(ग्रीक लोककथा)
[कोल्हा हा एक धूर्त, कावेबाज, चतुर आणि लबाडी करण्यात पटाईतअसलेला प्राणी आहे. कोल्ह्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत. वास्तविक
सिंह हा जंगलचा राजा, पण कोल्हा त्यालाही फसवतो. विहिरीच्या पाण्यात
सिंहाला त्याचेच प्रतिबिंब दाखवून “तुझा प्रतिस्पर्धी तुला आव्हान देत आहे”
अशी बतावणी करून तो सिंहाला चिथावतो. सिंह त्या प्रतिबिंबावर चाल करून
जातो, आणि विहिरीत पडतो. ग्रीक लोककथा मात्र याहून वेगळी आहे. ]
कोल्हा दिसायला सुंदर, अत्यंत चपळ, वेगाने पळणारा. याउलट साळिंदर
म्हणजे अगदीच गबाळा प्राणी. दिसायला थुलथुलीत. संथपणे डुलत डुलत
चालणारा. आपण भले आणि आपले काम, कुणाच्या अध्यात मध्यात पडणार
नाही, कुणाची स्वत:हून खोड काढणार नाही. अन्न शोधण्यासाठी बाहेर
पडायचं, अन्यथा आपलं घर सांभाळायचं. अशा निरूपद्रवी साळिंदरवर
कोल्ह्याचा डोळा असतो.
कोल्हा साळिंदरवर हल्ला करण्यासाठी टपून बसतो. रात्रंदिवस तो
साळिंदरच्या बिळाभोवती फेऱ्या मारून त्याच्यावर पाळत ठेवतो. केव्हा ना
केव्हा साळिंदर बिळातून बाहेर येईल, आणि मग आपण त्याच्यावर अचानक
हल्लाबोल करायचा, असा मनातल्या मनात बेत करून तो सावधपणे
साळिंदरची वाट पहात रहातो. सावज गळाला लागण्यासाठी तासनतास वाट
पहावी लागते, ज्याची शिकार करायची त्याला गाफील ठेवावं लागतं, अशा
युक्तीच्या सर्व गोष्टींचे ज्ञान कोल्ह्याला असते. साळिंदरला पकडण्यासाठी
कोल्हा या सर्व युक्त्यांचा वापर करतो. साळिंदरला मात्र याची मुळीच
खबरबात नसते. ते आपलं अन्न शोधण्याचं काम मुकाटपणे करीत
असतं.सफरचंद, मश्रुम, कीटक असे काही बाही गोळा करून बिळात
साठवण्याचा उद्योग चालू असतो. एकटे भटकण्यापेक्षा आपल्या सख्या
सोबत्यांबरोबर मिळून मिसळून रहाणे त्याला आवडते.थंडीच्या दिवसात
परस्परांची उब मिळून ते थंडीपासून आपला बचाव करतात. आताही ते असेच
फिरत होते. धुळीत त्यांच्या पावलांचे ठसे उमटून एक चाकोरी उमटली होती.
कोल्ह्याने ती पाऊलवाट ओळखली. त्याबरोबर खुशीत येऊन त्याने एक उडी
मारली. “ अरे व्वा! आता तू सापडलाच माझ्या तावडीत” असे म्हणून त्याने
झटकन ती चाकोरी ओलांड्ली. मैदान गाठले. पुसटशा खुणांवरूनही माग
काढण्यात कोल्हा पटाईत होता. साळिंदरच्या जवळपास पोहचायला त्याला
फार वेळ लागला नाही.
छोट्या साळिंदरला धोक्याची चाहूल लागली. संकट घेरून आले आहे, हे
त्याने ओळखले. कोल्ह्याला हुलकावणी देण्यासाठी लागणाऱ्या युक्तीच्या चार
गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. पण आत्मसंरक्षणासाठी त्याचे शरीर हीच एक फार
मोठी गोष्ट त्याच्याकडे होती. सर्वप्रथम त्याने त्याच्या तोंडातून फेस बाहेर
काढायला सुरूवात केली. तो फेस त्याने आपल्या पिसांना चोपडला. त्याच्या
वासाने असा विचित्र दर्प सुटला की, कोल्हा सैरभैर झाला. त्या वासाने
साळिंदरचे सहकारी सावध झाले. त्यांनीही बचावाचा पवित्रा घेतला. त्यांच्या
शरीराच्या मणक्यांची रचनाच अशी होती की, चटकन चेंडूसारखी त्याला
शरीराची गुंडाळी करता यायची. डोके, पाय, पोट सगळे काही गुंडाळले जायचे.
आणि पिसांची रचनाही टोकदार सुयांसारखी असे. त्या पिसांच्या पोकळीत
हवा भरली जायची आणि सगळी पिसे ताठरून बाहेर यायची. एखाद्या धारदार
शस्त्रासारखे साळिंदर पुढे आल्यावर कोल्ह्याला पळून जाण्याखेरीज दुसरा
पर्याय उरला नाही. कोल्हा हरला. साळिंदर जिंकले. यानंतरही दररोज
कोल्ह्याने साळिंदरला पेचात पकडण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या करून
पाहिल्या; परंतु साळिंदरच्या एककलमी प्रतिकारापुढे कोल्ह्याला माघारच
घ्यावी लागली. कंटाळून कोल्हा जंगलात निघून गेला.