(जपानी लोककथा)
तशी ही जुनीच गोष्ट आहे. जपानमधल्या बांबुबनातली आहे. एक गरीब म्हातारा नित्यनेमाने बांबूबनात यायचा. तिथून बांबूची रोपे जमा करायचा. रोपे विकून आपली उपजीविका करायचा. एके दिवशी धारदार कोयता घेऊन म्हातारा बांबूबनात गेला होता. त्याने कोयत्याने एक बांबूची फांदी कापली. त्याबरोबर बांबूच्या पोकळीतून चंद्रकिरणासारखी प्रकाशाची रेषा बाहेर आली. ही प्रकाशरेषा चंद्रासारखीच शीतल आणि धवलशुभ्र होती. हे अघटित दृष्य पाहून म्हातारा चक्रावून गेला. तरीही त्याने शांत मनाने ती बांबूची फांदी बुडापासून कापून बाजूला काढली. त्याने मोठ्या कुतुहलाने त्या बांबूच्या पोकळीत डोकावून पाहिले. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. बांबूच्या पोकळीत अलगद एक नवजात बालिका झोपलेली होती. हिरव्या देठासारखी कोवळी आणि अलवार. त्या सुकुमारिकेकडे तो पहातच राहिला. बालिकेच्या चेहऱ्यावर चंद्रासारखे शीतल तेज पसरले होते. रंगाने ती तशीच उजळ होती. या बांबूच्या उपवनात आपल्याला ही फारच मौल्यवान भेट मिळाली आहे, हे पाहून तो सुखावला. आजूबाजूला आपल्याला कुणी पहात नाही ना, हे पाहून घेतले आणि अलगदपणे त्याने ते बाळ उचलून घेतले. त्यानंतर डोक्यावरचे उपरणे टोपलीत अंथरले आणि त्यावर त्या सुकुमार बालिकेला झोपवले. तिला जराही धक्का लागणार नाही, याची काळजी घेत तो टोपलीतून बालिकेला घरी घेऊन आला.
या म्हाताऱ्या जोडप्याला मुलबाळ नव्हते. त्यामुळे परमेश्वराचा प्रसाद समजून त्यांनी त्या बाळाचा सांभाळ करायचे ठरवले. दिवसेंदिवस चंद्रकलेसारखे बाळाच्या चेहऱ्यावरचे तेज अधिकाधिक उजळ होत गेले. त्यामुळे त्यांनी तिचे नाव ‘चंद्रिका’ ठेवले.
बाळाला जोजवण्यात दिवस मजेत जात होते. पण पोटपाण्यासाठी बांबूबनात जाऊन रोपे काढण्याचे काम करायलाच हवे होते. म्हणून म्हातारा कोयता घेऊन बांबूबनात गेला. त्याने बांबूची पहिलीच फांदी तोडली आणि आजही तसाच चमत्कार घडला. कापलेल्या बांबूच्या पोकळीत सोन्याची नाणी भरलेली होती. म्हाताऱ्याने आपल्या उपरण्यात ती नीट बांधून घेतली आणि तो तडक घराकडे निघाला.
म्हाताऱ्याला हा अनुभव नवाच होता. पण पुढे पुन्हा पुन्हा हा अनुभव येत गेला. कधी बांबूच्या पोकळीत मोती मिळाले, कधी नाणी! गरीब म्हाताऱ्याचे दिवस पालटले. थोड्याच दिवसात तो श्रीमंत झाला. पण त्याला या श्रीमंतीचा गर्व चढला नाही. त्याच्या लेखी हा जादूई पैसा होता. अंगमेहनतीतून मिळालेला नव्हता. त्यामुळे वेड्यासारखे खर्च करून हे पैसे उधळणे त्याच्या मनाला पटत नव्हते. चंद्रिकेच्या भविष्यासाठी, तिला शिकवून मोठे करण्यासाठी हे पैसे राखून ठेवले पाहिजेत, या भावनेने तो काटकसरीनेच राहत होता.
