खोल किती आहे?

मारुती नावाचा एक सालदार होता. खूप कष्टाळू होता. सगळ्या गावातील लोक म्हणत, मारुती कामाला जसा वाघ आहे, तसा खायला बकासूर आहे.



(खानदेशी लोककथा)

मारुती नावाचा एक सालदार होता. खूप कष्टाळू होता. सगळ्या गावातील लोक म्हणत, मारुती कामाला जसा वाघ आहे, तसा खायला बकासूर आहे.

त्याच्या कामाबद्दल सगळेच कौतुक करीत. परंतु त्याला खायला भरपूर द्यावे लागते, याबद्दल खूप कुरकूर करीत. मारुतीचे सगळ्यात महत्त्वाचे स्वभाव वैशिष्ट्य सांगायचे तर, तो स्वाभिमानी होता, कुणी खायला दिल्याशिवाय तो खात नसे. आणि खाण्यावरून कुणी त्याला बोलले तर तो ते काम सोडून देत असे. बऱ्याच वेळा त्याच्या खाण्यावरून लोक त्याला कामावरून काढूनही टाकीत. परंतु त्यांची कामसूवृत्ती, प्रामाणिकपणा या गुणांमुळे दुसरीकडे लगेच काम मिळत असे.

एकदा एका भटजीकडे त्याला काम मिळाले. भटजी खूष झाला. परंतु एक-दोन दिवसात मारुतीसाठी जेवण बनवता बनवता भटजीची बायको कुरकूर करायला लागली. बायकोला समजविण्याच्या प्रयत्न करीत भटजी म्हणाला, ‘दोन-चार भाकरी बनव की जास्तीच्याः एक माणूस चार लोकांचं काम करतो, आपलंही काम लवकर होतं हे समजून घेतलं पाहिजे.’ पुन्हा चार पाच दिवसांनी बायकोने तक्रार केली. तिला रोज जास्तीचा स्वयंपाक करण्याचा कंटाळा येऊ लागला. भटजी बायकोला म्हणाला, ‘एक युक्ती सांगतो’ भाजी-पोळी सोबत रोज थोडासा गोड पदार्थ वाढायचा आणि मारुतीला सांगायचे, ‘थोडेसे आहे पण गोड किती आहे,’भटजीच्या बायकोला युक्ती पटली. दुसऱ्या दिवसापासून एकदाच वाढून देत थोडसं गोडही वाढे.

मारुतीची उपासमार होऊ लागली. मारुतीनेही ठरविलं! थोडसंच शेत नांगरायचं आणि आराम करायचा. दोन-तीन दिवसांनी भटजी शेतात आला. फारसं काम झालेलं नव्हतं. मारुतीला भटजी म्हणाला, ‘मारुती एवढंच शेत नांगरलं?’ मारुती म्हणाला, मालक, थोडसंच आहे पण खोल किती आहे?’ ब्राह्मणाच्या लक्षात आलं, आपल्या युक्तीला मारुतीनेही युक्तीनेच उत्तर दिले. ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली. जसे दाम तसे काम’ या न्यायाने मारुतीला पोटभर जेवण देण्याचे आदेश ब्राह्मणाने आपल्या बायकोला दिला आणि मारुतीची उपासमार थांबली.

Author