ससा आणि कासवाची शाळा

ससा आणि कासव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे ‘ससा व कासवाची शर्यत’. पण माझी गोष्ट यापेक्षा निराळीच आहे बरं का.



ससा आणि कासव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे ‘ससा व कासवाची शर्यत’. पण माझी गोष्ट यापेक्षा निराळीच आहे बरं का.

एक जंगल होतं. त्या जंगलात ससा व कासव हे दोघे घनिष्ठ मित्र राहत होते. त्याच जंगलात एक शाळा होती. ते दोघे त्या शाळेत सकाळी बरोबर जात असत. ससा टुणटुण उड्या मारत पुढे निघून जाई. तर कासव मात्र हळूहळू जात असे. त्यामुळे त्याला शाळेत शिक्षा होत असे. असे खूप दिवस घडले. सशाने कासवाची मैत्री सोडून दिली व दोघेजण स्वतंत्रपणे शाळेत जाऊ लागले. असेच दिवस उलटत गेले.

एके दिवशी अचानक हत्ती सर वर्गात येऊन म्हणाले की, आपल्या वर्गाची सहल जाणार आहे. हे ऐकून सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. पण हत्ती सरांनी लगेच नमूद केले की, ही सहल केवळ मजा करण्याची नसून शैक्षणिक सहल आहे. त्यात तुम्हाला अनेक वनस्पतींची माहिती मिळवायची आहे. सगळ्या प्राण्यांनी ही गोष्ट मान्य केली.

दोनचार दिवसांनी सहल निघाली. प्रत्येकाने आपल्याबरोबर स्वतःच्या आवडीचा खूप खाऊ घेतलेला होता. शिवाय माहिती लिहिण्यासाठी जवळ वही-पेनसुद्धा ठेवले होते. हसत-खेळत, गाणे गात सहल निघाली. बसमध्ये सगळे गाण्याच्या भेंड्या खेळू लागले. माकडाने तर चक्क भीमरूपी स्तोत्र म्हटले. त्याचे बघून कासवाने सगळ्या देवांचे एकत्रित असलेले एक भजन म्हटले. शेवटी हत्ती सरांनी सगळ्यांना गणपती अथर्वशीर्ष शिकवले. असे करता करता ते सहलीच्या ठिकाणी म्हणजेच आनंदवनात पोहचले. तेथे सगळ्यांनी मिळून मिसळून सहभोजन केले. थोड्याशा विश्रांतीनंतर हत्तीसरांनी सगळ्यांना बोलावले आणि दोन-दोनचे गट पाडून दिले. आणि काय आश्चर्य, सशाच्या जोडीला कासव आले. सरांनी त्यांना विविध वनस्पती गोळा करायला सांगितले.

ससा व कासव एका तळ्याजवळ जाऊन पोहचले. तळ्याजवळ असलेली वनस्पती तोडण्यासाठी ससा जवळ जाताच त्याचा पाय घसरला आणि तो तळ्यात जाऊन पडला. सशाला पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला व मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकताच कासव तळ्यापाशी आले. त्याने आपल्या जीवाची काळजी न करता पाण्यात उडी मारली. तो पोहण्यात पटाईत असल्याने क्षणात त्याने सशाचे कान ओढून त्याला बाहेर काढले. कासवाशी वाईट वागल्याबद्दल सशाने कासवाची माफी मागितली. नंतर दोघेजण सरांकडे गेले. घडलेली हकीगत ऐकून सरांनी कासवाचा गौरव केला व सगळ्यांपेक्षा जास्त व विविध वनस्पती एकत्रित जमा केल्याबद्दल याच जोडीचा गौरव केला.

ते सगळे त्यांच्या जंगलात पोहचले व झोपी गेले. मात्र सशाला झोप आली नाही. त्याने कासवाला भेटवस्तू देण्याचे ठरविले. त्याने एक लाकडाची लांब फळी घेतली. लाकडाचा एक गोल तयार केला. तो त्या फळीला जोडला. त्याने असे चार गोल कापले व ते फळीला लावले.

सकाळी पहिल्यासारखाच ससा कासवाला बोलवायला आला. त्याने ती फळी कासवाला दिली. रस्त्याने कासवाला त्या फळीवर चढायला व त्याच्या आधारे चालायला सांगितले. अशा रितीने कासवाचा स्केटिंग बोर्ड तयार झाला व ससा आणि कासव रोज शाळेत जाऊ लागले. दोघेही बरोबर व वेळेआधी शाळेत पोहचू लागले. तेसुद्धा शाळेची पहिली घंटा होण्याचा आत.

Author