समुद्रतळीचा राजवाडा

(जपानची लोककथा)

दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा
“होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा
डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून
लोक त्याला ओळखीत असत.



(जपानची लोककथा)

दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा
“होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा
डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून
लोक त्याला ओळखीत असत. ‘होकी’ हा स्वभावानेही दयाळू, चांगला व सरळ
तर ‘होना’ मोठा दुष्ट स्वार्थी व निष्ठुर ! एकाच आईची मुलं, पण किती फरक
असतो, पाहिलंत?
एक दिवस होकी वडील भावाला म्हणाला – ‘दादा, रोज उठून रानात
धावायचा फार कंटाळा आला आहे. आजच्या दिवस थंडपणे समुद्रकाठी बसून
मासे मारावे म्हणतो. तुमचा गळ देता आज मला?’
‘पण माझा गळ मी मुद्दाम बनवून घेतलेला आहे. भारी महागाईचा आहे,
यशस्वी आहे, तू कुठेतरी हरवशील. मी देत नाही!’
‘अहो, हरवायला काय झालं? द्याकी, एकच दिवस तर मागतो आहे मी दादा-
द्या ना. असं काय करता ?’
‘बरं ने, पण हरवलास तर याद राख, हाकलूनच देईन घरातून. असे म्हणून
त्याने आपला तो मूल्यवान गळ होकीला दिला.
गेला समुद्रावर होकी. समुद्र कसा शांत निळा गहिरा दिसत होता, थंड
वाऱ्याच्या झुळका त्याला किती सुखकर वाटत होत्या व काम तर मजेचच. इतके
छान छान मासे समुद्रात पोहत होते ते गळाने पकडायचे. ‘एखादा मोठा मासा
गळाला लागला की, बस्स तेवढ्यात आपलं जेवण होईल आजचं. रोजचं माझं
डोंगर पहाडात धावणं, त्याऐवजी हे काम सोपं-अगदी सोप्पंच!’ तो विचार करीत
होता. पण ते काम तेवढं ‘सोप्पंसं’ नव्हतं. इतके मासे समुद्रात फिरत होते पण
एक मासाही याच्या गळाला लागेना ! समुद्रातले सारेच मासे जणू शहाणे झाले
होते आज या गळाला फसणे म्हणजे मरण हे ओळखत होते जसे. सायंकाळ
झाली, तरी करंगळीएवढी मासोळीसुद्धा गळाला नाही लागली ! चला उठा. हा
व्यवसाय नशिबाचाही आहेसे दिसते – तो उठता उठता गळ टाकून म्हणाला –
‘आता हा शेवटचा प्रयत्न. पाहू नशीब! पण खरेच, ‘त्याचे नशीब आज रुसले
असावे त्याच्यावर. कारण एक भला मोठा देवमासा या गळाला अडकलासे
त्याला वाटले. गळ तो ओढून घेणार, तर हे काय झाले? त्या माशानेच याचा गळ
जोरात उसळी मारून ओढून घेतला व तो समुद्रात दूर कुठे गडप झाला ! गळ
गेला. आता दादा किती संतापतील? कोण जाणे! भीत भीत तो घरी आला व
दादांना त्याने सर्व सांगितले व ‘मी बाजारातून नवा गळ आणून देतो,’ असेही
म्हटले!
होना दादा ओरडला. ‘मला वाटलंच, तू असा धांदरट, तुला गळ देऊ नये
म्हणून. पण म्हटलं जाऊ द्या, लहान भाऊ कधी नव्हे ते मागतो आज, द्यावा. तर
माझा यशस्वी गळ गमावून आलास? “गळ गेला! म्हणून तोंड वेंगाडून सांगताना
लाज नाही वाटली?
‘पण-पण मी-मी उद्याच आणून देतो- त्याहून चांगला दादा.