चंद्रिका मोठी झाली. म्हाताऱ्याने तिच्यासाठी चांगले शिक्षक शोधले. आपली चंद्रिका सर्व विषयात पारंगत झाली पाहिजे म्हणून त्याने गुरुजींना भरभरून दक्षिणा दिली. चंद्रिकेची समज फार उत्तम होती. कुठल्याही गोष्टीचे तिला चटकन आकलन व्हायचे. शिक्षणातील तिची ही प्रगती पाहून तिचे शिक्षक तिच्यावर खूष होते. चंद्रिकेने अभिजात जपानी कविता वाचल्या. या कवितांचे पठण-मनन करून तिने त्या आपल्या मनात जपून ठेवल्या. हळू हळू तीही कविता लिहू लागली. चंद्रकोरीसारखेच दिसणारे तीन-चार ओळींचे जपानी हायकू आणि सोबत त्या कवितेला साजेसे चित्र ती रेखाटू लागली.
‘आकाशाच्या बागेत
उमलली फुले
चमेलीचा गंध
आभाळभर दरवळे.’
किंवा
‘पाखरू भिरभिरलं
फांदीभर फिरलं
फुलांमध्ये विसावलं.’
तिने अशा कितीतरी कविता लिहिल्या. रेशमी कपड्यांवर चित्रं रंगवली. संगीत शिकली. सकाळ-संध्याकाळ तिच्या ओठांवर गाणं असायचं. साधी-सरळ पण गोड स्वभावाची ही लोभसवाणी मुलगी सर्वांना आवडायची.
चंद्रिका आता वयात आली होती. डोक्यावरचे लांबसडक केस, बदामी डोळे, गालावर पडणारी खळी आणि पौर्णिमेच्या चांदण्याला लाजवेल असा गोरा रंग यामुळे सगळ्या परिसरात ती उठून दिसायची. आभाळातल्या परीसारखी दिसणारी चंद्रिका कधी कधी खिडकीतून बराच वेळ चंद्राकडे टक लावून पहात बसायची. कधी तिचा चेहरा कोमेजल्या फुलासारखा मलूल व्हायचा. एवढी आनंदी मुलगी अशी अचानक कशी काय हिरमुसून बसते, याचे घरातल्या लोकांना आश्चर्य वाटायचे. बाहेरच्या जगात मात्र ‘सौंदर्याची पुतळी’ अशीच तिची ख्याती होती. तरुणांच्या लेखी तर ती स्वप्नातली परीच होती. ते तिला पत्र लिहायचे, छान छान भेटवस्तू पाठवायचे. पण चंद्रिका त्याकडे ढुंकूनही पहायची नाही. सगळ्या भेटवस्तू ज्याच्या त्याला परत जायच्या. चंद्रिका नेमकी कशात हरवली आहे, हे कुणालाच समजत नव्हतं.
अखेर तिच्या बाबांनीच पुढाकार घेतला. आपल्या या नाजूक कन्येचं तशाच एखाद्या छानशा राजकुमाराशी लग्न लावून द्यावं, असं त्यांनी ठरवलं. बाबांनी चंद्रिकेची मनधरणी केली. “हे वय लग्नाचं आहे. तुझ्या लग्नाने आम्हाला किती आनंद होईल. तुझ्या सुखातच आमचं सुख आहे. तेव्हा तुला आवडेल त्या राजकुमाराशी तू लग्न कर. तुला आपला वर निवडण्याचं स्वातंत्र्य आहे.” पण चंद्रिकेची कळी खुलेना. अखेर एके दिवशी तिने बाबांना खरं काय ते सांगून टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, “बाबा, माझं तुमच्यावर जिवापाड प्रेम आहे. तुमच्या मनाविरूद्ध आपल्या हातून काहीही घडू नये, याची मी नेहमी काळजी घेते. पडत्या फळाची आज्ञा पाळावी, तसा तुमचा शब्द झेलते. पण तुम्ही लग्नाचं म्हणता ते मात्र मला शक्य नाही. पृथ्वीवरच्या कुठल्याच तरुणाशी मला लग्न करायचं नाही, करता येणारही नाही. मला तुम्ही तसा आग्रह करू नका.’
बाबांना चंद्रिकेच्या मनाविरूद्ध काहीही होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी चंद्रिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला. चंद्रिकेशी विवाह करू इच्छिणाऱ्या सर्व सुकुमार तरुणांना त्यांनी चंद्रिकेचा मनोदय कळविला. सगळे तरुण निराश झाले आणि परत फिरले.
