(एस्किमो लोककथा)
एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.
एका नदीच्या मुखाजवळ एक गाव होते. निष्णात शिकारी म्हणून त्या गावचे लोक प्रख्यात होते. गावातील एस्किमोंनी त्यांचे इग्लू अशा प्रकारे उभारलेले होते, की तिथून त्यांना समुद्राच्या बर्फावरील सील मासे जसे सहज दिसू शकत, तसेच अवतीभवतीच्या डोंगरांना ओलंडून येणारी उत्तर अमेरिकेतील सांबरेही सहज दिसू शकत. यामुळेच ते फार यशस्वी शिकारी होते. डोंगरावर चढणाऱ्या सांबरांच्या शोधात एके दिवशी त्या गावातील लोकांची एक टोळी नदीतून गाव सोडून निघाली. लहान लहान होड्यांना वल्हवीत ते नदीच्या वरच्या बाजूने अनेक मैल गेले. पण ते परत मात्र कधीच आले नाहीत. काही काळ त्यांची वाट पाहून मग त्यांना शोधायला शिकाऱ्यांची छोटी टोळी रवाना झाली. त्या नदीतून गेलेली ती टोळीसुद्धा त्या छोट्या गावात कधीच परत आली नाही.
गावातील मागे राहिलेल्या लोकांना मग काळजी वाटू लागली. नक्की काय करावे, हे मात्र त्यांना कळेना. गेलेल्यांना शोधायला अजून काही शिकाऱ्यांना नदीतून पाठवले तर आधीच्यांप्रमाणेच तेही हरवतील किंवा नाहीसे होऊ शकतील अशी भीती त्यांना वाटू लागली. अगदी लहान असतानाच ज्याचे आई-वडील मरण पावले आहेत असा एक तरुण मुलगा त्या गावात राहत होता. पोरका असल्याने तो अत्यंत गरीब होता. आपली स्वतःची होडी असावी आणि आपण मोठे शिकारी व्हावे अशी इच्छा मात्र तो मनात बाळगून होता. जेव्हा त्याला कळले, की गावातील शिकाऱ्यांच्या दोन टोळ्या गायब झाल्या आहेत, तेव्हा त्यांना शोधायला आपण एकट्याने जावे असे त्याला वाटू लागले. म्हणून त्याने गावातील एका वृद्धाला विचारले, की जर त्याला भाला, होडी या गोष्टी उसन्या मिळू शकल्या तर गायब झालेल्या माणसांना तो शोधू शकेल. यावर त्या वृद्धाने धोक्याची सूचना दिली. ” तू जर नदीतून वरच्या बाजूला गेलास, तर इतर शिकाऱ्यांप्रमाणे तू सुद्धा कदाचित कधीच परत येऊ शकणार नाहीस. तथापि हा धोका पत्करण्याची तुझी तयारी असेल, तर माझी होडी आणि भाला या गोष्टी मी तुला वापरायला दिल्या असे समज. खाली नदीकिनारी त्या आहेत.” मग मुलाने वेळ घालवला नाही. मोठ्या त्वरेने तो खाली होडीकडे गेला आणि अगदी जल्दीने त्याने होडीला वरच्या दिशेने नदीत लोटले. तो फार मोठा प्रवास होता; म्हणून प्रवासात आपल्या भाल्याने त्याने बदक आणि मासे मारले. अगदी अचूक नेम साध्य होइपर्यंत त्याने आपल्या भाल्याने चांगलाच सराव केला. नेमबाजीत मग तो इतका तरबेज झाला, की केवळ एका भाला फेकीत तो डोक्यावर उडणाऱ्या पक्ष्यांना अचूक मारू शकत असे. नदीच्या वरच्या बाजूने अनेक दिवस नाव वल्हवीत नेल्यानंतर नदीच्या किनारी काही इग्लू त्याला दिसले. त्या इग्लूंना पाहून त्याने विचार केला, ‘ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. नदीच्या वरच्या बाजूला इतक्या दूरवर गाव असल्याचे तर मी कधीच ऐकले नव्हते. तेव्हा कदाचित गायब झालेल्या शिकाऱ्यांची ती छावणी असावी किंवा त्यांना इथे कैदेत ठेवले असावे.’ त्या गावात नेमके कोण राहते, याची खात्री नसल्याने सावधपणे तो त्या इग्लूंना सामोरा केला. त्या वसाहतीपासून बऱ्याच दूर अंतरावर खालच्या बाजूला त्याने आपली होडी न दिसेल अशा प्रकारे लपवून ठेवली. मग आपल्याबरोबर त्याने त्याचा धारदार भाला व काही मृत पक्षी घेतले आणि सर्वात जवळच्या इग्लूजवळ तो रांगत रांगत गेला. आपल्याला कुणी पाहिले नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्याने सभोवताली नजर टाकली. नंतर तो त्या इग्लूत शिरला. आत तो एकटाच होता. नंतर तो इतर इग्लूंमध्येही शिरला. पण ते सर्वच रिकामे होते. गायब झालेल्या शिकाऱ्यांचे जर हे इग्लू असतील तर सध्याही ते शिकार करीत असलेच पाहिजेत, असा त्याने विचार केला. मग अनेक ओसाड इग्लूंपैकी एकात विश्रांतीसाठी तो लवंडला. त्यातील माणसे परत येण्याचीही तो वाट बघत होता. विश्रांती घेत असताना त्याला असे जाणवले, की काहीतरी किंवा कुणीतरी येते आहे. म्हणून अतित्वरेने तो इग्लूच्या काळोख्या कोपऱ्यात दडला. तिथून तो प्रवेशव्दाराकडे पाहू लागला. लवकरच त्या भोकातून काहीतरी येत असलेले त्याला दिसले. ते सर्व जरी काळे होते तरी त्याचे तोंडच फक्त त्याला दिसू शकले. खाण्यासाठी ते तोंड इग्लूत हुडकीत होते. प्रवासाच्या सुरुवातीलाच ज्या बदकांना त्याने मारले होते, त्यांपैकी एकाला त्याने लगेच समोर फेकले. अधाशीपणे त्या तोंडाने ते मृत बदक घेतले व ते तोंड अदृश्य झाले. कोपऱ्यात लपलेल्या मुलाचा थरकाप उडाला होता. कारण ते तोंड एका अस्वल-मानवाचे आहे हे त्याने ओळखले होते. या प्राण्यांविषयी त्याने भयंकर गोष्टी ऐकलेल्या होत्या. आपले केसाळ कोट काढून ठेवून हे प्राणी माणसांप्रमाणे इग्लूमध्ये राहतात हे त्याने ऐकले होते. त्याला हेही आठवले, की त्यांच्या गावात येणाऱ्या माणसाला ते मारून खातात. तो हे जाणून होता, की हे प्राणी अत्यंत धोकादायक असतात. काही मिनिटानंतर तो अस्वल-मानव परत आला. त्या भुकेल्या व तीक्ष्ण दातांच्या प्राण्यांकडे त्या मुलाने परत एकदा मृत बदकांपैकी एक बदक फेकले. असे काही वेळ चालल्यावर त्या मुलाच्या असे लक्षात आले, की त्याच्याकडील सर्व पक्ष्यांना त्या अस्वल-मानवाने खाऊन फस्त केले आहे. पुढच्यावेळी जेव्हा तो प्राणी येईल तेव्हा तो त्या मुलालाच खाऊन टाकीला ! मुलगा सापळ्यात अडकला होता. त्याने विचार केला, ‘माझ्याबाबत जसे घडते आहे तसे माझ्या गावातील शिकाऱ्यांबाबतही निश्चित असेच घडले असले पाहिजे. ते इथेच आले असावेत आणि या महाभयंकर अस्वल – मानवाने त्यांना खाऊन टाकले असावे. ‘ वास्तविक तो अतिशय घाबरलेला होता, पण त्याला मोठा शिकारी बनायचे असल्याने त्याने एक योजना आखली. जेव्हा तो अस्वल- मानव त्याचे डोके इग्लूमध्ये अन्नासाठी खुपसेल, त्यावेळी त्याच्याकडे भाला फेकायचा, असे