आटपाट नगर होतं, तिथं एक भाऊ रहात होता. त्याला एकुलती एक बहीण होती. दोघांचा एकमेकांवर भारी जीव असायचा. तर एकदा काय झालं की, ह्या भावाच्या घरी त्याची ही बहीण माहेरपणाला आली, भावाला मोठा आनंद झाला. फार दिवसांनी बहीण भेटली म्हणून तो हारखून गेला. बहिणीसाठी काय करू नि काय नको असं त्याला झालं. म्हणून तो आपल्या बायकोला म्हणाला कसा, “अग, आज चांगल्या पोळ्या कर पुरणाच्या. माझ्या पंक्तीला माझी बहीण बसू दे.” तशी ती त्याच्या तोंडावर “बराय’ म्हणाली. पण ती पडली मुलखाची द्वाड. तिनं नवऱ्याचं ऐकलं नाही. त्याच्या एकट्यापुरत्या व आपल्यापुरत्याच तेवढ्या पुरणाच्या पोळ्या केल्या. आणिक बहिणीसाठी कणकीच्या कोंड्याच्या रोट्या केल्या.
सैपाक झाला. पाट मांडला. भाऊ जेवायला बसला. बहिणीला म्हणाला, ‘ये बाई, संगं जेवू या.” पण त्याची बायको म्हणाली, “अं हं! बाप्या माणसांच्या पंक्तीला कुठं बायका बसत्यात व्हय? मी हाय की दिवानसाबासंग जेवायला?
तुमी जेवा म्होरं बघून.” ह्याला ते खरं वाटलं. तो जेवला खावला. निघून गेला.
पण बहिणीच्या ताटातील कोंड्याची रोटी तिला जाईना. ती उपाशीच राहिली.
होता होता चार दिवस असेच आले न् गेले. बहीण बिचारी कंटाळली.
उपासमार तरी कुठवर काढायची? पण भावाला बोलली नाही. घरी जाते म्हणाली. भावानं आग्रह केला. चार दिवस आणखी रहा म्हणाला पण नाही म्हणाली. गेलं पाहिजे म्हणून तिनं नेट धरला. म्हणून मग हा चोळीपातळ आणावं म्हणून बाजाराला निघाला. तर बायको आडवी आली. म्हणाली, “तुम्ही नको जाऊ. मी आणते.” आणिक स्वतः बाजारात गेली.
तिथं तिनं चोळी पातळ घेतलं; पण कशावरून तरी वाद झाला. दुकानदारावर ती कडाडली, “माझी मला खळखळी दे नि तुझी पातळ चोळी घे.” झालं, तिथं ही मारामरी जुंपली. तशी ही रडत ओरडत घरी आली. अशानं असं झालं म्हणून तिनं हा मोठा आकांत मांडला. तशी बहीण म्हणाली, “नको चोळी पातळ! तशीच जाईन मी.” मग भाऊ म्हणाला, ‘लाटीव वड्या ने भाकर तरी दे बांधून, वाटला हुईल.”
त्यावर हिनं “हूं’ म्हटलं, पण वड्या भाकरीच्या ऐवजी तिनं एका फडक्यात शेणकुटं बांधली. बहिणीला बिचारीला काय माहीत हिचा कावा? ती मुकाट्यानं हे गाठोडं घेऊन निघाली. ओझं लागलं तशी थबकली, बोलली मात्र नाही.
भावजयीकडे बघून तशीच वळली.
तर अर्धा निम्मा रस्ता ओलांडल्यानंतर तिचं बारकं पोरगं भूक लागलीय म्हणालं, म्हणून ही थांबली. गोठोडं उघडलं, बघतीय तर शेणकुटं! आता काय करावं? पोरानं तर रडून रडून हैदोस घातला. काय तरी, कुठं तरी गवसतंय का बघावं म्हणाली. उठून विहिरीकडे निघाली. रड रड रडली. तशी शंकरपार्वतीला काळजी पडली. त्यांनी माणसाचं रूप घेतलं. हिच्यासमोर ते आले. काय पाहिजे म्हणून त्यांनी हिला विचारलं. तशी हिनं झाली गोष्ट साईनसंगीत देवाच्या कानावर घातली, आणिक म्हणाली कशी, “पोराला काय घालू खायला? गांवचा पल्ला लई लांब हाय अजून.”
त्यामुळे मग पार्वती म्हणाली, “त्या शेजारच्या मळ्यात जा. तिथं तुला एक मोठा भोपळा दिसेल. तोडून घे. घरी ने. चिरून उकडत घाल. तुझ्या मनासारखं हुईल.” हिनं तसं केलं. घरी गेल्याबरोबर बिगीनं भोपळा चिरून चुलीवर शिजत ठेवलान् नदीला पाणी आणायला गेली.
