(आदिवासींमधील गाडगे महाराज)
खानदेशातील पाटबारा नावाच्या गावात एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. तो भिल्ल समाजाचा असून अतिशय दु:खी, कष्टी होता. त्याचे नाव काकड्या असे होते. त्याच्या पत्नीचे नाव ‘गोमती’ होते. दोघं पती-पत्नी जमीनदाराच्या शेतात कष्ट करीत असत; पण मोबदला फारच तुटपुंजा मिळत होता. तरी कुरकुर न करता ते खूप कष्ट करीत होते. कष्ट करूनही पोटभर अन्न त्यांच्या नशिबी नव्हते. त्यात त्यांना एक मूल झाले. त्या मुलाचे नाव त्यांनी ‘हान्या’ असे ठेवले. हान्या बालपणापासूनच शांत, सुस्वभावी होता. तो मोठा
झाला ते अनेक प्रश्न घेऊनच! तो आपल्या पित्याला, मातेला नेहमी विचारत असे, “आई, बाबा आपला आदिवासी समाज इतका मागास का आहे? आपला समाज पिढ्यान पिढ्या गरिबी / दारिद्र्य का सोसतो? आपला समाज व्यसनमुक्त कसा होणार?” एक ना दोन असे अनेक प्रश्न तो आई-वडिलांना विचारायचा.
हान्या इतर मुलांपेक्षा वेगळा आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. हान्या जसजसा मोठा होऊ लागला तसतसं वयापेक्षा जास्त शहाणपण प्राप्त होऊ लागलं होतं. शेतात आई-बाबांसोबत कामाला गेला की, तो बरोबरीच्या लोकांना एकत्र जमवायचा आणि त्यांना समजावायचा, “बाबांनो, ऐका, आपला समाज मागास, दरिद्री असण्याचं कारण अज्ञान आहे. व्यसन आहे. तसेच रोगराईपासून मुक्त व्हायचं असेल तर रोज आंघोळ करा. घर-अंगण स्वच्छ ठेवा.” हान्या अशा शहाणपणाच्या गोष्टी करायचा तेव्हा आई-बाबांचं काळीज फुलून येत होतं. अनेकांना हान्याच्या गोष्टी पटत होत्या. तो स्वत:ही पहाटे लवकर उठायचा. नदीवर जाऊन स्वच्छ आंघोळ करायचा आणि सूर्यदर्शन,
पूजन केल्याशिवाय अन्न सेवन करत नव्हता.
दिवसेंदिवस हान्याची साधुत्ववृत्ती वाढत होती. आपल्या समाजाविषयीची कळकळ त्याला स्वस्थ बसू देत नसे. आता हान्या एक तपस्वी पुरुष बनला. लोक त्याला “हान्या महाराज” म्हणू लागले. त्याने आपल्या गावात, परिसरात खूप सुधारणा केली. आपल्या आदिवासी बंधु-भगिनींना स्वच्छतेचे, व्यसनमुक्तीचे पाठ दिले.
हान्या महाराज म्हणजे धडगाव परिसरातील जणू गाडगे महाराजच होता.
अतिशय साधी पण स्वच्छ राहणी. हान्या महाराजाच्या आणखी एक गोष्ट
लक्षात आली. आपल्या समाजात पती-पत्नीचा सन्मान नाही. तेव्हा त्यांच्यात
एकमेकांविषयी आदरभाव निर्माण व्हावा, परस्परांचे महत्त्व पटावे म्हणून दर
सोमवारी आरती समारंभ घडवून आणला. त्याने गावातल्या लोकांना एकत्र
बोलावले आणि आपल्या मनातील विचार बोलून दाखविला. “गड्यांनो, स्त्री
आणि पुरुष समान आहेत. स्त्रीचे महात्म्य ओळखा. तिचा सन्मान घरातूनच
झाला पाहिजे. तेव्हा आज आपण एक आरती करणार आहोत.” गावातील लोक
विचार करू लागले, इथे कुठंय मंदिर, देव! मग आरती कशी आणि कोणाची
करायची? त्याने लोकांना सांगितले. “आज आपण कोण्या परमेश्वराची आरती
करायची नसून आजच्या आरतीचे नाव आहे – ‘सतीपतीची आरती’ म्हणजे
पतीने पत्नीची आरती करायची आणि पत्नीने आपल्या पतीची आरती करून
एकमेकांना सन्मानीत करायचे, कबूल?”
हान्या महाराजांचा इशारा होताच तेथे जमलेल्या सगळ्या जोडप्यांनी
एकमेकांची आरती केली. आरतीनंतर हान्या महाराजांनी त्या जमावाला
उपदेश केला- दारू पिऊ नका, चोरी करू नका. स्वच्छ रहा. आपले शरीर, घर,
अंगण स्वच्छ ठेवा. रोगराईपासून स्वत:ला वाचवा. घरातील सर्वांनी एकमेकांचा
आदर करायला शिका.
उपदेश करते समयी हान्या महाराज ‘आप’ या शब्दाचा प्रयोग जास्त करीत
असत. ‘आप’ म्हणजे आपण सर्व, ‘आप’ म्हणजे आत्मा. तेव्हापासून आरती
समारंभाला येणाऱ्या लोकांना ‘आपमंडळी’ म्हणण्याची प्रथा पडली आणि ही
आपमंडळी जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा हात जोडून एकमेकांच्या
हातांना हात लावून ‘आपकी जय हो’ या पद्धतीने नमस्कार करतात. हान्या
महाराजांनी आदिवासी बांधवांना स्वच्छतेचा, व्यसनमुक्तीचा, सचोटीचा मार्ग
दाखविला. कुटुंबात एकमेकांचा सन्मान करायला शिकवले.
आज हान्या महाराज नाहीत. पण त्याचे विचार धडगाव परिसरातील
पाड्यात अजूनही जिवंत आहेत. आजही धडगाव तालुक्यातील ‘पाटबारा’
गावात दर सोमवारी ‘सतीपतीची’ आरती होते. आदिवासींना स्वच्छतेचे,
कष्टाचे, निर्व्यसनाचे पाठ शिकविणाऱ्या हान्या महाराजांवर तेथील
आदिवासींनी भजने रचली. ही भजने दर सोमवारी आणि दिवाळी व
गुढीपाडव्याला गायली जातात. हा वसा हे भजनी मंडळ गावोगाव देतात. असा
हा पहाडातला छोटासा ‘हान्या महाराज’ आपल्या कर्तृत्ववानने चिरंजीव झाला
आहे.