नागराणीचा मुकुट

एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली



(स्वित्झर्लंडची लोककथा)

एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली. राजा आणि राजकन्या पुढं होऊन हे खेळ पाहत होते. सापाला असं हातात खेळविताना बघून राजकन्येला किळस आली. ती एकदम बोलली, ‘ईऽऽ, कसलं घाणेरडं जनावर!’ हे शब्द गारुडिणीच्या कानावर पडले. ती दूर होती. तिनं डोळे वटारून राजकुमारीकडे पाहिलं. मग नागाचे खूप लाड करुन त्याच्या फणीवर तोंड टेकून त्याचा पापा घेतला. हे बघून तर राजकुमारीला राहवलंच नाही. ती एकदम ओरडली, ‘शी: शी: !’ गारुडणीचा चेहरा एकदम बदलला. तिनं डाव्या हातानं नागाला आपल्या डोक्यावर मुकुटासारखं ठेवलं, उजव्या हातानं बगलेतली जादूची कांडी काढली आणि राजकन्येच्या पुढे येऊन तिच्या तोंडावरून ती तीन वेळा गोल गोल फि रवून म्हटलं, ‘पोरी, माझ्या नागाचा शीः शीः म्हणून अपमान करतेस? तर घे, आत्ता लगेच तू नागीण हो!’ राजा घाबरून ‘अरे अरे’ म्हणून पुढं सरकतोय् एवढ्यात राजकन्या नागीण होऊन जमिनीवर सरपटू लागली. तिला अतिशय पश्चाताप झाला असावा असं तिच्या डोळ्यांवरून दिसत होतं. केविलवाण्या नजरेनं ती आपल्या बापाकडं पाहत होती. राजाला भयंकर राग आला. त्यानं कमरेला असलेल्या म्यानातून तलवार उपसली. ‘अग दुष्टे,’ असं म्हणत तो तिला मारायला धावला. पण गारुडिणीनं पुनः आपली कांडी उंच करून राजाच्या तोंडापुढं उभी धरली.

ताबडतोब राजाचा हात खालच्या खालीच राहिला अन् त्याचे शब्द तोंडातल्या तोंडातच राहिले.

गारुडिणीनं आपली जादूची कांडी नागिणीच्या शेपटीला लावली आणि हुकूम केला, ‘चल चालू लाग इथून. बापाच्या कोडकौतुकात नाही राहू देणार मी तुला. नागिणीचं रूप आलंय् तर नागिणीचं सुख-दुःख भोग, म्हणजे तुला अभागी जीवांशी कसं वागावं ते समजेल!’ सर्रसर्र करीत नागीण निघून गेली. कुठं गेली कुणालाच कळलं नाही.

राजाला आता आपण किती दुबळे आहोत याची जाणीव झाली. गारुडीण म्हणाली, ‘राजा, मी तुला ओळखलं. तू राजा आहेस; पण राजसत्ता म्हणजेच जगात सर्व काही असं समजू नकोस. जगात सगळंच राजाच्या इच्छेप्रमाणं घडावं असा कायदा नाही. मुलीला लाडात वाढवून दुसऱ्याचा तिरस्कार करायला शिकवलंस, दुसरं काय केलंस? ‘ राजा आता गारुडिणीपुढे गयावया करू लागला, जमलेले लोक सारं पाहत होते. राजाच्या डोळ्यांत पाणी आलं. तो म्हणाला, ‘माझ्या मुलींकडून अपराध झाला, मी त्याची माफी मागतो. मला माझी एकुलती एक मुलगी परत दे !

गारुडीण म्हणाली, ‘मुलीला मी नागीण केलं असलं तरी मी काही ईश्वर नाही.

