(नायजेरियन लोककथा)
कोणे एके काळी सूर्य आणि पाणी खूप चांगले मित्र होते. पृथ्वीवर सूर्य आणि पाणी गुण्या गोविंदाने रहात होते. पाण्याला भेटायला सूर्य नित्यनेमाने येत होता. परंतु पाणी कधीच सूर्याला भेटायला जात नव्हते. एके दिवशी गप्पांच्या ओघात सूर्याने पाण्याला विचारले, ‘मित्रा मी नेहमी तुझ्याकडे येतो. तू माझ्याकडे का येत नाहीस?’ पाणी म्हणाले, ‘अरे मित्रा, माझ्या विस्तीर्ण प्रदेशात तू केव्हाही येऊ शकतोस ! परंतु मी जर तुझ्याकडे आलो तर तुलाच घराबाहेर पडावे लागेल ! मी तुझ्याकडे यावे असे वाटत असेल तर तुला खूप मोठे घर बांधावे लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे सांगतो, असंख्य लोकांसह, जलचर प्राण्यांसह मी येणार असल्यामुळे विस्तीर्ण प्रदेशात असंख्य खोल्याही असल्या पाहिजे!’ पाणी मित्र आपल्याकडे येणार या कल्पनेने सूर्याला खूप आनंद झाला. आनंदाच्या आवेशात पाण्याचा सर्व अटी मान्य केल्या.
सूर्य घरी येताच बायकोने म्हणजे चंद्राने हसतमुखाने सूर्याचे स्वागत केले. सूर्याचे आनंदित सुहास्य वदन पाहताच चंद्राने विचारले आज काही विशेष घडलेले दिसते आहे ! सूर्य म्हणाला, ‘माझा परम मित्र पाणी माझ्याकडे येण्यास तयार आहे. फक्त मित्राच्या स्वागतासाठी भोलेमोठे घर बांधावे लागणार आहे. चंद्रालाही खूप आनंद झाला. दोघेही उत्साहाने कामाला लागले. पाण्याशी चर्चा केल्याप्रमाणे विस्तीर्ण प्रदेशावर घर बांधून तयार झाले. सूर्य पाण्याच्या भेटीला आला. मित्राला म्हणाला, ‘मित्रा तुझ्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत! तू केव्हा येतोस? ‘ पाणी मित्र म्हणाला, उद्याही मी येऊ शकतो ! परंतु तयारी व्यवस्थित केली आहे, ना? ‘ सूर्याने मित्राला बिनधास्तपणे येण्याविषयी आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व मित्र परिवारासह पाणी सूर्याच्या भेटीला निघाले. सूर्याच्या घराबाहेर येताच पाण्याने सूर्य मित्राला हाक मारली, ‘मित्रा, मी बिनधास्त येऊ शकते ना? आम्हा सगळ्यांची पुरेशी व्यवस्था केली आहेस ना? ‘ हसतमुखाने पाण्याचे स्वागत करीत सूर्य म्हणाला, ये ये मित्रा, आज माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे.
पाणी आपल्या सर्व जलचर मित्रांसह आत येताच घरभर पाणीच पाणी झाले. ‘हे पाहून पाण्याने पुन्हा सूर्याला विचारले, अजून आत येऊ शकते ना? ’ सूर्य म्हणाला, ‘मित्रा काळजी करू नकोस भरपूर जागा आहे. जसजसे पाणी आत येऊ लागले तसतसे पाण्याचे लोट वाहू लागले. सूर्य मित्राला पाण्याने पुन्हा विचारले, ‘अजून काही मित्र आले तर चालतील ना? ‘चंद्रसूर्य म्हणाले, आमच्याकडे प्रथमच पाहुणे येत आहेत. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. कितीही मित्र आले तरी चालतील, आम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करू! परवानगी मिळताच पाण्याची एक मोठी लाट आत येताच चंद्र सूर्य घराच्या छतावर फेकले गेले. परंतु पाहुण्यांच्या आगमनामुळे चंद्र-सूर्य आनंदाने छतावर बसून गंमत पहात होते. काही क्षणातच छतावरून पाण्याचे लोट वाहू लागले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्या वेगामुळे चंद्र-सूर्य आकाशात लोटले गेले. आजही चंद्र सूर्य आपल्याला आकाशातच दिसतात.