
आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत. या सगळ्यांची एकच भाषा होती. त्याकाळी आजच्यासारखे अनेक भाषा बोलणारे लोकसमूह नव्हते. एकच भाषा असल्यामुळे त्यांचा परस्परांमध्ये उत्तम संवाद होत असे. त्यामुळे सर्वांमध्ये मैत्रीचे नाते होते. चीन्स लोकांना निसर्गातच अन्नधान्याची, भाज्याफळांची मुबलक उपलब्धी असल्याने त्यांना कशाची म्हणून चिंता नव्हती. बर्फ वितळल्यावर डोंगरावरून धबधब्याचे पाणी पडायचे, नदीत भरपूर मासे मिळायचे. सगळे सुबत्तेचे, आनंदाचे वातावरण असायचे. दारिद्र्य, गरिबी हे शब्दही नव्हते. प्रत्येक जण आपल्या गरजेपुरती शेती करायचे. शेतीची कामे आटोपली की मोकळा वेळ मिळायचा. या मोकळ्या वेळात हे लोक दूरदूरच्या जंगलात, हिरवळीत सहली काढायचे. एक वाघाची भीती सोडली तर त्यांना कशाची म्हणून चिंता नव्हती.
इतके साधे सरळ जीवन जगणाऱ्या लोकांना एक प्रश्न मात्र कायम सतावत होता. तो म्हणजे आकाशात दिसणारा चंद्र. हा चंद्र कधी खूप मोठा, तेजस्वी, गोलाकार दिसायचा आणि कधी अगदी कोयत्याच्या कोरीसारखा दिसायचा. सतत इकडून तिकडे फिरणारा, आकार बदलणारा हा चंद्र पाहून या लोकांना अनेक प्रश्न पडायचे. त्यांच्या दिनक्रमावरही त्याचा परिणाम व्हायचा. त्यामुळे चंद्र हा या लोकांच्या चर्चेचा एक महत्त्वाचा विषय बनला होता.
एके दिवशी एक माणूस बांबूचे कोवळे कोंब आणि हिरवा भाजीपाला घेऊन वस्तीवरच्या बाजारात आला होता. आपल्या मनाला कायम सतावणाऱ्या चंद्राविषयी तो आपल्या मित्रांशी बोलत होता. “हा चंद्र का असा सतत भटकत असतो? माझे हात जर त्याच्यापर्यंत पोहचण्याइतके लांब असते, तर मी नक्कीच या उनाड भटक्या चंद्राला पकडून आणले असते; आणि त्याला थेट आपल्या गावातल्या खांबाला बांधून घातले असते. या गोलाकार चेंडूला पकडून मुलांना खेळायला दिला असता.”
बाजारात शेंगा विकायला आलेली एक बाई त्या बांबूचे कोंभ विकणाऱ्या माणसाला म्हणाली, “अरे बाबा, तू वेडा का खुळा? हा चंद्र म्हणजे एक फार मोठा धातूचा गोळा आहे. एवढा जड गोळा तुझ्या हातात येणार नाही, आणि मुलांना तर त्याच्याशी नक्कीच खेळता येणार नाही.” आकाशात भटकणारा चंद्र हा एक धातूचा गोळा असल्याची नवीच माहिती ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. ते त्या चंद्राकडे संशयाने पाहू लागले. एकाला वाटले, “असेना का हा धातूचा गोळा. तसे असेल तर आपण त्याच्यापासून शेतीची अवजारे तयार करू.”
दुसरा एक तरुण मुलगा म्हणाला, “अरे तुम्हाला सांगतो, या आकाशात भटकणाऱ्या चंद्राच्या पोटात एक दिवा आहे. काल रात्री मी असाच जंगलात फिरायला गेलो होतो, तेव्हा मी त्याच्या पोटातला दिवा पाहिला. त्याचा उजेड इतका स्पष्ट होता की, त्या उजेडात मला लांबून येणारा वाघ दिसला. त्या दिव्यामुळेच मी वाचलो.”
हे ऐकून तिसऱ्या माणसाला उत्साह आला. तो म्हणाला, “अरे या चंद्राला आपल्याला पकडता आलं तर रोज संध्याकाळी रात्री आपल्या सगळ्यांना त्याच्या उजेडात फिरता येईल. वाघाची भीतीही जाईल. पकडायलाच हवे आपण त्याला!” मात्र त्याच्यापर्यंत पोहचायचे कसे हा प्रश्न काही सुटत नव्हता. सगळ्यांना वाटायचे, आपल्याला उंच हात हवे होते! यावर उपाय काय, यावर बरीच उलटसुलट चर्चा होत राहिली.
प्रत्येकाने आपापली मतं मांडल्यावर सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला. काही झालं तरी आपण चंद्रापर्यंत पोहचायचंच. पर्वतराजीवरच्या सर्व माणसांनी एकत्र येऊन एक भले थोरले, उंच मचाण बांधायचे ठरवले. आजच्या भाषेत सांगायचे तर एक मोठा टॉवर बांधायचा निर्णय झाला. त्यानुसार विभागणी करण्यात आली. पूर्वेकडच्या खोऱ्यातल्या लोकांनी विटा बनवण्यासाठी माती आणायची. पश्चिमेकडच्या लोकांनी उंच झाडांचे लांबसडक खांब आणायचे. दक्षिणेकडच्या लोकांनी बांबूच्या मोळ्या आणायच्या. उत्तरेकडच्या लोकांनी मचाणाचा मजबूत पाया घालण्यासाठी पर्वतावर खोल खड्डा खणायचा.