मी शाप देऊ शकते; पण तो मागं घेण्याची मला शक्ती नाही!’ तरी राजा तिच्यापुढे वाकून गयावया करीत राहिला. तेव्हा गारुडीण म्हणाली, ‘राजा, मी शाप काही परत घेऊ शकत नाही; पण तुझी मुलगी राजमहालात वाढली आहे, तर तिला मी नागलोकाची राणी बनवीन. राणी झाल्यामुळं ती सुखानं नागलोकात राहील. एवढं मी करू शकते.’ राजा ऐकत राहिला. गारुडीण पुढं म्हणाली, ‘नागराणीच्या डोकीवर राहील एवढा लहानसा शुद्ध सोन्याचा मुकुट बनवून तू घेऊन ये. आजपासून चौथ्या दिवशी याच वेळेला मी तुला इथं भेटेन. तेव्हा तो मुकुट तू मला दे. तो मी तुझ्या मुलीकडं पोचवीन. मात्र लक्षात ठेव, मुकुटाचं सोनं शुद्ध बावनकशी असलं पाहिजे. तो मुकुट राणीच्या डोक्यावरच राहून झिजत जाईल. तो सगळा झिजेपर्यंत तुझी मुलगी नागीण राहील.’ ‘बापरे !’ राजाच्या तोंडून किंकाळी निघाली. ‘ही म्हणजे युगायुगांची गोष्ट झाली!’ गारुडीण म्हणाली, ‘सोनं जितकं शुद्ध असेल, तितक्या लवकर ते झिजेल किंवा दुसरं म्हणजे कोणी त्या मुकुटाचा शेवटचा मालक होईल आणि नरकात जाईल. तेव्हा नागिणीच्या रूपातून तुझ्या मुलीची सुटका होईल!’ एवढं सांगून आणि ‘आजपासून चौथ्या दिवशी याच वेळी इथं अशी आठवण देऊन गारुडीण आपल्या नागाला घेऊन निघून गेली.

राजानं राजमहालात येऊन ताबडतोब कारागिरांना बोलावून आणलं आणि शुद्ध सोन्याचा छोटासा मुकुट बनविण्याचा हुकूम केला. मुकुट तीन दिवसात पाहिजे असं सांगितलं. कारागीर कामाला लागले. तीन दिवस पुरे होण्यापूर्वीच एक लहानसा सुरेख मुकुट त्यांनी बनवून आणला.

चौथ्या दिवशी राजा तो मुकुट घेऊन ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी गेला.

गारुडीण तेथे हजरच होती. राजानं मुकुट तिच्या हाती दिला आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, ‘माझ्या मुलीवर दया करा!’ मुकुट राजकन्येकडं पोचता झाला. तिच्या डोक्यावर तो ठेवताच जणू तो तिच्या अंगचाच असल्यासारखा बसला. राजकुमारी नागराणी झाली.

नागराणीला सरोवरात जाऊन आंघोळ करण्याची सवय. अंघोळ करायच्या वेळी ती तो मुकुट डोक्यावरून काढून काठावरच्या खडकावर ठेवी आणि मग सरोवरात उतरे. अंघोळ करून बाहेर आली की बेतानं ती आपलं डोकं मुकुटात घाली की मुकुट परत तिच्या अंगचा झाल्यासारखा डोक्याला चिकटे.

हळूळळू त्या प्रदेशातल्या लोकांत बोलवा होऊ लागला की, एक नागीण रोज पर्वतावरच्या सरोवरात येऊन अंघोळ करते, तिच्या डोक्यावर चकचक करणारा सोन्याचा मुकुट असतो, अंघोळ करताना तो मुकुट ती खडकावर काढून ठेवते. अन् अंघोळ झाल्यावर घालून निघून जाते.

नागाच्या मुकुटासंबंधी लोकात नाना तऱ्हेच्या अफवा पसरलेल्या होत्या.

कोणी म्हणे, हा मुकुट धुवून त्याचं पाणी प्यालं तर मरणाच्या दाढेतूनसुद्धा माणूस परत येतो. कोणी म्हणे, धान्याच्या कोठीत हा मुकुट ठेवला तर त्यातलं धान्य संपता संपत नाही. कोणी म्हणे, पैशाच्या थैलीत जर हा मुकुट ठेवला तर त्यातले पैसे कधी कमीच होत नाहीत. मुकुट जरी एकाच्या हातून दुसऱ्याच्या हाती गेला तरी त्याच्या या विलक्षण शक्तीत फरक पडत नाही. पण जर का काही कारणानं मुकुटाचा नाश झाला, तर तो नाश होताना ज्याच्या ताब्यात तो असेल, तो माणूस सैतानाच्या पकडीत सापडतो; आणि सैतानाच्या पंजात सापडलेला कधी सुटूच शकत नाही.

