(गढवाली लोककथा)
(जंगली भागात, पहाड-पर्वतामध्ये एक छोटेसे पिवळ्या रंगाचे फूल दिसून येते. टेहरी, गढवाल मधील लोक त्या फुलाला ‘प्ली’ म्हणून ओळखतात. तिकडील लोकांमध्ये या फुलासंबंधी एक लोककथा आहे.)
प्यूँलीचे फुलात रुपांतर होण्याच्या अगोदर असे म्हणतात, फार पूर्वी प्यूँली ही एक किन्नरी होती. एक मोठा वनप्रदेश तिच्या ताब्यात होता. त्या प्रदेशावर तिचेच साम्राज्य होते. तिची प्रजा म्हणजे, भालू, वानर, हरिण, हिलाँस, कप्फू इत्यादी पशु-पक्षी ! त्या सर्वांमध्ये कुटुंबभावना होती !
ही किन्नरी या सर्व पशु-पक्ष्यांशी, हे जणू आपलेच कुटुंब आहे अशा तऱ्हेने वागत होती. किन्नरीकडून सर्वांना लाड, प्रेम, कौतुक मिळायचे. किन्नरी म्हणजे जणू त्यांचा प्राणच!
तिच्या संगतीत जादू असावी. कारण हरिणशावक ते ऐकून स्वतःला विसरून जायचे ! फुले तिच्या अवती भवती असायची. दुर्वा जणू तिच्या पायाखाली स्वतःला झोकून द्यायच्या नद्या, निसर्ग तिच्या तालावर नाचायचे. कारण ती सर्वांची लाडकी होती. निसर्ग जणू आपले सर्व सौंदर्य तिच्या अंगाअंगात भरून द्यायचा. चंद्रकलेसारखी तिची प्रत्येक कला, नाजुक सुंदर दिसायची!
किन्नरीच्या साम्राज्यात दुःख असे नव्हतेच. दुःखी माणसाची सावली देखील तिथे पडली नव्हती. पापी हातांनी कुणी फुलांना स्पर्श केला नव्हता. पशू म्हणा, पक्षी म्हणा कुणीही कधी अमंगळ शब्द ऐकला नव्हता. योगक्षेमात, लोकक्षोभ नव्हते. तिच्या साम्राज्यभर शांततेची छाया जणू पसरली होती !
तिच्याकडे बघितले म्हणजे कसे पवित्र पवित्र वाटायचे. असे वाटायचे की जणू काही ती तपस्विनी सीता वा पार्वतीच! पूर्वजन्मीचे पुण्यफल तिच्या मुख कमलावर विलसत होते. ती आपल्या निवासाच्या बाहेर पडली, की वाटायचे कोळ्याच्या तंतू वस्त्राने तिचे अंगअंग झाकले गेले आहे. बाहेर पडली की कुंजाकुंजातून ती नाचायची. पक्षांच्या किलबिलाटात आपलाही स्वर मिसळून द्यायची. जीव-जंतूंना कुरवाळायची. फुलांचे हार लेवून, नद्यांच्या खळखळाटाच्या तालावर ती नाचायची. ती हसली म्हणजे वाटायचे की चांदण्याच चमकत आहे. क्षणाचे तिचे अस्वस्थ होणे, जणू कुणी तिच्या कानाशी कुजबुजत आहे. ही चाहूल कशाची हे कळेनासे व्हायचे. ही अशी हुरहुर कधी हसविते कधी स्वतःलाच हरवून बसविते.
एक दिवस आपले काळेभोर केस सोडून ती एका निर्झराकाठी बसली होती. डावा हात हनुवटीवर ठेवून उजव्या हाताने एका हरिण पाडसाला कुरवाळीत होती. तिचे डोळे नदीवर उठणाऱ्या तरंगावर खिळले आहे. हृदयात हसरी चाहूल…! कुठूनतरी कसला तरी आवाज आला. एक सुंदर नवयुवक तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर यौवनाचे रंग खुलले होते. बुद्धीचे तेज विलसत होते. परिश्रमांची छटा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. घामाने त्याचे शरीर चिंब झाले होते. जवळच वाहाणाऱ्या निर्झराकडे त्याची तहानलेली दृष्टी होती.
प्यूँलीने हे सर्व पाहिले. ती स्तिमित झाली! तो प्रवासीही एकटक ती रुपाची खाण बघत होता. जणू काय त्याची तहान त्या रूपाकडे बघूनच निमाली.
प्यूँलीने आजवर असे रुप कधी पाहिले नव्हते. अचानक एका नवख्या माणसाला पहाताच तिला किंचित संकोच वाटला. परंतु तिच्या मनात असेही आले की आपल्या मनाचा कसला तरी अभाव भरून निघत आहे.
‘तुमच्याकडे पाहून कुणीतरी शिकारी आला आहे असे मला वाटले. अन् आमच्या इथे शिकारीला मज्जाव आहे.
