एकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता (अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही, मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ करहणमाता या तिघांना न जुमानता जोरात म्हणाली, ‘तुम्हा तिघांपेक्षा मीच मोठी देवता आहे.’ त्यांच्यातला झगडा काही संपेना! शेवटी आपला झगडा घेऊन ते देवांचा राजा इंद्र यांच्याकडे गेले.
अग्नीदेवाचा राग अजूनही कमी झालेला नव्हता. इंद्राच्या दरबारात पाय ठेवताच अग्नीदेव म्हणाले, “देवाधि देवा, मी अग्नीदेवच या धरतीवरील मोठा देव आहे ना? माझं म्हणणं हे ऐकतच नाहीत. आपणच हा झगडा मिटवावा.” वरुणदेव, वृषभदेव, करहणमाता आपापले मोठेपणा व महिमा सांगू लागले.
इंद्रदेवाने त्यांना शांत केलं. त्यांची समजूत काढली आणि सांगितलं की सर्व देवतांचा दरबार भरवून सर्व साक्षीने तुमच्यातील मोठा देव कोण ते जाहीर करतो. चारही देवता आपापल्या वाटेने निघून गेल्या.
राजा इंद्राने सर्व देवतांना तातडीचे बोलावणे पाठवून दरबार भरवला. ठरल्याप्रमाणे सर्व देवता इंद्राच्या दरबारात हजर झाल्या. पण एक देवता सभेस हजर नव्हती. त्या देवतेचे नाव विलदातीबाई होते. राजा इंद्रदेव जमलेल्या देवतांना म्हणाला, या झगड्याचा अचूक निवाडा विलदातीबाईच करू शकेल.
त्यांच्या गैरहजेरीत हा निवाडा होणे संभव नाही. राजा इंद्राचे म्हणणे सर्वांना पटले. देवदरबारात हजर असलेला अरहणपुयु नावाचा देव इंद्राला म्हणाला, देवाधिदेवा विलदातीबाईंना देवदरबारात घेऊन येण्याची कामगिरी मझ्यावर सोपवा. मी ते काम करीन.
विलदातीबाई सातासमुद्रापलीकडे राहत होती. अरहणपुयु देव विचार करतो. सात समुद्र ओलांडून पार जायचे कसे? त्यांनी आपल्या दोन्ही हाताचा मळ काढला. मळाचे मगर बनविले. मगरीला जिवंत केले. तिला पाण्यात सोडतांना अरहणपुयु देव म्हणाले, “मगरी मगरी, सातसमुद्र पार करण्याची ताकद तुझ्यात असेल तर तू तरंगत राहशील, नाहीतर बुडून मरशील.” मगर तरंगत होती. अरहणपुयु देवाला आनंद झाला. त्याने मगर छातीला बांधली आणि प्रवासाला निघाला.
सात समुद्र पार केल्यावर अरहणपुयु देवाला विलदातीबाईचे घर दिसले.
विलदातीबाई नुकतीच आंघोळ आटोपून बसली होती. अरहणपुयुदेव आपले येण्याचे कारण सांगतो. इंद्राच्या दरबारात सर्व देवदेवता आपली आतुरतेने वाट बघताहेत हे ऐकताच विलदातीबाईंनी एक मण महू आणि एक मण भांग याची एक गोळी करून चिलिममध्ये भरली व चिलिम पेटवली. त्याबरोबर खूप धूर झाला आणि एका क्षणात विलदातीबाई आणि अरहणपुयु देव दरबारात हजर झाले.
राजा इंद्र आणि इतर देवतांनी विलदातीबाईचे स्वागत केले. हजर देवतांच्या संमतीने विलदातीबाईने झगड्याचा निवाडा करायला सुरूवात केली. चौघांना समाधानकारक निवाडा मिळावा म्हणून एक प्रयोग केला. या प्रयोगासाठी तिने एका माणसाची निवड केली आणि आठ दिवसांचा कालावधी मागून घेतला. त्या माणसाला जंगलात सोडून, तिथे अग्निदेवतेचे दर्शन घडणार नाही अशी सोय केली. पण त्या माणसाचे फारसे नुकसान झाले नाही. आठ दिवसांनतरही तो जिवंतच होता.
त्यानंतर विलदातीबाईने त्या माणसाला आठ दिवस अन्नदेवतेपासून दूर ठेवले. तो झाडांची पाने, फळे खाऊन जिवंत राहिला.
त्यानंतर विलदातीबाईने त्या माणसाला आठ दिवस वृषभ दर्शन घडू दिले नाही. तरीही तो माणूस जिवंत राहिला. त्यानंतर त्या माणसाला आठ दिवस पाण्याशिवाय ठेवले. माणूस जेमतेम एक दिवस, दुसरा दिवस राहू शकला.
तिसऱ्या दिवशी पाणी-पाणी करीत तो वेड्यासारखा फिरू लागला. आठ दिवसानंतर तो मरायला टेकला.
या छोट्याशा प्रयोगावरून विलदातीबाईने हे समजावून सांगितले की, माणूस अग्नी, वृषभ, अन्न या वाचून राहू शकेल, पण पाण्याशिवाय जगणे शक्य नाही.
आठ दिवसानंतर पुन्हा इंद्रदेवाच्या नगरीत देव-देवतांचा दरबार भरला.bसगळेजण निवाडा ऐकण्यासाठी उत्सुक होते. विलदातीबाईने अतिशय शांतपणे आपला निवाडा जाहीर केला, अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता या चौघा देवतांमध्ये मला वरूणदेवतेचे पारडे जड वाटते. आपण पाहिलेच की माणूस अग्नी, वृषभ, अन्न याशिवाय काही काळ जगू शकेल पण पाण्याशिवाय जीवन जगणे असंभव आहे. म्हणून या धरतीवरील मोठी देवता वरुणदेव आहे. सर्व देवतांनी एकमताने वरुणदेवाचा महिमा मानला. वरुणदेवाचा जयजयकार झाला.
अग्नीदेव, वृषभदेव आणि करहणीमाताही वरुणदेवाचा महिमा मानतात. त्यांच्यातला झगडा विलदातीमातेने हुशारीने सोडविला. इंद्रासकट सर्व देवता या निवाड्याने खुश होत्या. पण परत झगडा नको म्हणून विलदातीमातेने अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणीमाता यांना जवळ बोलाविले आणि सांगितले, वरुणदेवा आपण रांजणात राहवे, अग्नीदेवा आपण चुलीत रहा, वृषभदेवा आपण गोठ्यात रहा आणि करहणमातेने कोठीत राहावे. अशाप्रकारे विलदातीमातेने चारही देवतांच्या जागा ठरवून दिल्या. तेव्हापासून चौघेही आपापल्या जागी राहून आपले काम सुरळीतरित्या पार पाडताहेत!