ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट तुम्हा आम्हाला सर्व परिचित आहे. राम गणेश गडकरी यांच्या ‘चिमुकल्या इसापनीती’त ही बीजकथा या संग्रहात दिलेली आहे. पहा (४.५९) नव्या संदर्भात नवी भर घालून अनेकांनी या बीजकथेचा आपापल्या पद्धतीने विस्तार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनीही या बीजकथेचा केलेला विस्तार यापुढील तीन कथांमध्ये दिला आहे. या विस्तार कथांमधून मुलांना शर्यतीपेक्षा किंवा स्पर्धेपेक्षाही मैत्रभाव महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळेच ह्या कथा पारंपरिक कथेपेक्षा कशा वेगळ्या आहेत ते पहा.
ससा आणि कासव हे दोघे जण शेजारी शेजारी राहत होते. हे दोघेजण एकाच शाळेत व एकाच वर्गात शिकत होते. कासव घरातून लवकर निघायचे पण सश्याच्यानंतर शाळेत पोहचायचे. ससा घरातून लेट निघायचा तरीपण कासवाच्या अगोदर शाळेत पोहचायचा. सश्याचा पळण्याचा स्पीड जास्त होता. परंतु कासवाचा पळायचा स्पीड कमी होता. कासव हे खूप हळूहळू पळायचे. त्याला जोरात पळता येत नव्हते. व सश्याला जोरात पळता येत होते.
म्हणून ससा स्वतःला खूप शहाणा समजत होता. त्याला असे वाटत होते की, आपल्यापेक्षा कोणीही जोरात पळू शकत नाही. कासव तर आपल्या समोर काहीच नाही असे त्याला वाटत होते. शाळेत गेल्यावर ससा कासवाची टिंगल उडवायचा. कासवपण गुपचूप बसून राहायचे. कासव सश्याला काही बोलत नव्हते. ससा कासवाला रोज म्हणायचा की, “तू दररोज जॉगिंग कर. म्हणजे तू जोरजोरात पळू शकशील.” हे ऐकून कासव व ससा शाळा सुटल्यावर घरी परतायचे. ससा नेहमी कासवाच्या पुढे राहायचा. कधीच तो त्याच्या मागे राहत नसे. त्यामुळे कासव नेहमी हरायचे. त्याच्या मागे राहायचे.
एके दिवशी ससा आणि कासव शाळेत जायला निघाले. ससा शाळेचा गणवेश घालून आपल्या दप्तरात वही, पुस्तके भरून घराला कुलूप लावून कासवाकडे गेला. तेव्हा कासवाचे काहीही आवरलेले नव्हते. कासवाला माहीत नव्हते की आजही आपली शाळा आहे. त्याला असे वाटत होते की आपण जर शाळेत गेलो तर आजही ससा आपली टिंगल उडवेल. म्हणून कासव शाळेत जायला तयार नव्हते. पण ससा कासवाकडे आला. म्हणून कासवाने लवकर जेवण केले व गणवेश घातला. नंतर शाळेचे पुस्तके व वही भरून दप्तर तयार केले. सश्याला बसून-बसून बोअर झाले होते. कासवाने एक-दोन तास आवरायला लावला होता. कासवामुळे सश्यालासुद्धा आता शाळेला वेळ झाला होता. कासवाने आपले दप्तर घेतले व घराला कुलूप लावून शाळेत जायला निघाले. सश्याला पटले की आता शाळेला वेळ झाला आहे. आपण असे हळूहळू चाललो तर आपण शाळेत लेट पोहचू. तेवढ्यात कासव म्हणाला, “आपण दोघे रिक्षा करून रिक्षावाल्याला दहा पैसे देऊन शाळेत जाऊ. म्हणजे आपल्याला शाळेला लेट होणार नाही. ” सश्याला कासवाचे म्हणणे आवडले नाही. ससा कासवाला म्हणाला, “अरे दहा पैसे कमवायला किती कष्ट करावे लागतात माहीत आहे का तुला” मग ते दोघे परत चालायला लागले. चालता-चालता सश्याला अशी एक युक्ती सुचली की जिच्यामुळे शाळेला लेट होणार नाही व रिक्षाचे दहा पैसेपण वाचतील. त्याच्यावर कासव सश्याला म्हणाले की तुला माझी युक्ती आवडली नाही तर मला पण तुझी युक्ती आवडणार नाही. ससा म्हणाला, “अरे मी तर माझी युक्ती सांगितली पण नाही; तरी पण तुला ती आवडली नाही. ‘मी ती युक्ती सांगणार नाही’ असे ससा कासवाला म्हणाला. तेव्हा कासव म्हणाला, “चल तू तूझी युक्ती सांग आपण तुझ्या युक्तीनेच शाळेत जाऊ.” तेव्हा सश्याने आपली युक्ती सांगायला सुरूवात केली.
