शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती)

लेखक : सुभाष स. नाईक

मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक

अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम
अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।।

अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते.

हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल त्याबद्दल बरेच लिहिले-बोललेही जाते. पण ६८ टक्क्यांबाहेरील विद्यार्थ्यांबद्दल किती लोक बोलतात ? तुम्ही विचाराल की, हे ६८ टक्के काय प्रकरण आहे ? हा काही ‘कोटा’ ( quota ) आहे का, ‘एस्.सी. एस्.टी.’ किंवा ‘ओ.बी.सी.’ सारखा ? की, हा एखादा ‘कट्-ऑफ पॉइंट’ ( cut-off point ) आहे , ऍडमिशनसाठी ठेवलेला ? तेव्हा, ६८ टक्क्यांमधे नसलेल्यांबद्दल बोलण्याआधी आपल्याला ही ६८ टक्क्यांची भानगड समजून घेतली पाहिजे.

‘६८’ टक्केवाल्यांचे जग :

सर्वप्रथम आपण ‘नॉर्मल’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण. नॉर्मल अर्थात सर्वसाधारण म्हणजे काय ? एखाद्या विशिष्ठ गटातील जास्तीत जास्त गोष्टींचे जे गुणधर्म असतात, ते त्या गटासाठी ‘सर्वसाधारण’ आहेत, असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, माणूसप्राणी. माणसाला दोन हात, दोन पाय, एक डोके, ताठ उभा राहू शकणारा देह, दहा-दहा बोटे, असे गुणधर्म नॉर्मल म्हणता येतील. पक्ष्यांचे म्हणाल तर, पंख, चोच, अणकुचीदार पंजे, हे त्यांच्यासाठी नॉर्मल गुणधर्म म्हणता येतील.

त्या विशिष्ठ गटातील एखाद्याचे गुणधर्म जर काही नॉर्मलपेक्षा वेगळे असले, (उदा. दहाऐवजी अकरा बोटे असणे), तर तो ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ (different from Normal) आहे, असे म्हणता येईल.

संख्याशास्त्रात (statistics) ‘नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन’ नावाचा एक फिनॉमेनॉन (phenomernon) आहे. हा फिनॉमेनॉन ‘बेल्-कर्व्ह’ नामक आलेखाने (घंटीच्या आकाराचा आलेख) दाखवता येतो. सरासरीचा बिंदू (mean) हा या आलेखाचा मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला जर ‘एक सिग्मा’ (one sigma) इतके ‘स्टँडर्ड-डिव्हिएशन’ (deviation,तफावत) बघितले, तर त्या ‘रेंज’ (range) च्या अंतर्गत त्या गटातल्या ६८% वस्तू सामावतात ; ‘दोन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९३% , व ‘तीन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९९.७% इतक्या वस्तू सामावतात. सरासरीपासून एक सिग्मापर्यंतच्या सर्व वस्तूंचे गुणधर्म सरासरीपासून फारसे वेगळे नसतात, म्हणजेच जवळजवळ सरासरीसारखेच असतात.

