एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती
गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.
झाडांची, वेलींची नासधूस करायचा. आजीला त्याचा राग यायचा. पण काही केल्या तिला उपाय सापडेना. एकदा दोनदा भाजलेले हरभरे, शेंगदाणेही त्याने पळवले. अखेर या कोल्ह्याची खोड मोडायची तिने ठरविले. तिने चुलीत निखारे पेटविले. त्यावर तवा तापविला. हरभरे भाजले. तापल्या तव्याखाली राखेत निखारे तसेच ठेवले. दारात बोरांची पाटी ठेवली. मागच्या पडवीत दिवा विझवून झोपून राहिली. रात्र झाली. थंडी पडली होती. बोरांच्या वासाने कोल्हा घरात शिरला आणि बोरे खाल्ली. चुलीतल्या हरभऱ्याच्या वासाने तिकडे वळला. राखेतली ऊब चांगली वाटली म्हणून त्यावर बसला. तापल्या तव्याचा चटका बसला. ओरडत ओरडत बाहेर पळाला. पुन्हा तिकडे फिरकलाच नाही. आजी म्हणाली, “बोरोली पिकली गांडोली शेकली” शक्तिपेक्षा युक्ती कामी आली. म्हातान्या सारजा आजीची दांडग्या कोल्ह्याच्या त्रासातून सुटका झाली.