मेरे घर राम आये हैं
Category:
कथा साहित्य - ललितवरात एकाएकी थांबली . गाणं वाजवण्यात दंग झालेला बँड बंद झाला .
भल्या मोठ्या स्पीकर्सच्या प्रचंड भिंती अचानक अबोल झाल्या . रस्त्यावर बेभान होऊन नाचणारे , लोळण घेवून नागीण डान्स करायला अधीर झालेले , मान खाली घालून एक हात उंचावत , वाद्यांच्या ठेक्यावर डोलणारे इकडे तिकडे बघू लागले .
फुकटची दारू ढोसायला मिळाल्याने कसाबसा तोल सांभाळत घरंगळल्या सारखे चालणारे उभं राहण्याचा प्रयत्न करू लागले . हॅलोजन प्रखर हेडलाईट्स, डोळे आणि मेंदू चक्रावून टाकणाऱ्या विविध रंगी लाईट्सच्या माळा आणि विविध रंगी लेझरचे प्रकाशझोत चालू होते
वरात का थांबली हे कुणालाच कळत नव्हतं . हॉलमधून निघून देवळात आणि तिथून नवरदेवाच्या घरी इतकाच प्रवास होता . दोन किलोमीटर इतकंच तर सगळं अंतर होतं . दोन तास झाले पण अर्धा किलोमीटर अंतर जेमतेम पार झालं होतं . या हिशोबानं किती वेळ लागणार होता ते कुणाला सांगता येत नव्हतं .