(उत्तर भारतीय लोककथा)
कामनगरचा राजा विद्वान, मूर्तिकार, चित्रकार यांचा खूप आदर करीत असे.
त्याच्या राज्यात दरवर्षी एक मूर्तिस्पर्धा होत असे. राज्यातील मूर्तिकार मूर्त्या
तयार करून राजदरबारात येत आणि स्वतः राजा त्यांचे बारीक निरीक्षण करून
पारितोषिक घोषित करीत असे.
राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट
मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम
पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला
कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.
ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या
मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री
समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने
रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.
या मूर्तीला घेऊन माझ्या घरी ये. मी हिचे चांगले निरीक्षण करीन.
रामकिरण मूर्ती घेऊन मंत्र्याच्या महाली गेला. मंत्री व त्याच्या मुलाने
रामकिरणचे हाथ पाय बांधून त्याला एका खोलीत डांबून टाकले. आणि त्या
मंत्र्याचा मुलगा अजय ती मूर्ती घेऊन दरबारात हजर झाला. राजा ती मूर्ती
पाहून अतिशय प्रसन्न झाला आणि अजयला प्रथम पारितोषिक मिळाले.
दोन दिवसानंतर रामकिरणला सोडून देण्यात आले. त्याने ही गोष्ट
कोतवालाला जाऊन सांगितली. कोतवाल प्रामाणिक होता. परंतु काही प्रमाण
नसल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता.
एक दिवस राजा, मंत्री आणि कोतवाल शिकारीला गेले. राजा आणि मंत्री पुढे
होते. कोतवालाला रस्त्यात चमकणारे मोती पडलेले दिसले. ते पहाताच तो
समजला की हे मोती राजाच्या गळ्यातील हारातून तुटून पडले आहेत. त्याने
घोड्यावरून उतरून पटकन ते उचलून घेतले. जेव्हा राजा परतला तेव्हा
त्याच्या लक्ष्यात आले की आपले मोती कुठेतरी पडले आहेत. त्याने दंवडी
पिटवली, “ज्याला पण हारातील मोती मिळाले आहेत त्यांनी ताबडतोब आणून
द्यावे. नाहीतर पकडल्यावर त्याचा शिरच्छेद केला जाईल.”
परंतु तपास करूनही मोती मिळाले नाही, वर्ष झाले. मूर्ती स्पर्धा जाहीर
झाली. कोतवालने रामकिरणकडून राजाची सुंदर मूर्ती बनविली. पण
कोतवालाने त्याला सांगितले की यावेळेस त जाऊ नकोस आपल्या लहान
भावाला पाठव.
तिकडे मंत्री आणि अजय लक्ष्य ठेवून होतेच की यावर्षी कोणाची मूर्ती सुंदर
आहे. रामकिरणच्या भावांची मूर्ती सुंदर होतीच. मागच्या वर्षीप्रमाणे त्यांनी
त्याला खोलीत डांबून टाकले व अजय मूर्ती घेऊन दरबारात हजर झाला.
लागलीच कोतवाल उभा राहिला व म्हणाला, “महाराज, माझ्या गुप्तहेरांनी
तपास केला आहे त्यावरून ह्या मूर्तीत आपल्या हाराचे मोती लपवून ठेवले
आहे.” हे ऐकून सर्व स्तब्ध झाले. मूर्ती तोडताक्षणी त्यातून मोती निघाले.
हे पाहताच अजय राजाच्या पायावर डोक टेकवीत म्हणाला, “महाराज,
चुकीची माफी असावी. ही मूर्ती मी बनविली नसून दुसऱ्या मूर्तिकाराने बनविली
आहे.” आणि त्याने सर्व सत्य सांगून टाकले. राजा खूप चिडला आणि त्याने मंत्री
आणि अजय दोघांना कैद केले.
रामकिरणला दरबारात आणले. मोत्यांच्याबद्दल त्याला विचारले तेव्हा तो
चूप राहिला. तेव्हा कोतवाल म्हणाला, “महाराज, मीच ह्याला मूर्तीत मोती
टाकण्यास सांगितलं होत. खरं तरं मोती माझ्याजवळच होते. मी, मंत्री आणि
त्याच्या मुलाच्या दुष्कर्माचा गौप्यस्फोट सर्वासमक्ष करू इच्छित होतो. यांनी
मूर्तिकाराला खोलीत कैद करून कलेचा तर अपमान केलाच आहे. आपल्याला
धोका दिला आहे. तसेच मंत्रीपदाचा देखिल दुरूपयोग केला आहे.”
हे सर्व ऐकून राजाने कोतवालाला हार बक्षीस म्हणून दिला आणि
रामकिरणला मूर्तिकाराचे प्रथम पारितोषिक प्रदान केले.