वेडया कासवाची गोष्ट

कोणे एके काळी, एका तळ्यांत कंब्रुग्रीव या नावाचा एक कासव रहात होता. कंबुग्रीव म्हणजे कमानदार मानेचा. तर हा कमानदार मानेचा कासव ज्या तळ्यांत रहात होता, त्या तळयांत दोन हंस पक्षीही रहात होते. त्या तिघांची छान मैत्री जुळली होती नि ते दिवसभर एकमेकांशी खेळण्यात आणि गप्पा मारण्यात रमत असत.



कोणे एके काळी, एका तळ्यांत कंब्रुग्रीव या नावाचा एक कासव रहात होता. कंबुग्रीव म्हणजे कमानदार मानेचा. तर हा कमानदार मानेचा कासव ज्या तळ्यांत रहात होता, त्या तळयांत दोन हंस पक्षीही रहात होते. त्या तिघांची छान मैत्री जुळली होती नि ते दिवसभर एकमेकांशी खेळण्यात आणि गप्पा मारण्यात रमत असत.

अशी वर्षं लोटली नि त्यांची मैत्री दृढ होत गेली. एका वर्षी उन्हाळा कडक पडला होता. पाऊस पडत नव्हता. तळ्यांतलं पाणी आटू लागलं. दररोज ते तिघे मित्र आशेनं आकाशाकडे बघत. पण एकही पावसाळी ढग दिसत नव्हता.

एक हंस दुस-या हंसाला म्हणाला, ‘हे तळं लौकरच कोरडं ठणठणीत होईल, आपण दुसरं तळे किंवा नदी शोधायला हवी. आपण कंब्रुग्रीवाकडं बोलून काही तरी ठरवू या. त्याचा विचार ऐकू या.’

आणि त्या हंसानी कासवाला आपला बेत सांगितला. कासव थोडा वैतागला नि मग तो बोलला, ‘हे मला सांगण्यात काय अर्थ? मी पाण्यात राहाणारा प्राणी. पाण्याशिवाय मी जगू शकणार नाही. मरून जाईन. आणि तुम्ही निघून गेलात तर मी आणखीच लौकर मरेन कारण तुम्ही दूर निघून गेल्याचं दुःख मला सोसणार नाही. तुम्ही जर माझे खरे मित्र असलात तर, तुमच्याबरोबर मलाही नेण्याचा मार्ग तुम्ही शोधून काढाल. तुम्हाला ठाऊकच आहे की कायदेपंडित मनु ह्यानं सांगितलं आहे की, शहाणी माणसे संकटाच्या वेळी आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला वाचविण्याची शक्य तेवढी धडपड करीत असतात.

कंब्रुग्रीवाला आपल्याबरोबर दुस-या तळ्यांत नेण्याचा उपाय शोधण्यात ते तीन भित्र गढले. दोन दिवस ते विचार करीत होते विचार विचार आणि विचार-पण उपाय काही सुचेना.. एवढ्यात कासवाला एक छानदार युक्ती सुचली. ‘एक काठी घेऊन या तुम्ही. ती मध्यभागी मी तोडांत धरतो. तुम्ही दोघे दोन टोकं तुमच्या चोचीत पकडा आणि दुस-या तळ्याकडे उडत जा.’

तसा एक हंस म्हणाला, ‘वा: ही छान युक्ती आहे. मात्र ह्यात एक धोका आहे आपण हवेतून उडत असताना तू बोलता कामा नये. बोलण्यासाठी तोंड उघडलं तर तोंडातली काठी सुटून तू खाली पडशील आणि मरून जाशील. त्यावर कासवानं न बोलण्याचं, तोंड न उघडण्यांच वचन दिलं. हवाई हवेतल्या प्रवासात गप्प राहाण्याचं त्यानं कबूल केलं

दुस-या दिवशी हंसानी एक काटकी आणली. ठरल्याप्रमाणे कासवानं मध्यभागी ती दातानी पकडली. हंसानी दोन टोकं चोचीत धरली नि ते भर्रकन उडाले. सकाळची वेळ होती. नदीत आंघोळी करण्यासाठी खूप माणसं आली होती. एक काटकी दोन हंसानी दोन टोकांना धरली आहे. आणि मधला भाग दाताने पकडून एक कासव लोंबकळतो आहे. हा मजेशीर देखावा पाहून लोक हसत सुटले.

नंतर ती तिघं एका मोठ्या गावावरून उडत जाऊ लागली, रस्त्यातील एक माणूस आपल्या मित्राला म्हणाला, ‘रामू, अरे, हे काय उडतयं आकाशातून? ते दोन पक्षी कोणाला घेऊन उडत जातायत? किती मजेशीर दिसतय हे नाही का? कासवानं हे ऐकलं आणि तो भयंकर चिडला..

‘दुसऱ्याची टिंगल करण्याबद्दल मी तुला धडा शिकवतो….’ असं कासव रागारागानं बोलणार होता.

पण पहिला शब्द उच्चारण्यासाठी त्यानं तोंड उघडताच त्याच्या तोंडातली काठी सुटली आणि तो धाडकन् खाली पडला. त्याच्या पाठीवरल्या घट्ट कवचाचे तुकडे तुकडे झाले. आणि ज्या माणसानं त्याची टिंगल केली त्यानंच त्याला उचललं नि घरी नेऊन खाऊन टाकलं. तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही काय बोला, कुठे बोलता हे नेहमी काळजीपूर्वक ध्यानात ठेवून काय ते बोला.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →