नू’चे नाणे

(चिनी लोककथा)

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक
पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी
परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव
ऐकवत असे.



(चिनी लोककथा)

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक
पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी
परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव
ऐकवत असे. गावकरी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या गोष्टी ऐकत असत. विशेषतः
चीनमधील भव्य आणि प्रसिद्ध अशा बुद्ध मंदिरांची जेव्हा तो वर्णने करीत असे
तेव्हा लोक ती वर्णने ऐकून स्तिमित होत. ही वर्णने ऐकून ऐकून आपल्या
गावातही एखादं भव्य मंदिर उभारावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं.

मंदिर उभारण्यासाठी लागणारं साहित्य जमवणं फारसं अवघड नव्हतं. प्रश्न
होता भगवान बुद्धांच्या मूर्तीचा ! मूर्ती घडवणारे कारागीर तर गावात होते; पण
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा खर्च, मूल्यवान धातू आणायचे कोठून, हा
खरा प्रश्न होता. गावातील बहुतांश लोक निर्धन होते. या समस्येची सोडवणूक
कशी करायची याची साऱ्यांना चिंता लागली.

काही लोकांनी पुजारी बाबांना भेटून आपली समस्या सांगितली.
काही वेळ विचार करून बाबा म्हणाले, ‘एक उपाय आहे.’
‘कोणता बाबा ? ‘एकाने उत्सुकतेने विचारले.

‘गावात पुजाऱ्यांची सहा घरं आहेत. प्रत्येक घरातला एक-एक पुरुष सदस्य
चीनभर हिंडून सोनं, चांदी, पैसा जमवू शकेल. आपल्या देशात श्रीमंत लोक
बरेच आहेत. हे लोक या पवित्र कार्यासाठी सढळ हाताने मदत करतील असा
मला विश्वास वाटतो.’

सगळ्यांना हा उपाय ऐकून हुरूप चढला. सगळे उत्साहाने कामाला लागले.
जवळच्याच एका शहरी एक श्रीमंत स्त्री होती. अपार संपत्तीची मालकीण
होती ती. तिच्या सेवेसाठी दास दासींचा बराच मोठा ताफा होता. त्यातल्या
एका दासीची छोटीशी मुलगी होती- ‘टीन नू.’ ती वयानं लहान असली तरी
समजूतदार आणि कष्टाळू होती. आपल्या आईला ती कामात मदत करीत असे.
या गोड स्वभावाच्या मुलीचे सगळेजण खूप लाड करायचे.

एकदा ‘टीन नू’ ला रस्त्यावर एक पैसा सापडला. चीनमधील सर्वात लहान
असं तांब्याचं नाणं होतं ते. तिने तो पैसा उचलून घेतला. हा पैसा मिळाल्याचा
तिला खूप खूप आनंद झाला होता.

‘टीन नू’ ने तो पैसा मालकिणीच्या बागेतील एका दगडाखाली दडवून ठेवला.
रिकामा वेळ मिळे तेव्हा ती हा पैसा काढून न्याहाळीत बसायची. हा पैसा जणू
तिचं सर्वस्वच होतं!

एके दिवशी एक पुजारी त्या धनाढ्य स्त्रीच्या घरी आला. बुद्ध-मूर्तीसाठी
त्याने काही धन देण्याची विनंती केली. ‘टीन नू’ तेथेच काम करीत होती.
पुजाऱ्याचं बोलणं ती लक्षपूर्वक ऐकत होती. मालकिणीनं जेव्हा पुजाऱ्याला
भरपूर सोनं-नाणं दिलं तेव्हा भगवान बुद्धांच्या मूर्तीसाठी आपणही काही तरी
द्यावं असं तिला वाटलं. पण आपण तर गरीब आहोत, आपण काय देणार ?… या
विचारानं ती खिन्न झाली. तिचं विचारचक्र चालू होतं…

अचानक तिला बागेत दडवून ठेवलेल्या आपल्या पैशाची आठवण झाली.
आनंदाने तिचा चेहरा उजळला. ती लगेच धावत गेली अन् तो पैसा आणून
पुजाऱ्याच्या हातावर ठेवत म्हणाली, ‘भगवान बुद्धांची मूर्ती तयार करण्यासाठी
माझी ही छोटीशी भेट स्वीकारावी.”

