नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश
या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया?
परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे
पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती.
प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले. तयार पतंग घेण्यापेक्षा पतंगाचे
साहित्य खरेदी करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी कागद, मांजा, चक्री
इत्यादी साहित्य खरेदी केले. दिवसभरात ८-१० पतंग तयार झाले.
पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले. सागर पतंग उडवू लागला.
परेश ढिल देऊ लागला आणि सीमा गंमत पाहू लागली. पाहता पाहता जणू
काही आकाशात रंगीबेरंगी पक्षी उडताहेत असे अनेक लहान-मोठे पतंग
उडताना दिसू लागले. सागरचीही पतंग बऱ्याच उंच गेली होती. इतक्यात सीमा
ओरडली, ‘सागर पतंग खाली खेच. निळी पतंग तुझ्या पतंगाला काटेल! ओरडू
नकोस गं, आपणच निळा पतंग काटणार आहे. बघच तू. सागर असं म्हणत होता
तेवढ्यात निळ्या पतंगाबरोबर लाल रंगाच्या पतंगाने सागरचा पतंग काटला.
सागर-परेश लगेच खाली उतरले आणि पतंग ज्या दिशेने उडत खाली पडत
होती त्या दिशेला धावले. पाठोपाठ सीमा आलीच. पळता पळता तिघंही एका
पडक्या घराजवळ आली. सीमा दूरवर थांबली. सागरला म्हणाली, “सागर पुढे
जाऊ नकोस. त्या घरात मुलांना पकडणारा पांढरा दाढीवालाबाबा राहतो.”
सागर, परेश हसू लागले. अरे खरंच सांगते, लागले. अरे खरंच सांगते, राधाकाकू भांडी घासण्यासाठी माती घ्यायला आली तेव्हा मातीत पांढरे केसही दिसले. तेव्हा राधाकाकू
म्हणाली, पुन्हा त्या घरातील माती आणणार नाही. हे ऐकताच दोघे चार पावले
मागे सरकली. परंतु परेशला वरच्या कौलावर पतंगाचा मांजा दिसला. त्याने
सागरला सांगितले, आणि सागर खिडकीवरून कौलांपर्यंत पोहोचला. हातात
येईल तेवढा मांजा परेशला खाली जमा (गोळा) करायला सांगितला. मांजा ओढता ओढता सागरला कौलांवर पक्ष्यांची फडफड जाणवली. म्हणून तो अधिकच वर चढला. पक्ष्याच्या पायाला लागल्यामुळे त्याला उडता येत नव्हते. त्याने परेशलाही मदतीला बोलावले. दोघांनी अलगद पक्ष्याला उचलले. आणि सीमाला झेलायला सांगितले. पक्षी खूपच वेगळा होता. राखाडी रंगाचे पंख. गळा आणि पोटावरचा भाग पांढरा होता. डोळ्यांजवळ दोन काळे डाग. जणूकाही डोळ्यांत काजळ घातले आहे. परेश, सागर, सीमा यांनी पक्ष्याला घरी आणले. पायाला जखम झाली होती. डेटॉलने पक्ष्याचा पाय स्वच्छ धुतला. मलम लावले. इतक्यात आई आली. मुलं पक्ष्याची सेवा-सुश्रुषा करता आहेत हे पाहून आईला खूप बरं वाटलं. थोड्याच वेळात आईने हळद आणून लावली. थोडं पाणीही वाटीत प्यायला दिलं. पक्ष्याला थोडं बरं वाटलं. पक्ष्याने उडण्याचा प्रयत्न केला. थोड्या उंचावर उडालाही. पण क्षणार्धात खाली आला. सागरने
त्याला अलगद पकडलं. सीमाने घरातून एक टोपली आणली. त्या टोपलीत एक
मऊ कापड अंथरलं. सागरने पक्ष्याला टोपलीत ठेवलं. जिन्याखालच्या गार
हवेत टोपली ठेवली. सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं, ‘पक्षी झोपतो आहे.
आपण थोड्यावेळाने परत येऊ.’ असं म्हणून सगळे घरात पळाले. इतक्यात
वडील आले. त्यांनी जिन्याखालच्या टोपलीत डोकावून पाहिले, तर त्यात
समुद्रपक्षी! मुलांचा अजब पराक्रम पाहून वडील रागावतच घरात आले. सागरने
थंडगार पाण्याचा ग्लास वडिलांना देत म्हटले, ‘बाबा, मला पक्षी आवडला आहे.
त्याला जखम झाली आहे. आपण काही दिवस ठेवू या आपल्याकडे.’ ‘अरे,
समुद्रपक्षी आहे तो! सीगल’ ‘अरेव्वा! या आगळ्या वेगळ्या पक्षाच्या सोबत राहू
या ना काही दिवस.’ गालातल्या गालात हसत वडील आतल्या खोलीत गेले.