सश्याची युक्ती अशी होती की, “आपण इथून जर आपल्या शाळेपर्यंत शर्यत लावली तर आपले पैसे वाचतील व लवकर शाळेत पोहचू.” कासवाला सश्याची युक्ती आवडली. मग ससा आणि कासव या दोघांची शाळेपर्यंतची शर्यत सुरू झाली. ससा जोरजोरात पळू लागला. पण कासव हळूहळू पळत होते. कासव खूप मागे राहिले होते. ससा जोरजोरात पळत असताना पुढे एक मोठा सिग्नल आला. ससा त्या सिग्नलवर थांबून राहिला होता. सिग्नल सुटल्यावर ससा निघाला. पण कासव मागे राहिल्यामुळे ते सिग्नल पार करू शकले नाही. दुसऱ्या बाजूचे सिग्नल सुटले होते. तेवढ्यात पहिला सिग्नल सुटला. कासव सिग्नल ओलांडत होते. सिग्नल ओलांडल्यावर कासव हळूहळू पळू लागले. तेव्हा एकदम जोरात वादळी पाऊस सुरू झाला. पाऊस जोरजोरात कोसळू लागला. विजा चमकू लागल्या. कासव एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसून राहिले. ते पाऊस जाण्याची वाट पाहत होते. पण पाऊस काही थांबत नव्हता. इकडे कासव येत नाही म्हणून ससा घाबरून गेला होता. सश्याला वाटले की कासव हरवले आहे. ससा ज्या रस्त्यानी आला त्या रस्त्यानी परत जाऊ लागला. ससा सिग्नलजवळ आल्यावर त्याला दिसले की कासव एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसले आहे. ते कासव घाबरलेले होते. ससा कासवाजवळ आला तेव्हा कासवाला थंडी वाजत होती. ससा जोरात पळत पळत घरी गेला व कासवासाठी छत्री व आपल्यासाठी रेनकोट घेऊन कासवाजवळ आला. कासवाला छत्री दिली व सश्याने रेनकोट घातला. मात्र कासवाला रेनकोट आवडला होता. कारण रेनकोटमुळे काही पाऊस लागत नाही व थंडी वाजत नाही. पण ससा तो रेनकोट देत नव्हता. कासव दुःखी झाले होते. सश्याला कासवाचे दुःख सहन झाले नाही. सश्याने आपल्या अंगातून तो रेनकोट काढला. कासवाला दिला. आणि सश्याने ती छत्री घेतली. कासवाला आनंद झाला. व तेवढ्यात पाऊस थोडा कमी झाला होता. त्या दोघांची शर्यत परत सुरू झाली. आता ते दोघे मिळून शाळेत पोहचले. कासव व ससा दोघे जण खूप खूष होते. त्या शर्यतीत कोणीही जिंकले नाही. ती शर्यत पूर्ण झाली नाही. ससा म्हणाला, “आपण आता आपली शर्यत उद्या सकाळी पूर्ण करू.” जो उद्या सकाळी लवकर उठेल आणि सर्व गणवेश व दप्तर भरून शाळेत पोहचेल तो ही शर्यत जिंकेल. असे त्या दोघांचे ठरले. पाच तासांनी त्यांची शाळा सुटली. दोघे जण घरी जायला निघाले.
दोघे जण आपापल्या घरी गेल्यावर आपापला अभ्यास करून, जेवण करून दोघे जण लवकर झोपले. रात्र उलटली. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली. दोघे जण सकाळी लवकर उठले. आंघोळ करून आपापला शाळेचा गणवेश घालून आपल्या दप्तरात वही, पुस्तक भरून घराच्या बाहेर पडले. ससा आणि कासव यांच्यात परत शर्यत सुरू झाली. मात्र आज ससा व कासव दोघेही जोरजोरात पळू लागले होते. कासवपण आज जोरात पळत होते. कासवाला आज शर्यत जिंकायची होती. व सश्याला पण आज शर्यत जिंकायची होती. ससा व कासव हे दोघेजण मोठ्या सिग्नलपर्यंत जोरात पळत आले. त्यांना वाटले की आपण हा सिग्नल ओलांडून जाऊ. पण तसे झाले नाही. ससा, कासव ज्या रस्त्यांनी आले तो रस्ता बंद झाला. व दुसरा रोड सुटला. ससा आणि कासव दोघेजण तो रस्ता बंद होईपर्यंत थांबून राहिले. पण त्यांचा वेळ कमी राहिला होता. जेव्हा त्यांचा रोड सुटला तेव्हा दोघेजण पळत-पळत शाळेत गेले. ससा व कासव दोघेही जिंकले होते.
वर्गात आल्यावर दोघेही आपापली स्तुती करू लागले. त्यांची शाळा सुटली तेव्हा दोघेजण घरी जायला निघाले. ससा आणि कासव या दोघांमध्ये आज परत शर्यत सुरू झाली होती. ससा जोरात पळत होता आणि कासवपण जोरात पळत होते. पळता पळता सश्याचा पाय मुरगळला. त्याचा पाय खूप दुखू लागला. त्याच्या पायात ठणका होवू लागल्या. तेव्हा कासव सश्याला डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी कासवाला सांगितले की, “सश्याच्या पायाचे ऑपरेशन करावे लागेल.” हे ऐकून कासवाला धक्का बसला. कासवाने डॉक्टरांना सांगितले की, तुम्ही सश्याच्या पायाचे ऑपरेशन करून टाका. सश्याला पायाच्या ऑपरेशनसाठी रक्ताची गरज लागणार आहे. त्याचे रक्त खूप गेले आहे. त्याचे हाड मोडलेले आहे. तेव्हा कासव डॉक्टरांना म्हणाला तुम्ही माझ्या पायाचे हाड त्याच्या पायाला लावा. त्यांच्यामधील हे प्रेम पाहून डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन फुकटात करून दिले. मग सश्याचा पाय नीट झाल्यावर कासवाने त्याला घरी नेले. कासवाने त्याला औषधे, गोळ्या आणून दिल्या. त्याच्यामुळे त्यांची मैत्री जमली व ते दोघे कधीही शर्यत लावत नव्हते. ते आनंदाने शाळेत जाऊ लागले.