एक सिग्मा ते दोन सिग्मा अंतर पाहिले, तर त्या गटातील गुणधर्म हे सरासरीपासून बर्‍यापैकी वेगळे असतात, ओळखू येण्याइतके वेगळे असतात. दोन ते तीन सिग्मा या अंतरातील गटाचे गुणधर्म सरासरीपेक्षा बरेच दूर असतात, बरेच वेगळे असतात. मघाचे, भारतीय पुरुषांचे उदाहरण उंची हा घटक घेऊन पाहू या, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ असे समजू की भारतीय पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे. त्याप्रमाणे, साधारणपणे ५ फूट ४ इंच ते ५ फूट ८ इंच उंच भारतीय पुरुष उंचीच्या संदर्भात ‘नॉर्मल’ समजले जातील. समजा, एखादा पुरुष ५’-२” उंच आहे. तो पुरुष ‘थोडा-बुटका’ समजला जाईल. ५’-१०” उंच असलेला दुसरा एक पुरुष ‘थोडा-उंच’ म्हटला जाईल. पण, एखादा ४’-६” असलेला माणूस ‘खूपच-बुटका’ (अर्थात, नॉर्मलेक्षा खूपच वेगळा) व दुसरा एक ६’-६” उंच असलेला माणूस ‘खूपच-उंच’ या सदरात गणला जाईल (अर्थातच, हाही माणूस उंचीच्या बाबतीत नॉर्मलपेक्षा खूपच भिन्न समजला जाईल). पण असे असले तरी, त्यांचेही इतर गुणधर्म (जसे, दोन हात, दोन पाय इ.), दाखवतात की तीसुद्धा माणसेच आहेत, कारण की त्या दुसर्‍या गुणधर्मांच्या बाबतीत ती माणसेही इतरांसारखीच असतात. भारतीय बायकांच्या बाबतीत उंचीचे नॉर्मस् पुरुषांपेक्षा वेगळे असतील. तसेच पाश्चिमात्यांचे उंचीचे नॉर्मस् किंवा चिनी लोकांचे उंचीचे नॉर्मस् हे भारतीयांच्यापेक्षा वेगळे असतील.

महत्वाची गोष्ट ही आहे की , जगातील गोष्टी , या ‘६८%’ म्हणजेच नॉर्मल लोकांसाठीच असतात. उदाहरणार्थ, हॉकी स्टिक. साधारणपणे माणसे उजव्या हाताने काम करणारी (right-handed) असतात. त्यामुळे हॉकी-स्टिक त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. म्हणून, डावखोर्‍यांना (left-handed) त्या वापरतांना त्रास हा होतोच ! जगातील पद्धती (systems), सुविधा (facilities), या ‘६८‘ टक्केवाल्यांसाठीच बनवलेल्या असतात ; आणि उरलेल्या ३२ टक्क्यांना त्याबरोबर जावे लागते. या ३२ टक्क्यांमधेसुद्धा, जो सरासरीच्या जास्त जवळ, त्याला तडजोड/समायोजन (ऍडजस्टमेंट) जास्त सोपे जाते. जो जास्त दूर, (जसे की, ‘दोन सिग्मा’ पेक्षा जास्त स्टँडर्ड-डिव्हिएशन असलेली व्यक्ती), त्याला ही ऍडजस्टमेंट बरीच कठीण जाते. तरीही त्याला त्या पद्धतीबरोबर (सिस्टमबरोबर) फरपटत जावे लागते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर, इमारतीचे दार जमिनीपेक्षा उंच असल्यास पुढे पायर्‍या असतात. पण मग, लंगडे असणार्‍या व्यक्तींचे काय ? अशा लोकांसाठी किती ठिकाणी उतार (ramp) बांधलेला असतो ?

तुम्ही म्हणाल की, या ‘नॉर्मल’ चा शिक्षणाशी काय संबंध ? याचे उत्तर असे आहे की, शिक्षणाचा आराखडाही ‘नॉर्मल’ लोकांसाठीच बनवलेला असतो. सध्याच्या शिक्षणपद्धतीचा व बुद्धिमत्तेचा संबंध आहे. म्हणून, आपण बुद्धिमत्ता या गुणधर्माच्या संदर्भात ‘नॉर्मल-डिस्ट्रीब्यूशन’ कडे पाहू या. बुद्धिमत्तेचे मापन ‘आय्.क्यू.’ (इंटलिजन्स कोशंट) याने करतात. माणसासाठी, ‘१००’ हा आकडा आय्. क्यू. ची सरासरी (mean) मानतात. ६८% माणसांचा आय्. क्यू. ८५ ते ११५ असेल. या ‘रेंज’पेक्षा अधिक आय्. क्यू. असलेले ‘सबनॉर्मल’ व कमी आय्. क्यू. असलेले ‘ऍबनॉर्मल’ म्हणवले जातील. हे सबनॉर्मल लोक अति-हुशार म्हणून गणले जातात. यांनासुद्धा ऍडजस्टमेंट करायला त्रास होऊ शकतो, व होतोही. जे ऍबनॉर्मल आहेत, त्या आय्. क्यू. कमी असलेल्यांना ‘मेंटली चॅलेंज्ड’ असे म्हणतात. हल्ली त्यांना ‘डिफरंटली एबल्ड’ असे म्हणू लागले आहेत, आणि ते योग्यच आहे. कसे, ते पुढे येईलच.

