त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले. नंदालाही ती गोष्ट पटली. तेव्हा इंद्राला आपला अपमान झाला असे वाटून त्याने रागाच्या सपाट्यात भयंकर वृष्टी करणाऱ्या मेघांना मोकळे सोडले. ते गोकुळावर अतिवृष्टी करू लागले. विजांचा कडकडाट झाला; गारांचा वर्षाव झाला; जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. उभे राहण्यास तिळा एवढी देखील कोरडी जमीन राहिली नाही. थंडीने सर्व अगदी काकडून गेले. आता काय करावे याची सर्वांना काळजी येऊन पडली. तेव्हा इंद्राचा गर्व उतरण्यासाठी कृष्णाने तो गोवर्धन पर्वत उपटून करंगळीवर उचलून धरला आणि छत्रीखाली जसे आपण उभे राहतो तसे सगळे गोप व गोपीगाईवासरेसुद्धा त्या पर्वताखाली आश्रयास येऊन उभी राहिली. कृष्ण करंगळीवर पर्वत घेऊन सात दिवस उभा होता. हे इंद्राने पाहिले, तेव्हा त्याचा गर्व उतरला; पाऊस लख्ख उघडला; नदीनाल्यांचे पाणी ओसरले; जमीन कोरडी झाली; तेव्हा सगळी माणसे पुनः गोकुळात जाऊन राहिली.
पर्वताची केली छत्री
त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.