(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • प्रायश्चित्त – जितका अपराध मोठा, तितके प्रायश्चित्तही मोठेच !

    आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच !

  • खर प्रेम काय असत

    एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची. मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरीणी रडणं थांबवुन निघुन जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली. हरीणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला, माझं काही चुकतं का गं? मी कित्येक दिवस बघतोय जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो. तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस. कारण काय आहे. सांगना माझं काही चुकतं का गं?

  • सुखी माणूस (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३७)

    पुणे जंक्शनहून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडी नुकतीच सुटली होती.
    सेकंड क्लासमधे पाच प्रवासी अजून डुलक्या देत होते.
    नुकतेच त्यांचे भोजन झाले होते, त्यामुळे ते आता झोंप काढण्याच्या प्रयत्नात होते.
    सर्व कसं शांत होतं.
    अचानक दरवाजा उघडला गेला आणि एक ताडासारखा सरळ, उंच आणि नीटनेटका पोशाख केलेला, अंगात जाकीट घातल्यामुळे पत्रकार वाटणारा माणूस आंत शिरला.
    धाप लागल्यामुळे डब्यात मधेच तो थोडा वेळ नुसता उभाच होता.
    त्याचे डोळे बसायला जागा शोधत होते.
    मग तो उद्गारला, “परत चुकीचाच डबा मिळालेला दिसतोय. कमाल आहे !
    एखादा वैतागेल अशाने.”
    त्याला पाहून प्रवाश्यांमधला एकजण आनंदाने ओरडला, “श्याम आठवले, तू इकडे कसा ? श्यामच ना तू ?”
    नव्या प्रवाशाने प्रथम भकास नजरेने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं मग तोही आनंदाने ओरडला, “राम हेगडे, अरे किती वर्षांनी भेटतो आहेस !
    कुठे होतास ? मला माहित नव्हतं तूही ह्या गाडीतच आहेस.”
    रामने विचारलं. “कसं चाललंय तुझं, श्याम ?”
    “अरे यार, मी ठीक आहे रे !
    फक्त माझा डबा चुकलाय आणि कांही केल्या तो मला सांपडत नाही.
    काय मूर्ख आहे मी ! मला कोणीतरी बडवला पाहिजे !”
    गाडीबरोबर एक हेलकावा घेऊन श्याम पुढे म्हणाला, “विचित्र गोष्टी होत असतात.
    मी गाडीतून उतरून जरा पुढे जाऊन एक छोटा पेग घेत होतो आणि दुसरी घंटा वाजली.
    एकाने कसं बरं वाटणार ?
    मग आणखी एक पेग मी घाईघाईत घेत असतांनाच तिसरी बेल झाली.”
    “मी कसाबसा तो संपवून गाडीकडे धांव घेतली आणि वेड्यासारखा समोर येईल त्या डब्यात उडी मारून चढलो.
    मूर्खपणाच झाला तो !”
    राम म्हणाला, “पण तू तर मजेत दिसतोयस ? इथे भरपूर जागा आहे. ये बस इथे !”
    “नाही रे बाबा ! मला माझा डबा शोधला पाहिजे. अच्छा !” श्यामने स्पष्टीकरण केले.
    राम म्हणाला, “ऐक माझं ! असा डबा शोधतांना जरा चूक झाली तर दोन डब्यांच्या मधे पडशील !
    आता इथे बस. स्टेशन आलं की शोध तुझा डब्बा.”
    श्यामने एक मोठ्ठा सुस्कारा सोडला आणि कांटेरी पाटावर बसल्यासारखा चुळबुळ करत तो रामच्या समोरच्या मोकळ्या जागेवर बसला.
    राम हेगडेने विचारले, “तू कुठे निघाला आहेस ?”
    श्याम आठवले म्हणाला, “मी अवकाशाच्या प्रवासाला निघालोय. माझ्या डोक्यात गोंधळ आहे की मी कुठे चाललोय तें मीच सांगू शकत नाही.
    जिथे नशीब नेईल तिथे जायचं.
    तू कधी सुखी मूर्ख पाहिला आहेस ? नाही ?
    मग सर्वात सुखी माणूस पहा.
    माझा चेहरा पाहून काय वाटतं तुला ?
    राम हेगडे त्याच्याकडे पहात म्हणाला, “विशेष कांही नाही दिसत वेगळं ! आहेस नेहमीसारखाच.”
    श्याम आठवले म्हणाला, “मी खरंच सांगतो तुला.
    मी आरशात पाहिलेलं नाही पण आतां मी अगदी येडपट दिसत असेन ना !
    मी वेडाच होतोय बहुदा.
    तुला माहित आहे, राम, अरे मी लग्न केलंय. काय समजलास !”
    राम हेगडे आश्चर्याने ओरडला, “म्हणजे तू शेवटी लग्न केलसं !”
    श्याम म्हणाला, “केलं म्हणजे काय ? आजच केलं.
    लग्न केलं, देवळातून बाहेर आलो आणि थेट गाडी पकडली.”
    रामने श्यामचे अभिनंदन वगैरे केले.