दरम्यान एक तरुण चंद्रिकेच्या झोपडीत आला. गळ्यात सोनसाखळी, अंगात रेशमी कुडता घातलेल्या या तरुणाने तिच्यासाठी एक पत्र आणलं होतं. रेशमी वस्त्रात गुंडाळलेलं ते पत्र त्याने तिला दिलं. पत्र जपानच्या सम्राटाचं होतं. सम्राटाने चंद्रिकेला राजगृहात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण चंद्रिकेनं नम्रपणे त्याला नकार दिला. राजदूताने चंद्रिकेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. राजाचे पत्र हा राजाचा आदेश असतो. तो पाळायलाच हवा असंही सांगतो.
चंद्रिकेचे बाबाही राजाज्ञेचा अवमान करू नको, म्हणून तिची समजूत काढू लागले. आपण ही राजाज्ञा पाळली नाही तर मृत्यूदंडही होऊ शकतो, याची कल्पना दिली. पण चंद्रिका आपल्या निर्णयावर ठाम होती.
चंद्रिकेने बाबांना सांगितले, “तुम्ही काळजी करू नका बाबा. मीच महाराजांना पत्र लिहून माझी भूमिका कळवते.” असे म्हणून तिने सम्राटाला कवितेतून उत्तर पाठविले-
“नाईटिंगेलला भेटायचं तर बागेतच जायला हवं
तिच्याशी बोलायचं तर गायलाच हवं
गाणारा कुणीही नाईटिंगेलला आवडतो.”
राजदूताने चंद्रिकेचं पत्र सम्राटाला दिलं. तिच्या कवितेनं सम्राटाचा राग दूर झाला. तिला भेटण्याची त्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली, आणि तो चंद्रिकेकडे निघाला. राजमहालातून निघाला आणि चंद्रिकेच्या झोपडीत आला. बाबांनी आणि चंद्रिकेने मिळून सम्राटाचे स्वागत केले. राजाने चंद्रिकेशी मनसोक्त गप्पा मारल्या. चंद्रिकेच्या ओठातून बाहेर पडणारे शब्द त्याला खडिसाखरेसारखे गोड वाटत होते. तिची बोलण्याची लकब, वागण्यातली आदब, आणि सौंदर्याचा शिडकावा यामुळे राजा खूष झाला. तो आनंदाने म्हणाला, “आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. जपानच्या सम्राटाला साजेशी रूपगुणसंपन्न महाराज्ञी गवसल्याचा हा क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. हा राजा चंद्रिकेला रीतसर लग्नासाठी मागणी घालत आहे.”
चंद्रिका शांतपणे राजाला म्हणाली, “महाराज, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्या. पण मला तुमच्याशीच नव्हे तर पृथ्वीतलावरच्या कोणत्याही पुरुषाशी विवाह करता येणार नाही. आपला अवमान करण्याचा माझा उद्देश नाही, पण मी मुळी या पृथ्वीवरची भूकन्याच नाही. दुसऱ्या ग्रहावर रहाणारा माझा बाप केव्हाही येऊन मला आपल्या घरी घेऊन जाईल. मी त्या क्षणाची वाट पहात थांबले आहे. ”
आता मात्र राजाला चंद्रिकेचे बोलणे उद्धटपणाचे वाटले. त्याच्या मनात राग दाटून आला. तो चंद्रिकेला म्हणाला, “स्वर्गातला देवसुद्धा तुला इथून नेऊ शकणार नाही. हे माझे राज्य आहे, आणि या राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर माझी मालकी आहे. येऊ दे तुझ्या पित्याला, तो कसा तुला घेऊन जातो, ते पाहतोच.” राजाने चंद्रिकेच्या घराभोवती हजारो सैनिकांचा पहारा बसवला, आणि तो राजवाड्यात परतला.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्रिकेने राजाला पत्र लिहिले. ‘लवकरच मी पित्याच्या घरी जात आहे, आता आपली समक्ष भेट होणार नाही, म्हणून पत्राद्वारे आपल्याला सर्व शुभेच्छा!’
पत्र वाचताच राजा चंद्रिकेकडे जायला निघाला. हळूहळू दिवस मावळला. वाटेत अंधार पडला. चंद्रोदयाची वेळ झाली होती, पण आकाश काळ्या ढगांनी भरून आले होते. राजाला काही केल्या आजूबाजूचे दिसेना. अखेरीस तो कसातरी धडपडत चंद्रिकेच्या बागेत येऊन तिथेच विश्रांतीसाठी थांबला.काही वेळाने काळवंडलेल्या ढगांतून एक मोतिया रंगाचा रथ येताना दिसला. रथात चंद्रासारखाच गोरापान, रेशमी वस्त्रे ल्यालेला तेजस्वी माणूस बसलेला दिसला. रथाचे चंद्रिकेच्या अंगणात आगमन झाले. तो तेजस्वी माणूस रथातून पायउतार झाला आणि त्याने म्हातारबाबाला सांगितले, “मी चंद्रिकेला घेऊन जाण्यासाठी आलो आहे.” बाबाला हे परक्या माणसाचे सलगीचे बोलणे आवडले नाही. त्याने धाडकन् दरवाजा लावून घेतला. पण लगोलग दारे-खिडक्या आपोआप उघडल्या गेल्या. त्या चांद्रदूताने चंद्रिकेला हाक मारली, “तुझ्या वडिलांनी तुला नेण्यासाठी रथ पाठविला आहे, तू बाहेर ये.”
चंद्रिका, म्हातारबाबा आणि आजी बागेत आले. बाबांनी चंद्रिकेला मिठी मारली आणि ते रडू लागले. आजी म्हणाली, “अगं तुला मुलीसारखं वाढवलं, आणि आज अशी अचानक आम्हाला सोडून कशी जाते?”
चंद्रिकेने म्हाताऱ्या बाबांची आणि आजींची समजूत काढली. म्हणाली, “माझे वडील चांद्रवनाचे राजे आहेत. मी त्यांची एकुलती एक कन्या आहे. तुमच्यासारख्या दयाळू लोकांच्या सहवासात राहून तुमचा आनंद वाढवावा म्हणून त्यांनीच मला पृथ्वीवर पाठवण्याची योजना आखली होती. मला वाटते आता माझे काम पूर्ण झाले आहे. शिवाय मी जरी इथून निघून जात असले, तरी तुम्हाला कधीच दूरावणार नाही. आकाशातून मी रोज तुम्हाला पाहीन आणि पृथ्वीवरून रोज तुम्ही माझी डोळाभेट घेऊ शकाल.”
चांद्रदूताने घाई केली. सूर्योदयापूर्वी त्याला परतायलाच हवे होते. चंद्रिकेने जड अंत:करणाने म्हातारबाबा आणि आजींचा निरोप घेतला. सम्राटासाठी तिने बाबांजवळ एक बाटली दिली. म्हणाली, “महाराजांना ही बाटली द्या. त्यातले पेय प्याल्यावर त्यांचे मन शांत होईल. त्यांना म्हणावं, मला माफ करा. माझ्या मनात जपानच्या सम्राटाविषयी जराही राग नाही.” आणि चंद्रिकेचा रथ आकाशाकडे झेपावला.
बाबांनी सकाळी सूर्योदयाबरोबर राजाला चंद्रिकेचा निरोप दिला आणि सोबत भेट म्हणून दिलेली बाटली सुपूर्त केली. राजा शोकाकूल झाला. त्याने ते पेय प्यायला नकार दिला. म्हणाला, “चंद्रिकेच्या आठवणीत रात्र जागवायलाच मला आवडेल. तिच्या जाण्याने मला दुःख जरूर झाले आहे; पण तिच्या थोड्याशा सहवासातील आठवणींचे चांदणे मला आयुष्यभर आनंद देईल.” जपानच्या राजाला जसे चांदणे देऊन चंद्रिकेने सुखावले, तसे तुम्हा-आम्हा सर्वांनाही भरभरून हे चांदणे वाटून दिले आहे. पौर्णिमेच्या दिवशी म्हातारबाबाच्याच नाही तर पृथ्वीवरच्या सर्व बागांमध्ये चंद्रिकेचे हे चंदेरी देणे मानवजातीला आनंद वाटत रहाते.