आपण बुद्धीच्या विषयाकडे नंतर पुन्हा वळू.

जे लोक, ‘नॉर्मल असलेल्या ६८ टक्क्यांपेक्षा भिन्न आहेत , त्यांचे काय ?

पूर्वीच्या काळी, असे वेगळे असलेल्यांना खूपच त्रास वा अपमान सोसावा लागत असे, कधीकधी त्यांना जगणेही अशक्य होत असे. पुरातनकालीन ग्रीसमधील स्पार्टा या गणराज्यात, जे नवजात शिशु नॉर्मल नसत, हँडिकॅप्ड (handicapped) असत, त्यांना एक रात्र बाहेर, लांब एकटे ठेवून दिले जात असे ;

मेले तर मेले !! महाभारतातील धृतराष्ट्राला, तो आंधळा असल्यामुळे, मोठा भाऊ असूनही, राज्य मिळाले नाही. हा अन्यायच नाही काय ? खरे तर, सगळे महाभारतच ‘राज्य वस्तुत: कोणाचे?’ या प्रश्नामुळेच घडले. धृतराष्ट्र राजा होता, तर ते न्याय्य झाले असते, व घटनांना वेगळीच कलाटणी मिळाली असती.

आजचे युग सुधारलेले म्हणवते खरे, पण नॉर्मलपेक्षा वेगळे असलेल्यांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे ? आपण ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ असलेल्यांसाठी काही करतो आहोत काय, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था निर्माण करतो आहोत काय ? त्यांच्या शिक्षणासाठी आपण काय सोयी निर्माण करत आहोत ?

परंतु पुढे जाण्यापूर्वी, वर्गीकरणाशी संबंधित एका महत्वाच्या प्रश्नाकडे नजर टाकणे आवश्यक आहे.

तो प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

नॉर्मल (normal) नॉर्मलपेक्षा-भिन्न (different from normal) असे वर्गीकरण करण्यासाठी ,

केवळ आय्. क्यू.’ हेच योग्य मापन आहे काय ? :

हा मुद्दा फार महत्वाचा आहे, व तो समजून घेणे जरूरीचे आहे. आय्. क्यू. हे मापन सन १९०० पासून वापरात येऊ लागले. म्हणजे ते १०० हून अधिक वर्षे जुने आहे. ते उपयुक्त आहे हे खरे ; पण ते परिपूर्ण आहे काय ? आय्. क्यू. मापनामधे कोणते गुणधर्म जास्त वापरले जातात ? ते आहेत : ‘तर्कानुसारी विचार करण्याची क्षमता’ (Logical-thinking ability), गणित, आणि भाषिक क्षमता (Linguistic- ability). माणसाकडे यांच्याव्यतिरिक्त इतर क्षमता नसतात काय ? अन्, असल्यास, त्या क्षमता उपयोगी नसतात का ? त्या मापनासाठी वापरल्या जात का नाहीत ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उठू शकतात.

तीसएक वर्षांपूर्वी अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी ‘बहुआयामी बुद्धिमत्ते’ बद्दलची (Multiple Intelligence) धिअरी मांडली. त्यांचे ‘फ्रेमस् ऑफ माइंड’ (Frames of Mind) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. (बुद्धिमत्तेच्या बहुआयामीपणाबद्दल अन्यही थिअरीज् आहेत. पण तूर्तास आपण गार्डनर यांची थिअरी समजून घेऊ. शिक्षणाविषयीचा मुद्दा आपला स्पष्ट होण्यासाठी सध्यातरी तेवढे पुरेसे आहे).