    मग तो म्हणाला, “तू तर छुपा रूस्तुम निघालास !
    म्हणून तू असा सजलायस आणि ताजातवाना वाटतोयस !”
    श्याम म्हणाला, “ हो रे मित्रा ! स्वप्न पुरं करायला, मी अगदी अत्तराचा फवारा सुध्दा अंगावर आणि कपड्यांवर मारलाय.
    ह्या क्षणी मी माझ्यावरच खूष आहे.
    स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं !
    माझ्या आयुष्यात मी कधी एवढा आनंदी नव्हतो.”
    श्यामने डोळे मिटून मान हलवली.
    “मी अत्यानंदात आहे. विचार कर, दोन मिनिटांत मी माझ्या डब्ब्यात पोहोचेन.
    तिथे खिडकीशी मला आपलं सर्वस्व देऊ केलेली, सुंदर गोल चेहरा अन् सुंदर नाक डोळे असलेली माझी देवता, माझी प्रिया, माझी बायको बसलेली असेल.
    एखादी परीच आहे असं वाटणारी सुंदरी, माझी लाडकी.. !
    पण हे सर्व तुला सांगून काय उपयोग. तू व्यवहारी, अरसिक, अविवाहीत.
    प्रेम वगैरे झूठ वाटणारा तू ! तुला नाही समजणार.
    तू जर कधी विवाह केलास तर माझी आठवण येईल तुला.
    मी आता एक दोन मिनिटांत तिच्या बाजूला बसलो असेन आणि तिची हनुवटी हातात धरून तिचं सौंदर्यपान करेन.”
    पुन्हा श्याम आठवलेने डोळे मिटले अन् मान हलवली.
    तो परत बोलू लागला, “मी माझी मान तिच्या खांद्यावर ठेवून झोपेन.
    ह्या अशा आनंदाच्या क्षणी सगळं जग कवेंत घ्यावसं वाटतं.
    राम, मित्रा, ये, तुला कडकडून भेटू दे.”
    राम म्हणाला, “ये, तुझा आनंद साजरा करू.”
    दोघे कडकडून मिठी मारतात.
    आजूबाजूला बसलेले प्रवासी मोठ्या आवाजांत चाललेला हा संवाद ऐकत असतात.
    दोघे कडकडून भेटतांच सर्व एकत्र हंसतात.
    श्याम पुढे बोलू लागतो, “मग चित्र पूर्ण करण्यासाठी पॅंट्रीमधे जाऊन कांही खानपान करणार. मजा करणार.”
    आता श्यामचे बोलणं ऐकायला पांच श्रोते होते.
    त्याच्या बोलण्याला, त्याच्या हावभावांना ते सर्वच दाद देत होते.
    त्यांची झोप आता उडाली होती.
    तो बडबडतच होता.
    तो हंसला की सर्व हंसत होते.
    तो म्हणाला, “सद्गृहस्थहो, कधी दारू प्यावीशी वाटली तर प्या.
    ती पिणं चांगली की वाईट ह्याचं तत्त्वज्ञान बनवण्याची गरज नाही.
    ते तत्त्वज्ञान आणि ते मानसशास्त्र अगदी गुंडाळून ठेवा."
    तेवढ्यात एक तिकीट चेकर तिथून जात होता, त्याला उद्देशून तो म्हणाला, “साहेब, तुम्ही जेव्हां डब्बा नंबर २०९ मधे जाल तेव्हां तिथे एक हिरव्या रंगाची पांचवारी साडी नेसलेली स्त्री दिसेल, तिला सांगा की मी इथे आहे."
    चेकर म्हणाला, "जरूर सांगेन पण डब्बा नंबर २०९ ह्या गाडीला जोडलेल्या डब्ब्यांत नाही. २१९ नंबरचा डब्बा मात्र आहे."
    श्याम म्हणाला, “ ठीक आहे. मग २१९ असेल. तिला सांगा की तिचा नवरा इथे आहे आणि ठीक आहे.”
    मग तो डोक्याला हात लावत म्हणाला, “काय मजा आहे. नवरा, बायको, एक छोटा विधी झाला आणि कांही मिनिटांत आम्ही पती-पत्नी झालो. माझं ठीक आहे हो !
    पण तिचा विचार करा. काल ती मुलगी होती, लहान होती आणि आज लागलीच पत्नी झाली. कमाल आहे !”
    एक प्रवासी मधेच म्हणाला, “आज काल कोणी सुखी असणं फार कठीण झालं आहे.
    पांढरा हत्ती पहायला मिळणं जसं कठीण आहे, तसंच ते कठीण आहे.”
    “बरोबर आहे पण ह्यात दोष कुणाचा आहे ?” श्यामने बसल्या जागीच पाय लांब करत विचारलं.
    तो पुढे म्हणाला, “तुम्ही जर सुखी नसाल तर तो तुमचा दोष आहे.
    तुम्हाला नाही वाटत असं ?
    माणूस स्वतःच सुख स्वतःच निर्माण करतो.
    तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही सुखी होऊ शकता.
    नाही तर तुम्हीच सुखाकडे पाठ फिरवतां.”
    “पण पुढे काय होणार, ते तुम्हाला कसं कळतं ?” कोणीतरी विचारलं.
    श्याम म्हणाला, “ अगदी सोप्पं आहे.
    निसर्गाने माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे भाग ठेवलेत.
    त्या त्या वेळी माणसाने आपल्या त्या स्थितीवर प्रेम करावे.
    मात्र तसं न करतां तुम्ही जर दुसऱ्याच अपेक्षा ठेवल्यात तर तुम्हाला दुःखच मिळणार.
    तरूण झालात की विवाह करावा, ही निसर्गाचीच आज्ञा आहे.
    त्या वयांत विवाहाविना आनंद नाही.
    योग्य वेळ येताच विवाह करावा.
