साळींदरची प्रकाशभेट

(सायबेरियन लोककथा )

कोण्या एके काळी सायबेरियन लोकांना साळींदर हा प्राणी फार आवडायचा. कुठल्याही प्रश्नाचे चटकन् उत्तर शोधणारा हुशार व चाणाक्ष प्राणी म्हणून साळींदरची ओळख होती. साळींदर दयाळू स्वभावाचा होता. कुणाच्याही मदतीला चटकन् पुढे यायचा. सर्वांमध्ये मिळून मिसळून रहायचा. त्यामुळे सर्वांना तो हवा हवासा वाटायचा. तो सायबेरियन शेतकऱ्यांचा जिवाभावाचा दोस्त होताच; पण तितकाच तो आकाशाचाही मित्र होता.



(सायबेरियन लोककथा )

कोण्या एके काळी सायबेरियन लोकांना साळींदर हा प्राणी फार आवडायचा. कुठल्याही प्रश्नाचे चटकन् उत्तर शोधणारा हुशार व चाणाक्ष प्राणी म्हणून साळींदरची ओळख होती. साळींदर दयाळू स्वभावाचा होता. कुणाच्याही मदतीला चटकन् पुढे यायचा. सर्वांमध्ये मिळून मिसळून रहायचा. त्यामुळे सर्वांना तो हवा हवासा वाटायचा. तो सायबेरियन शेतकऱ्यांचा जिवाभावाचा दोस्त होताच; पण तितकाच तो आकाशाचाही मित्र होता.

आकाशराजाचे घर खूप मोठे होते. घराच्या भिंती पांढऱ्या शुभ्र चकाकणाऱ्या बर्फाच्या होत्या. जमिनीवर पांढऱ्या रंगाचेच मऊसूत गालीचे अंथरलेले असायचे. प्रत्येक खोलीत मंद घंटानाद चालू असायचा. शिवाय घरात नेहमी एक शेकोटी पेटलेली असायची. त्या शेकोटीतून लालबुंद ज्वाला धगधगत रहायच्या.

शेकोटीच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे आरसे ठेवलेले असायचे. एक आरसा सोनेरी आणि दुसरा चंदेरी होता. शेकोटीचा प्रकाश या आरशांवर पडून परावर्तीत व्हायचा. बर्फाच्या भिंतीतून पाझरून पृथ्वीवर पसरायचा.

एकदा साळींदर आकाशराजाला भेटायला गेला. आपला जानी दोस्त साळींदर आला की, आकाशराजा आपण ‘राजे’ आहोत हेही विसरून जायचा. साळींदरबरोबर गप्पागोष्टी करण्यात रमून जायचा. त्या दिवशीही त्यांनी अशाच दिलखुलास गप्पा मारल्या. केक्स खाल्ले, चहा प्याले. सगळे सोपस्कार आटोपल्यावर संध्याकाळी साळींदर आकाशराजाला म्हणाला, “मित्रा, आता मला परतायला हवं. माझी घरी जायची वेळ झाली आहे.”

आकाशराजाने त्याला निरोप देण्यापूर्वी आपल्या मैत्रीची भेट म्हणून काहीतरी सोबत घेऊन जा म्हणून विचारले. साळींदर म्हणाला,

“अरे राजा, तुझ्या जिव्हाळ्याच्या चार गोष्टी ऐकूनच मी तृप्त झालो आहे, आता वेगळ्या भेटीची काय गरज आहे?”

आकाशराजा म्हणाला, “अरे, ते खरे असले तरी राजधर्म म्हणून मला आलेल्या अतिथीला भेट दिल्याशिवाय रिकाम्या हाताने परत पाठविता येणार नाही. तेव्हा तू संकोच करू नकोस. माझ्या घरातली तुला जी गोष्ट मनापासून आवडली असेल ती तू अवश्य घेऊन जा.”