एकदा असं झालं की त्याच भागातला एक गरीब शेतकरी आपल्या गाढवावर बसून जंगल पार करून चालला होता. त्याची वाट त्या सरोवराच्या काठानंच जात होती. गाढवावर बसल्या बसल्या तो इकडं तिकडं पाहत चालला असताना त्याची नजर सरोवराजवळच्या एका काळ्या कुळकुळीत खडकावर गेली. तिथं त्याला झगमग-झगमग करीत असलेलं काही दिसलं. ते काय आहे हे पाहावं म्हणून तो आपल्या गाढवावरून खाली उतरला आणि त्या खडकाकडं गेला. बघतो तो एक लहानसा सोन्याचा मुकुट ! एकदम त्याला लोकांच्या तोंडची अफवा आठवली. नक्की हा त्या नागराणीचाच मुकुट असला पाहिजे.

फार विचार करण्याचा फुरसत नव्हती. त्यानं तो मुकुट उचलला आणि आपल्या बंडीच्या खिशात घातला. झरझर परत येऊन तो गाढवावर स्वार झाला आणि गाढवाला त्यानं टाच मारुन दौडविलं.

काही वेळानं नागराणी अंघोळ करून बाहेर येऊन बघते तर मुकुट कुठं आहे? मुकुट चोरीला गेला हे लक्षात येऊन ती ‘मुकुट चोरीला गेला, चोराला पकडा’ असं ओरडली. त्याबरोबर तिचे नोकर नाग होते ते चोराचा पाठलाग करण्यासाठी सळसळ करीत पळत सुटले.

सापांच्या गतीशी गाढवाची गती काय बरोबरी करणार? थोड्याच वेळात नागांनी गाढवाला गाठलं. गाढवाच्या सभोवर त्या लांब लांब नागांनी वेढा दिला.

शेतकरी समजला, की आता आपली घटका भरली. तो एकदम गाढवावरून उतरला अन् जवळच्याच ओकाच्या झाडावर सरसर चढला. त्याच्या मागोमाग एक दोन नव्हे, अकरा नाग झाडावर चढू लागले.

एक झेप घेऊन शेतकरी झाडाच्या वरच्या भागावर गेला आणि एका फांदीला धरून लटकत राहिला. त्याला नक्की वाटलं की आता हे नाग काही आपल्याला सोडीत नाहीत. चावायला आले तर लाथेनं त्यांना उडवायचं अशा तयारीत तो राहिला. पण काय चमत्कार ! नाग पायापाशी येत होते, फूं फूं करून चढू पाहत होते; पण त्याला चावत नव्हते. त्यामुळं त्याच्या जिवात काहीसा जीव आला, हा चमत्कार काय आहे हे त्याला कळेना. तेवढ्यात त्याची नजर झाडाच्या खोडांच्या ज्या भागाला धरून तो लटकत होता त्या भागावर गेली. त्याच्या लोंबत्या पायाजवळच एका खोबणीत एक लाकडाची मूर्ती बसविलेली होती. ही कोणा संतपुरुषाची मूर्ती असली पाहिजे, त्याच्या पुण्याईमुळेच हे नाग आपल्यापर्यंत पुढं सरकत नाहीत, असं त्याला दिसलं. खात्री करून घेण्याकरिता त्यानं आपला पाय थोडा त्या मूर्तीच्या खाली केला तोच सगळे नाग चावण्याकरिता धावून आले. त्यानं चट्कन पाय वर ओढून घेतला आणि त्या संतपुरुषाच्या आधारावर तो लोंबकळत राहिला. एका हातानं त्यानं फांदी पकडून धरली आणि दुसरा हात संताच्या मूर्तीच्या पायावर ठेवला. या अवस्थेत तो किती काळ दम काढू शकणार होता?

असा काही वेळ गेला. नागराणीच्या सेवकांचा मोर्चा लागलेलाच होता.