    चालढकल करू नये पण तुम्ही लग्न करत नाही.
    दुसऱ्याच कशाची तरी वाट पहाता.
    तसं केल्याने दुःखी होता.
    विवाह करावा, मद्य प्यावसं वाटलं तर मद्य प्यावं.
    आनंद साजरा करावा.
    ‘महाजनो येन गता: स पन्थ:’ हे मला अगदी योग्य वाटतं.
    सर्व जण जातात, तोच म्हणजे मध्यम मार्ग म्हणजेच राजमार्ग.
    म्हणूनच मी सुखी आहे.”
    “तुम्ही म्हणतां की माणूस स्वतःचा आनंद निर्माण करतो पण मला सांगा की दांत दुखत असला किंवा एखादीला वाईट सासू छळत असली तर त्या व्यक्तींना आनंद कसा होणार ? सांगा !
    सर्व कांही दैवावर अवलंबून असतं.
    योगायोग असतो.
    समजा, आता आपल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही ताबडतोब सूर बदलाल.” एक प्रवासी म्हणाला.
    “एकदम चुकीचे उदाहरण.
    गाडीला अपघात वर्षा-दोन वर्षात एखादा होतो. मला अपघात होईल अशी भिती मुळीच वाटत नाही.
    मला अपघात या विषयावर मुळीच बोलायचं नाही.
    आपली गाडीची गती मंद झाली.
    बहुदा एखादं स्टेशन जवळ आलं असावं !“
    रामने विचारलं, “तू आता पुढे कुठे जाणार आहेस ? कोल्हापूरला की बेळगावला ?”
    श्याम म्हणाला, “कोल्हापूरलाही नाही आणि बेळगांवलाही नाही.
    मी सांगलीहून आलो आणि धुळ्याला चाललोय.
    कोल्हापूर, बेळगांव उलट्या दिशेला आहेत. मी उत्तरेला चाललोय.”
    राम म्हणाला, “अरे पण ही गाडी मिरजेहून कोल्हापूर किंवा बेळगांवकडे जाणारी आहे.”
    “अरे मी चाललोय नाशिकमार्गे धुळ्याला.
    परत उलट कशाला जाऊ ?” श्यामने ठामपणे सांगितले.
    “मी तर बेळगांवला चाललोय. आता सातारा येत असेल.” राम म्हणाला.
    “म्हणजे ही दिल्लीकडे जाणारी गाडी नाही ?”
    “श्याम, तू पुण्याला बहुदा चुकीच्या गाडीत चढलास.
    तू परत सांगलीकडे जाऊ शकशील पण धुळ्याला नाही.” राम म्हणाला.
    बाकीच्या प्रवाशांनीही त्याला दुजोरा दिला.
    “अरे बापरे ! मी ही किती मूर्ख आहे.
    मग तो चक्क रडू लागला.
    अरे माझी नवखी पत्नी त्या पॅसेंजर गाडींतून गेली आहे.
    बिचारी एकटीच काळजी करत बसली असेल.
    आता काय करू ?”
    तो तोंडावर हात घेऊन रडत म्हणाला, “मी एक दुःखी, दुर्दैवी माणूस आहे. आता काय करू ?”
    “अरेरे ! कठीण आहे खरं !
    पण तुम्ही साताऱ्याहून तिला तार पाठवा आणि थोड्या वेळाने मागून येणाऱ्या कलकत्ता एक्सप्रेसने धुळ्याला जा.
    तुम्ही कदाचित थोडे आधीच पोहोचाल आणि तिला धुळे स्टेशनवरच गांठू शकाल.”
    “कलकत्ता एक्सप्रेस ! आणि मी त्या कलकत्ता एक्स्प्रेसचे तिकीट कसे काढू ? माझ्याकडे पैसेच नाहीत.
    माझे पैसे पत्नीकडेच आहेत.”
    सर्व प्रवासी हंसतात.
    आपापसात कांही बोलतात आणि हंसत हंसतच थोड्या वेळापूर्वी स्वतःला सुखी म्हणवणाऱ्या त्या दुःखी माणसाच्या तिकीटासाठी पैसे जमवू लागतात.
    - अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - हॅपी मॅन
    मूळ लेखक - ॲंटन चेकॉव्ह
    तळटीप - ही गोष्ट वाचून सुप्रसिध्द मराठी लेखक चिं. वि. जोशी ह्यांच्या वायफळाचा मळा मधल्या एका गोष्टीची आठवण झाली.
    चिं. वि.जोशींची गोष्ट सरस आहे.
    तिचा उल्लेख मी माझ्या आठवणींची मिसळमधे केला आहे.
    तोच भाग पुन्हा सादर करतो.
    “चिं. वि. जोशींच्या "वायफळाचा मळा" या पुस्तकांत एक लेख आहे.
    "स्मरणशक्तीचे प्रोफेसर".
    लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात.
    त्यांचे एक उदाहरण पहा.
    ते म्हणतात, "मला अहमदनगर जायचे आहे.
    अहमदनगर हे नांव लक्षांत ठेवण्यासाठी मी एक कारिका रचली आहे.
    ती अशी "दिवस गर्व विष नसे ज्या पुरी" (अह + मद + न गर).
    पद्यमय कारिका पटकन् लक्षात रहाते आणि गांवाचे नांव लक्षात ठेवणे सोपे जाते."
    लेखक त्यांना विचारतो, "आपण अहमदनगरला कोणत्या कामासाठी निघाला आहेत ?"
    तर प्रोफेसर म्हणाले, "अहो, अहमदनगरला माझ्या बहिणीला स्थळासाठी दाखवण्याचा कार्यक्रम आहे."
    लेखकांने विचारले,"पण बहिण कुठे दिसली नाही तुमच्या बरोबर."
    प्रोफेसर त्या प्रश्नाने गडबडले आणि म्हणाले, "अरेच्चा, म्हणजे ती मनमाड स्टेशनवर गाडी बदलताना तिथेच राहिली वाटते !"

