खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता.
तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’ सशाने हत्तीचे म्हणणे मान्य केले. परंतु तो म्हणाला, ‘प्रथम आपण एक करार करूया. तुझ्या किंवा माझ्या हातातील कुदळीचा दांडा जर त्या कुदळीतून निसटला तर तुझ्या डोक्याने माझा दांडा आणि माझ्या डोक्याने तुझा दांडा परत कुदळीत बसवला पाहिजे.’ हत्तीने हा करार मान्य केला. त्या दोघांनी जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आणि बाग तयार करण्याच्या उद्योगाला ते लागले.
ससा मोठा दुष्ट होता. त्याने मुद्दामच आपल्या कुदळीचा दांडा सैल केला आणि त्यामुळे तो एकसारखा त्या कुदळीतून बाहेर येऊ लागला. मग ससा हत्तीला म्हणाला, ‘मित्रा माझ्या कुदळीचा दांडा बाहेर आलाय. तुझे डोके मला दे. तुझ्या डोक्यावर आपटून मी तो दांडा नीट करुन घेतो. हत्तीने आपले डोके पुढे केले.
सशाने हत्तीच्या डोक्यावर आपटून तो दांडा कुदळीत घट्ट बसवला. बागेचे काम चालू राहिले. परंतु एकदा दुसऱ्या वेळी, हत्तीच्या कुदळीचा दांडा बाहेर आला. तेव्हा तो सशाला म्हणाला, ‘मित्रा, माझ्या कुदळीचा दांडा बाहेर आलाय. मला तुझे डोके दे. मी मग तुझ्या डोक्यावर दांडा नीट बसवून घेईन.’ ससा घाबरला. तो थरथर कापू लागला. तो हत्तीसमोर गयावया करू लागला. ‘अरे मित्रा, माझ्यावर दया कर. माझं डोकं किती किती लहान आहे.
तुझ्या पहिल्याच तडाख्याला ते फुटून जाईल.’ सशाचे ते बोलणे ऐकून हत्तीला राग आला. तो म्हणाला, मला काही एक ठाऊक नाही. करार म्हणजे करार. आणि आपण तो केलेला आहे. तुझ्या कुदळीचा दांडा बाहेर आला तेव्हा मी माझे डोके दिले.
आता माझ्या कुदळीचा दांडा बाहेर आला आहे आणि तू तुझे डोके दिलेच पाहिजेस. तुझ्या डोक्यावरच मी तो दांडा नीट बसवून घेणार आहे.’ परंतु ससा काही केल्या आपले डोके देईना. हत्तीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दोघांचे मोठे भांडण जुंपले. करार मोडण्यात आला. दोघांनीही त्या जमिनीच्या तुकड्यावर काम करायचे थांबविले.
दिवसामागून दिवस गेले. हत्तीने एके दिवशी आपल्या घरी मोठी मेजवानी दिली. त्याने अरण्यातील सर्व प्राण्यांना आमंत्रण दिले. परंतु सशाला मात्र दिले नाही. एक कासव त्या रात्री सतारीया म्हणून आले. सगळेजण नृत्य करणार होते आणि ते कासव सतार वाजवणार होते. त्याला खास आमंत्रण होते. मात्र त्याची सतार म्हणजे लांबट वाटोळा दुधी भोपळा होता. तो सुकलेला होता. त्याला तारा जोडलेल्या होत्या. या मेजवानीला कासव ‘सतारीया’ म्हणून जाणार आहे हे सशाला कळले. तो त्या कासवाकडे गेला आणि म्हणाला, ‘मित्रा, मला त्या भोपळ्याच्या आत लपव. मी तुझ्यासाठी आतून तारा वाजवीन. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. मेजवानीच्या वेळी जे जे काही खायला प्यायला मिळेल त्यातील काही भाग भोपळ्यात माझ्यासाठी ओतत रहा.’ कासव दयाळू होता. त्याला सशाची दया आली. त्याने त्याला त्या भोपळ्यात घातले. नाच सुरू झाला. ससा आणि कासव सतार वाजवू लागले.
प्रत्येकवेळी यजमानाने कोणते पेय प्यायला दिले की कासव त्यातील काही भाग सशाला द्यायचा. परंतु हळूहळू ते पेय सशाच्या डोक्यात चढले. त्याने त्या भोपळ्यातून गायला सुरुवात केली. हत्ती ते गाणे लक्षपूर्वक ऐकत होता. त्याने सशाचा आवाज ओळखला.
त्याला भयंकर राग आला. त्याने सभोवार चाललेला नाच थांबवला. तो सरळ त्या कासवाकडे गेला आणि म्हणाला, ‘या बदमाषाला तू इथे का आणलेस?’ कासव थरथर कापू लागले. त्याला भयंकर भीती वाटली. त्याच्या हातातील सतार निसटून खाली जमिनीवर पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. ससा त्या गडबड गोंधळात पळून जात होता.
पण हत्तीने त्याला आपल्या पायाखाली घेतले आणि पिकलेली पपई जशी चिरडतात तसा त्याला आपल्या प्रचंड पावलाखाली त्याने चिरडून टाकले. अशा रीतीने दुष्ट सशाला आपल्या बलाढ्य मित्राशी केलेला करार मोडण्याबद्दल योग्य शिक्षा मिळाली.