त्याने ठरवले. पुढच्यावेळी जेव्हा त्या अस्वल- मानवाने इग्लूत डोके खुपसले, तेव्हा त्या मुलाने अगदी काळजीपूर्वक नेम धरून त्याच्याजवळ असलेली, मोठे व्हेल मासे मारायची जी बरची होती ती सर्व शक्तीनिशी त्या अस्वल-मानवाच्या डोक्याच्या दिशेने फेकली. त्या बरचीचे पुढचे टोक त्या प्राण्यात खोलवर घुसले; तरी त्यामुळे तो प्राणी काही लगेच मारला गेला नाही. आत घुसलेली ती बरची बाहेर उपसून काढण्याचा त्याने प्रयत्न केला पण बरचीचे दोन तुकडे झाले. आपल्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन तो हलकेच त्या इग्लूतून पळून गेला आणि त्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या इग्लूचा त्याने आश्रय घेतला. त्या इग्लूमध्ये दोन वृद्ध अस्वली – मानव होत्या. स्वतःजवळ असलेल्या चामडे सोलण्याच्या चाकूसह तो मुलगा त्यांच्यावर तुटून पडला आणि त्याने त्यांना मारून टाकले. दोघींपैकी एकीला त्याने सोलले आणि तिच्या केसाळ कातडीच्या कोटाने त्याने स्वतःचे शरीर झाकून टाकले. नंतर तो इग्लूच्या भिंतीकडे कलला आणि अस्वली-मानव झोपल्याप्रमाणे पडून राहिला. त्याचे हे सर्व काही पूर्ण होते आहे तोच त्या इग्लूच्या प्रवेशव्दाराजवळ कुणीतरी आल्याची चाहूल त्याला लागली. एक मोठ्ठा अस्वल मानव त्या छोट्या इग्लूत प्रवेशला आणि म्हणाला, “तुमच्या या इग्लूजवळील इग्लूमध्ये आपल्यातल्या एका महान शिकाऱ्यावर हल्ला झाला असून त्याच्या शरीरात एक बरची रुतून बसली आहे. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. तुम्ही तिथे येऊन त्याची नीट काळजी घेतली पाहिजे.”अस्वली कातड्याचा केसाळ कोट धारण केलेल्या त्या मुलाने उत्तर दिले. “मी लांबपर्यंत चालू शकत नाही. मी फार थकलो आहे आणि माझी सोबतीण गाढ झोपली आहे. तिला झोपेतून उठवण्याची माझी इच्छा नाही. तिला विश्रांतीची आवश्यकता आहे.” परंतु त्या अस्वली-मानवाने आग्रहच धरला. तो म्हणाला, ‘तू यायलाच पाहिजेस. मी तुला उचलून त्या इग्लूपर्यंत घेऊन जातो. तू जर त्याला मदत केली नाहीस तर तो मरून जाईल.
मुलाने ओळखले की त्याला जावेच लागेल. म्हणून आपल्या पायांवर तो अगदी सावकाश उठला आणि म्हाताऱ्या बाईप्रमाणे कापत चालू लागला. मग त्या अस्वल-मानवाने त्याचा एक हात एकदम पकडला आणि त्याला जवळच्या इग्लूकडे ओढत नेऊ लागला. जरी त्या मुलाने वृद्ध अस्वली – मानवाप्रमाणे अभिनय केला असला तरी तो तसा पूर्णपणे करू शकत नव्हता. अस्वल-मानव यामुळे संशयी बनला. तो म्हणाला, “नेहमीपेक्षा तू अधिक बलवान वाटत आहेस, ते कशामुळे?” यावर मुलाने तात्काळ विचार करून उत्तर दिले, “माझ्या जखमी बांधवाला मदत करता यावी म्हणून माझ्या सर्व शक्तिनिशी मी चालण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून मी तुला शक्तिमान किंवा बलवान वाटत असेन.” या उत्तराने त्या अस्वल-मानवाचे समाधान झाले व त्याने अजून प्रश्न विचारले नाहीत.
पूर्वी ज्या इग्लूमध्ये तो लपला होता, त्यात तो अस्वल – मानव पडलेला त्याला दिसला. त्या अस्वल मानवाच्या छातीत बरची रुतून बसलेली होती, मोठे व्हेल मासे मारायची बरची होती ती. आणि त्या तुटलेल्या बरचीचा दांडा त्याच्या छातीतून बाहेर आलेला होता. त्या मुलाने त्या खोलीत सर्वत्र पाहिले तेव्हा त्याला तिथे एक अणकुचीदार दगड दिसला. तेलाच्या दिव्यावर मुलगा तो दगड गरम करू लागला. हे करताना ज्याने त्या मुलाला इग्लूत आणले होते त्या अस्वल-मानवाला तो मुलगा म्हणाला, “त्या बांधवात रुतलेली बरची ओढून काढायची आहे. पण त्या जखमेतून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी आधी मला हा दगड गरम करून त्या जखमेवर ठेवायचा आहे.” यावर मग त्या अस्वल-मानवाने संमतिदर्शक मान हलवली. तो मुलगा पुढे म्हणाला, “जेव्हा मी ती बरची ओढून बाहेर काढायच्या तयारीत असेन तेव्हा तू हा दिवा विझवायचास आणि मोठमोठ्याने आवाज करून ओरडायचे. जखम बरी करण्याच्या उपायाचाच हा एक भाग असून असे तू केलेच पाहिजेस.” यावर पुन्हा अस्वल- मानवाने संमतिदर्शक मान हलवली. नंतर मग त्या मुलाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सर्वात आधी त्याने त्या तुटलेल्या बरचीच्या दांड्याचा शेवटचा भाग पकडला आणि मग त्या अस्वल मानवाला त्याचे काम सुरू करायला सांगितले. ठरल्याप्रमाणे ती खोली मिट्ट काळोखाने पूर्ण भरून गेल्यावर मुलाने बरची बाहेर ओढून काढली आणि तो गरम झालेला दगड त्या जमखेत अगदी खोलवर बुडवला. जखमी अस्वल – मानव वेदनेने आक्रोश करू लागला. पण दुसऱ्या अस्वल – मानवाला त्याचा आक्रोश ऐकूही आला नाही. कारण सूचनेप्रमाणे तो अत्यंत मोठ्याने आवाज करीत होता. क्षणभरात तो जखमी अस्वल मानव मेला. नंतर तो मुलगा निसटून जाण्याच्या तयारीत होता. पण निसटण्यापूर्वी त्या मोठ्याने आवाज करणाऱ्या अस्वल-मानवाच्या हृदयात त्याने ती बरची खुपसली. त्या अनाथ मुलाने ती तुटलेली बरची बाहेर उपसून काढली आणि मोठ्या चपळाईने तो त्याच्या होडीच्या दिशेने जितक्या वेगात पळणे शक्य होते तितक्या वेगात पळू लागला. होडीत त्याने उडी मारली आणि अत्यंत बेफामपणे वल्हवीत ती होडी नदीच्या खालच्या बाजूला नेऊ लागला. त्या गावातील लोकांनी दोन मृत अस्वल-मानवांच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या आणि त्या मुलाला पळून जातानाही पाहिले होते. त्यामुळे मग त्यांनी नदीच्या काठाकाठाने त्याच्या होडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. लांब अंतरापर्यंत त्यांनी त्या मुलाच्या होडीचा पाठलाग केला, पण त्याला पकडता येईल इतके त्याच्या जवळसुद्धा ते कधी पोचू शकले नाहीत. शेवटी त्यांनी तो नाद सोडून दिला आणि त्यांच्या घरी ते परत गेले. समुद्रमार्गे तो मुलगा त्याच्या गावी पोचला आणि त्याच्या साहसाची गोष्ट त्याने सर्वांना सांगितली. आश्चर्यचकित झालेल्या शिकाऱ्यांना त्याने त्या अस्वलाचे कातडे दाखवले आणि तुटलेली ‘हारपून’ म्हणजे सील आणि मोठ्या माशांना मारायची बरचीही दाखवली. त्यामुळे मग गायब झालेल्या शिकाऱ्यांच्या दोन गटांचे काय झाले असावे, हे त्यांना पूर्णपणे कळून चुकले. ज्या वृद्धाने त्या अनाथ मुलाला त्याची होडी आणि भाला या गोष्टी उसन्या दिल्या होत्या, त्याला मुलाने जे काही केले त्यामुळे समाधान वाटले. म्हणून त्याने मग त्या मुलाला ती होडी आणि मोठे व्हेल मासे मारण्याची नवी बरची देऊन टाकली. त्यावेळेपासून मग तो मुलगा मोठा पुरुष बनला आणि ‘ग्रेट हंटर’ किंवा श्रेष्ठ शिकारी म्हणून ओळखला जाऊ लागला.