मित्राच्या या आग्रहाने साळींदर सुखावला. म्हणाला, “ठीक आहे, तुझा एवढा आग्रहच आहे, तर मला काही तरी खाऊ बांधून दे. लांबचा प्रवास आहे, उपयोगी पडेल.’ “”

आकाशराजाने त्याला छान छान फळांचा करंडा आणि मिठाईचा पुडा बांधून दिला. हा खाऊ घेऊन साळींदर परत जायला निघाला. आकाशराजाला आपल्या या मित्राला निरोप देताना फारच जड गेले. तो म्हणाला, “थांब, मी पुढेपर्यंत येतो. तुला जरा जवळचा (शॉर्टकट) रस्ता दाखवतो. लवकर पोहोचशील.” असे म्हणून आकाशराजा साळींदराच्या सोबतीने बाहेर पडला.

थोडे अंतर चालून गेल्यावर त्या दोघांची रस्त्यात पृथ्वीराजाशी गाठ पडली. दोघांनी एकमेकांना अभिवादन केले, ख्याली-खुशाली विचारली. आकाशराजा पृथ्वीराजाला म्हणाला, “राजे, आज इतक्या दूर कशासाठी आलात?” पृथ्वीराजा म्हणाला, “राजाधिराज, आज तुमच्याच भेटीला निघालो आहे. पण आपली रस्त्यातच भेट झाली. बाकी काहीही म्हणा राजाधिराज, तुमच्या राज्यात एवढ्या संध्याकाळीसुद्धा किती स्वच्छ प्रकाश पडला आहे! काय रहस्य आहे, कळेल का?”

आकाशराजाने पृथ्वीराजाला आलिंगन दिले आणि म्हणाला, “या प्रकाशाचे रहस्य असे काही वेगळे नाही. आमच्या राजवाड्यात नेहमी अग्निकुंड पेटलेला असतो. त्या अग्निकुंडातून निघणाऱ्या ज्वालांचा हा प्रकाश आहे.” आकाशराजाने पृथ्वीराजाला रात्री आपल्याकडेच मुक्कामी रहाण्याचा आग्रह केला. म्हणाला, “राजे, रात्रभर रहा आमच्याकडे. गप्पा-विनोद होतील. माझा छोटा दोस्त साळींदरही आहे, त्यालाही ठेवून घेऊ. खाऊ, पिऊ, मजा करू.” पृथ्वीराजाने आकाशराजाचे अगत्याचे निमंत्रण स्वीकारले, साळींदरलाही आपल्या मित्राचे मन मोडता आले नाही. ते तिघे तत्काळ आकाशराजाच्या महालाकडे निघाले.

आकाशराजाने पृथ्वीराजाला आणि आपल्या साळींदर मित्राला खास राजघराण्याला शोभेल अशी मेजवानी दिली. राजवाडा सुंदरच होता, तशात आज तो अधिकच सजवलेला दिसत होता. प्रत्येक खिडकीत मेणबत्ती तेवत होती. सगळीकडे सुखावणारा प्रकाश भरून होता. पृथ्वीराजाला आकाशराजाचे हे वैभव पाहून आनंदही झाला आणि असूयाही निर्माण झाली. कारण पृथ्वीवर असा उजेडाचा सडा पडलेला कधी दिसायचा नाही. तिथे सतत अंधार असायचा. शिवाय झाडाझुडुपांमुळे या अंधारात भरच पडायची. त्यामुळे वातावरणात आकाशराजासारखा जोश तर नसायचाच; उलट सर्वत्र उदास छाया पसरलेली असायची. या दोन राज्यांच्या तुलनेने पृथ्वीराजा अस्वस्थ झाला. मेजवानीत आणि रात्रीच्या गाण्याच्या मैफलीत त्याचे मन रमेना.

कशीबशी मैफल संपली. आता निरोपाची वेळ जवळ आली होती. नेहमीप्रमाणे आकाशराजाने आपला अतिथीधर्माचा रिवाज सांभाळण्यासाठी साळींदर आणि पृथ्वीराजाला भेटवस्तू नेण्याचा आग्रह केला.

