राजा आणि गरीब माणूस

एका गावात एक बुद्धिमान आणि अनुभवी वृद्ध रहात होता. त्याला एक मुलगा होता. एक दिवस त्याने आपल्या मुलास सांगितले, “बेटा, तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्ष्यात ठेव. एक – कधीही अशा माणसास आपला मित्र करू नकोस. ज्यावर तुझा विश्वास नसेल. दोन – कधीही अशा माणसाकडून कर्ज घेवू नकोस. जो खानदानी श्रीमंत नसेल आणि तीन कधीही कोणतीही गुपित गोष्ट कोणालाही सांगू नकोस मग ती तुझी बायको का असेना.”



(कजाकिस्तानची लोककथा)

एका गावात एक बुद्धिमान आणि अनुभवी वृद्ध रहात होता. त्याला एक मुलगा होता. एक दिवस त्याने आपल्या मुलास सांगितले, “बेटा, तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्ष्यात ठेव. एक – कधीही अशा माणसास आपला मित्र करू नकोस. ज्यावर तुझा विश्वास नसेल. दोन – कधीही अशा माणसाकडून कर्ज घेवू नकोस. जो खानदानी श्रीमंत नसेल आणि तीन कधीही कोणतीही गुपित गोष्ट कोणालाही सांगू नकोस मग ती तुझी बायको का असेना.”

मुलाने वडिलांच्या ह्या तीन गोष्टींची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्याने एका विश्वासघातकी माणसाशी मित्रता केली. एका नवीनच श्रीमंत झालेल्या व्यक्तिकडून कर्ज घेतले. नंतर त्याने एक बकरा मारला. आणि आपले रक्ताळलेले कपडे बायकोला देत सांगितले की, “मी एका माणसाचा खून केला आहे. हे कपडे त्याच्या रक्ताने माखलेले आहेत. यांना स्वच्छ धुवून घे.”

एक दिवस त्याने उगीच बायकोशी भांडण केले. तिला नको ते बोलला.

त्यामुळे ती रागाने राजाकडे गेली आणि म्हणाली, “महाराज, माझा नवरा हत्यारा आहे. त्याने एका माणसाची हत्या केली आहे.” राजाने तिच्या नवऱ्याला पकडून आणण्याचा आदेश दिला.

शिपाई त्याला पकडून राजमहालाकडे घेवून जात होते की त्याने रस्त्यात थांबून आपल्या विश्वासघातकी मित्राची मदत मागितली. त्याने उत्तर दिले, “मित्रा, आता तर मला मुळीच वेळ नाही. तू मला माफ कर.”

तेव्हाच त्याला कर्ज देणारा तो श्रीमंत भेटला. त्या श्रीमंताने विचार केला की आता राजा ह्याला दंड करेल आणि माझे कर्जाचे पैसे बुडतील. म्हणून तो ताबडतोब कर्ज फेडण्याचे त्याला सांगू लागला.

त्या मुलाने राजाला सर्व कथा सांगितली आणि वडिलांनी जो उपदेश दिला तो पण सांगितला. राजा त्याच्या वडिलांच्या उपदेशावर तसेच त्याच्या प्रामाणिकपणा आणि बुद्धीवर प्रसन्न झाला आणि त्याला सोडून दिले.

काही दिवसानंतर राजावर एक संकट आले. राजा मांस खात होता की एक हाड त्याच्या घशात अडकले. राज्यातील नावाजलेले वैद्य बोलाविण्यात आले पण कोणीही ते हाड काढू शकले नाही. राजाला अचानक ते बुद्धिमान बाप-बेटे आठवले. त्याने त्यांना बोलावून आणण्याचा आदेश दिला.

त्या वृद्ध माणसाने येऊन राजाला सांगितले की, “महाराज, आपण वाचू शकता पण त्याकरिता आपल्याला आपल्या मुलाचा बळी द्यावा लागेल.” राजदरबारातील सर्वांनी राजाला समजाविले तेव्हा तो आपल्या मुलाला बळी देण्यास तयार झाला.

त्या वृद्धाने व त्याच्या मुलाने जवळच्या एक खोलीत राजकुमाराला नेऊन त्याचे हातपाय बांधून त्या खोलीत टाकून दिलं. मग त्यांनी एका बकऱ्याचं तोंड बांधून त्याच्या गळ्यावर तलवार चालविली, बकऱ्याचा बळी दिला जात असताना व्यक्ती ओरडतो तसा त्या वृद्धाचा मुलगा ओरडला. बाहेर असलेल्या राजाला कळले की त्याच्या एकुलत्या एक मुलाला बळी दिले गेले आहे. तो पुत्र शोकामुळे इतक्या जोराने ओरडला की त्याच्या घशातील हाड बाहेर पडले आणि राजा बेशुद्ध झाला.

जेव्हा राजा शुद्धीवर आला तेव्हा त्या बुद्धिवान वृद्धाने राजास सांगितलं की, “महाराज, आपणपण वाचलात आणि आपला राजकुमार पण जिवंत आहे. राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने आपले अर्धे राज्य त्या वृद्धास देऊन टाकले.”

Author