मुलांना खूप आनंद झाला. हळूहळू शेजारचे, परिसरातले ओळखीचे लोक समुद्रपक्षी पहायला येऊ लागले. पक्ष्यासाठी पिंजरा बनवला. सागर आणि सीमा पिंजऱ्यासह पक्ष्याला फिरायला रोज बागेत आणत. तो थोडावेळ आंब्याच्या झाडाला टांगत. इतर
पक्षी पहात समुद्रपक्षी पिंजऱ्यात फिरू लागे. कधी कधी पिंजऱ्याच्या दारावर
टोचा मारून ‘मलाही मुक्तपणे फिरू द्या’ असेच सांगत असे. पशु पक्ष्यांच्या गोष्टी
एकदा सागर आणि सीमा सहलीच्या निमित्ताने पक्षी अभयारण्यात गेले.
शिक्षकांनी सुतारपक्षी, कोकिळा वगैरे पक्ष्यांची माहिती सांगितली. काही
अनोख्या पक्ष्यांच्या माहितीसाठी एक माहितीपट दाखवला. या माहितीपटात
अनेक पक्ष्यांबरोबर सीगल्स म्हणजेच समुद्रपक्ष्याचीही माहिती होती. मुलं
अधिक जिज्ञासेने माहितीपट पाहू लागले. सीगल्स – समुद्रपक्षी समुद्रकिनारी
असतात. या पक्ष्याचे पंख लांब आणि मजबूत असतात. पाण्यावर तरंगणाऱ्या
नावेसारखे हे पक्षी काही वेळ पाण्यावर तरंगतात आणि क्षणार्धात जहाजामागे
उडताना दिसतात. समुद्रात कितीही वादळ आले तरी वादळातून सहीसलामत
बाहेर पडतात. नाविक या समुद्रपक्ष्यांना आपला मित्र मानतात. कारण समुद्रात
जहाजाची दिशा चुकते, अशावेळी समुद्रपक्षी दिसताच जमिनीकडे जाण्याची
दिशा मिळते. ही माहिती मिळाल्यावर सीमा – सागरने ठरविले की आपण
आपल्या पक्षीमित्राला रोज नदीकिनारी फिरायला न्यायला हवे. एके दिवशी वादळी हवा असल्यामुळे पक्ष्याला नदीकिनारी नेता आले नाही. जसजशी वादळी हवा सुरू झाली तसतसा पक्ष्याचा पिंजरा गोल गोल फिरू लागला. पक्ष्याला मोकळ्या वादळी हवेत उडायचे होते. सारं बळ एकवटून पिंजऱ्याचं दार तोडून तो स्वतंत्रपणे आकाशात उडू लागला. सागर-सीमापक्ष्याच्या स्वतंत्रतेचा आनंद अनुभवत होते. थोड्याच वेळात सागरने आवाज देताच पक्षी सागरच्या जवळ आला. आता ते खरोखरच मित्र बनले होते. आता
पिंजऱ्यात बंद करायची गरजच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आई मासे स्वच्छ करत होती. पक्ष्याने टोपलीतून अलगद मासा उचलला आणि दूर पळाला. त्याच्यामागे काठी घेऊन आई पळाली. पण पक्षी काही सापडेना. सागर शाळेत जायला निघालाच होता. आई पक्ष्याच्या मागे लागली आहे हे पाहून त्याने दप्तर बाहेर काढले. वह्या-पुस्तके
बाजुला ठेवली आणि दप्तरात पक्ष्याला घातले. शाळेत आला. जोशी सर संस्कृत श्लोक पाठांतरासाठी घेत होते. सर म्हणाले, ‘या कुंदेन्दु तुषार हार धवला…’ मुलांच्या आधी पक्ष्याने ‘चिन-चान-चाव’ असा आवाज काढला. गुरुजींना वाटले सागरच खोडकरपणा करतो आहे. दरडावून गुरुजींनी सागरला विचारले, ‘काय वात्रटपणा चालवला आहे? बाकावर उभे रहा आणि ५० वेळा उभ्याने श्लोक लिहून काढ. शिक्षा ऐकताच सागर घाबरला. बॅगकडे बोट दाखवून म्हणाला, ‘गुरुजी मी काहीच केले नाही.’ गुरुजी जवळ आले आणि बॅगेत पाहिले तर पक्षी. बॅग उघडताच पक्षी बाहेर आला अन् गुरुजींच्या
डोक्यावरच बसला. सगळा वर्ग हसू लागला. गुरुजी रागाने लाललाल झाले.
