सुदामदेवाची गोष्ट

कृष्ण लहानपणी सांदीपनी गुरूपाशी विद्या शिकत होते, तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर सुदामदेव नावाचा ब्राह्मणाचा एक मुलगा विद्याभ्यास करीत होता. तो कृष्णाचा जिवलग मित्र होता. पुढे कृष्ण मथुरेला गेला, आणि सुदामदेव आपल्या घरी गेला.



कृष्ण लहानपणी सांदीपनी गुरूपाशी विद्या शिकत होते, तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर सुदामदेव नावाचा ब्राह्मणाचा एक मुलगा विद्याभ्यास करीत होता. तो कृष्णाचा जिवलग मित्र होता. पुढे कृष्ण मथुरेला गेला, आणि सुदामदेव आपल्या घरी गेला. तेव्हापासून कित्येक वर्षेपर्यंत त्यांची दोघांची गाठ पडली नाही. इकडे कृष्णाचे वैभव वाढत चालले, आणि त्याची कीर्तीही चोहोंकडे पसरली. ती ऐकून सुदामदेवाला मित्राचा उत्कर्ष झाल्याबद्दल फार आनंद झाला. सुदामदेव मोठा विद्वान्, सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता. तो अतिशय दरिद्री होता, तथापि जे मिळे त्यात समाधान मानून राहत असे. त्याला बायकोही त्याच्या सारखीच सदाचरणी मिळाली होती. तथापि दारिद्यामुळे तिला अंगभर वस्त्र व पोटभर अन्न मिळत नसे, याचे तिला वाईट वाटे.

सुदामदेव व कृष्ण हे बाळपणचे स्नेही असून त्यांचे एकमेकांवर फार प्रेम आहे हे तिला ठाऊक होते. श्रीकृष्णाच्या भेटीस सुदामदेव गेल्यास आपले दारिद्र्य एका क्षणात नाहीसे होईल ही तिची पक्की खात्री होती. आणि म्हणून ती कृष्णाच्या भेटीला जाण्यासाठी आपल्या पतीच्या पाठीस सारखी लागली होती. पुष्कळ दिवस सुदामदेवाने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण एक दिवस त्यालाही वाटले की द्रव्यासाठी नाही तरी मित्राच्या भेटीसाठी आपण द्वारकेला जावे आणि आपल्या बाळमित्राला एकदा डोळे भरून पहावे. म्हणून त्याने द्वारकेस जाण्याचा विचार केला. फार दिवसांनी मित्राच्या भेटीला जावयाचे, तेव्हा त्याला देण्यासाठी त्याला आवडेल अशी एखादी वस्तू नेली पाहिजे. सुदामदेवाच्या घरात तर अशी काही वस्तू नव्हती. तेव्हा त्याच्या बायकोने चार शेजारणीपाजारणीच्या घरून चार मुठी पोह्यांच्या कण्या मागून आणिल्या, आणि त्या सुदामदेवाच्या धोतराच्या पदरात बांधून दिल्या. त्या घेऊन ब्राह्मणाची स्वारी निघाली, ती द्वारकेला आली. द्वारकेच्या भोवतीं कडेकोट बंदोबस्ताचे चौकीपहारे होते. त्यातून सुदामदेवाने मोठ्या कष्टाने बाहेर पडून दुसऱ्या काही ब्राह्मणांबरोबर नगरात एकदाचा प्रवेश केला, आणि शोध करीत रुक्मिणीचे मंदिरात कृष्ण बसले होते तेथपर्यंत ब्राह्मण जाऊन पोचला. सुदामदेवाला पाहताच कृष्णाने त्वरेने पुढे होऊन आपल्या मित्राला आलिंगन दिले, त्याचे पाय धुतले, व त्याच्या अंगाला सुवासिक पदार्थांच्या उट्या लाविल्या. हा फाटके तुटके नेसलेला दरिद्री ब्राह्मण, आणि कृष्ण याचा इतका आदर का करतात हे कोणालाच काही कळेना. कृष्णाच्या व त्या ब्राह्मणाच्या पुष्कळ वेळपर्यंत सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या. त्यात गुरूच्या घरी रहात असता नानाप्रकारच्या प्रसंगांतून आपण कसे पार पडलो, गुरुजींचे आपल्यावर कसे प्रेम होते, आपण एके जागी कसे हसलो, खेळलो, विद्या पढलो, इत्यादि लहानपणच्या आठवणी निघाल्या, तेव्हा दोघांच्याही नेत्रांतून प्रेमाश्रु वाहू लागले. गोष्टी झाल्यानंतर “माझ्यासाठी तू काय भेट आणली आहेस ती दे” असे कृष्णाने म्हटले. तेव्हा ज्याचे ऐश्वर्य मोठमोठ्या राजांचेही डोळे दिपवून टाकीत होते त्याला आपण आणिलेल्या भिकार कण्या भेट म्हणून कशा द्याव्या अशी लज्जा वाटून सुदामदेव विचारात पडला. तो खाली मान घालून बसला. तेव्हा कृष्णाने आपण होऊन त्याच्या धोतराच्या पदरात बांधलेले पोहे धुंडाळून काढले, आणखी त्यातले मूठभर पोहे मोठ्या आवडीने खाल्ले. ते त्याला इतके गोड लागले की, त्याच्यापुढे रसभरित पंचपक्वान्ने अगदी फिकी वाटली, हा सगळा प्रेमाचा प्रभाव! दुसरे काय?