एवढ्यात एक म्हातारी हातातली काठी टेकीत टेकीत तिकडून चालली होती.

झाडाला चिकटलेले इतके साप आणि फांदीला लोंबकळता माणूस हा तमाशा बघून तिला आश्चर्य वाटलं. आपल्या काठीनं कोंडाळी करीत करीत आणि त्यात पाय टाकीत-टाकीत ती त्या झाडाच्या खोडापाशी येऊन उभी राहिली.

झाडावर लोंबकळणाऱ्या शेतकऱ्याला नवल वाटत होतं की या म्हातारीला साप कसे चावत नाहीत? सगळे तिच्या कोंडाळ्यापासून दूर-दूर राहत होते. खास ही जादुगारीण असली पाहिजे.

म्हातारीनं वर बघितलं अन् शेतकऱ्याला विचारलं, ‘काय रे पोरा, काय मामला आहे? ‘ तरुण शेतकरी म्हणाला, ‘आजी, हे साप माझ्या मागं लागले आहेत. ‘ ‘साप मागं लागण्यासारखं तू त्यांचं काय केलंस? ‘ ‘त्यांचं, आजी, मी काही केलं नाही; पण सरोवरापासच्या खडकावर असलेला सोन्याचा एक छोटासा मुकुट मी उचलून आणला. एवढंच मी केलं.

‘अरे म्हणजे तो नागराणीचा मुकुट असला पाहिजे. बरं नव्हे रे बाबा, बरं नव्हे.

मी चालले.’ ‘जाऊ नको आजी, पण हे नाग तुला कसे चावायला येत नाहीत, सांग !

हा प्रश्न ऐकून म्हातारी उभी राहिली. हातातल्या काठीनं आपल्या भोवती कोंडाळं करून ती म्हणाली, ‘मी हे कोंडाळं केलंय् ते बघितलंस? हे कोंडाळं ओलांडून आत यायची, नाग असो नाही तर नागाचा बाप असो, त्याची छाती व्हायची नाही. अशीच जादू माझ्यापाशी आहे!’ शेतकरी म्हणाला, ‘तर मग, आजी, मला या नागांपासून वाचव ना!’ म्हातारी म्हणाली, ‘वाचवीन; पण एकाच अटीवर.

‘काय अट आहे सांग.

‘तुझ्यापाशी नागराणीचा सोन्याचा मुकुट आहे, तो मला दे!”

शेतकऱ्यानं क्षणभर विचार केला आणि म्हणाला, ‘देतो. अशी कबुली दिल्यावर म्हातारीनं आपल्या हातातली काठी हवेत तीन वेळा जोरानं फिरविली, तीन वेळा काही मंत्र म्हटले, पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जमिनीवर रेघा ओढल्या आणि बोलली, ‘एक, दोन, तीन, चार! चार नागांनी या वाटेनं जायचं!’ ‘ राजाचा हुकूम होताच शिपायी जसे धावतात, तसे त्या अकरा नागांपैकी चार नाग झाडापासून दूर होऊन पश्चिमेकडे गेले. मग म्हातारीनं मंत्र म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे रेघोट्या ओढल्या आणि म्हटलं, ‘एक, दोन, तीन, चार !

नागांनी या वाटेनं जावं. चार नाग त्या वाटेनं गेले. ‘ असेच मंत्र म्हणून म्हातारीनं दक्षिण दिशेकडे रेघोट्या काढल्या आणि टलं, ‘तीन नागांनी इकडं चालतं व्हावं. उरलेले तीन नाग तिकडं निघून गेले. ‘ असे सगळे नाग निघून गेल्यावर म्हातारीनं शेतकऱ्याला झाडावरून खाली उतरायला सांगितलं. शेतकरी खाली आला अन् तत्काळ उत्तरेकडे चालू लागला. तिकडं त्यानं आपलं गाढव उभं केलं होतं. गाढवावर त्यानं टांग मारली अन् ते पळवीत नेलं. म्हातारी मागं ओरडत राहिली.. ‘एक, सोन्याचा मुकुट टाक, सोन्याचा मुकुट टाक!’ शेतकऱ्यानं ओरडून उत्तर दिलं, ‘देतो, ये, माझ्या मागोमाग पळत ये.’ म्हातारी ती, ती पळणार कशी? ती आपली चालत-चालत त्याच्या मागोमाग गेली. शेतकऱ्याचं गाव आलं. तो गाढवावरून उतरून सरळ आपल्या घरात शिरला. थोड्या वेळात म्हातारीही तिथं आली. गाढवावरून तिनं त्याचं घर ओळखलं. शेतकरी म्हणाला, ‘ये, आजी, हे तुझंच घर आहे. आनंदानं रहा, खा, पी, मजा कर!’ म्हातारीनं ओळखलं, की ही आता आपल्याला झुलवायला पाहतो आहे.