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ लेखक- ॲंटोन चेकॉव्ह.

  • गुढी नी पावसाची उडी

    त्यावेळी आमचे कुटुंब रानात राहायला होते माझे बरेच दिवस रानामध्ये निसर्गाच्या सानिध्यात गेले. गावातील हवेपेक्षा रानातील हवा माझ्या मनाला अल्लाद देत होती. मनमोकळेपणाने राणा मध्ये फिरणे म्हणजे आनंदाला एक प्रकारचे उदाण येतेऐन उन्हाळ्यात राणा मध्ये अधून मधून असणारे वारे.

  • 10.25 बदलापूर फास्ट

    बीपीटी कॉलनीतील चाळीवजा बिल्डिंग मध्ये लहान खोल्यांमध्ये मागील वर्षापर्यंत गणेशोत्सव साजरा करणारे राघव काका आणि त्यांचा पुतण्या विजय, यावर्षी दोघेच जण भायखळ्याहुन गणपतीची मुर्ती न्यायला आले होते. राघव काकांनी वीस वर्षांपुर्वी घरात दीड दिवसांचा गणपती आणायला सुरुवात केली होती. तेव्हापासून बीपीटी कॉलनीत त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ आणि लहान भाऊ सह कुटुंब दोन दिवसांसाठी येऊन राहत होते.

  • काळ्या मांजरीचा कौतुक दिन

    मंडळी आज दिनांक १७ ऑगस्ट. ह्या तारखेला परदेशात काळ्या मांजरीचा कौतुक दिन साजरा करतात. म्हणूनच तिचं कौतुक करण्यासाठी ही कथा. फक्त एकच सांगू इच्छितो. काळी मांजर दिसायला भयानक जरी असली तरी ती खूप खेळकर आणि प्रेमळ असते. जरा अंधश्रद्धेला बाजूला ठेवून तिचाही विचार करा. बिचारी ती मुकी ,  ती आपल्या भावना आपल्याकडे कशा व्यक्त करणार

  • शेवटचं पान (संक्षिप्त रूपांतरीत कथा २९)

