अंशू हा एक विचित्र मुलगा होता. नको ते करण्यात पटाईत होता. एकदा मात्र
त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला. आपण फेकलेल्या जाळ्यात तो स्वत:च
फसला.
अंशू एके दिवशी रस्त्याच्या कडेला बसला होता. त्याला मासे फार
आवडायचे. बसल्या बसल्या मासे पकडायला जायचा बेत त्याच्या डोक्यात
घोळत होता. आकाश तसे निरभ्र होते आणि मासेमारीसाठी तर फारच उत्तम
होते. चांगले मासे मिळाले तर खायलाही होतील, आणि उरले तर बाजारात
विकून चार पैसेही मिळवता येतील; मग आपल्याला हव्या त्या वस्तू खरेदी
करता येतील या मनोराज्यात तो हरवला होता. आपल्याला मासे मनापासून
आवडतात ही गोष्ट मात्र त्याला कुणाला कळू द्यायची नव्हती.
अंशू आपल्या दिवास्वप्नातून बाहेर आला. मासे पकडायचे तर आपल्याला
आधी जाळे तयार करावे लागेल, ते पाण्यात टाकून रोज किती मासे गळाला
लागले ते अधूनमधून जाऊन पाहावे लागेल. हे सगळे काम तसे मेहनतीचे होते.
ते कसे पार पाडायचे याचा विचार करीत असतानाच त्याला एक अफलातून
कल्पना सुचली आणि तो स्वत:शीच म्हणाला “आपल्याला एक जोडीदार
शोधायला हवा!”
लगबगीने तो गावात गेला. भेटेल त्याला आपल्या व्यवसायात भागीदार
बनण्याची गळ घालू लागला. पण कुणीच पुढे येईना. सर्वांनी त्याला सांगितले, ”
अंशू, अरे आम्ही तुला चांगले ओळखतो. तुझ्याबरोबर धंदा करायचा, म्हणजे तू
सर्व काम आमच्याकडून करून घेणार, आणि मलिदा मात्र तू खाणार!” लोकांचे
हे बोलणे अंशूला लागायचे. पण त्यांच्या बोलण्यात अगदीच तथ्य नव्हते असेही
नसल्याचे त्याचे मन सांगत होते. निराश होऊन तो म्हणायचा, “अरे, स्वत:च्याच भागीदाराला मी कसा काय रे फसवेल?’ लोकांना मात्र त्याच्या या बोलण्याचे हसे यायचे. म्हणायचे, “ तुझे बरोबर आहे अंशू. खरोखर महामुर्ख असेल तोच तुझ्या बरोबर भागीदारी करेल.” त्या दिवशी बाजारपेठेत ओनिनीच्या कानावर आले की, अंशू एका मूर्ख भागीदाराच्या शोधात आहे. दुपारी जेवणाची वेळ झाली होती, तेवढ्यात
अंशूला ओनीनी दिसला. तो तसाच त्याच्याकडे चालत गेला आणि म्हणाला,
ओनीनी, अरे मी तुला कधीचा शोधतो आहे. माझ्याकडे उद्योगव्यवसाय
करण्याची एक भारी योजना आहे. इतर कुणाला संधी देण्याच्या आधी प्रथम
तुलाच मी त्यात भागीदार होण्याचे आमंत्रण देतो.” अंशूला वाटले ओनिनी तसा
अगदी साधा सरळ मुलगा आहे, उगाच कुणाला पाणचट जोक सांगत बसण्यात
त्याला रस नव्हता. तसा तो फार बोलघेवडाही नव्हता.
”
आपल्या मनात काय दडले आहे, याची अजिबात चाहूल लागू न देता
ओनीने धीरगंभीर आवाजात अंशूला विचारले, “ अंशू तुला नेमके काय हवे
आहे?” “मला तुझ्याबरोबर व्यवसायात भागिदारी करायला आवडेल?” अंशू
म्हणाला.
“भागिदारी, आणि ती कशाची?”ओनीनीने विचारलं. “मत्सोद्योग!” अंशूनं उत्तर दिलं.
