आळशी उंट आणि हुशार कोल्हा

फार फार वर्षांपूर्वी एका वाळवंटात एक उंट राहात होता. भगभगीत वाळवंटात पोटापाण्यासाठी उंटाला खूप भटकावे लागत असे. एकदा त्याला आपल्या पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आठवल्या. पूर्वजन्मी आपण खूप जपतप केले. खूप पुण्य जमा झाले.



फार फार वर्षांपूर्वी एका वाळवंटात एक उंट राहात होता. भगभगीत वाळवंटात पोटापाण्यासाठी उंटाला खूप भटकावे लागत असे. एकदा त्याला आपल्या पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आठवल्या. पूर्वजन्मी आपण खूप जपतप केले. खूप पुण्य जमा झाले. त्याचा फायदाही झाला. ही गोष्ट आठवताच सगळा आळस झटकून जपतप करायचे ठरवले. प्राणीजगतात एक अनोखा चमत्कार घडला. उंट महोदयांनी अनुष्ठान मांडले. दिवसरात्र ब्रह्मदेवाचा धावा केला.

एक पशू धावा करतो आहे या गोष्टीचे ब्रह्मदेवास आश्चर्य वाटले आणि ब्रह्मदेव संतुष्ट झाले. उंटाला देवांनी विचारले, “हे उंटा तुला काय हवे ते माग, तुझी इच्छा पूर्ण होईल!” उंट म्हणाला, “देवा, या वाळवंटी प्रदेशात सहजपणे फिरवता येईल अशी चारशे कोसांची लांब मान मला द्या.” ब्रह्मदेव ‘तथास्तु! तथास्तु!’ म्हणाले आणि गुप्त झाले. लांबच लांब मान मिळाल्यावर उंट महाशय एकाच सोयीच्या जागेवर बसले आणि सहजपणे मान फिरवून आपला चारा-पाणी मिळवू लागले. थोड्या कष्टात भरपूर सुख मिळाल्याच्या आनंदात समाधानी झाले. कुठल्याच गोष्टीसाठी कष्ट करावे लागत नव्हते. चारा-पाणी खाऊन झाल्यावर दूर अंतरावर मान टेकवून आराम करीत असे. हळूहळू उंटराज गलेलठ्ठ बनू लागले. अवजड शरीर आणि मठ्ठ मेंदू यामुळे ते आळशीपणाकडे झुकू लागले. अशा या आळशी उंटाची देवाने परीक्षा पाहायचे ठरविले.

एकदा चारा-पाण्यासाठी चारशे कोसांची लांब मान फिरवत असताना त्या वाळवंटी प्रदेशात वादळ सुटले. पाऊस पडला. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उंटाने आपली मान एका गुहेत घातली आणि निर्धास्त झाला. या वादळवाऱ्यात आसरा शोधत शोधत एक कोल्हा आपल्या बायकोला घेऊन त्या गुहेजवळ आला. गुहेत येताच त्यांना उंटाची मान दिसली. आसराही मिळाला आणि अन्नही मिळाले म्हणून दोघेही आनंदित झाले. लगेचच उंटाचे लचके तोडायला सुरुवात केली. चारशे कोसावरील उंटाच्या जेव्हा हे लक्षात आले तोपर्यंत कोल्हा-कोल्हीने उंटाच्या मानेचा पूर्ण फडशा पाडला होता. धडपड करत जगणाऱ्या कोल्हा-कोल्हीने तृप्ततेचा ढेकर दिला आणि आळशी उंटाचा मात्र अंत झाला.

Author