साळींदर म्हणाला, “मित्रा, तू दिलेला खाऊ अजून तसाच आहे, तो मला पुरेसा आहे. त्यापेक्षा तू पृथ्वीराजालाच काहीतरी भेट दे.” आकाशराजाने मग पृथ्वीराजाला अगत्यपूर्वक विचारले, “राजे, आपल्या आजच्या या मैफलीची आठवण म्हणून आपल्याला इथली जी गोष्ट आवडली असेल, ती आमच्याकडून भेट म्हणून जरूर घेऊन जा.”

पृथ्वीराजाला आकाशराजाच्या या अगत्याचे कौतुक वाटले. आपण आकाशराजाच्या आग्रहाला मान द्यायला हवा, म्हणून कोणती गोष्ट भेट म्हणून मागावी, याचा तो विचार करू लागला. वास्तविक स्वत: राजपद उपभोगत असल्याने त्याला काही मौल्यवान भेटीची लालसा नव्हती. पण आकाशराजाच्या राजवाड्यातील अनमोल संध्याकाळ खुलवणाऱ्या त्या मनोहारी आरशांनी त्याचे मन लुभावले होते. पृथ्वीराजाने हे चमचमणारे आरसेच भेटीदाखल द्यावेत अशी इच्छा प्रदर्शित केली. तो आकाशराजाला म्हणाला, “हे चमचमणारे आरसे माझ्या घरातल्या शेकोटीभोवती खुलून दिसतील, आपण ते मला दिले तर हे आरसे माझ्या राजवाड्यात आपल्या अगत्याची आठवण कायम ताजी ठेवतील.”

आता मात्र आकाशराजा धर्मसंकटात सापडला. आरशांशिवाय आपल्या राजमहालाचे वैभव नाही, याची त्याला जाणीव होती. पृथ्वीराजा असली काही भेट मागेल हे त्याला अपेक्षित नव्हते. पण अतिथीधर्म तर पाळायलाच हवा, म्हणून त्याने जड अंत:करणाने ते दोन्ही आरसे काढून पृथ्वीराजाला दिले.

पृथ्वीराजा आरसे घेऊन आणि साळींदर फळा-मिठाईचा उपहार घेऊन परतीला निघाले. आपल्या स्वभावधर्माप्रमाणे आकाशराजा पुढेपर्यंत त्या दोघांना सोडायला गेला. पण आता आरसे शेकोटीसमोरून काढून घेतल्याने परावर्तीत होणारा प्रकाश नव्हता. सगळीकडे अंधार दाटून आलेला होता. रस्ता शोधायला त्रास पडत होता. आकाशराजा कसाबसा आपल्या राजमहालात परतला आणि उदास मनाने शेकोटीसमोर बसून राहिला. जे झाले ते बरे नाही, हे खरे असले तरी आपण आपला अतिथीधर्म पाळला या विचाराने त्याने आपल्या मनाची समजूत काढली.

इकडे पृथ्वीवर परावर्तित होणारा प्रकाश अचानक नाहीसा झाला. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. साळींदरची थोडीफार शेती होती. पण प्रकाश ओसरल्याने पाऊसही पडेना आणि पीकपाणीही पिकेना. पृथ्वीवरची प्रजा हवालदिल झाली. हे सारे अघटित आकाशघरातले आरसे काढून आणल्यानेच झाले हे अर्थातच हुशार साळींदरच्या लक्षात आले. पृथ्वीराजाने आकाशराजाला हे आरसे परत करण्यातच राजाचे आणि प्रजेचे हित आहे, आणि त्यासाठी आपण पृथ्वीराजाला साकडे घातले पाहिजे, असा त्याने मनाशी निश्चय केला आणि तो पृथ्वीराजाकडे निघाला.