ठरलेल्या नियोजनानुसार सर्व जण कामाला लागले. खड्यात काही खांब रोवून ते एकमेकांना घट्ट बांधून पाया तयार करण्यात आला. त्यावर झाडाच्या फांद्या आणि बांबूंच्या दांड्यांनी भिंती आणि पायऱ्या रचण्याचे काम सुरू झाले. खूप उंचापर्यंत असे बांधकाम झाले तरी चंद्राच्या जवळपासही पोहचता येईना. चारी दिशांना जाऊन लोक बांधकामाची सामग्री जमा करायचे, पण पुन्हा पुन्हा सामग्री गोळा करायला जाताना दमछाक होऊ लागली. पण तरीही हार न मानता प्रत्येक जण या थकव्यावर मात करण्यासाठी एकमेकांना दिलासा देऊ लागले. एक जण म्हणाला, “आता लवकरच आपलं ध्येय साध्य होईल.” काही दिवसांनी दुसरा म्हणाला, “आता फार वेळ लागणार नाही, चंद्राचा दिवा स्पष्ट दिसू लागला आहे.” पण नंतर पुन्हा काही दिवसांनी दिव्याचा आकार छोटा व्हायचा, उजेड मंद व्हायचा. पुन्हा एकदा लोकांमध्ये अस्वस्थता यायची.
टॉवर चांगलाच उंच झाला होता. पण लोक म्हणू लागले, “दिवसभर कामापेक्षा चढ-उतार करण्यातच आपला वेळ जातो, आणि दमवणूकही होते. खायला-प्यायला वेळ मिळत नाही, मुलांकडे लक्ष देता येत नाही, अशा तक्रारी सुरू झाल्या. त्यावर एका म्हाताऱ्या अनुभवी माणसाने तोडगा काढला. तो म्हणाला, “असं पहा, सर्वांनी सारखी चढ-उतार करून दमण्यापेक्षा आपण थोडी कार्यविभागणी करू. काही लोक सर्वात वरच्या मचाणावर म्हणजे वरच्या टॉवरवरच थांबून पुढचे काम करीत राहतील. त्यांनी खाली-वर चढ-उतर करण्याचे कारण नाही. काही लोक मधल्या भागावर थांबून खालून येणारी सामग्री वरच्या माणसांना पोहचवतील. तळमजल्यावरील लोक बांधकामाचे साहित्य आणि अन्नपदार्थ तयार करून वरच्या पातळीवर काम करणाऱ्यांना पाठवत राहतील. सर्वांना ही कार्यविभागणी मान्य झाली.
काही काळानंतर असे लक्षात आले की, तळमजल्यावरच्या रसद पुरवणाऱ्या लोकांना सर्वात जास्त कष्ट करावे लागत आणि त्या तुलनेत सर्वात उंच स्थानावर काम करणाऱ्या लोकांना उसंत मिळू लागली, आराम करता येऊ लागला. उंचावरून दिसणाऱ्या सृष्टीसौंदर्याची मजा चाखता येऊ लागली. काम थोडे आणि आनंद जास्त! तळमजल्यावरच्या लोकांना कामाचा ताण पडू लागला आणि आनंदापेक्षा ते कष्टाचेच धनी झाले. वरच्या मजल्यावरच्या लोकांचा खालच्या मजल्यावरील लोकांशी असलेल्या संबंधात दुरावा निर्माण होऊ लागला. टॉवर मात्र बांधून झाला नाही.
हळूहळू तळाच्या लोकांना सर्वांसाठी अन्नधान्य पिकवण्याचा, अवजड सामान गोळा करून वरच्या मजल्यावर पाठवण्याचा शीण येऊ लागला. त्यांनी वरच्या मजल्यावर रसद पाठविण्याचे काम थांबवले. वरच्या मजल्यावरचे लोक भुकेने तडफडून मरू लागले. बरेच लोक आपण चंद्राला पकडण्यासाठी टॉवर बांधण्याचे कार्य हाती घेतले आहे, हेच विसरले, आणि ते टॉवरवरून खाली उतरून या प्रकल्पापासून दूर निघून गेले.
या टॉवरचे पुढे काय झाले, हे आज कुणालाच सांगता येत नाही. कुणी म्हणतात, या बांधकामामुळे चंद्रच वैतागला, आणि त्यानेच या टॉवरला ढकलून दिल्याने तो धडाधड कोसळला. कुणी म्हणतात, मोठे वादळ आले आणि त्यात टॉवर कोसळला. अशा बऱ्याच समजुती असल्या तरी या पर्वतराजीतल्या चिन्सच्या वंशावळीतली मुलं मात्र आपल्या पूर्वजांच्या या ध्यासाला विसरली नाहीत. नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या लढवून चंद्राला आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयास अजूनही चालूच आहे. चंद्रही दूरून माणसांच्या या खेळाकडे गंमतीने पहात आहे.
असे म्हणतात की, चिन्स जमातीची माणसं पुढे प्रगत झाली. त्यांनी आपल्या तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. त्यांनी चांद्रयान तयार केले आणि चंद्रावर स्वारी करून त्यावर आपला झेंडा रोवला. चंद्रातला दिवा मात्र याकडे मजेनेच पाहतो आहे, आणि त्याने अजून उजेड देण्याचे काम थांबवलेले नाही!