इतक्यात पक्षी खिडकीतून उडून गेला. सगळ्यांनाच सुटल्यासारखे झाले. पण
सागर मनातून खट्टू झाला. एक चांगला मित्र दुरावल्यासारखे वाटले. दुपारच्या वेळेत सीमा सांगायला आली, आपला पक्षीमित्र आला आहे. सागरने पक्ष्याला जवळ घेतले. एकमेकांच्या डोक्याला डोके लागले. सागरच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि पक्षी टिपा-टावटान’ म्हणाला. दोघांनाही भेटण्याचा आनंद झाला.संध्याकाळी बाबांबरोबर सगळे एकत्रित जेवायलाच बसले. बाबा म्हणाले, ‘आपण सगळे समुद्र पहायला जाणार आहोत.’ सागर-सीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सहलीची सगळी तयारी झाली. सीमा म्हणाली, ‘सागर आपल्या पक्षीमित्रालाही सोबत घेणार आहेस?’ सागर म्हणाला, ‘अर्थातच!’ समुद्रपक्ष्याला समुद्राकडे न्यायलाच हवे. पक्ष्यासोबत समुद्रकिनारा पहायला
सगळे निघाले. दोन दिवसांच्या प्रवासात आई, बाबा, सीमा, सागर आणि समुद्रपक्षी सगळ्यांनीच खूप धमाल, गप्पा, गोष्टी केल्या. आता पक्षी कुटुंबाचा घटकच बनला होता. आईबाबाही त्याचे खूप लाड करीत. पक्षीही त्यांच्या अंगाखांद्यावर उडत राही.
दूरवर चमकतं पाणी पाहून सागर आनंदाने ओरडला, “आलाच की समुद्र !”
अथांग पाणी दुपारच्या उन्हात चमकत होतं. थोडं जवळ येताच समुद्राकाठची
वाळूही चमकताना दिसू लागली. मच्छिमार वाळूवर मासे सुकवत होते. काही
पर्यटक समुद्राच्या लाटांचे अनोखे सौंदर्य पाहण्यात गुंतले होते. आईबाबांनी
सांगितले, ‘आता रूमवर जाऊ. फ्रेश व्हायचे आणि मग समुद्रावर भटकायचे.
पाण्यात डुंबायचे. पण फार पुढे जायचे नाही.’ सागर-सीमाने आईबाबांच्या
सूचनांचे पालन केले. फ्रेश झाल्यावर समुद्रावर आले. संध्याकाळची पाच-साडेपाचची वेळ. समुद्रावर समुद्रपक्षी पाहून आपल्या पक्ष्याचे हे सर्व मित्रच आहेत हे पाहून दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं. काही पक्षी पाण्यावर तरंगत होते तर काही आकाशात चक्राकार फिरत होते. सागरने ठरवले आपल्या पक्ष्याला समुद्रावर फिरायला आणू या. सागरने पक्ष्याला समुद्रकाठी आणताच पक्ष्याने उंच झेप घेतली आणि सर्व पक्ष्यांमध्ये सामील झाला. सर्व सारख्या पक्ष्यांमध्ये आपला पक्षी कोणता हे ठरवताच येईना. सागरने शिट्टी वाजवून पक्ष्याला परत बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षी परत आलाच नाही. क्षितिजापलिकडे सूर्य अस्ताला जात होता. केशरी पिवळ्या आकाशाकडे पाहता पाहता सीमा गुणगुणत होती, ‘कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा’ आणि सागर खाली
मान घालून परतीच्या वाटेला चालू लागला. मनात म्हणत होता, ‘कुठे हरवला
माझा सोनेरी मित्रपक्षी’ इतक्यात आईबाबा आले. सागर-सीमा पाहिलेत का सीगल्स? आणि तुमचा मित्र कुठे आहे? सागरचं मौन पाहून आई म्हणाली, ‘आई-बाबांशिवाय सागर राहू शकतो का? नाही ना? मग आज आपला मित्र पक्षीही आपल्या आई-बाबांकडे, मित्रमैत्रिणींसोबत त्याच्या घरी गेला!’ बाबा सागरला समजावू लागले, ‘सागर एका जखमी पक्ष्याला तू वाचवलेस. त्याची निगराणी राखलीस आणि आज त्याच्या परिवारात, त्याच्या वातावरणात सोडून त्याला मुक्त केलेस. आता थोडावेळ तुला आपला पक्षीमित्र गमावल्याचे वाईट वाटेल. पण एक लक्षात घे, माणूस जंगलात हिंडू फिरू
शकतो, पण दीर्घकाळ राहू शकत नाही. तसंच पक्षीसुद्धा माणसांच्या जगात,सहवासात फार काळ राहू शकत नाहीत. पक्षी पाळणं म्हणजे पक्ष्याचं मुक्त आकाशात झेपावण्याला बंदी घालणं. आपण त्यांचं मुक्त हिंडण्याफिरण्याचं हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. आपण पक्षी निरीक्षणाचाच आनंद घ्यावा. त्यांना त्यांच्या मुक्त आनंदात स्वच्छंद विहार करू द्यावा, यातच खरे पक्षीप्रेम आहे.
सागर आणि समुद्र पक्षी
नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश
या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया?
परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे
पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती.
प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.