इकडे तोवर शेजारणी जमल्या. काय शिजत लावलंय म्हणाल्या. कुणाला दाद लागली नाही. आपल्यातच कुजबुजल्या. माघारी गेल्या. चुलीवरचा हंडा उघडून बघितला तर मोकळा दिसला म्हणून पुटपुटत गेल्या. इतक्यात बहीण घरी गेली. तिनं चुलीवरचा हंडा उचलून खाली उतरला. बघतेय तर हंडा वजनदार झालेला आणि सोन्यानं गच्च भरलेला! तिचं भान हरपलं. नवऱ्याला सांगत गेली. अशानं असं झालं म्हणाली. देव पावला म्हणून हरखली. तिनं कोरभर भाकरीएवढा सोन्याचा तुकडा काढून घेतला. बाजारला गेली. दागिने केले. सामानसुमान आणलं. कपडालत्ता केला.
होता होता मग एकदा काय झालं की, एका बाजारात भावजयीनं तिला बघितलं. तिच्या अंगावरचा चांगला कपडालत्ता आणि दागदागिना बघून तिला मोठं नवल वाटलं. एवढं हिनं कुठून आणलं म्हणाली. आणि मग तिनं आपल्या घरचं गाठोडं हिनं चोरलं म्हणून तिच्यावर आळ घेतला. नवऱ्याचे चांगले कान भरले. नवऱ्याला पण तिचं बोलणं खरं वाटलं. तो बहिणीवर रागावला. तावातावानं तिच्या घरी आला. भला मोठा दगड घेऊन आला. जेवला नाही. बोलला नाही. बहिणीची नजर चुकवून एका तुळीवर जाऊन बसला. बहिणीला मारायला टपला.
बहीण जेवली नाही. मुलांना तिनं जेवू घातलं, नवऱ्याला जेवू घातलं. काम आवरून ती समईजवळ आली. आणि आता भाऊ तिच्या डोक्यात दगड घालणार तितक्यात ही म्हणाली कशी, “ऐक समुईबाई, फार दिसांनी भावाला भेटायला गेले. भाऊ पुरणाची पोळी कर म्हणाला. पण भावजयीनं मला कोंड्याची रोटी वाढली. भावाच्या पंक्तीला बसू दिलं नाही. भावाला लुगडं चोळी करू दिली नाही. खुळखुळीवर भांडण काढलं. केला सौदा मोडला. आणिक बरं का समईबाई, मी यायला निघाले. भाऊ म्हणाला, लाटीव वड्या ने, भाकरी ने.
हिनं शेणकुटं बांधून दिली. वाटेवर पोरगं रडलं, भूक लागली म्हणालं, पण गाठूडं सोडतीया तर अगं, आत शेणकुटं बरं का? देवाला दया आली. शंकरपार्वती माणूस होऊन आली. मला भोपळा दिला. घरी नेऊन व चिरून शिजवा म्हणाली. मी तसं केलं. हंडा सोन्यानं भरला. नशीब उजाडलं. मी घर सजवलं, दागिने केले, चांगलं लुगडं घेतलं आणिक बरं का समईबाई, भावजयीनं घरचं गाठूडं चोरलं म्हणून माझ्यावर आळ घेतला. भावाचे कान भरले. आणिक बरं का समईबाई तो मला मारायला आता आलाय! तुळीवर दगड घेऊन बसलाय.
यंदाची हीच माझी भाऊबीज. समईबाई, माझ्या भावाला संभाळ. उदंड आऊक्ष दे, दिवाळी तुझ्या रूपानं आलीय.”
भावानं हे सारं ऐकलं. तो उठला. गहिवरला. दगड बाजूला टाकला. धावत बहिणीकडे आला. त्यानं बहिणीच्या पायावर डोकं ठेवलं. ढसाढसा रडला.
झाली गोष्ट समजली म्हणाला. चुकी झाली बोलला.
बहिणभाऊ कडकडून भेटले. प्रेमाने बोलले बसले. समाधानानं जेवले खावले. त्यांच्या मनाला आनंद झाला. भावानं बायकोला बेदम ठोकली. सारी धनदौलत बहिणीकडे घेऊन आला. म्हणाला, “ही घे भाऊबीज” पण बहीण शहाणी होती. “बोललास त्यातच पोट भरलं’ म्हणाली. तिनं भावजयीला बोलावून तिचा सन्मान केला. भावाची धनदौलत धक्का न लावता परत दिली.
म्हणाली, “भाऊ भेटला. पंक्तीला जेवयाला मिळालं. भाऊबीज साजरी झाली.”
सगळीकडे मग आनंदी आनंद झाला. आमची कहाणी संपली. तुमची तहान भूक हरपली.