आकाशराजाचा मित्र साळींदर आज आपल्याला स्वत:हून भेटायला आला, हे पाहून पृथ्वीराज संतुष्ट झाला. त्याने आनंदाने साळींदरचे स्वागत केले. आपुलकीने ख्याली-खुशाली विचारली. साळींदरने प्रामाणिकपणे कुठलाही आडपडदा न ठेवता राजाला पृथ्वीवरच्या प्रजेचे कसे हाल होत आहेत, याचा वृत्तांत कथन केला. सगळीकडे अंधार पसरला आहे. शेतातली पिके पिवळी पडत चालली आहेत, अन्नधान्यच पिकले नाही, तर प्रजा जगेल कशी, म्हणून त्याने चिंतेचा सूर लावला. आणि शेवटी हे सारे काही आकाशराजाचे आरसे काढून आणल्याने झाले आहे, हे परखडपणे कथन केले.

पृथ्वीराजाच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण साळींदरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याने थेट राजाला विचारलेच, “कुठे आहेत ते आरसे?” पृथ्वीराजा म्हणाला, “अरे बाबा साळींदर, ते आरसे मला खरोखरच आवडले, म्हणून मी मागितले. हे सुंदर आरसे जपून ठेवावेत म्हणून मी ते सुरक्षित ठेवून दिले आहेत.”

साळींदरने चहूकडे नजर फिरवली; पण त्याला ते आरसे कुठे दिसले नाहीत याचा अर्थ राजाने ते लपवून ठेवले असावेत, हे चाणाक्ष साळींदरने ओळखले.

दरम्यान साळींदरला पाहुणचार म्हणून पृथ्वीराजाने चहा-फराळाची व्यवस्था केली. सगळेच पदार्थ फार रूचकर होते, पण साळींदरला ते गोड लागत नव्हते. राजाकडून हे आरसे कसे काढून घेता येतील आणि आकाशराजाला कसे परत नेऊन देता येतील याची तो युक्ती शोधत होता.

चहा-फराळाची मेजवानी संपल्यावर आतिथ्यधर्म म्हणून पृथ्वीराज साळींदरला म्हणाला, “मित्रा, आपल्या आजच्या या भेटीची स्मृती म्हणून तुला माझ्याकडचे जे काही आवडले असेल, ते तू भेट म्हणून आनंदाने घेऊन जा.” साळींदर मानेनेच नाही म्हणाला. ‘निदान थोडाफार खाऊ तरी ने’ म्हणून पृथ्वीराजाने आग्रह केला. पण साळींदरने त्यालाही नम्रपणे नकार दिला. पृथ्वीराजाला साळींदरचे हे वागणे खटकले. राजा त्याला म्हणाला, “तुला माझा पाहुणचार आवडला नाही का? तू काहीच बरोबर नेत नाही, याने माझ्या मनाला वेदना होत आहेत; तेव्हा तू तुझा हट्ट सोड, आणि माझ्या समाधानासाठी तरी काही छोटी-मोठी भेट घेऊन जा.”

आता राजा आपण मागू ते देईल, असा विश्वास आल्यावर चतुर साळींदरने पृथ्वीराजाकडे मागणी केली, “मित्रा तू तुझे राजपद विसरून निखळ मैत्रीची जी भावना प्रदर्शित केली, ती माझ्यासाठी खूप मोलाची आहे. मी तुझ्या इच्छेचा आदर करतो. तू मला सोन्याचांदीचा नजराणा देण्याच्या भानगडीत पडू नकोस. मला फक्त तुझ्या राजवाड्यासमोरील तळ्याचं मनोहरी प्रतिबिंब दाखव.” आता राजाची मोठीच पंचाईत झाली. तळ्याचं प्रतिबिंब दाखवायचं तर आपल्याला आरसे बाहेर काढावे लागतील. राजाला ते मानवले नाही. त्याने साळींदरला ‘दुसरे काही माग, हे आपल्याला शक्य होणार नाही,’ म्हणून सांगीतले.

