धनतेरस

तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात.



आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो.

तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी
प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या
सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.)

प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे
हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.
त्याला शिकारीचा फार छंद होता. तो नेहमी अरण्यातून शिकार करीत भटकत
असे.

वसंत ऋतूचे दिवस होते. राजा शिकारीसाठी बाहेर पडला. बराच दूर
गेल्यानंतर त्याला एक काळवीट दिसला. राजाने काळवीटाचा पाठलाग सुरू
केला. काळवीट दाट जंगलात शिरला. राजाची शिकार हुकली.

दोन प्रहर झाली होती. राजा तहानेनं व भुकेनं हैराण झाला. बरोबरच्या
लोकांची चुकामूक झाली. तेथून पाच सहा मैलावर हंस राजाचा परम मित्र हैम
राजाची राजधानी होती. राजा मित्राच्या राजमंदिरी आला. हैम राजाने हंसाचे
यथोचित आदरातिथ्य केले.

त्याच दिवशी हैम राजास पुत्ररत्न झाले होते. सर्वत्र आनंदी आनंद झाला
होता. सनई चौघडे झडत होते. गुढ्या तोरणे उभारून प्रजाजन आनंदोत्सव
साजरा करीत होते. नागरिक सुवासिनी वाजतगाजत यमुनेच्या पाण्याचे कलश
आणून राजमंदिराच्या पायऱ्यावर ओतत होत्या.

प्रीती भोजन झाल्यानंतर उभय मित्र राजमहालात गप्पा गोष्टी करत आराम
करत होते. नूतन राजपुत्राचे जातक वर्तविण्यासाठी राज ज्योतिषी व अनेक
ऋषीमुनी आले होते. हैमराजाने सर्वांचे स्वागत केले. ते सर्वजण आसनावर
बसले.

‘नूतन राजबालक शुभ तिथी, शुभ वार, शुभनक्षत्र व शुभ योगावर जन्मले
आहे. महत्त्वाचे ग्रह उच्चीचे आहेत. राजपुत्र महारथी योद्धा व चक्रवर्ती सम्राट
होईल; तो दीर्घायु होईल. राजपुत्र सर्व सुलक्षणांनी युक्त आहे. सर्वांनी एक
मुखाने भाकीत वर्तविले. राजाला आनंद झाला. त्याने सर्वांना उपहार, वस्त्र
प्रावरणे व भरपूर सुवर्णदान केले. राज पुरोहित, राजज्योतिषी व सर्व ऋषिमुनी
संतुष्ट होऊन राजाला व नूतन राजपुत्राला आशीर्वचन करून आनंदाने निघून
गेले.

बलाहक नावाचा एक तरूण ऋषी मागे राहिला. त्याने राजाचे कसलेही दान
स्वीकारले नव्हते. त्याने सांगितले, “राजपुत्राला दंश होईल त्यावेळी फार
सावधपणे वागून नागदंशापासून त्याचा बचाव केला तर हा अपमृत्यू टळेल व तो
शतायुषी होईल. भाग्यवान होईल. चक्रवर्ती सम्राट होईल. मी कटुसत्य कथन
केले आहे. अपमृत्यूचा दिवस, नेमकी वेळ व मृत्यूचे कारण कथन केले आहे.
सावधान राहून राजपुत्राचा अपमृत्यू टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याचे
काम तुमचे आहे.” एवढं बोलून व काहीही न स्वीकारता बलाहक मुनी ताडताड
निघून गेला.

राजपुत्राच्या जन्मोत्सवाच्या आनंदी वातावरणात मिठाचा खडा पडला, सर्व
राजपरिवार व प्रजाजन दु:ख सागरात बुडून गेले.

हंस राजा खंबीर होता. तो घाबरला नाही. त्याने हैम राजाची, राणीची व
सर्वांची समजूत घातली. “घाबरू नका. अद्यापि वीस वर्षांचा अवधी आहे. वाटेल
ते प्रयत्न करू व राजपुत्राचा अपमृत्यू टाळू. हे भाकीत ऐकून राजपुत्राला कोणी
आपली मुलगी देणार नाही. मला राजकन्या झाली तर मी तिचा विवाह
राजपुत्राशी करून देईन. ती भाग्यवान असेल, पुण्यवान असेल, तर तिचे वैधव्य
टळेल. प्रयत्नांती परमेश्वर भेटतो हे ध्यानी घ्या.”

दोन दिवस राहून हंस राजा, परत गेला. राजपुत्राचा नामकरण समारंभ
झाला. त्याचे नांव हेमचंद्र ठेवण्यात आले. राजकुमार शुक्लेंदुप्रमाणे
दिसामासांनी वाढू लागला. तीन वर्षांनी हंस राजास कन्या झाली. हंसाला
आनंद झाला. राजकन्येचे नाम हेमांगिनी ठेवण्यात आले.

कालचक्र झपाट्याने फिरत होते. हेमचंद्रास विसावे वर्ष लागले, हेमांगिनी
सतरा वर्षांची उपवर कन्या झाली. हेमचंद्र हेमांगिनीचा विवाह ठरलेलाच होता.
हंस राजाने मोठ्या थाटामाटाने विवाह समारंभ साजरा केला. हंसाने
हेमचंद्राच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्याने युमनेच्या डोहाच्या
मध्यभागी एक खांबी राजमहाल बांधला. तो गोलाकार होता. मध्यभागी एक
दालन असून सभोवती चार सारखी दालने होती.

