(महानुभाव ग्रंथातील गोष्ट)
कव्हणा एका महात्माचिये आधारिये परिसू होता तो कव्हणी एका ब्राह्मणाचे घरा वसतीसी जाये. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेणे तयाचे वस्त्र आंबट-ओले ऐसे जाले होते.
घरिचीया ब्राह्मणी ओसरीये पिढे घातले, पाये धुतले, तांबिया भरुनी दिधला.
तेणे संध्या केली. तव तो ब्राह्मणू आला. डोईये वानेराची पेंढी, ते ठेविली. तिये सदुर्बळे ऐसी ब्राह्मणे तेयाते गाये एकी दुभे. तेणे गाये दुहिली. राळेयाचे खिचटे गोंदले लोणियाचा कवडा ताविला. मग तयासी ठाव केला, तया दोघाही तो जेविला.
तुटकी ऐसी बाज, तियेवरी फाटकी ऐसी वाकळ अंथुरली ते निजावया दिधली, तयाचे पाये धुतले, चोपडीले. इतुकेनि तो संतोषिला.
तुमचि जेतुली लोखंडे आहात, तेतुकी बांधौनि आमचिये बाजीबुडी ठेवा.
पास, फाळ, इळा, कु-हाडी तुता बांधोनी, तियाचिये बाजेबुडी ठेविली. तो पहाटेचि उठिला, आधारियेचा परिसू काढिला तेथ लावुनी आपण निगोनि गेला.
तो ब्राह्मण उठिला, डोईए लोखंडे ठेवुनि शेता घेऊनि गेला. वखरू जुंपिला, तव फाळ लव लागला. तुतेनी करोनी माती फेडिली, तव माती न फिटे. इळेनी करोनी गवत घेऊ बैसला, तव गवत नेघवे. कुऱ्हाडी करूनी झाडे फेडू आदरिली, तव कुऱ्हाडी वाकली. ऐसा निधावला. लोखंडे डोईए ठेवुनी घरा घेऊनी आला.
दारी लोखंडे घातली. मग भणितले, “पापिणी पापिणी, कवणासी बि-हाड दिधले? महात्मेनी कुंजातर केले. अजि माझा सोनियाचा देहाडा वाया गेला.” “महात्मेनी कुंजातर केले? ” ऐसे भणोनी ते बाहेरी आली तव विवळले असे.
वरील माती फिटली आंतुन सोने झळझळ करीत दिसताये तिया म्हणितले, “महात्मेनी कुंजातर केले, की आमचेया दरिद्राचा मुळी इळा घातला?” ऐसे म्हणोनी ते भितरी घेऊनी गेली.
भावानुवाद: या दृष्टांतकथेची भाषा ही १३ व्या शतकात बोलली जाणारी मराठी भाषा होती. आजच्या मराठीत या दृष्टांतकथेचा भावानुवाद पुढीलप्रमाणे: कोण्या एका महात्म्याजवळ जीवन जगण्यासाठी आधार म्हणून परीस होता. तो महात्मा कोणा एका ब्राह्मणाच्या घरी रहाण्यासाठी गेला. घराच्या दारात थेंबथेंब पाणी ठिबकत होते. त्यामुळे त्याचे कपडे आंबट-ओले झाले होते.
घरातील ब्राह्मणीने ओसरीत बसण्याचे पाट ठेविले. महात्म्याचे पाय धुतले.
तांब्या भरून दिला. त्याने संध्या केली. त्यानंतर ब्राह्मण आला. त्याच्या डोक्यावर गवताची पेंढी होती. ती त्याने ठेवली. त्या गरीब ब्राह्मणाने गायीचे दूध काढले. तिने राळ्याची खिचडी रांधली, लोणी कढवले. मग त्याला वाढले. महात्मा खिचडी आणि लोणीचे जेवण जेवला.
तिने तुटक्या बाजेवर फाटकी वाकळ अंथरून महात्म्याची झोपण्याची व्यवस्था केली. त्याचे पाय धुतले व चेपून दिले. त्याने तो संतुष्ट झाला. तो तिला म्हणाला, तुमच्याकडे जेवढी म्हणून लोखंडे असतील तेवढी बाजेच्या पायथ्याशी ठेवून दे.” त्याप्रमाणे तिने पास, फाळ, विळा, कुऱ्हाड आणून बाजेच्या पायथ्याशी नेऊन ठेवले.
सकाळी ब्राह्मण उठला, डोक्यावर लोखंडी अवजारे घेऊन शेतावर गेला.
वखर जुंपले, तर फाळ लवू लागला. खुरप्याने माती खरडू लागला तर माती निघेना. विळ्याने गवत कापू लागला, तर गवत कापले जाईना. कुऱ्हाडीने झाड तोडू लागला तर कु-हाड वाकली. अखेर कंटाळला आणि डोक्यावर लोखंडी अवजारे घेऊन घरी निघाला. ब्राह्मणाने दारात लोखंडे टाकली आणि बायकोला म्हणाला, “पापिणी, कुणाला आश्रय दिला? महात्म्याने जादूटोणा केला. माझा सोन्याचा संसार लुटला गेला.” “महात्म्याने जादूटोणा केला?” असे म्हणत ती बाहेर आली. लोखंडावरची माती दूर झाली होती. आतून सोने झळाळत होते.
ती नवऱ्याला म्हणाली, “महात्म्याने जादूटोणा केला की आमच्या दारिद्र्यावर विळा घातला? दारिद्र्य दूर केले?” असे म्हणून तिने सारी अवजारे घरात नेली.