एके काळी निसर्गात दोन बलवंत शक्ती होत्या. हत्ती आणि पावसाचा देव.
अभिमानी आणि बढाईखोर हत्ती पावसाशी नेहमी वाद घालायचा. दोघात हत्ती मोठा आहे असं पावसानं मान्य करावं हा हत्तीचा हेतू असायचा. एकदा अशाच वादात आपल्या ओल्या आणि खळखळाट करणाऱ्या आवाजात पावसानं हत्तीला विचारलं ‘अहो गजराज, जिथं मी तुम्हाला चारा देतो तिथं माझ्यापेक्षा तुम्ही कसे मोठे असाल? ‘ अभिमानी हत्ती हे कसे मान्य करणार? काहीही विचार न करता तो म्हणाला, ‘तू नाही मला चारा देत. माझा मी शोधतो आणि खातो. स्वतःच्या हिंमतीवर मी जगतो.’ आता वृथा वाद घालायचा नाही, आपलं सामर्थ्य मात्र दाखवायचं असं पावसानं ठरवलं. त्यानं आभाळ काळंभोर केलं, गडगडाट केला आणि बोलला, ‘समज मी नाहीसाच झालो तर तू जगशील?’ आणि पाऊस नाहीसा झाला.
पाऊस दिसेनासा झाल्यावर हत्ती आपल्याशीच मोठ्यांदा हसला, ‘आता सगळं राज्य माझंच ! पाऊस पळून गेला म्हणजे आपण हार खाल्ली हेच त्यानं जाहीर केलं.’ मग जंगलावर आणि रानावर सहाएक महिने हत्तीचंच राज्य होतं. सगळं सुरळीत चालू राहिलं. पावसाची आणि हत्तीची सततची खडाजंगी नसल्यामुळे सगळीकडे शांतता राहिली. मग पाऊसकाळ आला. आता पुष्कळशा प्राण्यांच्या पोटात गर्भ होते.
हिरव्या लुसलुशीत गवतानं आणि स्वच्छ पाण्यानं पाठच फिरवली होती. निळं आभाळ उष्ण राहिलं. कुठे कोपऱ्यातसुद्धा काळा ढंग उमटला नाही. पोटातली बाळं भुकेलीच राहिल्यामुळे सगळे प्राणी काळजीत पडले. जेरीला येऊन सगळे हत्तीला शोधत गेले. तोच त्यांचा रक्षण करणारा होता. हत्ती थोडा अस्वस्थ झाला पण प्रजेच्या मागणीची कदर करून म्हणाला, ‘गिधाड हे पाऊस आणण्यात वस्ताद आहे, मी त्याला बोलावणं करतो.’ हत्तीनं गिधाडाला निरोप पाठवून बोलावलं, पण गिधाड हे पावसाचं नोकर होतं. हे दोघं आपसात मोठे भांडलेत हे त्याला माहीत होतं. निरोप आणण्याराला ते म्हणालं. “मला जमणार नाही. माफ करा. पाऊस आणणं झालं नाही माझ्याकडून तर गजराज काय करतील ह्याची मला भयंकर भीती आहे.’ मग हत्तीनं सगळया पक्षात शहाणा म्हणवून घेणाऱ्या कावळ्याला बोलावलं, ‘पाऊस आणण्यासाठी तू सोडत चिठ्ठी उचल”, असं त्याला फर्मावलं. कावळ्यानं थोडा पाऊस आणला. काही भागातले झरे पाण्यानं वाहू लागले. पण काही काळानं तेही कोरडे पडले. बराच खोल असा एक झरा होता तो आटला नाही. हत्तीनं हा शेवटचा झरा आपल्या स्वतःसाठी राखून ठेवला. कासवाला सांगितलं ‘मी चरायला दूर गेल्यावर तू हे पाणी राखायचं.’ (चरण्यासाठी गवत मिळणं फार कठीण झालं होतं.) ‘जशी आपली आज्ञा महाराज,’ असं म्हणून कासव राखणीवर रुजू झालं. एका जिराफाच्या कळपाला पुष्कळ तपास करूनही कुठं पाणी प्यायला मिळालं नाही तेव्हा तो कळप ह्या झऱ्यावर पाणी प्यायला आला. कासवानं त्याला अडवलं. पाणी प्यायला मना केली. ‘हे तळं गजराजांनी स्वतःसाठी राखून ठेवलं आहे, असं सांगितलं. झेब्रे, सरळ शिंगे, फऱ्यावर व तोंडावर काळे पट्टे असणारी काळविटे, केसाळ लांबडं तोंड, वाकडी शिंगे आणि लांब शेपटीवाली काळविटे, स्प्रिंगबॉक जातीची लहान काळविटे, खेरीज आणखी इतर प्राणी ह्या सगळ्यांना कासवानं पाणी पिऊ दिलं नाही. हे सगळे प्राण्यांचे कळप आपसात कुजबुजत माघारी परतले. पाणी नाही तर आपण जगणार कसे ह्या काळजीनं सगळ्यांना घेरलं. संध्याकाळी झऱ्यावर पाणी प्यायला सिंह आला. कासवानं सांगितलं, ‘इथं इतरांनी पाणी प्यायचं नाही. हा झरा गजराजांचा आहे. सिंहानं न ऐकल्यासारखं केलं. कासवाला बाजूला ढकलून तो शांतपणे भरपूर पाणी प्याला. बापडं कासव काय करणार? सिंहाचं बघून इतर तहानलेल्या प्राण्यांनीही झऱ्याभोवती गर्दी केली आणि पोटभर पाणी पिऊन घेतलं. हत्ती चरून परत आला. बघतोय तर झऱ्याचं सगळं पाणी संपून फक्त राड राहिलेली. रागारागानं हत्तीनं सोंडेची तुतारी वाजवली आणि तो बिचाऱ्या कासवावर धावून गेला. त्यानं कासवाला जाब विचारला. ‘मी दीन दुर्बल माझं कोण ऐकणार? तहानेनं कासावीस झालेल्या प्राण्यांना मी कसा थांबवणार? ‘ असं समजावून सांगण्याचा प्रयत्न कासवाने केला. पण हत्ती इतका संतापलेला होता की त्यानं कासवाला सोंडेनं उचलून ते अख्खं गिळून टाकलं.कासवाला मरायचं नव्हतंच. का म्हणून त्यानं उगाच आपली शिक्षा सोसायची? हत्तीच्या पोटात गेल्या गेल्या त्यानं बाहेर पडण्यासाठी पोटाचा मऊ भाग फाडायला सुरुवात केली. हत्ती वेदनेनं किंचाळायला लागला. आपला अभिमान, आपला उद्धटपणा ह्याची ही फळं आहेत. त्यामुळे वैऱ्याला येऊ नये असलं यातनामय मरण आपल्या वाट्याला आलं हे त्याला कळून चुकलं.
कासव वाट काढून बाहेर आलं आणि इकडं हत्ती मरून पडला. लगोलग कासव तिथनं सटकलं. तेव्हापासून त्याला कुणी प्रश्न विचारला तरी ते कधी तोंड उघडत नाही. कोणाला ते धनी मानत नाही. मनाला येईल तसं वागतं.
सगळ्या प्राण्यांना जन्माचा धडा मिळालेला बघून पावसाच्या देवाला तहानलेल्या धरतीची करूणा आली. पाऊस धुवांधार कोसळला. सगळ्या नद्या, सगळे ओढे पुन्हा धुवांधार वाहू लागले.