    शिमला आणि मनाली ह्यामधे कुलू येतं.
    पर्वतराजी आणि आजूबाजूच्या प्रदेशाची चित्रें रेखाटू इच्छिणारे अनेक चित्रकार तिथे कांही काळ स्थायिक होतात.
    हॉटेलात दीर्घ काळ रहाणं त्यांच्या किंमतीमुळे केवळ अशक्य असतं.
    तशातच ह्यांतल्या अनेक चित्रकारांच अजून नाव झालेलं नसतं.
    त्यांच्या चित्रांना हवा तसा मोबदलाही मिळत नाही.
    तेव्हां तिथे भाड्याने घर घेऊन रहाणं हा एकच मार्ग चित्रकारांसमोर असतो.
    एका भागांतली बरीच छोटी छोटी एकमजली, दुमजली घरं अशी भाड्याने दिली होती.
    त्याला पेंटर मोहल्ला असें म्हणत.
    पेंटर मोहोल्ल्यांत एक दोन मजली घरं होतं.
    सुनिता आणि ज्योती ह्यांनी त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आपला मुक्काम केला होता.
    सुनिता आणि ज्योती ह्यांची ओळख दिल्लीत एक चित्रप्रदर्शन पहातांना झाली होती.
    सुनिता बंगाली होती तर ज्योती पंजाबी.
    पण चित्रकलेच्या समान धाग्याने त्यांना जणू बहिणीच बनवल्या होत्या.
    मग दोघींनी सिमला-कुलू-मनाली ह्या भागांत मनसोक्त चित्रं काढायचा बेत दोघींनी आंखला होता.
    शेवटी ह्या परवडणाऱ्या ठिकाणी येऊन त्या राहिल्या होत्या.
    तेव्हां मे महिना होता.
    एक वर्ष राहून सर्व ऋतुंत हिमालयाची चित्रे काढायचा त्यांचा विचार होता.
    १९८९च्या नोव्हेंबर महिन्यात एक नवाच फ्लू नावाचा आजार सर्व जगभर, विशेषतः जिथे जिथे ब्रिटीश वसाहती होत्या, त्यांतून पसरला.
    डॉक्टर त्याला न्युमोनिया म्हणत.
    आपल्या बर्फाळ थंड हातांनी इथे एकाला तर तिथे दुसऱ्याला स्पर्श करत तो जगभर फिरू लागला.
    विशेषतः पूर्वेकडल्या देशांत शेकडो लोकांचा त्याने बळी घेतला.
    तो हलकेच हिरव्या गार गवतांतून सिमला-कुलू भागांतही पोहोचला.
    न्युमोनिया हा कांही दयाळू आणि उदार अंतःकरण असलेला नव्हता.
    नाहीतर छोट्या चणीच्या नाजूक सुनिताला त्याने कसा स्पर्श केला असता ?
    पण त्या दुष्टाने सुनिताला पकडले.
    सुनिता आपल्या पलंगावर पडून बाजूच्याच खिडकीतून बाहेर समोरच्या विटांच्या घराकडे पहात झोपून राहू लागली.
    अगदी क्वचितच ती हालचाल करत असे.
    आपल्या कामांत खूप व्यग्र असणारे डॉक्टर खन्ना एका सकाळी सुनिताला तपासायला आले.
    परत जातांना ज्योतीला बाजूला नेऊन म्हणाले, “ही वांचण्याची फक्त दहा टक्के शक्यता मी देईन.”
    थर्मामीटर झटकत डॉक्टर पुढे म्हणाले, “हे असे रोगी आमच्या वैद्यकीय शास्त्राला निकामी ठरवतात.
    असे मरणाची वाट पहाणारे रोगी काय उपयोगाचे !
    तुझी मैत्रिण जगण्याची इच्छा हरवून बसली आहे.
    आपण ह्यांतून बरी होणारच नाही, असं ती मनाशी धरून बसली आहे.
    तिच्या मनावर कांही दडपण आहे कां ?”
    “नाही. ती म्हणत असे की तिला एकदा कैलास पर्वतावरील मानस सरोवराचे चित्र रंगवायचे आहे.”
    “चित्रण ! तें करू द्या तिला.
    कुणी पुरूष किंवा कांही प्रेम वगैरेमुळे कसले दडपण मनावर आहे कां ?”
    ज्योती म्हणाली, “पुरूष ? प्रेम करण्याच्या लायकीचे पुरूष कुठे भेटतात ? तें असो.
    पण सुनिताचं असं कांही नाही.”
    “मग फक्त अशक्तपणा आहे.
    हे बघ, ज्योती, मी माझे संपूर्ण वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून तिला औषधांनी बरी करायचा प्रयत्न करीन.
    जेव्हा आजारी व्यक्तीच आपल्या शवयात्रेची कल्पना करू लागते, तेव्हा डाॅक्टर हतबल होतो.
    तू जर तिला हिवाळ्यानंतरच्या दिवसांबद्दल बोलायला लावशील तर मी तिच्या जगण्याची शक्यता दहा टक्क्यांवरून पन्नासावर नेईन.”
    डॉक्टर गेल्यानंतर ज्योती आपल्या खोलीत गेली व खूप रडली.
    मग तिने आपला चित्र काढण्याचा बोर्ड उचलला व उसने अवसान आणून एक गाणं गुणगुणत, ती सुनिताच्या खोलीत आली.
    सुनिता खिडकीकडे तोंड करून स्तब्ध पडलेली होती.
    ज्योतीला वाटले ती झोपली असावी.
    तिला जाग येऊ नये म्हणून तिने आपले गुणगुणणे आवरते घेतले.
    बोर्ड मांडून ती एक चित्र काढू लागली.
    ती एका कथेसाठी चित्र काढत होती.
    कथांबरोबर अशी चित्रे दिली की कथाकारांना अधिक प्रसिध्दी मिळते.
    ती एका घोड्यावर स्वार झालेल्या लढवय्या नायकाचं चित्र काढत असतांना तिला एक हलका आवाज दोन तीनदा ऐकू आला.
    ती सुनिताजवळ गेली.
