कोल्हा इतर जनावरांशी लबाडीनं वागतो हे जगजाहीर होते. त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नसे. पण तरीही कोल्हा सतत कुणा ना कुणाला फसवायचा आणि जनावरं फसायची. ‘हा बढाया मारणारा आहे’ म्हणून सगळे त्याला टाळायचे.
एकदा खाणंपिणं शोधण्याच्या मोहिमेवर बाहेर पडलेल्या कोल्ह्याला रानमांजर दिसलं. झाडाच्या फांदीवर ते मोठ्या ऐटीनं हिंडत होतं. कोल्ह्याला एकदम मांजराविषयी असूया वाटली. का तर कोल्ह्याला असं झाडावर हिंडायला येत नव्हतं. रानमांजराला त्याने विचारले. “का रे बाबा अशी झाडं वेंधतोस?” रानमांजर म्हणालं, “झाडावरनं मला चोहोबाजूचं छान दिसतं. शत्रू येतोय का मित्र येतोय हे लांबनं कळतं आणि मी दिसलो की कुत्रा पाठलाग करतो. त्यालाही चुकवता येतं झाडावर चढून ‘ “किती भेदरट आहेस रे तू रानमांजरा. घाबरट खुळचट, पक्षी आणि साप एवढेच झाडात लपतात. बाकी कुणी नाही!” कोल्ह्याच्या ह्या बोलण्यानं रानमांजर दुखावलं. पण त्यानं तसं दाखवलं नाही. आपला आब होता तसाच ठेवला. कोल्हा लबाड आहे. त्याच्यापासून संभाळूनच राहणं बरं.
मग रानमांजर कोल्ह्याला म्हणालं, “तुझ्यासारखं वेगानं धावणं काही मला जमणार नाही आणि कुत्रा हा तर माझा जन्माचा वैरी आहे.” “मी कुणाही जनावरांपेक्षा जास्ती वेगानं पळू शकतो.” बढाईखोर कोल्हा म्हणाला. “मानगुटी धरणारे ते जुने जाणते कुत्रे जरी आले तरी मी नाही बधणार.
त्यांची टाप नाही मला पळताना गाठायची.”
रानमांजर म्हणालं, “खरं आहे. पण झाडावर चढायला येणं हे ऐन संकटाच्या वेळी फार फार उपयोगी पडतं. तुला ही कला शिकाविशी वाटते कां? मी शिकवीन.” राजमांजरानं उदार अंतःकरणानं देऊ केलेली ही मदत कोल्ह्यानं स्वीकारली.
“हां, कोणतेही ज्ञान अपाय करत नाही, आणि तूर्त मी मोकळा आहे.
हातातली कोणतीही गोष्ट मला अर्धवट सोडावी लागणार नाही”, तो म्हणाला.
म्हणजे झाडावर चढणं शिकायला हा अगदी उत्सुक होता.
रानमांजर झाडावरून जमिनीवर उतरलं आणि कोल्ह्याला सुरुवातीचा धडा शिकवला गेला. पण कोल्हा हा काही चांगला विद्यार्थी नव्हता. त्याचे पंजे झाडाच्या फांद्या पकडून ठेवायला उपयोगाचे नव्हते. तो वारंवार फांद्यांवरून खाली घसरला. वारंवार खालच्या चिखलात पाठीवर पडला. कोल्हा रागाने लाल होत गेला. अखेरीला त्याचा राग अनावर झाला. त्यानं संतापानं रानमांजराला थप्पड लगावली. रानमांजराचा पाय ओढून कोल्हा ओरडला, “माझं हसं केल्याबद्दल मी तुझा जीव घेतो.” खरं म्हणजे रानमांजराचं मरणच ओढवलं होतं. पण त्याच्या पूर्वपुण्याईने रानकुत्र्यांची टोळी अचानक भुंकत भुंकत त्या जागी आली. त्या टोळीकडे कोल्ह्यानं नजर टाकली आणि त्याचा सगळा रुबाब, सगळी बढाई वितळून गेली. त्यानं रानमांजराचा पाय सोडला. रानमांजर लगोलग झाडाच्या खोडावरनं सरसर वर चढून धोका नाही अशा जागी जाऊन बसलं. दोन्ही पायात शेपूट घालून कोल्हा धूम पळाला. रानकुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी तो खवल्या मांजराच्या बिळात शिरला. कुत्री मागोमाग होतीच. पण त्यांना बीळ उकरता आलं नाही. कुत्र्यांनी खटपट करून पाहिली.
पण काही इलाज चालेना. तेव्हा कोल्ह्याचा पिच्छा सोडून ती आपल्या वाटेनं परत गेली.
जरा वेळानं कोल्हा हळूच बिळाबाहेर डोकावला, तर झाडावर बसलेलं रानमांजर दात काढून हसताना त्याला ऐकू आलं. आपला आब राखण्यासाठी तोंड फिरवून कोल्हा दूर पळाला. तेव्हा तर ते रानमांजर खो खो हसलेलं त्याला ऐकू आलं. आपली ही फजिती राजमांजरानं बघितली आहे ह्याचा विसर कोल्ह्याला पडलेला नाही. रानमांजराचा वचपा काढण्याची कुठलीच संधी सोडायची नाही असं कोल्ह्यानं ठरवून टाकलं होतं.
आता कधीही कोल्हा बघितला की ते रानमांजर झाडावर चढून बसतं.
कारण कोल्ह्याचा सूड ही फार भीती वाटण्याजोगी गोष्ट आहे हे रानमांजराला माहीत आहे.