मात्र, गार्डनर यांची थिअरी समजून घेण्यापूर्वी आपण मेंदूबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.

माणसाच्या मेंदूचे दोन भाग (Lobes) असतात, जे एकमेकांना जोडलेले असतात. तुमच्याआमच्या सर्वसाधारण व सोप्या भाषेत त्यांना ‘उजवा मेंदू’ व ‘डावा मेंदू’ असे संबोधतात. या दोन्ही भागांचे कार्य वेगवेगळे असते. एक भाग तार्किक कार्यांवर (Logical functions) भर देतो. गणित, शब्द, भाषा, तर्क वापरून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे, या गोष्टींसाठी हा भाग वापरला जातो. दुसरा भाग सृजनशील कार्यांसाठी (Creative Functions) वापरला जातो. चित्रें, संगीत, इतर कला, अशा सृजनशील गोष्टींसाठी हा दुसरा भाग वापरला जातो. एक साधे उदाहरण द्यायचे तर, एखाद्या माणसाचे नाव आपल्या मेंदूच्या एका भागात साठवलेले असते, तर त्याच्या चेहर्‍याचे चित्र आपल्या मेंदूच्या दुसर्‍या भागात साठवलेले असते. त्यामुळेच, कधीकधी आपल्या एखाद्या माणसाचा चेहरा आठवतो पण नाव काही आठवत नाही ; किंवा नाव आठवते पण चेहरा आठवत नाही. या माहितीवरून , आपल्याला हे स्पष्ट होते की,

आय्. क्यू. टेस्टिंगमधे मेंदूच्या सर्व क्षमता कसाला लागत नाहीत, मेंदूचे दोन्ही भाग (Lobes) समान प्रकारे वापरले जात नाहीत.

डॉ. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटलिजन्स’ ची थिअरी सांगते की बुद्धिमत्तेला वेगवेगळे आयाम असतात. ते आठ आयाम मानतात. ते आठ आहेत :

  • त्रिमिती जगाशी संबंधित (Spacial, i.e. related to space)
  • भाषिक (Linguistic)
  • तर्किक-गणिती (Logical-mathematical)
  • शारीरिक-हालचालींशी संबंधित (Bodily-kinesthetic)
  • सांगीतिक (Musical)
  • व्यक्तींच्या परस्पर-संबंधाबद्दलचे (Interpersonal)

[यालाच हल्ली वेगळ्या परिभाषेत ‘इमोशनल इंटलिजन्स’ असे म्हणतात.]

  • व्यक्तीच्या ‘स्व’ च्या संबंधातील, अंतर्गत (Intrapersonal)
  • नैसर्गिक (Naturalistic)

आता, या वर्गीकरणावरून, आपल्या लक्षात येते की जगप्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम् , महान गायक भीमसेन जोशी व क्रिकेटियर सचिन तेंडुलकर हे कसे वेगळे आहेत, त्यांच्या मेंदूच्या क्षमता कशा वेगळ्या आहेत. अर्थातच रामानुजम् हे भीमसेन होऊ शकले नसते, आणि भीमसेन हे रामानुजम् होऊ शकले नसते.

एका अशाच ‘डिफरंटली एबल्ड’ इंग्लिश मुलाची सत्यकथा मी (बहुधा ‘रीडर्स डायजेस्ट’ मधे) वाचलेली आहे.