    सुनिताचे डोळे सताड उघडे होते आणि खिडकीबाहेर पहात ती कांही तरी उलट मोजत होती.
    “बारा” ती म्हणाली.
    आणखी थोड्या वेळाने म्हणाली, “अकरा”.
    त्यानंतर दहा, नऊ, आठ, सात” जवळजवळ एकाच दमात म्हणाली.
    ज्योतीने खिडकीतून बाहेर पाहिलं.
    पहाण्यासारखं तिथे कांही नव्हतंच आणि मोजण्यासारखं तर नव्हतंच.
    तिथून सुमारे वीस फुटांवर समोरच्या घराच्या कुंपणाची भिंत दिसत होती.
    बाकी सगळं ओसाड होतं.
    त्या भिंतीच्या आधाराने तिच्यावर वाढत गेलेल्या एका वेलीच्या शुष्क फांद्या अगदी त्या भिंतीलगत चिकटलेल्या दिसत होत्या.
    वेलीचं मूळही जमिनीच्या आधाराने अजून तग धरून होतं.
    परंतु वेलीवरची बहुतेक पाने ह्या हिवाळ्यांतल्या जोरदार वाऱ्यांनी पाडली होती.
    ज्योतीने सुनिताला विचारले,
    “काय पहाते आहेस, सुनिता ?”
    सुनिता कुजबुजल्यागत उद्गारली,
    “सहा. आता ती भराभर पडताहेत.
    तीन दिवसांपूर्वी सुमारे शंभर तरी होती.
    मोजतां मोजता माझे डोके दुखू लागले होते.
    आता ती मोजणे सोपे आहे.
    ते बघ आणखी एक पडलं.
    आता फक्त पांच राहिली.”
    “काय पाच सुनिता ?”
    “अग, त्या समोरच्या वेलीची पाने. त्यातलं शेवटचं पडलं की मीही जाणार.
    गेले तीन दिवस मला हे लक्षांत आलंय.
    डाॅक्टरनी सांगितलं नाही तुला ?”
    ज्योती मोठ्या बहिणीचा आव आणून ओरडली, “छे: ! कांहीतरी बेवकूफी.
    मी कधी असं ऐकलं नाही.
    त्या पानांचा तुझ्या बरं होण्याशी काय संबंध ?
    तुला तर ती वेल खूप आवडायची !
    असे कांहीतरी विचार करू नकोस.
    डॉक्टर मला म्हणाले की तू वाचण्याची खूप शक्यता आहे.
    आपण मोठ्या शहरांत उलट सुलट जाणाऱ्या वाहतुकीच्या मधून रस्ता ओलांडताना आपण वाचण्याची जेवढी शक्यता असते, तेवढीच शक्यता तुला बरं व्हायची आहे.
    आता थोडी गरमगरम पेज देते, ती घे आणि मला माझं चित्र पुरे करायला जाऊ दे.
    हे चित्र पोंचलं की संपादक आपल्याला पैसे पाठवेल.
    मग तुझ्यासाठी थोडी वाईन आणि मला माझ्या आवडीचे मटन चाॅप खायला आणिन.”
    सुनिता म्हणाली, “माझ्यासाठी वाईन आणायची आता जरूरी नाही.
    तें बघ, आणखी एक पान पडलं.
    नको मला पेजही नको.
    आता फक्त चार राहिली.
    जाण्यापूर्वी मला तें शेवटचं पान पडतांना पहायचं आहे.
    ते पडलं की मीही कायमची अंधारात जाईन.”
    ज्योती तिच्यावर ओठंगून म्हणाली, “सुनिता, मला वचन दे बघू.
    आतां तू डोळे बंद ठेवशील आणि खिडकीबाहेर बघत रहाणार नाहीस.
    मला आता थोडं काम करायचं आहे.
    ती चित्र उद्यापर्यंत पाठवली पाहिजेत.
    नाहीतर मी खिडकीचा पडदा लावून टाकला असता.”
    सुनिता म्हणाली, “तू तुझ्या खोलीत जाऊन काम करशील कां ?”
    ज्योती म्हणाली, “नाही. मला तुझ्याजवळ थांबायचय आणि तुला ती फुटकळ पानंही पाहू द्यायची नाहीत.”
    “तुझं झालं की मला सांग.”
    सुनिता डोळे मिटत म्हणाली.
    ती एखाद्या तांबूस पुतळ्यासारखी पलंगावर पडली होती.
    “मला ते शेवटचं पान पडतांना पहायचं आहे.
    मी ते पडण्याची वाट पाहून थकले आहे,
    विचार करून थकले आहे.
    तें शेवटचे पान वाऱ्यावर कसें भिरभिरत खाली येईल.
    मीही तशीच त्या थकलेल्या पानासारखी भिरभिरत हळूवार खोल, खोल अंधारात जाईन.”
    ज्योती म्हणाली, “झोप आतां.
    मला आता खालच्या खोलीतल्या बेहरामला मॉडेल म्हणून बोलवायला हवं.
    मला एका म्हाताऱ्या खाणकामगाराचं चित्र मासिकाला पाठवायचय.
    मी दोन मिनिटात परत येते.
    तोपर्यंत उठायचा प्रयत्न करू नकोस.”
    म्हातारा बेहराम वाडिया सुध्दा चित्रकार होता.
    तो त्याच इमारतीत तळमजल्यावर रहात असे.
    त्याचं वय साठाहून जास्त होतं.
    त्याने वाढवलेली दाढी एखाद्या महर्षीसारखी छातीपर्यंत लोंबत होती.
    बेहराम चित्रकार म्हणून अयशस्वी ठरला होता.
    चाळीस वर्षे त्याच्या हातात ब्रश होता पण त्याची कमाई त्याला महिना काढायला सुध्दा अपुरी असे.
    त्याची इच्छा नेहमी एक सर्वोत्कृष्ट चित्र काढण्याची असे परंतु अजून त्याच्या हातून त्या सर्वोत्कृष्ट चित्राची सुरूवातच होत नव्हती.
    अनेक वर्ष अधूनमधून जाहिरातीसाठी एखाद दोन चित्रे काढण्यापलिकडे त्याची मजल जात नसे.
    ज्या चित्रकारांना व्यावसायिक मॉडेलचे मानधन परवडत नसे त्यांच्यासाठी मॉडेल म्हणून काम करून तो पैसे मिळवत असे.