‘नाही ! मला दुसरा नको ! माझाच गळ मला हवा ! जा निघ, चालता हो
घरातून. घरात यायचं असलं तर माझा तो गळ हुडकून मगच पाऊल ठेव इथे,
तोवर या घराची दारं तुला बंद ! जा, निघ, काळं कर इथून!’ होनाने त्याचे धनुष्य
व बाणही उचलून घेतले व म्हटले- ‘आणि ध्यानात ठेव, गळ आणशील तेव्हाच
तुझं धनुष्य अन् बाण परत मिळतील. मी अडकवून ठेवतोय ते! चलावं!’
होनाने हात धरून त्याला दाराबाहेर ढकलले व खाडकन् दार बंद करून
टाकले. किती निर्दयपणा हा ? होकी लहान भाऊ, स्वभाव नम्र, तरही, थोरला
भाऊ एवढं मोठं शासन करील असं त्याला वाटलं नव्हतं. क्षुद्र गळ तो काय ?
गोष्ट किती क्षुल्लक अन् शिक्षा किती मोठी ? म्हणे घरात येऊ नको! ‘अरे, या
घरातच माझ्या आईच्या कितीक आठवणी जागोजाग आठवीत राहातो मी,
आईच्या लाडक्या वस्तू मी रोज काढून पहातो, ते माझं सुखही दादा तुम्ही
हिरावून घेतलंत? एवढा मोठा अपराध होता का माझा? मोठे कठोर मन तुमचे.’
स्वतःशी विचार करीत तो समुद्रावर आला. काठावर उदासपणे बसून
राहिला. एवढ्या प्रचंड समुद्रात हरवलेला गळ सापडवून काढणं म्हणजे
वाळूच्या मैदानात हरवलेली टाचणी हुडकण्यासारखंच वेडेपणाचं, काय बरं
करावं?
समोरून एक वृद्ध आला. त्यानं विचारलं – ‘रात्र झाली बेटा, तरीही इथे का
बसून राहिला आहेस? ‘त्यानं सारे सांगितले, वृद्ध म्हणाला, ‘तर मग तुला तुझा
गळ आणायला समुद्रतळी देवमाशाच्या किंवा आपल्या पाणसर्प राक्षसदेवांच्या
राजवाड्यातच जायला हवं. समुद्रात हरवलेल्या साऱ्या वस्तू तेथे आणल्या
जातात. ‘राजे चांगले आहेत. तू त्यांना भेट ‘
‘सांगायला ते ठीक, पण समुद्रतळी मी जायचं कसं?
‘हात्तेच्या, त्यात काय अवघड ? चल, माझी ही छोटी नाव आहे त्यात बैस. मी
पोचवतो. डोळे मीट जरा!’
त्याने डोळे मिटले. नाव सुरू झाली पण ती खोलखोल जाते आहे व तरीही
आपण भिजत नाही आहोत हे त्याला जाणवले. ‘उघड डोळे. हाच ड्रॅगन किंगचा
(पाणसर्प राक्षसदेवाचा) राजवाडा.’ त्याने शब्द ऐकले. डोळे उघडतो तो खरेच!
केवढा सुंदर व कोरीव कामाचा प्रचंड राजवाडा तो? राजवाड्याभोवती सोनेरी
चकाकणारी वाळू पसरलेली होती, चीनमधील शिंगावर शिंगे असलेल्या
देवालयांप्रमाणे याची छपरे होती. समुद्रशेवाळाच्या रंगीबेरंगी झुपक्यांनी ह्या
शिखरांवर नक्षी कोरली होती. रत्नाकराचेच राज्य ते! तेथे मोत्यांची कमतरता
थोडीच? रत्नमहाल म्हणण्यासारखी रत्ने, मोत्ये तेथे खिडक्या दारांवर
बसवली होती व त्यांनी त्या राजवाड्याची दालने चकाकत होती. त्याने जन्मांत
इतका भव्य व एवढा दिव्य राजवाडा पाहिला नव्हता. पण या राजवाड्याची दारे
गच्च बंद. शेजारीच एक मोठे निराळ्या प्रकारचे पण सुंदर फुलांचे मोठे झाड
होते. कुणीतरी आतून बाहेर येईल दार उघडेल, तोवर बघूया, असे म्हणून तो
त्या झाडावर चढून बसला.