सुदामदेवाने एक दिवस कृष्णाच्या येथे राहून दुसरे दिवशी निरोप घेतला. कृष्णानेही त्याला दूरपर्यंत पोचवायास जाऊन असाच वारंवार भेट देत जा म्हणून आग्रहाने सांगितले. सुदामा आला तसा परत वाट चालू लागला; पण “मला थोडे तरी धन द्या” असे शब्द त्याच्या तोंडातून लज्जेमुळे निघाले नाहीत, व कृष्णानेही आपण होऊन त्याला काही ‘घे’ असे म्हटले नाही.

आपल्या मित्राने ऐश्वर्य प्राप्त झाले असताही पूर्वीची ओळख कायम ठेवून आपणास सख्ख्या भावाप्रमाणे वागविले, या गोष्टीचीच सुदामदेवाला मोठी धन्यता वाटली ! इतकंच नाही, तर धन दिले नाही हे त्याने उपकारच केले; कारण, धन मिळाले असते तर कदाचित् आपल्या डोळ्यांवर धुंदी आली असती, असे मनात समजून तो आनंदित झाला.

याप्रमाणे मित्राच्या भेटीचा लाभ घडल्याबद्दल आनंद मानीत तो ब्राह्मण आपल्या गावाजवळ जसजसा येत चालला, तसतसे त्यांच्या गावाचे स्वरूप एकदम पालटलेले त्याला दिसले. मोठाले श्रीमंती थाटाचे वाडे, सुंदर बगीचे, आणि आपले स्वागत करण्यासाठी उत्तमोत्तम वस्त्र व अलंकार घालून आलेले स्त्रीपुरुष पाहून सुदामदेव अगदी थक्क झाला. जिला नेसायला धड वस्त्र नव्हते, ती आपली स्त्री भरजरी पैठणी नेसली आहे व शालू पांघरली आहे, आणि आपले चंद्रमौळी घर इंद्रभुवनाप्रमाणे शोभत आहे, हा काय चमत्कार आहे ते बराच वेळ त्याला उमगेना. पण लवकरच त्याच्या ध्यानात आले की, हा सगळा कृष्णाचा खेळ आहे! तेव्हा असा प्रेमळ व गमती मित्र मिळाल्याबद्दल त्याला केवढी धन्यता वाटली असेल याची कल्पनाच केली पाहिजे.

Author