‘काही हरकत नाही, मीपण बघून घेईन, ‘ ती मनाशी म्हणाली. म्हातारी शेतकऱ्याच्या घरी राहिली.

शेतकऱ्यानं नागराणीचा मुकुट कुणाला नकळत आपल्या धान्याच्या कोठीत ठेवला आणि तो समजला होता तसाच चमत्कार घडला. कोठीतला गहू काढून तो विकीत होता आणि तरी गहू संपत नव्हता. विक्रीतून त्याच्या थैलीत पैसेच पैसे भरून गेले. तो म्हातारीला ऐष आरामात ठेवू लागला. तिचं मन सांभाळू लागला. तिनं पाणी मागितलं तर यानं तिला दूध द्यावं. त्याच्या बायकोला आश्चर्य वाटलं, की या भिकारड्या थेरडीची हा इतकी खुशामत का करतोय? याला वेड बीड तर नाही लागलं? एवढं या थेरडीत काय आहे? ती आपल्या नवऱ्याला तसं तोंडावर म्हणू लागली. तो फक्त ऐकून घेई. मुकुटासंबंधी त्यानं आपल्या बायकोलासुद्धा काही सांगितलं नाही.

असे काही दिवस गेले. एके दिवशी त्या शेतकऱ्याला अचानक बाहेरगावी जावं लागलं. आता म्हातारीला संधी गवसली. शेतकऱ्यानं मुकुट कुठं ठेवला असेल याची तिला काही कल्पना आली होती. कोटीतले गहू काढून काढून विकत असतानासुद्धा गहू संपत नाहीत, यावरून तिनं अंदाज बांधला होता.

तेव्हा शेतकरी परगावी गेलाय् अन् त्याची बायको विहिरीवर कपडे धूत होती. हे बघून हळूच ती कोठीत शिरली, कोठीत ठेवलेला मुकुट तिनं घेतला आणि सरळ आपल्या घरची वाट धरली!

संध्याकाळी शेतकरी परत आला. बघतो तो घरात म्हातारी दिसेना. त्यानं बायकोला विचारलं,‘काय गं, आजी कुठं गेली?

बायको नाकाचा शेंडा चढवून म्हणाली, ‘मेली ती थेरडी ! आजी, आजी करताय, एवढं तिला काय सोनं लागलंय्? ‘ शेतकरी धावत-धावत गेला अन् कोठीत घुसला. पाहतो तो जागेवर मुकुट नाही. त्यानं जाणलं, की मुकुट म्हातारीनंच पळविला. वेड्यासारखा तो घरातून पळत सुटला आणि गावच्या शिवेपर्यंत गेला; पण म्हातारीचा कुठंच पत्ता नव्हता. निराश होऊन आणि मुकुट गेल्याचा शोक करीत तो घराकडं परत आला; आणि एवढंसं तोंड करून घराच्या एका कोपऱ्यात जाऊन पडला.

त्याच्या बायकोला नवऱ्याचे हे चाळे आवडले नाहीत. हाताचे पिळे करीत अन्नाक-तोंड वेडं-वाकडं करीत ती म्हणाली, ‘ती म्हातारडी गेली म्हणून एवढा का जीव टाकताय्? ती काय तुमची आई मेलेली जिवंत होऊन आली होती?