आणि खरेच; थोड्या वेळाने दोन अत्यंत सुंदर मुली तेथे राजवाड्याचे एक
दार उघडून आल्या. अगदी मानवाच्या मुलीसारख्याच ! होकीला वाटत होते
की, हे ड्रॅगनचे राज्य, येथले सारेजण म्हणजे मासे, देवमासे, सुसरी, मगरी किंवा
पाणसर्प, पाणघोडे अशाच आकारात असणार! पण येथेही मानवांच्याप्रमाणेच
काही मंडळी आहेत का ? वा ! फार छान. त्या दोघी राजकन्या फु लं वेचायला
आल्या व त्यांनी होकीला पाहिले व खाली येण्याची खूण केली व म्हटले, ‘आपण
कोणी पृथ्वीवरचे दिसता, इकडे कसे ?
‘मी माझी एक समुद्रात बुडालेली वस्तू शोधायला आलो. मी एक गरीब तरुण
आहे. होकी माझं नाव. आपण?’
‘आम्ही समुद्रदेव सर्पराक्षसराज यांच्या मुली, चला तुम्हाला आम्ही बाबांकडे
नेतो. पृथ्वीवर त्यांचे मानवमित्रही आहेत. ‘
त्यांच्याबरोबर तो राजवाड्यात राजाकडे गेला. राजा पाणसर्पराज यावेळी
मानव रूपात होता. होकीला बघून व त्याची हकिगत ऐकून तो म्हणाला-
‘मुला, तुला बघून मला पृथ्वीवरच्या एका माझ्या सज्जन मित्राची आठवण
झाली.’ त्याचं नाव युशिन. टोकियो शहरात ते मच्छीमारीचा धंदा करायचे. तू
अगदी तस्सा दिसतोस
‘ मी त्यांचाच पुत्र आहे महाराज, युशिन् माझे वडील आता राहिले नाहीत,
देवाघरी गेले ते.’
अरेरे ! बरं तू मित्राचा मुलगा आला आहेस तर तुझं कामही करू पण जरा
सावकाशीनं. राहा, मजा कर, माझ्या राज्यातली प्रेक्षणीय स्थळे बघून घे. खूपच
चमत्कार आहेत येथे. माझा तू पाहुणाच आहेस, आनंदात रहा बेटा.’
अन् यांत दोन वर्ष उलटली तरी त्याला समजलेच नाही! इतका तो रमला
तेथे. मोठे चित्रविचित्र जग होते ते ! जपानही खरे बेटच, पुष्कळ प्रकारचे मासे
त्याने पाहिलेलेच; पण हे एकाहून एक निराळे मासे तो बघतच राही. काय त्यांचे
चकाकते अंगरंग ! किती विचित्र रचना देहाची ! समुद्रीय फुलझाडे म्हणून त्याने
एका मोठ्या फुलाला हात लावला तर विंचू डसल्याप्रमाणे झटकाच बसला
हाताला ! तो समुद्रजीव होता. अर्थात खरी फुले, तीही अतिशय सुंदर फुले, तेथे
कमी नव्हती. समुद्रवेलींचे इतके मनोहर प्रकार? त्याने भूमीवर कधीच वेलींचे
असे प्रकार बघितले नव्हते……
त्यातल्या एका राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले तशी राजाने आनंदाने
त्याला जावाई करून घेतले. तीन वर्षे झाली. ‘गळाची त्याला एकदम आठवण
झाली. अरे! आपण त्या गळासाठी ना आलो होतो? मग ? विसरलो कसे इतके
दिवस ते ? त्याने सर्पराजाना विचारले. त्यांचा एक ‘सापडलेल्या वस्तूंचा
महाल वेगळा होता तेथे तो गळ त्याला सापडलाही. मग तो म्हणाला-
‘मी या गळासाठी आलो होतो खरे तर. पण विसरलोचमी. ‘
राजाराणीच्या गोष्टी‘ आहेच आमचं राज्य तसं, सारं विसरायला लावणारं.’
