एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल.
मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव.”
ती परत आल्यावर, त्या दाण्याबद्दल त्याला विचारले, तेव्हा तो हसत म्हणाला, “मी काही तुझा नोकर नाही मला तर सरकारकडून पगार मिळतो.
तुझा दाणा कुठे इकडे तिकडे पडला असेल.” चिमणी निराश झाली. आता तर शेतकरी पण शेतात असतील, आता मला उपाशीच राहावे लागेल……… ती विचार करीत होती तेव्हाच एक शिपाई तिला येतांना दिसला. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, “शिपाई दादा, मी गरीब आहे. माझी मदत करा. माझा मटारचा दाणा कुठेतरी हरवला आहे. एक सुतार पुलावर काम करीत होता. मी त्याला लक्ष ठेवावयास सांगितलं होतं. पण त्याने तो दाणा चोरला असावा किंवा तो कुठे पडला असावा.” शिपाई म्हणाला, “अग मुर्ख चिमणी, तुझी इतकी हिमंत की मी कामाला जातांना तू थांबवतेस…….. माझं काम कायदा आणि शांती ठेवणे आहे. त्याचाच मला पगार मिळतो. मी एका गुन्हेगाराच्या घरी जात आहे. त्याने मला जेवणासाठी बोलाविलं आहे. तू जिवंत रहा की मर मला काय करायचे.” त्याचा राग पाहून चिमणी घाबरली आणि आपल्या नशीबाला कोसू देऊ) लागली. तेव्हाच तेथून एक फौजदार जात होता. त्या चिमणीने त्याला सर्व प्रसंग सांगितला आणि विनंती केली, “फौजदारसाहेब, काय आपण माझी मदत कराल? सुताराने माझा मटारच्या दाण्याला कुठं तरी टाकून दिलं आहे. आणि शिपाई मदत करण्यास तयार नाही. आपण काही करू शकाल?” फौजदार चिडला, “तुझी ही हिमंत की तू मला थांबवतेस. माहीत आहे काय मंत्री दौऱ्यावर येत आहेत. आणि मला सर्व बंदोबस्त करायचा आहे. त्याला माझं काम आवडलं नाही तर मला पदोन्नती मिळणार नाही, मला तुझ्या दाण्याशी काय करायचं आहे” असे बोलून तो निघून गेला.
चिमणी विचार करू लागली की हा कसा देश आहे. येथील लोक किती स्वार्थी आहेत की दुसऱ्याला मदत पण करीत नाहीत. आता तर मला उपाशीच राहावे लागेल. ती असा विचार करतच होती की तिला घोड्यावर स्वार मंत्री महाशय येतांना दिसले. तिने त्यांना थांबविले आणि विनंती केली की, “मंत्री महाशय, आपण माझ्यावर दया कराल का? माझा मटारचा दाणा हरवला आहे.
येथून जितके सरकारी कर्मचारी गेले सगळ्यांनी माझी मदत करावयास नकार दिला. सुताराने तो दाणा हरविला. शिपाई मेजवानीसाठी निघून गेला.
फौजदाराला स्वतःच्या पदोन्नतीची काळजी होती. कोणीच माझी गोष्ट विचारात घेतली नाही. ”
मंत्री म्हणाला, “माझी इच्छा तुला मदत करावी हीच आहे पण आता राजे येथे येतील. मला त्यांचं स्वागत करावयाचे आहे.” असे बोलून ते पण निघून गेले.
चिमणीला समाधान वाटलं की मंत्री महाशयांनी माझं म्हणणं तर ऐकून घेतलं. त्याला वेळ असता तर त्यांनी नक्कीच मला मदत केली असती.
इतक्यात हत्तीवर स्वार राजेसाहेब दिसले, तिने त्यांना विनंती केली, “राजेसाहेब, आपण तर या देशांचे मालक आहात. आपण मला मदत कराल?” राजाला हे आवडलं नाही की ही एक छोटीसी चिमणी आणि मला थांबविते.
मी तर प्रजेला दर्शन देण्याकरिता जात होतो. राजाने तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. राजाचा अंगरक्षक ओरडला, “दूर हो !” आणि राजा निघून गेला.आता चिमणीची खात्री पटली की कोणीही तिची मदत करू शकणार नाही.
राजापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? अशा क्रूर राजाच्या राज्यात मी तो दाणा सोडून अंघोळीला जावयास नको होतं…… ती अगदी उदास झाली. तेवढ्यात तिला एक मुंगी दिसली. तिने त्या मुंगीला आपली सर्व कहाणी सांगितली. आणि म्हणाली, “त्या हत्तीला जावून सांग की राजाला सांगून माझं काम करून दे.” मुंगी म्हणाली, “ताई, मी आताच जाते.” मुंगी हत्तीजवळ गेली. आणि तिने त्याच्या कानात सांगितलं, “तू ऐकलंच असेल की चिमणीने राजाला काय विनंती केली होती. माझी इच्छा आहे की तू राजाला तिची मदत करण्याचा आग्रह धर. नाही तर मी तुझ्या सोंडेंवर चावीन.” हत्तीने ही धमकी ऐकली आणि पटकन राजाला म्हणाला, “तुम्ही चिमणीची मदत करा. जर ती मला चावली तर मी तुम्हाला हत्तीवरून पाडून टाकीन आणि त्यामुळे तुमची हाडं मोडली जातील किंवा तुम्ही मरू पण शकाल.” राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी मंत्रीला बोलाविलं आणि आज्ञा दिली की या चिमणीला मदत करा. मंत्री फौजादाराकडे गेला आणि म्हणाला, “शांतता ठेवण्याचं तुमचं काम आहे. काय तुम्हाला माहीत नाही की त्या सुतार आणि शिपाई दोघांनीही तिची काहीच मदत केली नाही. पटकन काही करा. नाही तर नोकरी जाईल.” फौजदार शिपायाकडे गेला आणि त्याला रागावला. शिपाई सुताराला रागावला. तेव्हा सुताराने तो दाणा शोधून आणला. त्यामुळे चिमणी आनंदीत झाली.