गेली तर बरंच झालं. बसून बसून गोळे गिळत होती, ते तरी वाचलं!’ शेतकऱ्याला राग आला. त्यानं कोपऱ्यातली केरसुणी हातात घेऊन बायकोला झोड-झोड झोडपलं. नवऱ्याला एवढा का राग आला ते बायकोला समजेना. तीही रागावून, रुसून कोपऱ्यात जाऊन पडली. त्या दिवशी रांधलेलं अन्न वाया गेलं.

इकडं तो नागराणीचा मुकुट घेऊन ती म्हातारी निघाली ती थेट आपल्या घरात गेली. तिनं तो मुकुट आपल्या धान्याच्या कोठारात ठेवला. तिचंही धान्य संपेनासं झालं. विकून विकून तिनंही पुष्कळ धन जमा केलं तरी धान्य जसंच्या तसं ! मग तिनं एक मोठा भटारखाना काढायचं ठरविलं. भटारखान्यात पाव-रोटी बनवायची अन् विकायची. त्याकरिता तिनं एकदम सात पोती गहू दळून आणण्यासाठी काढले; पण सातवं पोतं भरताना चुकून त्यात तो एवढासा मुकुटही धान्याबरोबर गेला. पोती गाडीवर चढवून ती चक्कीवाल्याकडं गेली आणि साती पोती त्याच्याकडं देऊन घरी आली.

इकडं चक्कीवाल्यानं सहा पोती गहू दळला; पण सातव्या पोत्यातले गहू काही केल्या संपेचना ! चक्कीत गव्हाचं संबंध पोतं त्यानं खाली केलं. चक्कीतून पीठ बाहेर पडत राहिलं, पिठानं पोतीच्या पोती भरली; तरी चक्कीतला गहू संपेना. चक्कीवाला चकित झाला. त्यानं चक्की उलगडून बघितली, तेव्हा त्याला तो चकचक करणारा सोन्याचा मुकुट आढळला. नागराणीच्या मुकुटाची गोष्ट त्याच्याही कानी आलीच होती. हाच तो मुकुट अशी त्याची खात्री झाली आणि त्यानं तो मुकुट काढून घेऊन आपल्या घराच्या छपरात दडवून ठेवला.

इकडं म्हातारी गहू दळायला देऊन आली अन् आपल्या धान्याच्या कोठीत गेली तर तिथं काय होतं? संबंध कोठी रिकामी ! गव्हाचा एक दाणाही तिथं नव्हता. आणि मुकुट? मुकुटाचाही पत्ता नव्हता. म्हातारीच्या छातीत धस्स झालं. मुकुट गव्हाबरोबर दळायला तर गेला नाही? ती धावत पळत चक्कीवाल्याकडं गेली. रागानं म्हणाली, ‘दे, माझा सोन्याचा मुकुट. मुकाट्यानं दे.

चक्कीवाला जणू आपल्याला काही कळतच नाही, असा चेहरा करून म्हणाला, ‘आजी, मुकुट? कसला मुकुट? तुझा मुकुट म्हणतेस तर तू काय मुकुट घालणारी राजाची राणी झालीस काय?

म्हातारीनं विचारलं, ‘माझी गव्हाची पोती कुठं आहेत?

चक्कीवाल्याने बोटानं पिठानं भरलेली पोती दाखविली आणि म्हणाला, ‘ही सहा पोती भरली. आता हे सातवं चालू आहे.’ फिरती चक्की बंद करायला लावून म्हातारीनं चाललेला घाणा तपासला; पण मुकुट काही तिच्या हाती लागला नाही. ती चक्कीवाल्याला म्हणाली, ‘या गव्हाबरोबर माझा सोन्याचा मुकुट आलाय्. एवढा होता.

चक्कीवाल्यानं भुवया चढविल्या अन् आश्चर्य दाखविलं. म्हातारी निराश होऊन डोक्यावर हात मारीत घरी परतली. तिला जगणं नकोसं झालं.

चक्कीवाल्याला वाटलं, की मुकुट आपल्याला पचला. त्यानं तो छपरातून काढला अन् आपल्या धान्याच्या कोठीत ठेवला. आता त्याच्या कोठीतलं धान्य संपता संपेना. रोज तो पोती भरभरुन कोठीतून धान्य काढायचा अन् दळायचा, पीठ विकायचा. पिठाच्या आलेल्या पैशानं तिजोरी भरली. असं कित्येक दिवस चालत राहिलं.

