राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.
जेव्हा विश्वामित्राला समजले की नंदिनी गाईच्या प्रभावामुळे वसिष्ठ हे सारे करू शकले तेव्हा विश्वामित्राने वसिष्ठ मुनींकडे ती गाय मागितली. कोणत्याही प्रकारे आणि कितीही किंमत दिली तरी ती गाय देण्यास वसिष्ठांनी नकार दिला. आपल्या बलसामर्थ्याने विश्वामित्र नंदिनीला ओढून नेऊ लागले. परंतु वसिष्ठाच्या आदेशाने नंदिनीने आपल्या हुंकारातून मोठमोठे वीर योद्धे निर्माण केले आणि त्या योद्ध्यांनी विश्वामित्राच्या सैन्याला पिटाळून लावले.
राजा विश्वामित्राने बरीच दिव्यास्त्रे सोडली पण वसिष्ठाच्या ब्रह्मदंडाला स्पर्श करताच ती निस्तेज बनू लागली. विश्वामित्राने आणखी कठोर तपश्चर्या करून आणखी काही दिव्यास्त्रे निर्माण केली पण वसिष्ठांच्या सामर्थ्यापुढे ती कुचकामी ठरली तेव्हा विश्वामित्राला समजले की ‘ क्षात्रबल तपस्वी ब्राह्मणाला पराजित करू शकत नाही. शेवटी त्याने स्वतः ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केला आणि त्यासाठी कठोर तपश्चर्या केली. शेकडो वर्षाच्या उग्र तपस्येनंतर प्रत्यक्ष ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, ‘जर वसिष्ठ मुनी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणून मान देत असतील तरच तुम्ही ब्राह्मण म्हणून संबोधले जाल.’ आता वसिष्ठासमोर नतमस्तक होणे हे विश्वामित्राला अपमानास्पद वाटले.
जेव्हा जेव्हा विश्वामित्राचा वसिष्ठाशी संबंध येत असे तेव्हा तेव्हा वसिष्ठ त्याला ‘राजर्षी’ म्हणून संबोधित असे. ‘राजर्षी’ म्हणून हाका मारली की विश्वामित्राचा राग अधिकच वाढत असे. शेवटी शेवटी रागाचे पर्यवसान शत्रुत्वात झाले व विश्वामित्र वसिष्ठाचे कट्टर शत्रू बनले. एका राक्षसाच्या सांगण्यावरून विश्वामित्राने वसिष्ठाचे शंभर पुत्रही ठार केले आणि वसिष्ठाला घोर अपमानित करण्याच्या संधीची तो वाट पहात होता.
शेवटी नवीन सृष्टी निर्माण करण्याचा त्याने संकल्प केला आणि आपल्या तपोबलाने नवीन अन्न, नवीन झाडे, वेली, पशु-पक्षी बनविले. शेवटी ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष येऊन त्याला थांबविले आणि ‘तू निर्माण केलेले प्राणी-पक्षी-झाडेही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतच इतरांप्रमाणेच रहातील’ असे आश्वासन दिले.
आता सर्वच उपाय थांबल्यानंतर विश्वामित्राने वसिष्ठाला मारण्याचाच बेत केला. समोर जाऊन कित्येक वेळा पराजय झाला. शेवटी एकदा लपत छपत रात्रीच्या वेळी ते वसिष्ठाला मारण्यासाठी आश्रमाजवळ गेले व आश्रमाबाहेरील गवतात लपून बसले.
बाहेर चांदणे पसरले होते. वसिष्ठ आणि त्यांची पत्नी आश्रमाबाहेरील अंगात गप्पागोष्टी करत होते.. वसिष्ठांची पत्नी अरुंधती म्हणाली- “आज चंद्राचा प्रकाश किती लख्ख पडला आहे.” वसिष्ठ म्हणाले.
आजकाल विश्वामित्राच्या तपोबलाच्या तेजाप्रमाणेच आजच्या चंद्राचाही प्रकाश तेजस्वी झाला आहे. ह्या प्रकाशाकडे पाहिल्यावर मला विश्वामित्राच्या दिव्य तेजाची आठवण होत आहे.’ लपून बसलेला विश्वामित्र हे ऐकत होता. त्याचे एक मन म्हणाले, ‘अहंकारी विश्वामित्रा तुझा धिक्कार असो. अरे ज्याला मारण्यासाठी तू आला आहेस, ज्याचे शंभर पुत्र ठार करून तू त्याला त्रास दिला आहे.
ज्याच्याविषयी तुझ्या मनात द्वेषाचा अग्नी भडकतो आहे, त्या महर्षी वसिष्ठाचे केवढे मोठेपण की जो आपल्या प्रिय पत्नीलाही तुझी यशोगाथा सांगतो आहे.
तोच खरा मोठ्या मनाचा महात्मा आहे.’ आणि तात्काळ विश्वामित्राने आपल्या हातातली शस्त्रे टाकून दिली व त्याने वसिष्ठांच्या पायावर डोके ठेवले. त्यांचे दास्यत्व स्वीकारले. त्यामुळे वसिष्ठांविषयीचा समूळ द्वेष नाहीसा झाला. साधु-महात्मे तर शत्रूवरही प्रेम करतात मग विश्वामित्र तर शत्रुत्व झुगारून देऊन शरण आला होता.
वसिष्ठांची क्षमा बुद्धी जागी झाली आणि ते उद्गारले. ‘विश्वामित्रा, द्वेष आणि शस्त्रयांचा त्याग करून तू आज ब्राह्मणत्व पदाला पोचला आहेस!’ विश्वामित्र म्हणाले- ‘महर्षी, मी द्वेष आणि शस्त्र यांचा नुसता त्याग केला नाही तर आजपासून आपले दास्यत्व स्वीकारले आहे.’ वसिष्ठाला गहिवरून आले आणि विश्वामित्राचे दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवून ते म्हणाले — ‘उठा ब्रह्मर्षी विश्वामित्र.’ घोर युद्ध, द्वेष, शत्रुता, तपोबल या सर्वांपेक्षाही त्याने शरणागत होऊन दास्यत्व स्वीकारले तेव्हाच तो ब्रहर्षी पदाला पोचला. “दास्यभक्तीत एवढे महान सामर्थ्य आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात संताचिया पायी हा माझा विश्वास ॥ सर्वभावे दास झालो त्यांचा !!