‘पण तो माझ्या मोठ्या भावाचा गळ आहे, मी देऊन यावं म्हणतो-‘
‘हरकत नाही, पत्नीला घेऊन जाणार कां?’
‘आधी तिच्यासाठी मी एक राजवाडा बांधतो. एक वर्षात होईल मग पाठवा –
माझ्या भावाच्या घरात मलाच जागा मिळणं कठीण -‘
‘ठीक, ठीक. तोवर तुझा तान्हा मुलगाही ५-६ महिन्यांचा होईल, जाऊन ये.
आणि एक. तू समुद्रकाठी राहणारा. समुद्रापासून तुला भय नको म्हणून हा एक
जादूचा शिंपला ठेव जवळ. हा हातात घेऊन म्हणायचं – ‘शिंपल्या भरती आण!
की कोठलीही वेळ असो – भरती येईल! बरं, नको वाटलं तर ‘ओहोटी आण. ‘
म्हटलं की बस! एकदम समुद्र ओहोटीस लागेल. लक्षात ठेव.’

बरोबर काही रत्ने, देणग्या व तो गळ घेऊन जवळजवळ तीन वर्षांनी परत
होकी होनादादाला भेटायला निघाला होता. ‘दादा रागीट आहेत. पण मी त्यांचा
गळ समुद्रातून हुडकून आणला आहे हे पाहून ते सारे विसरतील व मला प्रेमाने
शाबसकीही देतील. शिवाय ही रत्नं पृथ्वीमोलाची मी भेट देणार आहे त्यांना.
किती खूष होतील दादा?
मनात गोड विचार करीत तो वर आला, पण अरेरे, पुष्कळदा आपले विचार,
आपल्या गोड अपेक्षा, आपल्या मधुर कल्पना यांना प्रत्यक्षात अशी काही
जोराची थप्पड बसते व भलताच कटू अनुभव येतो की काय सांगावे ? तो
समुद्रावर आला तर काही अंतरावर होनादादाच एक मासे पकडायचे जाळे
दुरुस्त करीत बसलेला! खूप खूप आनंदाने त्याने धाव घेतली, मनात भावाचं
प्रेम जणू उचंबळून आलं, रागीट असो कसाही असो, सख्खा भाऊ आहे
आपला. बाळपणी आम्ही एका थाळीतून जेवण कितींदा जेवत होतो…. त्याला
मी केव्हा बघेन ? असं मनात येत होतं त्याच्या. धावत येऊन त्याने म्हटले
‘दादा, होनादादा, बरे आहात ना? अहो, तुमच्या गळासाठी मी समुद्रात बुडी
मारुन तळी गेलो व हा तुमचा गळ शोधून आणला ! आता तर नाही ना राग ?
चला घरी जाऊ आपल्या.’

पण होना काही वेळ कर्माला आठ्या घालून बघतच राहिला. हाच आपला तो
खेडवळ मूर्ख भाऊ? याचे कपडे तर राजासारखे आहेत, गळ्यात मोत्याचे सर
आहेत टपोरे. हा समुद्रातून वाचून आला तो आला, अन् गाढव माझ्याहूनही
श्रीमंत होऊन मला हिणवायला आला आहे. नालायक कुठला- ! याच्यापायी
मला लोकात कमीपणा येणार आता. ह्याचाच मान जास्त ठेवणार लोक
माझ्याहून, मला कोण विचारतो याच्यापुढे ? तो विचार करीत होता. धाकटा
होकी प्रेमाने भेटायला आला, पण होनाचे मन मत्सराने, व्देषाने बरबटून गेलेले.
