(जैन लोककथा) एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता. त्या दिवशी तिने विचार केला की आज मी असा स्वयंपाक करते की सगळेजण बोटे चाटून जेवतील. तिने बरेच पदार्थ तयार केले. पण जेव्हा भोपळ्याची भाजी चाखून पाहिली तेव्हा तिला ती कडू वाटली. तिने ती भाजी एकीकडे ठेवून दुसरी भाजी बनविली.
इतक्यात एक श्वेतांबर जैन मुनी भिक्षा घेण्यास आले. तिने विचार केला की, मुनींना तर स्वादाशी काही घेणं देणं नसतं. तर का नाही, यांनाच भाजी देवून टाकावी, आणि तिने तसेच केले.
जेव्हा मुनी भिक्षा घेवून आपल्या निवासस्थानी आले आणि इतर मुनींच्या बरोबर जेवावयास बसले. तेव्हा त्यांना दिसले की भाजीत तर एक पाल मरून पडली आहे. हे पाहून आचार्यांनी लागलीच आदेश दिला की ही भाजी दूर जंगलात फेकून द्या. कारण ही विषारी झाली आहे.
मुनी भाजीचे भांडे घेवून जंगलात गेले आणि एका निर्जनस्थानावर ते रिकामे करू लागले. त्यांनी थोडी भाजी ओतलीच होती की काही मुंग्या तेथे आल्या आणि ती भाजी खाऊ लागल्या. पण चाटताच त्या मुंग्या तेथेच मरून पडू लागल्या. हे पाहून मुनी विचार करू लागले की मी जिथे पण ही भाजी टाकीन तिथे कोणी न कोणी प्राणी खाईल आणि मरेल. माझा मुनिधर्म हेच सांगतो की मी कोणत्याही जीवाचे प्राण घेवू नये. यावर एकच उपाय आहे की मी स्वतः ही भाजी खावी आणि प्राण्यांवर करूणाभाव असणाऱ्या मुनींनी असंच केलं.