कोजागिरी पौर्णिमा होताच हेमचंद्र व हेमांगिनी त्या महालात राहावयास गेले.
तो महाल सुसज्जित करण्यात आला होता.

हेमांगिनी मोठी धैर्यशाली राजकन्या होती. तिने जरूर ते साहित्य मागवून
घेतले. सर्व तयारी केली. आश्विन वद्य त्रयोदशी उजाडली. तो काळ दिवस होता.
ती काळरात्र ठरणार की, शुभ रात्र ठरणार हे विधात्याचे हाती होते. मधल्या
दालनात चंदनाच्या पलंगावर हेमचंद्र व हेमांगिनी बसले. सूर्यास्त होण्यापूर्वी
सर्व महाल दिव्यांनी प्रज्वलित केला. सर्वत्र लखलखाट झाला. प्रत्येक दालनात
सुवर्णमुद्रा, हिरे, माणिक, मोती यांच्या राशी घालून ठेवल्या. सुवर्ण पात्रे भरून
केशरी मधुर दूध ठेवले. कोणालाही दिसणार नाही अशा अदृश्य जागेमधून
मुरली पुंगी वगैरे वाद्यांचे नादमधूर सूर निनादू लागले. हेमांगिनी हेमचंद्राला धीर
देत यमदूताची वाट पाहात बसली.

यम दरबारात एकच धांदल उडाली. कराल, विकराल, कालमुख व कालद्रष्टा
या चार भयंकर यमदूतांवर हेमचंद्रास आणणेचे काम सोपविण्यात आले.

यम राजानी प्रथम कराल यास पाठविले. तो वेळेत परत आला नाही म्हणून
विकरालाची रवानगी झाली. तोही आला नाही तेव्हा कालमुखास पाठविले.
त्याचाही पत्ता नाही म्हणून कालद्रष्टा रवाना झाला. तोही बेपत्ता झाला. यमराज
चिडले. संतापले व स्वत: रेड्यावर आरूड होऊन घटनास्थळी आले, त्यांनी
आपले वहान रेडा याला यमुनातीरी चरावयास सोडले. काल, भुजंग कालीचे
रूप घेऊन महालात प्रवेश केला.

असंख्य दिव्यांच्या लखलखाटाने त्यांचे डोळे दिपले. मंजूळ सूर निनादानी
ते डोलू लागले. धनराशींचा मोह होऊन त्यावर बसून डोलू लागले. मसालेदार
दुधाच्या सुगंधाने मोहून जाऊन दूध प्राशन केले. एवढे झाल्यावर त्यांना
आपल्या कामाचे स्मरण झाले. ते धनराशीवरून उठू लागले तो चित्रगुप्त जन्म
मरणाची चोपडी घेऊन हजर झाला.
“महाराज, राजपुत्राच्या अपमृत्यूची वेळ टळली आहे. आता आपण यमपाश
टाकू शकणार नाही व टाकले तरी ते राजपुत्रास बांधू शकणार नाहीत.
राजकन्येचे चातुर्य प्रशंसनीय आहे. नाग कशाने लुब्ध होईल हे जाणून तिने सर्व
व्यवस्था केली व नागरूपी यमदूतांची मात्रा चालू दिली नाही.”

यमदूतांनी व यमराजांनी आपले सत्य स्वरूप प्रकट केले. हेमचंद्र व
हेमांगिनीने त्यांना साष्टांग नमस्कार घातला, “मुली, तुझ्या प्रसंगावधानाने व
चातुर्याने यमदूतानाच नव्हे तर मलाही भारावून सोडलेस. धन्य आहे तुझी! मी
प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग” यमराजांनी सांगितले.

महाराज, या अभागिनीसाठी स्वतः धावून आलात. मला चुडेदान दिलेत
यात मला संतोष आहे. मला काही नको. पण महाराज, या तुमच्या मुलीची एकच
नम्र विनंती आहे. आश्विन वद्य त्रयोदशी दिवशी प्रदोश काळी दीपोत्सव करून,
धनदौलतीची व गुराढोरांची यथासांग पूजा करतील त्यांच्या घरी निदान
त्यादिवशी तरी अपमृत्यू घडू नयेत. सर्व चराचर सृष्टी आनंदमय व्हावी. एवढाच
आशीर्वाद द्यावा. यापेक्षा मला अन्य काही मागावयाचे नाही. सर्व जग सुखी तर
आम्ही सुखी आणि हा दिवस ” धनतेरस’ या नावाने वाखाणला जावा. सर्वांनी हा
सण आनंदाने साजरा करावा एवढीच विनंती आहे.

“तथास्तु ” तुझ्या विनंतीप्रमाणे सर्व घडेल’ असे बोलून यमराज चित्रगुप्त व
चारी यमदूत अंतर्धान पावले. युवराज्ञी हेमांगिनीने युवराजाचा अपमृत्यू
टाळल्याची वार्ता वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरली. सर्वत्र उत्साहाला उधाण आले.

युवराज व युवराज्ञीची हत्तीवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
आनंदोत्सवाला भरती आली. हंस राजाच्या व हैम राजाच्या राज्यभर एक
सप्ताह उत्सव साजरा करण्यात आला. हंसराजाने अपार अन्नदान, वस्त्रदान
केले व धनदान केले. हंस राजाला मुलगा नव्हता. त्याने आपले राज्य हेमचंद्रास
दिले.

Author