तो अतिसंतापाने त्याच्या अंगावर धावून गेला व ओरडला-
हरामखोरा, तू अजून जिवंत ? समुद्रातून जिवंत परत कसा आलास? पाजी
माणसा,परत मला खिजवायला, आपली श्रीमंती मिरवून चारचौघात मला मान
खाली घालायला लावायलाच आलास ना ? आण माझा गळ-आधी !! ‘
गळ हिसकावून घेत होनाने तो भांबावलेल्या होकीच्या गळ्याभोवती
आवळायला सुरुवात केली एकदम् ! होकीला काहीच समजेना प्रथम, पण मग
त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला सख्खा भाऊ होनादादा द्वेषाने आंधळा
होऊन आपल्याला ठार करू पाहतो आहे ? अरे! मग जग इतकं वाईट असतं ?
तोवर होना तिरस्कारानं ओरडला-
‘कुत्र्या, मर, मर एकदाचा, पीडा टळेल माझ्यामागची!’ होकीच्या प्राणावरच
बेतले. गळफास घट्ट होऊ लागला! आता मात्र तो एकदम ओरडला-
अगदी जीवाच्या आकांताने म्हणाला,”
‘शिंपल्या, शिंपल्या भरती आण मला वाचव !!
त्याच्या हातातच होता शिंपला. ती आज्ञा होताच संध्याकाळी चार वाजताच
सपाट्याची भरती येऊ लागली त्याची होनाला कल्पनाच नाही ! भांबावून तो
मागे पहातो तोवर डोक्याएवढ्या लाटा किनाऱ्याकडे धावत येताहेत ! तो
पळणार तोवर भरतीची एक प्रचंड लाट आली व होनादादाच्या डोक्यावरून
गेली तो होन्याला घेऊनच परतली !
दूर धावत जाऊन त्याने गळ काढून फेकला तोवर पाण्यातून एकदा वर डोके
काढून होना ओरडला,
‘होकी, होकी मला वाचव, क्षमा कर होऽऽकी!’
मग होकी ओरडला,
‘शिंपल्या शिंपल्या-ओहोटी! एकदम एकदम ओहोटी आण!’
काय चमत्कार ? पहाता पहाता भरती हटू लागली. डोक्याएवढ्या लाटा
कुणी धक्के मारून मागे ढकलावे तशा माघारी गेल्या-पण हाय ! होना तेवढ्यात
कुठेतरी समुद्रात गडप झाला तो परत कधीच होकीला दिसला नाही! होकीला
वाईट वाटले, पण थोडा वेळच! दादाही आपल्या जीवावर उठले होते हे त्याच्या
मनातून जाईनासे झाल्याने तो लवकरच ते सारे प्रकरण विसरला. ‘वाईट
कृत्याला देव शिक्षा करणारच. ‘असे म्हणून त्याने मनाचे समाधान करून घेतले.
मग त्याने मोठा राजवाडा बांधायला घेतला. राजवाडा इतका सुंदर व
नक्षीदार होता की एक वर्षांत ते बांधकाम पुरे झाले नाही. सर्पदेवांची कन्या
मुलाला घेऊन वर्षाने ठरल्याप्रमाणे तेथे आली, पण अटीप्रमाणे राजवाडा तयार
नव्हता, म्हणून परतली. मात्र मुलगा तिने होकीच्या हवाली केला व म्हटले, ‘मी
परत दोन वर्षांनी येईन!’
पण खूप वर्षे झाली ती परत येऊ शकली नाही, का कोण जाणे मात्र होकीचा
मुलगा उत्तम मच्छीमार झाला व त्याचा संसार पहात होकी आनंदात आता
जीवन कंठीत आहे ! आपली समुद्रतळीची अद्भुत सफर तो अजूनही विसरला
नाही!

Author