‘ ‘मी शिकारी नाही. मी एक राजकुमार आहे. तुम्हाला भ्यायचे कारण नाही. शिकार करण्याची आता मला गरजच राहिली नाही. ‘
क्षणभर कुणीही बोलले नाही. कदाचित दोघांना बोलण्याचे भानही नसावे. राजकुमार तृप्तीची नजर लावून किंचित हसला.
सूर्य पश्चिमेला सरकत होता. पशुपक्षी स्वच्छंदाने आवाज करीत प्यूलीसाठी फळे तोडून आणू लागले. ते दृष्य पाहून राजकुमाराला आश्चर्य वाटले. पक्षांनी आणलेली ताजी फळे प्यूँलीने राजकुमाराच्या आतिथ्यासाठी सादर केली. अशा आतिथ्याने राजकुमारभारावून गेला.
‘किती छान! इथे किती चांगले वाटते आहे! सर्वत्र जंगल असूनही सगळे कसे मंगल मंगल भासते आहे. ही शांतता, हे सुखी जीवन… खरेच असे वाटते की इथून जाऊच नये.’
‘मोठमोठ्या शहरांवर राज्य करणारा राजकुमार इथे या जंगलात राहून करणार काय?’
‘ते मलाही ठाऊक नाही. पण इथून मात्र हलूच नये असे वाटते.’
दोघांची नजरानजर झाली. दोघांच्या डोळ्यांतील भाव… चटकन राजकुमार म्हणाला,‘तू माझ्याबरोबर चलशील? माझ्यावर अन् माझ्या राज्यावर तुझीच सत्ता असेल.’
प्यूँलीची नजर खाली वळली. तिने उत्तर दिले नाही. संमतीची छटा तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली. ती शंकित होऊन म्हणाली, ‘माझे सर्व लागे-बांधे इथेच आहेत. इथले सर्व जीव मला प्रिय आहेत. त्यांना मी कसे सोडू?’
पण लगेच तिच्या मनात आले… ही व्याकुळता… ही सौंदर्याची खाण… !
यासाठीच तर जगायचे असते. पण या सगळ्यांना सोडून जायचे म्हणजे…!
पण तारुण्याची ओढ, हृदयाची हुरहुर….. अखेर ती राजकुमाराबरोबर जाण्यास तयार झाली.
दुसऱ्या दिवशी राजकुमाराबरोबर प्यूँली निघाली. तिच्या सख्या सोयऱ्यांनी तिला निरोप दिला. पण त्या निरोपात आपले कसे होणार, ही चिंता होतीच. आपल्या प्रिय साम्राज्ञीचा वियोग…!
असे कधीतरी घडणारच होते. तेथले पशु-पक्षी पुन्हा आपल्या भरवशावर नित्यक्रमाला लागले. सर्व जीवनक्रम पूर्ववत झाला.
प्यूँली आता राजधानीत राहू लागली. सारे ऐश्वर्य, प्रेम यात ती न्हाऊन निघत होती ! तरी देखील तिला तिच्या सख्या-सोबत्यांची आठवण येतच राहिली. पशु-पक्षांची गाणी, नद्यांची खळखळ, ती पर्वते शिखरे प्लीला असे वाटू लागले की सगळे आपल्याला बोलावीत आहेत.
इकडे या राजधानीत ही सगळी माणसे…! तिने आजवर कधी न पाहिलेली इर्षा, घृणा,लोभ, मोह….! तिचे राणीपद तिला बोचू लागले. राजकुमाराच्या राणीवशात अनेक राण्या आहेत. त्यात आपणही एक.
प्यूँली मनात गोंधळून गेली. तिचे हृदय गलबलून आले. ती उदास उदास राहू लागली. तिच्या मनाची शांती नाहीशी झाली. अस्वस्थतेचा परिणाम तिच्या देहावर दिसू लागला. दिवसें दिवस ती कोमेजू लागली. आजारी झाली. ती फिकी दिसू लागली. जगण्याची इच्छाच नुरली.
राजकुमाराच्या सांत्वनाचा काही एक परिणाम झाला नाही. ती आणखीनच खंगू लागली. अखेर जवळ आलेली दिसताच ती कण्हत कुंथत म्हणाली…..
‘माझी एक अखेरची इच्छा आहे !
‘सांग माझ्या लाडक्या राणी !
“प्यूँलीने आपली इच्छा व्यक्त केली. यापुढे शिकारीला जाल तर माझ्या भावाबहिणींना मारू नका. माझे प्राण गेल्यावर कलेवर माझ्या राज्यातील शिखरांच्या आसपास ठेवून द्या.’
हे प्यूँलीने अखेरचे वाक्य ! तिच्या कुडीतून प्राण-पक्षी उडून गेला.
राजकुमाराने तिची अखेरची इच्छा पूर्ण केली. त्या ठिकाणी प्रिय वस्तूंच्या सानिध्यात एके दिवशी एक लहान रोप उगवले. तिच्या सग्या सोयऱ्यांनी ते जपले. रोप मोठे झाले. त्याला एक फूल उमलले…… एक फूल अनेक फूले ! त्या फुलाला तिचे जंगलातील बंधू बांधव ‘प्यूली’ असे म्हणू लागले.
‘रम्य फूल ते सान सोनुले.’