या मुलाला एकट्याने रस्तासुद्धा ओलांडता येणे कठीण वाटत असे. पण त्याची भाषिक बुद्धिमत्ता जबरदस्त होती. एकदा तो लंडनला विमानात चढला, हॉलंडमधील ऍमस्टरडॅम येथे जाण्यासाठी. हा फक्त दोनएक तासांचा प्रवास आहे. प्रवास सुरू होतांना त्याने डच भाषा शिकण्याचे पुस्तक वाचायला घेतले ; अन् उतरेपर्यंत तो ती भाषा, मातृभाषा असल्याप्रमाणे बोलू लागला होता !

असाच एकदा मला डॉ. वत्स या गृहस्थांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. हे गृहस्थ एम्. डी. मेडिकल डॉक्टर होते. त्यांनी सांगितले की शाळेत असतांना त्यांना गणित हा विषय अजिबात कळत नसे, ते त्यात नापासही होत असत. पण पुढील शिक्षण व व्यवसाय त्यांनी असे निवडले जिथे गणिताचा विशेष संबंधच येत नाही, म्हणूनच ते यशस्वी झाले. जर त्यांचा व्यवसाय गणिताशी संबंधित असता, तर ते नक्कीच अयशस्वी (failure) म्हणूनच गणले गेले असते.

या सर्वाचा अर्थ असा की, ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीप्रमाणे आपण वागू नये ; आपण सर्वांना एकाच तराजूत तोलू शकत नाही.

शिक्षण, ‘अति-हुशार’ मुले वडिफरंटली एबल्डमुले :

शालेय शिक्षणात सर्वच मुलांवर परफॉर्मन्ससाठी घरून व शाळेतूनही खूपच दबाव येतो. अन्, नेहमीच्या शालेय विषयांमधे जे कच्चे असतात, ते ‘ढ’ म्हणवतात. अशी मुले साधारण (नॉर्मल) असतील किंवा नसतीलही, पण त्यांच्यात काही इतर क्षमता (abilities) आहेत काय, याचा विचार करायला शिक्षकांनाही वेळ नसतो अन् पालकांनाही.

पारंपारिक शिक्षणपद्धतीत गणित व भाषा यांना अतोनात महत्व आहे. शाळा जोर देतात तो असतो तार्किक-बुद्धिमत्ता व भाषिक-बुद्धिमत्तेवरच (logical-intelligence and linguistic-intelligence). खास करून लेखन-वाचनावर शाळांचा जोर असतो. गार्डनर यांचे म्हणणे असे आहे की, ‘शालेय शिक्षणाचा हेतू , विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास करणे, आणि त्याच्या बुद्दिमत्तांना योग्य (suitable) अशा, व्यावसायिक व अव्यावसायिक ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करणे, असा असला पाहिजे.’

शालेय शिक्षणात ,‘ नॉर्मलपेक्षा वेगळे’ असलेल्या मुलांना तर नक्कीच त्रास होतो. ‘अति-हुशार’ मुलांनाही इथे ऍडजस्ट व्हायला त्रास होतो. अशी काही अति-हुशार मुले कधीकधी बिघडलेलीही आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.

मला एक उदाहरण आठवते. एक मुलगा शाळेमधे, अभ्यासात अतिहुशार म्हणून गणला जात असे. सर्वच विषय त्याला चांगले येत असत. ‘सर’ (शिक्षक) जे काही शिकवत होते ते त्याला आधीच येत असल्यामुळे तो वर्गात हळूच कॉमिक्स वाचत असे. ते एकदा सरांनी पाहिले. त्यांना आधीच त्या मुलाच्या परफॉर्मन्सबद्दल माहीत होते. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या मुलाला कारण विचारले. मुलाने शरमून सांगितले की, सर हे तर मला आधीच येत आहे. सरांनी त्याला शिक्षा केली नाही, वर्गाबाहेर पाठवले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परवानगी देत सांगितले, ‘ठीक है, पढ़ो कॉमिक्स. पर किसीको डिस्टर्ब मत करना’. त्यानंतर त्या मुलाने वर्गात कॉमिक्स वाचली नाहीत ! ते सर खरोखरच ‘ग्रेट’ म्हणायला हवे. सरांनी शिक्षा केली असती, तर काय झाले असते ? हा जो अनुकूल परिणाम झाला, तो तर नक्कीच झाला नसता ; कदाचित तो मुलगा तेव्हा, नाहीतर नंतर, बिघडूही शकला असता.

‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वी फारशा शाळाही नव्हत्या. ज्या थोड्याशा होत्या, त्या होत्या अगदी टोकाच्या मुलांसाठी (उदा. डाऊन सिंड्रोम असलेली, ‘मतिमंद’ म्हटली जाणारी मुले). बॉर्डरलाइन मुलांसाठी काहींच वेगळ्या सोयी नव्हत्या. या मुलांच्या शिक्षणाचे काय ? ती मुले नॉर्मल मुलांच्या शाळेतही ‘फिट्’ होत नव्हती, अन् डाऊन सिंड्रोम असलेल्या वा तत्सम मुलांच्या शाळेतही फिट् होत नव्हती.

आपण एका मुलाचे उदाहरण ‘तारे जमीनपर’ या सिनेमात पाहिले आहे. एरवी अभ्यासात लक्ष नसणारा, ‘ढ’ समजला जाणारा हा मुलगा चित्रकलेत निष्णात असतो. जर त्याला समजून घेणारा योग्य शिक्षक मिळाला नसता, तर त्या बिचार्‍याचे आणखी काय हाल झाले असते ?

आज ‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी पहिल्यापेक्षा काहीशा जास्त शाळा आहेत, हे खरे. या शाळांमधे, (शालेय शिक्षणाव्यतिरिक्त), वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे वगैरे व्होकेशनल शिक्षण देतात. अशा शाळांशी संबंधित लोक खरोखरच सेल्फलेस (selfless) सेवाभावी वृत्तीने काम करतात. या शाळांमधील, ‘स्पेशल एज्युकेशन’ या विषयाचे स्वत: शिक्षण घेतलेले शिक्षक-शिक्षिका, अन्य ट्रेनर, संचालक हे सर्व मोठेच सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना माझा सलाम, माझे वंदन ! पुढील श्लोक अशा गुरुजनांसाठीच लिहिलेला असणार.

गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु: गुरुर् देवो महेश्वर:

गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।

गरूच ब्रह्मदेव आहे, गरूच विष्णु आहे, गुरूच महेश्वर शंकर आहे. गुरू साक्षात् परब्रह्म आहे. त्या गुरूला मी नमन करतो.

या संस्थांमधील कार्यावर कसलीही टीका करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवूनही मी असे म्हणू इच्छितो की, या शाळांमधे वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे याव्यतिरिक्तही काही अन्य शिक्षण देता येणार नाही का ? उदाहरणार्थ चित्रकला, गायन, वादन, नृत्य ; तसेच, जिथे शक्य असेल तिथे बागकाम-हॉर्टीकल्चर, वगैरे. मल्टिपल इंटेलिजन्सच्या थिअरीप्रमाणे, जर काही मुलांमधे अशा इतर विषयांमधील गुणवत्ता असली, तर ती मुले त्या त्या शिक्षणाचा नक्कीच फायदा उठवू शकतील.

समारोप :

पहिली गोष्ट म्हणजे, शिक्षणपद्धतीत बदल व्हायला हवा, आणि फक्त ‘तार्किक-बुद्धिमता’ व ‘भाषिक-बुद्धिमत्ता’ यांच्यावर जो अतिरिक्त (excessive) जोर दिला जातो, तो कमी केला गेला पाहिजे ; विद्यार्थ्याचा सर्वांगीण, चौफेर विकास कसा होईल हे पहायला हवे. आज अनेकदा असे दिसते की, अगदी डिग्री घेऊनही तरुणांना जगात कसे वावरायचे ते उमगत नाही. त्यासाठी , आज अनेक ‘व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम’ खाजगी ट्रेनर्सनी सुरू केले आहेत. त्याचे एकमेव कारण आहे, शिक्षणपद्धतीत या आवश्यक गोष्टीचा समावेशच नाही. विद्यार्थ्यांच्या अशा डेव्हलपमेंटसाठीच्या कार्यक्रमांचा रेग्युलर-शिक्षणपद्धतीत समावेश असलाच पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होणे सोपे जाईल.

