(मध्य आफ्रिकेतील कथा)
पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.
मैदानावरच्या गवताळ कुरणात चरणाऱ्या सगळ्या जनावरांकडे निर्मात्याने मग निरोप पाठवला की, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गुहेकडे जावे आणि पसंत पडतील ती शिंगे आणि कातडी घेऊन जावीत. हा निरोप मिळताच जनावरांच्यात प्रचंड खळबळ उडाली. निर्मात्याने आपल्यासाठी कशी, कोणती, शिंगे आणि कातडी तयार ठेवली आहेत हे पहाण्याची विलक्षण उत्सुकता सगळ्यांनाच वाटली. ह्या सगळ्यांतून एकटा झेब्रा मात्र बाजूला राहिला. खाणं ही एकच गोष्टत्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. झेब्रा आधाशी प्राणी आहे हे जगजाहीर होतं.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच सगळी जनावरं सरोवराकाठच्या त्या गुहेकडे चालू लागली. झेब्रा मात्र गेला नाही. तो म्हणाला, ‘सरोवर फारच दूर आहे. केवढी तरी वाटचाल करावी लागेल. निघण्याआधी चांगलं खाऊन घेतलंच पाहिजे. लुसलुशीत चविष्ट गवताची न्याहारी न करता शिंगं आणि कातड्यांच्या मागं सगळे का धावत सुटलेत कुणाला ठाऊक!’ घाईने जाताना वरचेवर इतर जनावरांनी जिराफाला हाका दिल्या. “ए, पळ. गुहेकडं बोलावलय् सगळ्यांना”. झेब्रा तोंडातल्या तोंडात बोलला. “व्हा पुढं. मी येईन माझी न्याहारी आटोपल्यावर!” आणि गवताचा मोठ्ठा घास घेऊन त्याने तोंड बंद केलं. जाणारी जनावरं म्हणाली, ‘ह्या झेब्र्याशी बोलण्यात अर्थ नाही. त्याला दुसऱ्या कुणाची किंमत नाही.’ इतरांशी वागण्यातली रीत न पाळणाऱ्या झेब्र्याला तिथंच सोडून जनावरे पुढे गेली. बऱ्याच वेळानं झेब्रा म्हणाला, ‘बास आता. भरपेट न्याहारी झाली’ आणि रमतगमत तो बाकी जनावरांनी रुंद वाट पाडलेली होती ती धरून सरोवराकडं गेला. सरोवराजवळ आल्यावर झेब्र्याला परत फिरलेली जनावरं दिसली. त्यांच्या बदललेल्या रूपाकडं बघून झेब्रा चकीत झाला. हत्तीनं काळसर राखी रंगाचा कोट पसंत केलेला होता. पण तोंडातून बाहेर आलेल्या सुरेख अशा दोन सुळ्यांनी त्या कसनुशा कोटाला शोभा दिली होती. सिंहानं उदी, पिवळसर रंगाचा कोट आणि काळसर लांब, राजेशाही आयाळ निवडली होती. सेबल काळविटानं काळा चकचकीत कोट आणि पाठीमागं वळलेली शिंगं घेतली होती. नवी रूपं घेतलेली, एका पाठोपाठ एक जनावरं त्याने मागे टाकली. शेवटी गुहेच्या तोंडाशी पोहोचताना झेब्र्याला गेंडा दिसला. अधू डोळ्यांच्या गेंड्याने फार ढगळ कोट घेतला होता. लहान पोरानं बापाचा अंगरखा घातल्यावर जसा दिसेल तसा त्याचा कोट ढगळ दिसत होता. गेंड्यानं शिंग घेतानाही ती सारख्या आकाराची घेतली नव्हती. शिवाय ती डोक्याऐवजी नाकावर खोचली होती. तात्पर्य, गेंडा अगदी ध्यान दिसत होता! पण स्वतः मात्र फार खूष होता. झेब्रा गुहेत गेला तेव्हा एकच कोट शिल्लक राहिला होता. त्याच्यावर ठळक काळे-पांढरे पट्टे होते. झेब्र्यानं गुहेत सगळीकडं शोधलं, पण शिंगं दिसली नाहीत. बरीच वाट चालून आल्यामुळे झेब्रा भुकेलेला होताच. त्यानं होता तो पट्टेरी कोट घालून पाहिला तर तो अगदी झकास त्याच्या अंगाला आला. फार भूक लागल्यामुळं आपल्या अंगावर हा इतरांपेक्षा निराळा दिसतोय ह्याचा विचार झेब्र्यानं केला नाही. आपल्यासाठी शिंगं उरली नाहीत ह्याचं वाईट वाटून घेतलं नाही. इकडं सगळी जनावरं कुरणातल्या गवतावर चरत चरत एकमेकांच्या नव्या रूपाची तारीफ करीत होती. झेब्रा कुरणात पोचला आणि कुणाशी काही वटवट न करता खाली मान करून चरायला लागला. ते त्याचं दुपारचं जेवण होतं. झेब्र्याच्या अंगावरच्या पट्टेरी कोटानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जनावरांनी आरडाओरडा करून, टर उडवून झेब्र्याचं स्वागत केलं. काळवीट ओरडलं, “बघा रे ह्या आधाशी झेब्र्याला. ह्याच्या अंगावरचा डगला बघा. शिंगाशिवाय भुंडं असलेलं ह्याचं डोकं बघा.” काळवीटामागोमाग बाकी जनावरांनीही एकच गिल्ला केला. झेब्र्याला पर्वा नव्हती. खायला भरपूर हिरवं लुसलुशीत गवत असलं म्हणजे झालं. करायचं काय आहे शिंगांना ? आजपर्यंत कधीही झेब्र्याला शिंगांची गरज नाही लागली. बघाल तेव्हा तो गोल गरगरीत दिसतो आणि त्याचं काळं पाढरं अंगही तजेलदार, चकचकीत असतं.