    तो त्याचे आवडते मद्य रोज पीत असे.
    इतरवेळी मात्र तो भडक डोक्याचा होता आणि ज्याच्या त्याच्यावर खेंकसत असे.
    सुनिता व ज्योती ह्या दोघींच पालकत्व मात्र त्याने स्वतःच स्वतःकडे घेतलं होतं आणि त्यांचा संरक्षक असल्यासारखा तो वागे.
    अंगाला मद्याचा वास असलेला बेहराम हलकासा उजेड असलेल्या तळमजल्यावरच्या त्याच्या मठीतील स्टुडीओत भेटला.
    त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्राची २५ वर्षे वाट पहात असलेला बोर्ड कोऱ्या कॅनव्हाससह खोलीच्या एका कोंपऱ्यांत उभा होता.
    अजून त्याच्यावर पहिली रेषा पण काढली नव्हती.
    सुनिताने मनाशी घेतलेलं वेड आणि तीची पानासारखी भिरभिरत खोल जाण्याची भीती ह्याबद्दल ज्योतीने त्याला सांगितलं.
    म्हाताऱ्या बेहरामचे डोळे लाल लाल झाले व तो अशा मूर्ख कल्पनेबद्दलच्या तिरस्काराने ओरडला, “काय ? जगात असेही पागल लोक आहेत की ज्यांना वाटतं त्या फालतु वेलीची पाने पडल्यामुळे मरण येणार आहे !
    मी कधी असली गोष्ट ऐकलेली नाही.
    तुझ्या चित्रासाठी मी मॉडेल म्हणून येऊन तुझ्या पागल मैत्रीणीला मदत करणार नाही.
    बिच्चाऱ्या न्हान्या छोकरीच्या मनांत असला भेदरटपणा तू येऊच कसा देतेस ?”
    ज्योती म्हणाली, “ती खूप आजारी आहे आणि अशक्त झाली आहे.
    तिच्या सततच्या तापाने तिचं मन सैरभैर झालंय आणि वाईट-साईट कल्पना तिच्या मनांत येतात.
    बरं, मिस्टर बेहराम, तुम्ही मॉडेल म्हणून येणार नसेल तर राहू दे.
    पण मी सांगू ?
    तुम्ही काळीज नसलेले फक्त एक नंबरचे चमत्कारीक बाताडे आहांत.”
    “तू पण पगली, येडी डिकरी आहेस,” बेहराम ओरडला, “कोण म्हणतं मी मॉडेलिंग करणार नाही तुझ्यासाठी ?
    गेला हाफ अवर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय की मी तुझ्यासाठी मॉडेल म्हणून काम करेल !
    ओ गॉड, सुनिता सारख्या एवढ्या चांगल्या डीकरीला बिमार पाडायची ही जागा आहे काय ?
    काळजी करू नकोस.
    एक दिवस मी माझं सर्वोत्कृष्ट चित्र काढीन मग आपल्याकडे खूप ‘मनी’ येईल.
    मग आपण सर्व इथून जाऊ.”
    ती दोघं वर गेली तेव्हां सुनिता गाढ झोपली होती.
    सुनिताने खिडकीचा पडदा बंद केला व हाताने बेहरामला दुसऱ्या खोलीत यायला खूण केली.
    बाजूच्या खोलीच्या खिडकीतून दोघांनी एक भयभीत नजर त्या वेलीवर टाकली.
    मग दोघांनी एकमेकांकडे न बोलतां क्षणभर पाहिलं.
    सतत पावसाच्या थंड धारा वर्षत होत्या आणि मधे मधे बर्फही पडत होता.
    म्हातारा बेहराम एका मोडवर, जणू एखाद्या दगडावर टेकून म्हातारा खाण कामगार बसला आहे, अशी पोज घेऊन बसला.
    एका तासाच्या झोपेनंतर ज्योती जेव्हा दुसऱ्या दिवशी जागी झाली तेव्हा तिला खिडकीच्या हिरव्या पडद्याकडे सुनिता आपली खोल गेलेली नजर लावून बसलेली दिसली.
    ज्योती उठलेली दिसताच ती हलक्या पण हुकमी आवाजात म्हणाली,
    “उघड तो पडदा. मला पहायचंय.”
    ज्योतीने नाराजी दाखवतच तो पडदा बाजूला केला.
    पण काय आश्चर्य !
    त्या काळरात्री झोडपणारा पाऊस आणि वादळी वारा ह्यांना तोंड देऊन सुध्दा त्या वेलीचे भितीलगतचं एक पान अजून टिकून होतं.
    ते वेलीवरचं शेवटचं पान होतं.
    त्याच्या देठाजवळ ते अजूनही गडद हिरवं होतं.
    त्या जून व विरलेल्या पानाच्या कडा पिवळसर दिसत होत्या पण ते फांदीला धीटपणे घट्ट चिकटून उभं होतं.
    सुनिता पुटपुटली, “हे शेवटचं पान आहे.
    मला वाटलं होतं की रात्रीच पडलं असेल.
    मी वाऱ्याचा आवाज ऐकला.
    आता ते आज पडेल.
    त्याच वेळी मी पण जग सोडून जाईन.”
    ज्योती सुनिताची उशी नीट करत म्हणाली,
    “अग, माझ्या प्रिय सखये, कांहीतरी माझा विचार कर.
    तू अशी गेलीस तर माझं काय होईल ? मी काय करू ?”
    सुनिताने उत्तर दिलं नाही.
    जेव्हा माणसाचा आत्मा दूरच्या अनोख्या सफरीवर निघायची तयारी करत असतो, तेव्हा तो अगदी एकाकी असतो.
    मनातल्या त्या विचारांनी तिची इतकी पकड घेतली होती की केवळ मैत्रीचेच नव्हे तर एक एक करून सगळेच बंध हळूहळू गळून पडत होते.
    दिवस ढळला, संध्याकाळ झाली तरी ते एकाकी पान फांदीला लगटलेल्या आपल्या देठानिशी भिंतीलगत दिसत होते.