दुसरी गोष्ट म्हणजे, विद्यार्थी साधारण (नॉर्मल) असो , किंवा ‘नॉर्मलपेक्षा वेगळा’ असो, त्याच्याकडे काही वेगळ्या क्षमता (abilities) असू शकतात, हे शैक्षणिक संस्थांमधील गुरूंनी (शिक्षकांनी) समजून घेतले पाहिजे, व त्या शोधून काढून, त्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे, प्रत्येकाला स्वत:च्या क्षमतांचा (एबिलिटीज् चा) शोध लागेल, व त्याला पुढील जीवनात त्याचा नक्कीच उपयोग होईल.

तिसरी गोष्ट म्हणजे, ‘डिफरंटली एबल्ड’ व्यक्तींसाठी ज्या संस्था असतात तिथे, त्या व्यक्तीची दुसर्‍या एखाद्या, म्हणजे संगीत, चित्रकला, नृत्यकला वगैरे अशा, विषयात अधिक क्षमता आहे काय, याचा शोध घ्यायला हवा ; तसेच तेथील सर्वांनाच वह्या-मेणबत्त्या याव्यतिरिक्त संगीत-चित्रकला-नृत्य अशा गोष्टींचेही ट्रेनिंग द्यायला हवे. अशा ठिकाणी कंप्यूटर-ट्रेनिंगही (विशेषकरून डेटा-एंट्री व ऍनिमेशन) उपयोगी ठरू शकेल.

थोडक्यात काय, तर, शैक्षणिक पद्धतीत बदल होणे हे, विद्यार्थ्यांची यशस्विता वाढविण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. शुभस्य शीघ्रम् .

जे लोक, ‘नॉर्मल असलेल्या ६८ टक्क्यांपेक्षा भिन्न आहेत , त्यांचे काय ?

पूर्वीच्या काळी, असे वेगळे असलेल्यांना खूपच त्रास वा अपमान सोसावा लागत असे, कधीकधी त्यांना जगणेही अशक्य होत असे. पुरातनकालीन ग्रीसमधील स्पार्टा या गणराज्यात, जे नवजात शिशु नॉर्मल नसत, हँडिकॅप्ड (handicapped) असत, त्यांना एक रात्र बाहेर, लांब एकटे ठेवून दिले जात असे ;

मेले तर मेले !! महाभारतातील धृतराष्ट्राला, तो आंधळा असल्यामुळे, मोठा भाऊ असूनही, राज्य मिळाले नाही. हा अन्यायच नाही काय ? खरे तर, सगळे महाभारतच ‘राज्य वस्तुत: कोणाचे?’ या प्रश्नामुळेच घडले. धृतराष्ट्र राजा होता, तर ते न्याय्य झाले असते, व घटनांना वेगळीच कलाटणी मिळाली असती.

आजचे युग सुधारलेले म्हणवते खरे, पण नॉर्मलपेक्षा वेगळे असलेल्यांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे ? आपण ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ असलेल्यांसाठी काही करतो आहोत काय, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था निर्माण करतो आहोत काय ? त्यांच्या शिक्षणासाठी आपण काय सोयी निर्माण करत आहोत ?

परंतु पुढे जाण्यापूर्वी, वर्गीकरणाशी संबंधित एका महत्वाच्या प्रश्नाकडे नजर टाकणे आवश्यक आहे.

तो प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

नॉर्मल (normal) नॉर्मलपेक्षाभिन्न (different from normal) असे वर्गीकरण करण्यासाठी ,

Author