गायक गाढव

एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.

सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.



एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.

सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.

गावाला लागून एक शेत होतं. शेताला काट्याचं कुंपण होतं. माणसं जाण्याएवढी पाऊलवाट होती. गाढव हळूच शेतात शिरलं. समोर हिरवंगार शेत.

शेतात लुसलुशीत काकड्या बघून म्हाताऱ्या गाढवाच्या तोंडाला पाणी सुटलं.

तोंडात दात नसले तरी कोवळ्या काकड्यांची मेजवानी बघून गाढव खूष झालं.

आपल्या मित्राला त्याने आत बोलावलं. दोघांनी पोटभर काकड्या खाल्ल्या.

मग दोघंही हळुवार आलेल्या रस्त्यानं कुंपणाबाहेर आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघांनी काकड्यांवर ताव मारला. मग दररोजच त्यांचा हा कार्यक्रम ठरून गेला. मनसोक्त काकड्या खाल्ल्याने मरतुकडा म्हातारा गाढव हळूहळू मस्त झाला.

एक दिवस चांदणी रात्र होती. आकाशात पूर्वेकडे चंद्र उगवला होता. सर्वत्र टिपूर चांदणं पडलं होतं. काकड्या खाऊन गाढवाचं पोट भरलं होतं. थोडी सुस्तीही आली वातावरण असत. गाढव म्हणाला. “माझ्या मित्रा, आजूबाजूला बघ. आकाशात चंद्र कसा चांदणे उधळीत आहे.

झाडांची पानं हळुवारपणे ह्या मंद प्रकाशाचं जणू स्वागतच करीत आहेत.

अंगाला बोचणारी थंड हवा जणू गुदगुल्या करीत आहे. कशी मोहक रात्र आहे.

माझ्या मनात गाण्याच्या लहरी उठू लागल्या आहेत.” कोल्हा म्हणाला, “अरे काका, जरा सबुरीनं घ्या. कुठं तुम्ही खरंच गाऊ लागला तर शेताचा राखण करणारा मालक आवाज ऐकून धावून येईल. तुमच्या गाण्यामुळे तुम्ही संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे. आपण पडलो चोर. चोरानं आपली मर्यादा सोडू नये. चोर जर राजरोस सूचना देऊन घरात घुसू लागला तर कंबर मोडायला वेळ लागणार नाही.” गाढवाला राग आला हे ऐकून “काय शहाणपण ऐकिवतोस मला? इतकं सुंदर वातावरण असताना गायचं नाही म्हणणं म्हणजे धनवानानं कंजुषी केल्यासारखं होईल. आनंद झाला की तो व्यक्त केला पाहिजे. नसता त्या आनंदाला काही अर्थ राहत नाही. मला तर आता राहवत नाही. मी तर आता एक झकास गाणं म्हणणार.’ गाढवाचा निर्धार ऐकून कोल्हा घाबरला. त्यानं गाढवाला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. “काका, माझं ऐका. तुम्ही यावेळी तुमचं तोंड बंद ठेवणं आपल्या दोघांच्या हिताचं आहे. खरं सांगायचं झालं तर तुमचा आवाजही बेसूरच आहे.” “तू माझ्यावर जळतोस. मुर्खा, तुला सूर आणि तालाचं बुडूख आणि शेंडा तरी माहीत आहे काय? संगीत हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. तू पडला अरसिक.” गाढवानं कोल्ह्याला ऐकिवलं.

“ठीक आहे काका, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. संगीतात मला काही कळत नाही. त्यामुळे तुमचं गाणं ऐकूनही उपयोग नाही. तुमच्या गाण्याच्या वेळी माझ्यासारखा अरसिक उपस्थित रहाण्यापेक्षा मीच स्वत:हून बाहेर जातो. मग तुम्ही मनसोक्त गा.” गाढव चिडून म्हणालं, “तू मूर्ख आहेस. फक्त मूर्खच नाही, तर महामूर्ख आहेस. तुला वाटतं, माझं गाणं मधुर होऊ शकणार नाही. माझं तुला आव्हान आहे. तू आता ऐकच माझं गाणं.” म्हणून गाढवानं आवाज काढण्यासाठी आकाशाकडं तोंड केलं.

“थोडं थांबा काका, मला बाहेर जाऊ द्या. मी बाहेर गेलो की, तुम्ही मनसोक्त गा. गाऊन झालं की या. मी बाहेर तुमची वाट पहातो.” कोल्हा म्हणाला.

कोल्हा बाहेर जाताच गाढवानं उंच स्वरात राग आळवण्यास सुरुवात केली.

रात्रीच्या शांततेत गाढवाचं ओरडणं दूरपर्यंत गेलं. गाढवाचा आवाज ऐकताच शेताचा राखणदार मोठी काठी घेऊन धावत आला. गाढव देहभान विसरून गात होतं. काठ्यांचा वर्षाव त्याच्या अंगावर पडू लागला. मार खाऊन खाऊन गाढव जमिनीवर पडलं.

थोड्या वेळानं गाढव शुद्धीवर आलं. बघतो तर गळ्यात एका मोठ्या दोराला मोठा दगड बांधून ठेवला होता. ते दगडाचं लोढणं ओढत, रखडत गाढव कुंपणाबाहेर आलं. गाढवाचं सर्वांग मार खाल्ल्यानं दुखत होतं. गळ्यातील ओझ्यानं त्याला चालणंही अवघड झालं होतं. गाढवाला बघून कोल्हा उभा राहिला.

“वा, काका, तुमच्या गाण्यावर खुष होऊन राखणदारानं सुंदर बक्षीस दिलं आहे. अभिनंदन! तुमचं अभिनंदन !” “मित्रा, माझ्या दु:खावर आणखी मीठ चोळू नकोस. तुझा सल्ला न ऐकल्याबद्दल मला आता वाईट वाटत आहे.” गाढव म्हणालं.

Author