“मला वाटतं, ही फारच उत्तम कल्पना आहे!” ओनीनीने अगदी सभ्य शब्दांत
सांगितलं. अंशू गालातल्या गालात हसला. अखेर त्याला एक महामुर्ख भागीदार
मिळाला होता. सगळ्यांनी अंशू तुला फसवेल असा ओनीनीला धोक्याचा
इशारा देण्याचा प्रयत्न केला. पण ओनीनी त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली
नाही. जरासं हसू ओठावर आणून तो गप्प रहायचा. भल्या पहाटे उजाडता उजाडता अंशू आणि ओनीनी जंगलात जायला निघाले. ओनीनीला कसे उल्लू बनवायचे आणि सगळे काम त्याच्याकडून कसे करवून घ्यायचे याची पद्धतशीर योजना अंशूने आखली होती. आपल्या नियोजित जागेवर पोहचताच त्यांना माशाचे जाळे बनविण्यासाठी
अगदी योग्य असे वेताची झुडपे सापडली. ओनीनीने चटकन त्याच्याकडचा
चाकू बाहेर काढला आणि अंशूला म्हणाला, “ आपण दोघे भागीदार आहोत,
तेव्हा आपण आपले काम वाटून घ्यायला हवे.” अंशूला अर्थातच काम वाटून
घेण्यात मुळीच रस नव्हता, तरीही मान हलवून त्याने आपली संमती दर्शविली.
ओनीनी म्हणाला, “पहिल्यांदा आपण झुडपातून वेताची पाती कापून
घ्यायला हवीत. मी कापायला सुरुवात करतो.”
अंशू म्हणाला, “मग मी काय करायचे?”
“तू कशाला माझ्यासाठी थकतोस? मलाच जर पाते कापायचे आहेत, तरतू
कशासाठी त्रास घ्यायचा हे काही मला कळत नाही?” ओनिनी म्हणाला.
काय” अंशू जवळपास ओरडलाच. म्हणाला, “मलाच का पाते कापू देत
नाहीस? तोपर्यंत तू विश्रांती घे.”
“पहा बुवा, तू म्हणशील तसे.” असे म्हणून ओनिनी झाडाच्या सावलीत
जाऊन बसला.
सूर्य माथ्यावर येईपर्यंत अंशू वेत कापीत होता आणि ओनीनी झाडाच्या
सावलीत स्नायू सैल करण्यासाठी व्यायाम करीत होता. त्यांना हवे तितके वेत
मिळाल्यावर ओनीनी अंशूला म्हणाला,
“खरं तर माझ्या पाठीत चमक भरली आहे, पण तू माझी चिंता करू नकोस.
मी आतापर्यंत विश्रांती घेतली होती, आता हे सर्व वेत पाण्यापर्यंत वाहून नेण्याचे
काम मी करतो.
“नाही, तू मुळीच नाही” अंशू ओरडला. “मी वेत वाहून नेतो, तोपर्यंत तू
पाठीला आराम दे.”
ओनीनीने ‘आई ग, बाई ग’ करीतआपल्याला खांद्यातून कळा येत असल्याने
खूप दुखत असल्याचे भासवले. ते पाण्यात पोहचेपर्यंत ओनीने गवतात लोळण
घेतली आणि जणू काय आपल्या पाठीवर पहाड कोसळला आहे इतक्या वेदना
होत असल्याचे दाखवले.
“आता काय?” म्हणून अंशूने प्रश्न केला. त्याला वाटलं आता पुढचं काम सोपं
आहे, ओनीनी ते करेल. “ठीक आहे. आता आपण वेतांचे जाळे विणू या. मी विणतो जाळं. तोपर्यंत तू माझ्या मानेला आणि ताठरलेल्या बोटांना मसाज करून दे.” ओनीनी म्हणाला. अंशूने त्याला थांबवलं. म्हणाला, “मूर्ख आहेस का? मी विणतो जाळं.
तोपर्यंत तू तुझ्या दुखऱ्या मानेला आणि ताठरल्या बोटांना विसावा दे.”
ओनीनीने तत्काळ मान्य केलं आणि अंशू जाळं विणायला बसला. ओनीने
आपल्याला बरंच दुखत असल्याचं नाटक केलं. ओनीनीचं दुखणं पाहून अंशू मिष्किलपणे हसला. ओनीनीला आपण जंगलात आणून कसं मुर्ख बनवलं या कल्पनेनं मनातल्या मनात सुखावला. जाळं तयार झालं. ओनीनी उठला आणि ते गोळा करू लागला.
“काय करतो आहेस? अंशू पुन्हा त्याच्यावर ओरडला. “अरे कुणाला तरी हे काम करावंच लागणार ना? शेवटी आपण भागीदार आहोत. काम वाटून घ्यायलाच हवं. मी टाकतो जाळं पाण्यात.”- ओनीनीनं उत्तर दिलं.
“मग मी काय करायला हवं?” काहीशा संशयानंच अंशूनं विचारलं.
“तिकडे शार्क आहेत. जर माझ्यावर त्यांनी हल्ला केला तर एक भागीदार
म्हणून तू माझ्यासाठी मरण पत्करशील का? ” ओनीनीनं उत्तर दिलं.
