(मध्य भारतातील लोककथा)
एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची. मग अंधार असू दे नाही तर उजेड असू दे. विंध्य पर्वताच्या जंगलात मेधी राजाचं राज्य होतं. आदिवासींचा तो आवडता होता. त्याच्या आदेशाप्रमाणं त्यांनी वागावं आणि त्याच्या दबदब्याखाली रहावं असं असायचं.
तर एकदा काय झालं की, मेधी राजानं गिल्ली राजाची कळ काढली.
अवचितच गेला न् त्याच्या दाढीमिशा कातरून आला! आला ते थेट आभाळातच उडून गेला. गिल्ली राजाला कळायच्या आत हं अगदी! दुसऱ्या दिवशी गिल्ली राजानं या गोष्टीचा वचपा काढावा म्हणून आपल्याच लेकीची वेणी कापून घेतली! ती लागली रडायला. पण ह्यानं लक्षच दिलं नाही. रडू दे म्हणाला. त्यानं मग फौजेला इशारा दिला की, कसंही करून मेधी राजाला जिवंत पकडून आणा.
राजाचीच आज्ञा. मग काय? सगळ्या फौजफाट्यानं जंगल, पहाड, गुहा.
दरी, खोरी पार धुंडाळून काढली. अखेर शेवटी दोन दिवसांनी एका पहाडाच्या माथ्यावर मेधी राजा गवसला. सैनिकांनी त्याला पकडून गिल्ली राजाकडे आणलं. राजानं त्याच्याकडे रागानं पाहिलं न् म्हटलं, “ये, असा पुढं ये. तुला मंगलजी वाण्याकडे पाठवून जबर सजा देतो.” आणि दिला तिकडे पाठवून.
मंगलजी वाणी मोठा करारी होता. त्याने आपले मोठे नेत्र उघडून ह्याच्याकडे पाहिलं. आपल्या भल्या दांडग्या मिशा कुरवाळल्या. खदखदून हसला आणि म्हणाला, ” जा, या पाजी माणसाला घेऊन जा. मी याचं तोंडही बघू इच्छित नाही. याला कोंडवाड्यात फेकून द्या. पहातो मग कशी मस्ती करतो ते.”
मेधी राजा पण कमी नव्हता. कोंडवाड्यात आणल्याबरोबर त्यानं जिकडं तिकडं पाणीच पाणी करून सोडलं. त्या पाण्याचा लोंढा मंगलजी वाण्याच्या दारात गेला! ते बघून तो घाबरून गेला आणि पळत पळत गिल्ली राजाकडे आला. त्यावेळी हा राजा पान खात बसला होता. त्यानं ह्याचं बोलणं ऐकलं.
मंगलजीनं गयावया करीत ह्या मेधी राजापासून आपलं रक्षण कर अशी राजाला गळ घातली. त्यामुळं गिल्ली राजानं मेधी राजाला एका गरम खोलीत कोंडून टाकलं. पण मेधी राजानं तिथंही पाणीच पाणी करून सोडलं. सगळीकडे धुराचे लोटच लोट पसरले. राजा त्यामुळं संतापून ओरडला, ” ह्याला पुऱ्या बंदोबस्तात ठेवून द्या!…
सैनिकांनी मग ह्याला जंगलात नेलं. ठार मारायचा बेत केला. मेधी राजा त्यामुळं रडू लागला. सैनिकाला दया आली. त्यानं मग ही सजा मोठी होईल म्हणून सांबराच्या शिंगात बंदिवान केलं. तिथं मग हा गुपचूप पडून राहिला. थोडे दिवस हे कुणाला कळलंही नाही. होता होता काय झालं की, जिकडं तिकडं दुष्काळ पडला. हाहाकार उडून गेला. धनधान्य संपून गेलं. लोक मरायला लागले. दगाफटका होऊ लागला. अपघात घडू लागले. नदीचं पाणी आटलं.
जमिनीला तडे पडले. त्यामुळं गिल्ली राजाकडे लोक तक्रार घेऊन गेले. तो चिंताक्रांत झाला. पाऊस कोठून आणावा? धान्य कोठून आणावं? लोकांना काय खायला द्यावं? त्याचा जीव उडून गेला. रात्रंदिवस चिंता लागली. झोप उडाली. राजानं मग दरबार भरवला. मेधी राजाला शोधून आणील त्याला मोठं बक्षीस जाहीर केलं. पैजेचा विडा पुढं ठेवला. पण चटकन कोणी पुढं येईचना.
राजानं पुन्हा पुन्हा हे जाहीर केलं. पण छे! कोणी मान वर करीनाच. अखेर शेवटी एक जोगीण पुढं आली. तिनं हा पैजेचा विडा उचलला.
जोगिणीनं मग सगळीकडे तपास केला. सांबराच्या शिंगाजवळ ती गेली. चारी बाजूंनी ते बंदिस्त होतं. म्हणून तिनं मेधी राजाला हाकारा घालीत विचारलं, ‘ जागा आहेस का झोपला आहेस?”
मेधी राजानं आतून उत्तर केलं, ” मी तर. झोपलोही नाही किंवा जागाही नाही.”
‘मग बाहेर का येत नाहीस?”
‘माझ्या मनाची मर्जी.”
‘कशात बिघडलंय?”
समजेल ते समजून घे.”
” तुला हवंय काय?”
“गिल्ली राजाच्या मुलीशी लगीन.
जोगीण हसली. तिनं मेधी राजाची विनंती मान्य केली. राजाची समजूत घालीन म्हणाली. पण मेधी राजाला सांबरशिंगातून बाहेर कुठं येता येतंय? धड शिंग फुटेना की हा पण बाहेर येईना! खूप धडपड केली. पण काहीच नाही.
जोगीण मग पळत गेली. तिनं रेशीम दोरा आणला. सोन्याची सुरी आणली.
मोत्यांचा घाव आणला. मग चारी बाजूंनी शिंग गच्च बांधून तिनं ते घाव घालीत फोडलं तेव्हा कुठं मेधी राजा बाहेर आला. त्यावेळी त्याला बघून एकदम आकाश गरजलं. मुसळधार पाऊस आला. नदी नाले भरून गेले. जमीन शांत झाली. लोकांना बरं वाटलं.
गिल्ली राजानं मग हात जोडून मेधी राजाची क्षमा मागितली. आपल्या लेकीशी त्याचं लगीन लावून दिलं. मग म्हणाला, ” मी नावाचा राजा. पण तूच खरा राजा. पावसाचं पाखरू तू. दुनिया तुझ्यामुळं जगते. तुझ्यामुळं सुखावते. तू खरा मोठा. ‘ मेधी राजानं मग सगळीकडे आनंदी आनंद करून सोडला. तसा तो तुम्ही आम्ही पण करू या.