एकदा त्याच्या मनात आलं, कोठीत मुकुट ठेवायचा, रोज कोठीतलं धान्य काढायचं अन् चक्कीत ओतायचं आणि दळून घ्यायचं. त्यापेक्षा चक्कीतच मुकुट ठेवला म्हणजे धान्य टाकायलाच नको. टाकलेलं धान्य कधी न संपता पीठ बाहेर पडत राहील. आपले श्रम वाचतील, आरामात बिडी फुंकत आपण बसू आणि नोकरांकडून पीठ पोत्यात भरून ठेवायला लावू. त्यानं शेवटच्या घाण्याबरोबर मुकुट चक्कीच्या नाळक्यात टाकला अन् बघत राहिला.

मुकुटाच्या प्रतापानं चक्कीच्या तोंडापर्यंत गहू भरलेलाच राहत होता आणि खाली पिठाचा धबधबा पडत होता! त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

असे कित्येक दिवस गेले. चक्कीवाल्याच्या पिठाचा व्यापार दसपटीनं, वीसपटीनं वाढला आणि चक्कीत धान्य न टाकता फक्त पिठाची पोती भरण्याचंच काम राहिलं. चक्कीवाला तंगड्या लांब पसरून चिरुट ओढीत आरामखुर्चीत पडून रहायचा. नोकरलोक नदीच्या लोंढ्यासारखं एकसारखं पडणारं पीठ भरुन पोती तयार करायचे.

इकडं चक्कीत रोज तो मुकुट धान्याबरोबर हळूहळू खाली-खाली उरत जात होता. एके दिवशी गव्हाबरोबर तोही धान्याच्या नाळक्यातून खालच्या चक्कीच्या तोंडात गेला आणि खालच्या तळीत सापडून त्याची चकती झाली.

‘खट्’ असा आवाज झाला आणि चालत असलेली चक्की एकदम बंद पडली.

चक्कीवाला वर्तमानपत्र वाचीत पडला होता. चक्कीचा आवाज बंद पडताच त्यानं वर बघितलं. गहू दळायचं अन् पीठ खाली पडायचं थांबलं होतं. त्याला आश्चर्य वाटलं. उठून बघतो, तो वरच्या गहू टाकायच्या नाळक्यातले गहू खलास झाले होते. असं कसं झालं? त्यानं हात घालून सगळीकडं चाचपलं.

यातला मुकुट कुठं गेला?

इतक्यात जंगली रेड्याच्या आवाजासारखा आवाज त्याच्या कानी आला.

‘हा! हा! हा!‘ कोणी तरी भयंकर वाटावं असं हसत होतं. एकदम आकाशातून कडकड करत वीज चक्कीघरावर पडली. चक्कीघर, आतली चक्की अन् चक्कीवाला तिन्हीची राख झाली.

‘फुकटचं खायला सोकावलेल्या लोभ्या, मुकुट, मुकुट करुन मुकुटाला आपल्यापाशी ठेवणारा शेवटचा मालक तू; तू माझ्या तावडीत आलास!’ असं म्हणून सैतानानं चक्कीवाल्याचा जीव आपल्या चिमटीत घेतला आणि त्याला नरकाकडं घेऊन चालला.

याच वेळी नागराणी गारुडिणीच्या मंत्राच्या पकडीतून सुटली. नागराणीची फिरुन ती राजकन्या झाली आणि आपल्या राजमहालाच्या अंगणात जाऊन उभी राहिली. राजाला कळलं, तो ‘ माझी लाडकी, माझी लाडकी, करीत धावत आला आणि त्यानं तिला मिठीत कवटाळलं.”

मात्र आता ती पूर्वीची राजकन्या राहिली नव्हती. जीव लहान असो, मोठा असो, माणूस असो, जिवाणू असो, सर्वांना दुःखाची वेदना एकच आहे हे तिला कळलं आणि ती शहाणी झाली.

Author