ते अत्यल्प किंमतीचं नाणं पाहून पुजाऱ्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या.
काहीशी नापसंती दर्शवीत तो म्हणाला, ‘मुली, या पैशाचा काय उपयोग करणार
आम्ही ? हा तुझ्या जवळच राहू दे.’ आणि त्यानं ‘टीन नू’ला पैसा परत केला.
तिला खूप वाईट वाटलं. किती तरी वेळ ती रडत होती.

अनेक दिवस लोटले. सगळे पुजारी परतले होते. मूल्यवान धातू आणि
भरपूर पैसे जमले होते. आता भव्य अशी मूर्ती तयार करायला अडचण नव्हती.
गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले.

मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सगळे धातू एकत्र करून
वितळविण्यात आले. वितळलेले सारे धातू एकजीव होऊन गेले. हा तप्त रस
काळजीपूर्वक साच्यात ओतण्यात आला. बराच वेळ लोटला; तप्त रस पूर्णपणे
थंड झाल्याची खात्री करून साचा हळूहळू तोडण्यात आला.
पण हे काय… ? भगवान बुद्धांची भग्न अशी मूर्ती दिसू लागली. ही तुटकी-
फुटकी मूर्ती पाहून लोकांत निराशा पसरली. दोन-चारदा पुन्हा प्रयत्न करण्यात
आला. पण दरवेळी भंगलेली मूर्तीच तयार होत असल्याचे पाहून लोक
चिंताक्रांत झाले. पुजारी बाबांना ही गोष्ट फारच खटकली. ते शांतपणे विचार
करू लागले… ‘काही तरी विपरीत असं नक्कीच घडलं असावं… कुणावर तरी
अन्याय झाला असावा… कुणाचं तरी मन दुखावलं गेलं असावं…’

सगळ्या पुजाऱ्यांना बोलावून धन गोळा करताना जे जे प्रसंग घडले ते
विस्ताराने सांगायची सूचना बाबांनी केली. एखादा प्रसंग ऐकताना ते अधून
मधून प्रश्नही विचारू लागले. ही विचारपूस सुरू असताना ‘टीन नू’ चा प्रसंग
ऐकताच ते काहीसे उत्तेजित झाले. ज्या पुजाऱ्याने हा प्रसंग सांगितला त्याला
बाबांनी आज्ञा दिली, ‘आत्ताच्या आत्ता ‘टीन नू’कडे जा आणि तिच्याजवळचा
पैसा मागून आण.’

पुजारी ताबडतोब निघाला. ‘टीन नू’ला भेटून त्याने तिला सगळं काही
सांगितलं. अन् शेवटी म्हणाला, ‘मुली, भगवान बुद्धांच्या प्रतिमेसाठी तुझा पैसा
हवा आहे. मागे मी नकार दिला याचं खूप वाईट वाटतं मला… तो पैसा देशील
कां?’

‘हो…. हो…. का नाही ? ‘नू’ म्हणाली अन् धावत पळत जाऊन तिने पैसा
आणला आणि पुजाऱ्याला दिला. पुजाऱ्याने काळजीपूर्वक तो पैसा
अंगरख्याच्या खिशात ठेवला.

तो परतला आणि त्याने पैसा बाबांच्या ताब्यात दिला.
पुन्हा नव्याने साचा तयार करण्यात आला. धातू वितळू लागले. धातूच्या
उकळत्या रसात बाबांनी नूचा पैसाही टाकला. क्षणभरात तो पैसा वितळून गेला.

अतिशय जपून रस साच्यात ओतला गेला… रस थंड झाल्यावर साच्याचे
आवरण दूर करण्यात आले. यावेळी साच्याचे आवरण दूर होताच लोक
हर्षातिरेकाने मूर्तीकडे पाहतच राहिले. अनेकांच्या तोंडून सहजोद्गार बाहेर
पडले-‘सुंदर! अति सुंदर!

खरोखरच अत्यंत सुंदर अशी मूर्ती साकारली होती. ‘अशी मूर्ती संपूर्ण
चीनमध्ये कुठेच नाही असे बाबांनी सांगितल्यावर लोकांच्या आनंदाला
पारावार राहिला नाही.

याच बरोबर लोकांनी एक आगळीच गोष्ट पाहिली. मूर्तीच्या वक्षावर एक
लहानसे चिन्ह दिसत होते… ‘टीन नू’च्या पैशाएवढाच त्याचा आकार होता… हा
‘टीन नू’- चाच पैसा होता ! आजही ‘ताओन-लिन’ येथील बुद्ध मूर्तीच्या वक्षावर
‘टीन नू’ चा पैसा अगदी स्पष्टपणे दिसतो !!

Author