साळींदरने थोडा विचार केला आणि तो राजाला म्हणाला, “ठीक आहे, प्रतिबिंब नाही देता येणार तर नको देऊ. पण तुझ्या घरातले प्रतिध्वनी मला दिले तरी मी खुष होईल.” आता मात्र पृथ्वीराजापुढे मोठाच पेच निर्माण झाला. साळींदरने खाऊला नकार दिला, आपण प्रतिबिंबाला नकार दिला. आता प्रतिध्वनीचा तिसरा पर्यायही आपण मान्य केला नाही, तर त्यामुळे राजधर्माचा अवमान होईल. तरीही राजा म्हणाला, “साळींदर, मला तुला नाराज करायचे नाही, आणि मलाही माझा अतिथीधर्म पाळायचा आहे. आता तूच मला सांग, प्रतिध्वनी म्हणजे फक्त आवाजाचा पडसाद असतो, मी तो तुला कसा काय देणार? त्यापेक्षा तू असे काही तरी माग की मी ते तुला सहजपणे देऊ शकेल.”

साळींदरने बऱ्याच वेळापूर्वी दाराजवळ एक जुना खोका पडलेला पाहिला होता. खोक्याचं झाकण कदाचित नीट लागलेलं नसावं, त्यामुळे त्या खोक्यातून काही प्रकाशकिरण वर डोकावताना दिसत होते. तेवढ्यावरून हुशार साळींदरने ताडले होते, की या खोक्यात ते मौल्यवान आरसे दडवून ठेवलेले असावेत. साळींदर राजाला म्हणाला, “मित्रा, मलाही तुला नाराज करायचे नाही. तुझा अतिथीधर्म मोडल्याचे पाप मला माझ्या डोक्यावर घ्यायची इच्छा नाही. पण मला गरीबाला फार काही मागायला सुचतही नाही. तेव्हा तू मला तो दाराजवळचा जुना खोका तेवढा दे, मी खूष होईल.”

पृथ्वीराजाला खरंच साळींदरचा फार राग आला. पण आता आपण वचन पाळले नाही तर अतिथीधर्माचा आणि पर्यायाने राजधर्माचाही भंग होईल म्हणून नाइलाजाने ही मागणी मान्य करावीच लागणार होती. राजाचे मन खट्टू झाले. डोळ्यांत पाणी दाटून आले. पण तरीही स्वत:ला सावरून त्याने तो खोका साळींदरच्या हवाली केला. त्याला रस्त्यापर्यंत सोडायला न जाता दारातूनच निरोप देऊन दरवाजा खाडकन् लावून घेतला.

साळींदर मात्र खोका घेऊन घरी न जाता थेट आकाशराजाला भेटायला निघाला. आकाशघरी पोहचल्यावर तो आपल्या मित्राला म्हणाला, “राजा, या गरीब मित्राने आज तुझ्यासाठी छोटीशी भेटवस्तू आणली आहे, ती तू स्वीकारावी, अशी मी तुला विनंती करतो.” आकाशराजा या छोट्याशा भेटीनेही भारावून गेला. त्याने तत्काळ खोका उघडून अशी कोणती भेटवस्तू आणली आहे, ते पाहिले. ते दोन आरसे होते. आकाशराजाचे जीव की प्राण असलेले आरसे! त्याने चटकन् ते दोन्ही आरसे आपल्या शेकोटीसमोर ठेवले. आणि झटकन् साऱ्या पृथ्वीवर प्रकाशाचे तेज पसरले. साळींदरने आपल्या मित्राला मिठी मारली.

आजही आपण आकाशात नजर टाकली तर हे दोन्ही आरसे चमचमताना आपल्याला दिसतात. त्यातला सोनेरी आरसा म्हणजे सूर्य आणि चंदेरी आरसा म्हणजे चंद्र! सूर्य प्रकाशासोबत उष्णताही देतो आणि चंद्र प्रकाशासोबत शांतता देतो. ही सारी त्या साळींदराची कृपा!

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →