(एस्किमो लोककथा)
एकदा एक दहा पायांचे ध्रुवप्रदेशी अस्वल अलास्काच्या उत्तरेला असलेल्या समुद्रकिनाऱ्याजवळ राहत होते. समुद्रातील हिमपर्वत आणि दूरवर तरंगणाऱ्या हिमखंडाच्या पलीकडील सील माशांची शिकार करणे यात त्याचा बहुतांश वेळ ते घालवीत असे. त्यामुळे हे अस्वल एस्किमोंच्या दृष्टीस अगदी क्वचितच पडत असे. त्या अस्वलाला प्रत्येक बाजूने पाच पाच असे पाय होते. जेव्हा ते अस्वल चालत असे किंवा पळत असे तेव्हा ते त्याच्या एका बाजूच्या पाचही पायांवर चालून किंवा पळून पुढे जात असे. नंतर मग त्याचे दुसऱ्या बाजूचे पाय त्यामागे पडत. अनेक पाय असल्यामुळे पळताना कधी कधी त्याचे पाय एकमेकात गुंतून ते पडतही असे. म्हणून त्याचा बहुतांश वेळ पाण्यातच ते व्यतीत करीत असे.
गोरा माणूस आर्क्टिक महासागरावर पोहोचण्यापूर्वीची अर्थात फार जुन्या काळातील गोष्ट आहे. समुद्रावर तरंगणाऱ्या हिमखंडावर एक श्रेष्ठ ‘एस्किमो शिकारी सील माशांची शिकार करीत होता. त्याने सीलची शिकार केली आणि गोठलेल्या रमणीय भागावरून तो त्याच्या दूरवरच्या घराकडे त्या माशाला फरपटत ओढत घेऊन चालला होता. अचानकच त्याची दृष्टी एका चमत्कारिक दृश्यावर पडली. बर्फामध्ये एका ध्रुवप्रदेशी अस्वलाच्या पावलांचे ठसे उमटलेले त्याला दिसले; पण याबाबत त्याची खात्री होईना की एक अस्वल की अनेक?
दहा पायांच्या ध्रुवप्रदेशी अस्वलाच्या चमत्कारिक गोष्टी त्याने यापूर्वी ऐकलेल्या होत्या. गावापासून दूरवर अशा अस्वलाची शिकार केली गेल्याचेही त्याने ऐकले होते. पण अशा प्रकारचे अस्वल असू शकेल यावर त्याने कधी विश्वास ठेवला नव्हता.
एका हाताने त्या मृत सील माशाला त्याच्या मार्गाने फरपटत नेणे त्याने चालू ठेवले होते. मात्र दुसऱ्या हातात त्याने त्याचा लांब भाला धरून ठेवला होता. नंतर त्याच्या मागे दहा फुटांवरच दहा पायाच्या ध्रुवप्रदेशी अस्वलाच्या पावलांचा बर्फावर आदळून उठणारा ध्वनी त्याला ऐकू आला. तो थांबला. त्याने आपल्या खांद्यावरुन मागे वळून पाहिले. त्याच्या मागून जवळ येणारी उंच अशी हिमराशी म्हणजे ध्रुवप्रदेशी अस्वल होते. हे पाहून तो शिकारी खूप घाबरला. लगेचच त्याने तो मृत सील तिथेच टाकला आणि तो पळाला. भाला मात्र त्या शिकाऱ्याच्या हातातच होता. आपले दहा जड पंजे बर्फात रुतवत रुतवत दहा पायांचे ते मोठे अस्वल त्या शिकाऱ्यामागे पळत होते. मिनिटभर ते अस्वल थांबले. तो सील मासा त्याने खाऊन टाकला आणि नंतर पुन्हा ते घाबरलेल्या शिकाऱ्याचा पाठलाग करू लागले. जवळ जवळ असलेले दोन प्रचंड मोठे हिमखंड त्या माणसाने बघितले. तिकडे त्या बाजूने तो पळाला आणि तिथे जाऊन लपला, पण दहा पायांच्या त्या अस्वलाने वासावरुन त्याचा माग काढला. ते भुकेलेले ध्रुवप्रदेशी अस्वल एका हिमखंडाच्या शिखरावर चढले आणि त्या दोन हिमखंडाच्या बरोबर मधोमध पडले. अस्वल जे पडले ते नेमके उलटे. तोंडाची व छातीची बाजू वर आली. पायही वर झाले. जेव्हा ते उठू लागले तेव्हा त्याचे पाय एकमेकात गुंतले. अडकले. एस्किमो शिकाऱ्याने त्याचा तो जड भाला घेतला आणि सर्व शक्तिनिशी त्या दहा पायांच्या अस्वलाच्या छातीत खुपसला जाईल असा फेकला. त्या अस्वलाने त्याचे ते दहा मोठे पाय हवेत मागे पुढे झाडले आणि जिवावर उदार होऊन उठण्याचा प्रयत्न केला, पण लवकरच ते अस्वल मेले. नंतर त्या शिकाऱ्याने त्या अस्वलाचे सर्वच्या सर्व म्हणजे दहाही पाय कापून आपल्या गावी नेले. पण त्याने दहा पायांचे ध्रुवप्रदेशी अस्वल मारले यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. त्यानंतर मात्र कुणीही अशा प्रकारचे विलक्षण व समजण्याच्या पलीकडे असलेले ध्रुवप्रदेशी अस्वल त्या आर्क्टिक प्रदेशात कधीच बघितले नाही.