वृक्षतोड हेच महान पाप आहे असे सांगणारी एक कथा ‘शतपथ ब्राह्मणात’ आली आहे. भृगुऋषी हा वरुणाचा मुलगा होता. त्याला आपल्या विद्येचा इतका गर्व झाला की, वरुणापेक्षाही आपण जास्त विद्वान आहोत असे त्याला वाटू लागले.
हे वरुणाला समजल्यावर तो म्हणाला, “बाळ तू पूर्वदिशेला जा. तिथे काय दिसेल ते पाहून दक्षिणेकडे जा. तेथे जे दिसेल ते पाहून पश्चिमेकडे जा. तेथे जे दिसेल ते पाहून उत्तरेकडे जा आणि तुला जे दिसेल ते मला येऊन सांग.
प्रथम भृगु पूर्वदिशेला गेला. तेथे त्याला चमत्कार दिसला. काही क्रूर लोक दुसऱ्यांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करीत होते आणि ‘हे तुला, हे मला’ अशी त्यांची आपसात वाटणी करीत होते. भृगु म्हणाला- ‘हा काय भीषण प्रकार? हे दुष्ट लोक खुशाल दुसऱ्याला मारून तुकडे करून खात आहेत.’ ते ऐकून ते लोक म्हणाले, “ह्या लोकांनी आम्हाला पूर्वजन्मी असेच वागविले होते. त्याचे उसने आम्ही आता फेडतो आहोत. नंतर भृगु दक्षिणेला गेला.
पश्चिमेला गेला. पुढे उत्तरेलाही गेला. प्रत्येक ठिकाणी त्याला तशाच प्रकारचे क्रूर दृश्य पहायला मिळाले. ही सर्व दृश्ये पाहून भृगु भेदरला आणि घरी येऊन अंथरुणावर पडून राहिला. तेवढ्यात त्याचा पिता वरुण’ तेथे आला आणि म्हणाला “अरे पडून का राहिला आहेस. अभ्यास का करीत नाहीस.’ त्यावर भृगु उदास होऊन म्हणाला- ‘बाबा मी सर्व वेद पाठ केले. परंतु या पाहिलेल्या घटनांचा अर्थ मला समजला नाही. माझ्या अज्ञानाचेच मला वाईट वाटत आहे. मग हसत हसत वरुणाने पाहिलेल्या दृश्यांचे कोडे उलगडणारे स्पष्टीकरण केले. वरूण म्हणाला- ‘जे लोक तू पूर्वेस पाहिलेस ती झाडे होती.
पृथ्वीवर जे लोक झाडांच्या फांद्या, फुले, फळे अकारण तोडतात ते मेल्यावर ती झाडेही त्यांना असेच तोडून खातात. दक्षिणेस तू जे पाहिले ते सारे पशू होते. पशुधन ही समाजाची महान संपत्ती आहे. त्या पशुधनाला तितक्याच प्रेमाने सांभाळायला हवे. त्यांच्यावरही पुत्रवत प्रेम करायला हवे, त्यांना लळा लावायला हवा. परंतु तसे न करता जे लोक या पशुधनाला, या जनावरांना योग्य वागणूक देत नाहीत. त्यांना कामाला लावतात, त्यांच्या अंगावर मोठा भार देवून त्यांना श्रमवितात, त्या मुक्या जनावरांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना शिकार करून मारतात व खातात; मेल्यावर ती जनावरेही त्यांना असेच तोडून खातात.
भृगुला पर्यावरणाच्या एकएका घटकाची महती पटत गेली आणि पर्यावरणाच्या ज्ञानाशिवाय आपले पांडित्य किती थोटके होते त्यामुळे आपण किती अज्ञानी होतो, याची त्याला जाणीव झाली. शेवटी वरूण म्हणाले – ‘पुत्रा जगात झाडे तोडणे, जनावरांना राबविणे आणि त्यांची शिकार करणे हेच मोठे पापाचरण आहे. हे ज्याला समजते तोच खरा ज्ञानी होय. ज्यांच्यामुळे हा निसर्ग सुंदरतेचे रूप धारण करतो त्यावर आघात करणे हेच मोठे पाप आहे. तुला ही जाणीव झाल्याशिवाय तुझे ज्ञान अपूर्णच राहील.
भृगु ऋषि हे महान तत्त्ववेत्ते, महाकवी आणि शास्त्र ज्ञानातील व्यासंगी होते परंतु त्यांना सुद्धा आपल्या ज्ञानाची परिपूर्णता होण्यासाठी निसर्गातील झाडे, पशू, वनस्पती यांचे अंतरंग जाणणे आवश्यक ठरले. निसर्ग हाच परमात्मा आहे आणि निसर्गाचे रक्षण व जाणीव हेच यथार्थ ज्ञान आहे असे सांगणारी ही प्राचीन कथा ऋषिमुनींच्या जीवनातही पर्यावरणाविषयी कोणती दृष्टी होती याचे मोठेपण सांगून जाते.