    पुन्हा त्या रात्रीही उत्तरेकडून येणारा वारा घोंघावतांना ऐकू येत होता.
    पाऊस खिडकीवर थडथडत होता.
    वरच्या छोट्या पट्टीतूनही पाणी आत शिरत होतं.
    जेव्हां सकाळी पुरेसा उजेड आला तेव्हा कठोरपणे सुनिताने ज्योतीला पडदा दूर करायला सांगितले.
    त्या वेलीवरचे ते पान अजून तिथेच होते.
    सुनिता बराच वेळ त्या पानाकडे पहात राहिली.
    ज्योती आत स्टोवर चिकन सूप तयार करत होती.
    सुनिताने तिला हांक मारली.
    ती येताच सुनिता म्हणाली, “मी वाईट वागले.
    मी कशी दुष्टपणा करत होते हे दाखवण्यासाठीच कशाने तरी ते पान तिथेच राहिले आहे.
    मरावसं वाटणं, हे पाप आहे.
    हे आता मला उमगलं.
    मला सूप आणि पेज दे.
    मी घेईन थोडं, थोडं.”
    थोडं थांबून ती म्हणाली, “नंतर थोडं दूधही दे, त्यांत थोडा मध घालून आणि जरा उशा लावतेस इथे म्हणजे मी बसेन आणि तुला काम करतांना पाहू शकेन.”
    एका तासानंतर सुनिता म्हणाली, “ज्योती, मला आशा आहे की मी कधीतरी मानस सरोवराचे रम्य चित्रण करीन.”
    दुपारी डॉक्टर खन्ना आले आणि त्यांनी सुनिताला तपासले.
    डॉक्टरांना सोडायला ज्योती बरोबर गेली.
    डॉक्टर तिचा हात हलकेच थोपटत म्हणाले, “आता ती वांचण्याची पन्नास टक्के शक्यता आहे.
    तिची योग्य काळजी घे, तू ही लढाई जिंकशील.
    मला आता जायला पाहिजे.
    तळमजल्यावर दुसरा पेशंट बघायचाय.
    कोणी बेहराम वाडिया नांवाचा चित्रकार आहे म्हणे.
    बहुदा त्यालाही न्यूमोनिया झालाय.
    तो म्हातारा आणि अशक्त आहे आणि त्याला आलेला तापाचा झटका जबर आहे.
    तो वाचण्याची कांही आशा नाही पण आज त्याला हाॅस्पिटलमधे हलवतो आहोत.
    तिथे त्याला थोडा आराम तरी मिळेल.”
    दुसऱ्या दिवशी सुनिताला तपासतांना डॉक्टर ज्योतीला म्हणाले, “आता हिला धोका नाही. तू जिंकलीस.
    आता फक्त चांगला आहार व थोडं लक्ष ठेव. तेवढं पुरे आहे.”
    दुपारी सुनिता पलंगावर पडली होती तिथे ज्योती आली.
    सुनिता एक निळा स्कार्फ उगाचच विणत होती.
    सुनिताभोवती हात लपेटत ज्योती म्हणाली, “सुनिता, ससुली, मला तुला कांही सांगायचंय !
    मिस्टर बेहराम आज हॉस्पिटलांत मरण पावला.
    तो फक्त दोनच दिवस आजारी होता.
    गुरख्याने पहिल्या दिवशी तळमजल्यावरच्या खोलीत त्याला तापाने फणफणलेला आणि वेदनांनी तळमळत असलेला पाहिला.
    त्याचे बूट भिजलेले होते.
    त्याचे कपडे ओले होते.
    त्यातून पाणी निथळतं होतं.
    सगळं अगदी बर्फासारखं थंडगार होतं.
    त्यांना कल्पना येईना की एवढ्या वादळी पावसांत तो कुठे गेला होता ?
    मग त्यांना एक शिडी वाटेत पडलेली दिसली.
    जवळच एक कंदील अजूनही पेटलेलाच होता.
    तिथेच ब्रश पडले होते.
    रंगाची ताटली होती.
    तिच्यात पिवळा आणि हिरवा रंग तयार केलेले दिसत होते.
    सुनिता, जरा खिडकीतून बाहेर त्या भिंतीवरलं वेलीचं शेवटचं पान पहा.
    आपल्या लक्षांत कसं नाही आलं की एवढा वारा वहात असतांना ते पान जरा देखील कसं हललं नाही ?
    माझ्या प्रिय मैत्रिणी, ती बेहरामची सर्वोत्कृष्ट कलाकृती होती.
    ज्या रात्री ते शेवटचं पान पडलं, त्याच रात्री तिथे जाऊन भिंतीवर त्याने ते पान रंगवलं.”
    -- अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - द लास्ट लीफ्
    मूळ लेखक - ओ हेन्री
  • पैलं …जे आसन ते

    मरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय

  • वटपौर्णिमा (कथा)

    मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस वसरीतुन उठत त्यानं नेमकच पाणी शेंदुन आलेल्या बायकोल,ईमलीलं चहा कर आसं मनलं.तस वस्काळतच ईमली त्यालं मनली,“घरात गुळ ,साकर्‍या,पत्ती कशाचाच पत्त्या नाय….सगळे डब्बे तुमच्यासारखेच ठणठण गोपाळ झालेतं.आज वडपौर्णिमेचा सन हे.जरा दुकानावर जाऊन किराणा माल आणा.काय बाई किती वढाव एकटीन संसार. या माणसाचं बिलकुल जरासं सुद्धा घरात लक्ष नाही.मी आहे म्हणून टिकली या घरात….दुसरी कोणी टिकली नसती. काय पाहून बापानं मलं या घरी दिलं काय माहीत.कोण्या जन्माचा सुड काढला बापाणं काय ठाऊक माय…. ये पोर्‍हयवो काय हुडदंग माजवलाय रे….ईकडं या .ईथ बसा मह्यापुढं अभ्यासालं.”

  • निस्सीम प्रेम

    नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या तासाला कोणी दांडी मारत नसे.