“वा! अरे दे माझ्याकडे ते जाळे. मी उतरतो पाण्यात. जर शार्क मला
चावायला आले, तर तू माझ्यासाठी मरण पत्कर.” अंशू म्हणाला. आणि अंशू
जाळं घेऊन खोल पाण्यात उतरला आणि त्याने तिथं जाळं पसरलं.
आता दुसऱ्या दिवशी सकाळी किती मासे गळाला लागले हे पहायला आपण
बरोबरच येऊ, असा आपापसात करार करून ते दोघे घराकडे परतले. ओनीनी
आपली मान-पाठ सांभाळत घराकडे निघाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते एकमेकांना भेटले. पुन्हा एकदा अंशू पाण्यात
उतरला. दोन मोठे मासे जाळ्यात अड्कलेले त्याला दिसले. अंशू त्यांची वाटणी
करून छोटा ओनीनीला द्यायचा विचार करीत होता. परंतु ओनीनी म्हणाला,
“नको. आधीच हे मासे छोटे आहेत; तेव्हा आज तू ते दोन्ही मासे घे. उद्या
कदाचित जास्ती मासे गळाला लागतील, जे मिळतील ते सर्व मी नेईन.”
वास्तविक ते दोन्ही मासे पुरेसे मोठे होते. पण ओनीनी म्हणाला म्हणून
अंशूला ते छोटे वाटू लागले. अंशू ओनीनीला म्हनाला, “नको आज तू हे दोन्ही
मासे ने. उद्याचे मी घेईन” आणि अखेर ओनीनीने ते दोन्ही मासे पदरात पाडून
घेतले.
दुसऱ्या दिवशी चार मासे मिळाले. अंशू उपहासाने ओनीनीला म्हणाला, ”
काल दोन मासे घेऊन तू अखेर मुर्खच ठरला. मला बघ कसे घसघशीत चार
मासे मिळाले.” ओनीनी हसून म्हणाला, “मला मोठी गंमत वाटत आहे, कारण
उद्याचे मासे मला मिळणार आहेत, आणि ते आजच्या दुप्पट आणि आजच्या
पेक्षा मोठेही असू शकतात. अंशू गोंधळला. पण स्वत:ला सावरत तो ओनीनीला म्हणाला, “असे कर आज तू हे चारही मासे घेऊन जा. मी उद्या पकडेल.” ओनीनीने पुष्कळ
समजावले, पण अंशूला ते पटले नाही. आजही चार मोठे मासे घेऊन अनीनी
घरी परतला.
”
नंतरच्या दिवशी पुन्हा दोघे जाळे पहायला गेले. आता भरपूर मासे गळाला
लागले होते. पण त्यातले बरेच मासे अगदी छोटे होते, काहींना सडल्यामुळे घाण
वास येत होता. अंशू नाराज झाला. पण ओनीनीने त्याला दिलासा दिला.
म्हणाला, बाजारात सर्व प्रकारचे मासे विकले जातात. याही माशांना काहीना
काही किंमत येईलच की.” अंशूला ते पटले. काहीना काही रोकड रक्कम हाती
लागेल या आशेने तो ते मासे बाजारात घेऊन गेला. बाजारात गेल्यावर त्या सडक्या माशांचा घाण वास पसरला. लोक रूमालात नाक धरून अंशूकडे तिरस्काराने पाहू लागले. तेवढ्यात बाजारातला एक मुखीया तेथे आला. असले घाण मासे बाजारात आणून अंशूने आपल्या बाजाराच्या नावलौकिकाला डाग लावला म्हणून त्याने अंशूची पिटाई केली. बाजारातल्या एका म्हातारीला ओनीनी भेटला. तिने ओनीनीला बाजारात
घडलेली हकिगत सांगितली. म्हातारी त्याला म्हणाली, “अरे तुझ्या मित्राची
बाजारात पिटाई होत आहे, आणि तू इकडे काय करतो आहेस? तू त्याचा
भागीदार आहे ना? मग त्याची पिटाई होताना त्याच्याबरोबर तुही वार सोसले
पाहिजेत.” म्हातारीच्या तोंडून घडलेली हकिगत ऐकून ओनीनी स्वत:शी म्हणाला,
“कोणी कुणाला मुर्ख बनवले, हे आता अंशूला कळेल. तो लगोलग बाजारात
गेला. तिथे प्रत्येक जण अंशूची फजिती पाहून पोट धरधरून हसत होते. एका
महिलेने ओनीनीला सांगितले, “अरे तो तुझा मित्र सारखी तुझी आठवण काढीत
ओरडत होता. ‘कुठे गेला तो माझा भागीदार मित्र? आता माझी एवढी पिटाई
झाल्यावर निदान वेदना वाटून घ्यायला तरी समोर ये!”