मोती पोवळ्याची मोष्ट

एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.



(अहिराणी लोककथा)

एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.

त्याचवेळी शंकर-पार्वती नंदीवर बसून चालले होते. शेतकऱ्याची हाक ऐकून पार्वतीला त्याची दया आली. शंकर-पार्वतीने त्याला विहिरीतून बाहेर काढले. शेतकरी म्हणाला, “तुम्ही फार चांगले लोक दिसतात, मला विहिरीतून बाहेर काढलं बरं झालं, मी आंधळा आहे, मला घरापर्यंत पोहचवून द्याल तर बरं होईल.”

शंकर म्हणाले, “या नंदीची शेपटी धरून तू घरी जा.’ शेतकरी नंदीची शेपटी धरून शेतातून चालायला लागला. नंदी जस-जसा पावलं टाकायचा तस-तसे तिथल्या मातीतल्या खड्यांचे मोती- पोवळे बनायचे. नंदीने शेतकऱ्याला घरापर्यंत पोहचवले. तेव्हा शेतकरी म्हणाला, “नंदीबा, मला रोज असं घरापर्यंत सोडशील का?” नंदीने रोज त्याला सोडायचं कबूल केलं.

सकाळी गावातल्या लोकांना, शेतकऱ्यांना आपापल्या शेतात मोती-पोवळे आढळले. काही लोकांनी हे मोती- पोवळे शेतकऱ्याच्याही दारात पाहिले. सगळ्या गावात चर्चा होऊ लागली की हा म्हातारा शेतकरी रोज रात्री चोरी करतो. शेवटी ही चर्चा राजाच्या कानावर गेली. राजाने म्हाताऱ्या शेतकऱ्याला बोलावले आणि विचारले, “का रे बाबा, तू रोज रात्री मोती-पोवळ्याची चोरी करतोस, हे खरं आहे का?” शेतकरी म्हणाला, “नाही महाराज, मी खरंच कशाची चोरी करत नाही. पण मला दिसत नसल्यामुळे मी विहिरीत पडलो आणि मला दोन सज्जन लोकांनी
त्यातून बाहेर काढलं आणि त्यांनीच मला सांगितलं की नंदीची शेपटी पकडून तू घरी जा. आणि रोज मला हा नंदी घरी आणून पोहचवतो.” राजा म्हणाला, “ठीक आहे, आज मी पण येतो तुझ्याबरोबर शेतात.”

ठरल्याप्रमाणे राजा त्याच्याबरोबर शेतात गेला. संध्याकाळ होताच नंदी शेतात आला, म्हाताऱ्या शेतकऱ्याने त्याची शेपटी धरली आणि नंदी शेतकऱ्याच्या घराकडे चालायला लागला. नंदी जस-जसा चालायचा तशा त्याच्या पावलाखालच्या खड्यांचे मोती-पोवळे होतांना राजाने पाहिले आणि राजा आश्चर्यचकित झाला. सगळ्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्याला त्याने दरबारात बोलावले. आणि सांगितले, “तो नंदी हा शंकर-पार्वतीचा नंदी आहे. शंकर-पार्वतीने या शेतकऱ्याला विहिरीतून बाहेर काढलं. अशा या देव माणसाचा मी नमस्कार करतो.” ओंजळभर मोहरा देऊन राजाने शेतकऱ्याचा सन्मान केला आणि गावकऱ्यांना सांगितले, “कोणालाही चोर म्हणण्यापूर्वी तो खरंच चोर आहे का याची खात्री करून घ्यावी. उगाचच कोणालाही बदनाम करू नये.” त्या दिवसापासून म्हाताऱ्या शेतकऱ्याला सगळेच आदराने ‘बाबा’ म्हणू लागले.

Author